फरक

By Admin | Updated: March 8, 2015 16:17 IST2015-03-08T16:17:40+5:302015-03-08T16:17:40+5:30

‘लक्षात घ्या, वर्क ऑफ आर्ट काय आहे हे लक्षात घेतल्याशिवाय, आर्ट ऑफ वर्क काय असतं हे लक्षात येणार नाही. कलेचं काम वेगळं, कामाची कला वेगळी.

The difference | फरक

फरक

>चंद्रमोहन कुलकर्णी
 
गोंधळेकर सर वर्षातून एकदोनदाच शिकवायला येत. फार स्वच्छ शब्दात सांगत, ‘‘लक्षात घ्या, वर्क ऑफ आर्ट काय आहे हे लक्षात घेतल्याशिवाय, आर्ट ऑफ वर्क काय असतं हे लक्षात येणार नाही. कलेचं काम वेगळं, कामाची कला वेगळी.’’
---------------
अँप्लाईड आर्ट्समधलं शिक्षण घेत होतो. अर्थात व्यापारी कला समजावी म्हणून.   
‘जाहिरात : कला व कल्पना’ हे पुस्तक. आणि एकूणच चित्रशिल्पकलेच्या इतिहासासाठी कलेचा इतिहास.
दोन्ही विषय शिकवायला वर्षाच्या शेवटी वर्षातून एकदोनदाच ओळीनं चारसहा दिवस लेक्चर्स होत.
अँडव्हर्टायझिंगसाठी मुंबईहून येत गजानन मंगेश रेगे.
आणि कलेच्या इतिहासाकरता ज. द. गोंधळेकर सर.
 
परवाच कुणीतरी विचारलं की,
नेमका काय फरक कर्मशियल आर्ट आणि फाइन आर्टमधे? 
तेव्हा साक्षात गोंधळेकर सर आठवले.
गोंधळेकर सर म्हटलं की पूर्ण बाह्यांचा, पूर्ण गळा झाकेल असा आणि हिरवार्जद टी शर्ट घातलेली त्यांची मूर्ती आठवते. जाड फ्रेम आणि जाडच काचांमधून लुकलुकणारे डोळे आठवतात.
आठवते आहे ती त्यांची ती ओठापर्यंत जळत आलेली, टोकाशी अर्धा पाऊण इंच राख साठलेली विना फिल्टरची सिगरेट.
हिरवा टी शर्ट, तोंडात ओठापर्यंत जळत आलेली सिगरेट असं एक अगदी छोटं, रॅपिड सेल्फ पोट्रेट  करताना उपस्थित असणार्‍या चारपाच जणांच्या गर्दीत मीही डोळे विस्फारून आणि अंग चोरून उभा होतो.
 
तर कट टू हिस्टरी ऑफ आर्ट.
महाकंटाळवाणा विषय. 
काही विषयांबद्दल अनास्था निर्माण व्हायचं कारण ते विषय आपल्याकडे ज्या पद्धतीनं शिकवले जातात, त्यात असावं!
कलेचा इतिहास शिकवतानासुद्धा सनावळ्या पद्धतीनं शिकवण्याची पद्धत होती. भारतीय आणि युरोपिय कलेचा इतिहास. तीच ती मोहनजोदरो आणि हडप्पा संस्कृती. हाततुटक्या बायांचे पुतळे आणि बैलगाड्या, त्याकाळची खेळणी, हाडांचे दागिने आणि फुटक्या खापरांचे तुकडे. अजिंठा, एलोरा आणि मंदिरशिल्पं. (त्यातल्या त्यात खजुराहो इंटरेस्टिंग!) 
युरोपियनमधे तोच तो रेनेसान्स पीरियड, इम्प्रेशनिस्ट, पॉइंटॅलिझम ते पार क्यूबिझमपर्यंत. 
कुणीतरी सांगायचं, कर्मशियल आर्टला काही उपयोग नसतो हिस्टरी ऑफ आर्टचा! 
झालं! आधीच उल्हास..!
गोंधळेकर सर म्हणत,  
‘‘हा महत्त्वाचा विषय तुम्हाला रटाळ वाटणं स्वाभाविक आहे, कारण तो आत्तापर्यंत रटाळ पद्धतीनं शिकवला गेलाय. मला हा विषय नीट समजलाय. हा विषय माझा आहे, माझ्या पद्धतीनं मी तो शिकवणार आहे. अभ्यासक्र म तयार करण्यात माझाही मोठा सहभाग आहे. चारसहा दिवसात मला सगळा पोर्शन ओळीनं पूर्ण करायचाय. शिकण्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे की नाही, हे मला माहीत नाही, शिकवण्यात मला इंटरेस्ट आहे, हे नक्की! तेव्हा, शिकवण्याचा आनंद मला घेऊ द्या!’’
आणखी एक सरळ थेट सूचना असे,
‘‘ज्यांना शिकायचं नाहीये, त्यांनी वर्गात बसू नका. हे मी रागावून बोलत नाहीये, मनापासून बोलतोय. परीक्षेचा पेपर मीच काढत असल्यामुळे इथून जाताना सर्वात शेवटी मी तुम्हाला वीस संभाव्य प्रश्न देईन. त्याची उत्तरं तुम्ही पाठ करा, परीक्षेत लिहा, पास व्हा. पण आत्ता  ज्यांना शिकायचंय त्यांना आणि मला त्रास देऊ नका.’’
 
