साहित्य संमेलन फेकायचे की सावरायचे?
By Admin | Updated: December 6, 2014 18:07 IST2014-12-06T18:07:35+5:302014-12-06T18:07:35+5:30
कुटुंबातील एखाद्याला आवडत नाही म्हणून कुळाचार फेकून देता येत नाहीत. म्हणूनच मराठी समाजाचा वाड्मयीन कुळाचार असलेल्या संमेलनाला हिणवण्याऐवजी शुद्ध कसे करता येईल, याचा विचार व्हायला हवा. साहित्य संमेलनावरील टीकेच्या पार्श्वभूमीवर एका माजी संमेलनाध्यक्षांचे सखोल चिंतन.

साहित्य संमेलन फेकायचे की सावरायचे?
>- डॉ. द. भि. कुलकर्णी
समाज म्हणजे समूह नव्हे. समाज अनेक व्यवस्था आणि यंत्रणा यांनी सिद्ध झालेला असतो. काही व्यवस्था स्पष्ट दिसतात, काही यंत्रणा अदृश्य राहून कार्य करीत असतात. भाषा व्यवस्था अदृश्य असते, पण विशिष्ट भाषांच्या रूपाने ती दृश्य होत असते. भाषा व्यवस्थेचे महत्त्व जाणून मातृभाषेवर प्रेम करायचे असते. तिचे संगोपन आणि संवर्धन करायचे असते. कौटुंबिक व्यवहारापासून सर्व सार्वजनिक व्यवहारात तिचे उपयोजन करावयाचे असते. अशा उपयोजनातूनच तर बोली-भाषा-पोटपरिभाषा-परिभाषा यांची निर्मिती होत असते.
भाषा संस्था, भाषा व्यवस्था, भाषा यंत्रणा या अखंड, पण तरीही परिवर्तनशील असतात. यापैकी कुठलाही घटक समूळ उखडून टाकणे घातक असते. त्यामुळे संस्कृतिसातत्य, अर्थसातत्य व मुख्य म्हणजे अस्मिता यांचाच नाश होतो. क्रांतीमुळे असा सर्वनाश होतो, म्हणून तर क्रांती ‘स्वत:ची पिल्ले खाते,’ असे म्हणतात. आजचा काळ ‘यूज अँड थ्रो’चा आहे, असे म्हणतात. ते का गैर आहे, हे आता लक्षात येईल. वस्तू काय आणि माणसे काय दुरुस्त करायची असतात. फेकून द्यायची नसतात, हेच आपण विसरत चाललो आहोत. जुनी वस्तू जशीच्या तशी वापरायची नसते. तिच्यात हळूहळू उचित बदल करायचा असतो. कसा? संपूर्ण गाडी एकदम बदलावयाची नाही किंवा एकदम फेकूनही द्यायची नाही. तिच्यातला एक एक भाग बदलवत जायचा. मग एक दिवस असा येतो, की तिचा फक्त नंबर कायम असतो. पण तिच्यातील प्रत्येक भाग नवा असतो.
साहित्य संमेलनाबाबत असेच घडत आलेले आहे, हे आपले भाग्य. उदारमतवादी आणि नेमस्त न्या. महादेव गोविंद रानडे यांनी १८७८ मध्ये ‘साहित्य संमेलन’ या यंत्रणेची पुण्यात पायाभरणी केली. तिला नाव दिले ‘ग्रंथकार संमेलन.’ सहकार्यांनी न्यायमूर्तींनाच अध्यक्षपद प्रदान केले. गंमत म्हणजे तेव्हा न्यायमूर्तींच्या नावावर एकही ग्रंथ नव्हता!
स्वाभाविकच या नेमस्त यंत्रणेला जहाल जोतिबा आणि जहाल लोकमान्य यांनी विरोध केला- तो स्वाभाविकच होता. नेमस्त वृत्तीमुळे प्रारंभापासूनच साहित्य संमेलनाची भूमिका सहिष्णू समन्वयात्मक आणि सर्वसमावेशक होती, म्हणूनच साहित्य संमेलनाच्या नामरूपात वेळोवेळी परिवर्तन होत गेले. जसे, ग्रंथकार संमेलनाचे साहित्य संमेलन झाले, साहित्य संमेलनाचे साहित्यिक संमेलन झाले आणि आज ते मराठी समाजाचे वाड्मयीन सण, कुळाचार आणि उत्सव झाले आहे. विदर्भामध्ये- विदर्भातच का, खान्देश मराठवाड्यातही महालक्ष्म्यांचा उत्सव असतो, तीन दिवसांचा. मोठय़ा घरी. तिथे सगळ्या धाकट्या पाती निमंत्रणाविना हजेरी लावतात. तिथे तेव्हा भाऊबंदकी, सासूरवास, ज्येष्ठ-कनिष्ठ, गरीब-श्रीमंत हे भेद आडवे येत नाहीत. एकोप्याने सण साजरा होतो. हरेक कुटुंब आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करतं. तो एकोपा पाहून ज्येष्ठा-कनिष्ठा आणि त्यांची दोन बाळं खुदकन हसतात. संपूर्ण परिवाराला आशीर्वाद देतात. नेहमी असं वाटतं, खासगी गणेशाचा सार्वजनिक गणपती झाला. तद्वत पारिवारिक उभ्या महालक्ष्म्यांची सार्वजनिक महालक्ष्मी व्हावी-कुणातरी ‘लोकमान्य’ नेत्याने असा विचार करावा. त्या सार्वजनिक महालक्ष्म्यांसमोर व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे यांचे आयोजन व्हावे. महालक्ष्म्यांची मिरवणूक निघावी. हे होईल तेव्हा होवो. आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महासरस्वतीचा कुळाचार सांभाळत आहे. तिथे जातिभेद-पक्षभेद-पंथभेद विसरून संपूर्ण मराठी समाज एकोप्याने सामील होत आहे. परंपरा नष्ट करणे सोपे; परंपरा शुद्ध करणे कठीण!