एवढं झाल्यावर मुद्दा पटून काहीजण आत राहत, बरेचजण बाहेर! बाहेर जाणार्‍यांचं किती नुकसान झालं, ते सांगता नाही येणार, पण आत राहिलेल्यांचा फार फायदा झाला आणि तोही आयुष्यभराचा, हे मात्र नक्की!!
 
मग पुढचे सगळे दिवस त्यांच्या खास पद्धतीनं इतिहास समजावून सांगितला जायचा. सनावळ्या वगळून!
अँप्लाईड आर्टचा कोर्स नवा असला तरी उपयोजित कला विकसित होत होत अँडव्हर्टायझिंगपर्यंत कसकशी आली, हे सांगताना म्हणत,  
‘‘तुम्हाला अँप्लाईड आर्ट समजायची असेल, तर फाइन आर्ट काय आहे ते आधी समजलं पाहिजे. एका अर्थानं तुमचा दुहेरी फायदा!’’
 
खरं तर त्यांनी हे सगळं काही केलं नसतं, फक्त कलेचा टिपिकल इतिहास टिपिकल पद्धतीनं शिकवून घरी गेले असते तरी चाललं असतं. पण विद्यार्थ्यांच्या भवितव्याची ज्यांना खरंच काळजी असते, ते हाडाचे शिक्षक तसं करत नाहीत. इतिहास शिकवण्यामागचा आणि तो शिकण्यामागचा उद्देश लक्षात आणून देत. त्या अनुषंगानं फाइन आर्ट आणि कर्मशियल आर्टवर थोडी चर्चा करत, उद्देश, फरक सांगत.
 
फार स्वच्छ शब्दात सांगत, ‘‘लक्षात घ्या, वर्कऑफ आर्ट काय आहे हे लक्षात घेतल्याशिवाय आर्ट ऑफ वर्क  काय असतं हे लक्षात येणार नाही. फाइन आर्ट, पेंटिंग म्हणजे वर्कऑफ आर्ट. खर्‍या अर्थानं ते आज किती होतं हा वेगळा मुद्दा आहे, पण तिचा इतिहास आपल्याला  शिकायला हवा. कलेचं काम वेगळं, कामाची कला वेगळी. काम कसं करावं, त्याचं उपयोजन कसं, कुणाकडून, कशासाठी करून घ्यावं हे शिकणं म्हणजे अँप्लाईड आर्ट, उपयोजित कला. तुमच्या भाषेत : कर्मशियल आर्ट!’’
- नेमका फरक कायमचा, नीट, लवकर कळला!
 
वर्कऑफ आर्ट ही गोष्ट वेगळी आणि आर्ट ऑफ वर्क ही गोष्ट वेगळी!
 
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)

Web Title: The difference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.