आज साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिकांचे संमेलन नाही, तो मराठी समाजाचा साहित्योत्सव आहे, वादही आहेतच. त्यांना बिचकायचे नाही, समजून घ्यायचे.
हा वाड्मयीन उत्सव असल्यामुळे त्याच्या अध्यक्षपदावर केवळ साहित्यिकांचाच नव्हे, तर विचारवंत, संशोधक, पत्रकार, प्रकाशक, संपादक, ग्रंथपाल या सर्वच ग्रंथनिष्ठांचा अधिकार आहे. अशी ज्यांची उदार आणि विवेकनिष्ठ दृष्टी नसेल त्यांनी त्या पदापासून दूर राहणेच योग्य. निवडणूक, निधी, कार्यक्रमांचे स्वरूप या संदर्भातील सुधारणा कोणत्या, याचे उत्तरही या भूमिकेतच दडले आहे.
साहित्य संमेलन : उजळ तुझे भाळ
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे भवितव्य काय? मराठी भाषा मरणपंथाला लागली आहे व लवकरच ती मरणार आहे, असे भविष्य फार पूर्वीपासून फार विद्वानांनी वर्तविले आहे. तसे झाले नाही, तसे होणार नाही. यवनांची राजवट. फारशीचे वर्चस्व. तरी मराठी नष्ट झाली नाही. फक्त बदलली. इंग्रजांची राजवट. इंग्रजी भाषेचे वर्चस्व. तरीही मराठी मेली नाही. राज्यघटना, हिंदी चित्रपट. हिंदी सिनेसंगीत. रूपवाणी. हिंदी मालिका. नागपुरीच नव्हे, पुणेरी मराठीवरही हिंदीचा संस्कार. तरीही मराठी धट्टीकट्टी. जे मराठी भाषेबद्दल खरे आहे तेच साहित्य संमेलनाबद्दलही खरे आहे. १८७८ मध्ये सुरू झालेली ग्रंथगंगा वळणे घेत घेत, अनेक उपनद्यांना आत्मसात करीत आज महानदीच्या रूपात वाहतेच आहे. ज्यांनी विरोध केला, त्यांनीही साचा मूळ संमेलनाचाच स्वीकारला. त्यातले वैचारिक पाणी वेगळे होते,यात शंका नाही. जन साहित्य, स्त्री साहित्य, बाल साहित्य, अस्तित्ववादी साहित्य, विज्ञान साहित्य, विद्रोही साहित्य इत्यादी प्रवाहांना अ.भा.सं. ने आत्मसात केले असते, सन्मानित केले असते, तर या चुली कशाला पेटल्या असत्या! समन्वयवादी माऊलीने म्हटलेच आहे, ‘वोहळे हेचि करावें। जे गंगेचे आंग ठाकावे। तरी ते गंगा नोहे। मग काय करी।’
साहित्य संमेलन समन्वयवादी, उदारमतवादी भूमिकेतूनच निर्माण झालेले आहे. त्याचा आज सर्वांनाच विसर पडला आहे. महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान आणि महाराष्ट्राची संस्कृती समन्वयवादाचे प्रतीक आहे. वाद घालायचे समन्वयासाठी, तोडफोडीसाठी किंवा विनाशासाठी नाही. भावी काळात मराठी मरणार नाही, पण बदलेल तद्वत साहित्य संमेलन नष्ट होणार नाही, फक्त बदलेल, कसे?
१) सध्या मतदारांची संख्या १ हजाराच्या आसपास आहे. ती किमान १0 हजारापर्यंत वाढवावी.
२) मतदान केंद्र एकच नको अनेक हवीत.
३) त्यासाठी इ-मशिनचा वापर करावा.
४) कोर्या मतपत्रिका देणेघेणे हा गंभीर गुन्हा ठरवावा.
५) अध्यक्षीय उमेदवारांनी निवडणुकीपूर्वी एकत्र येऊन मतैक्याने एकाची निवड करावी.
६) ते शक्य न झाल्यास सर्वांनी मिळून मतदारांना उद्देशून, एकच आवाहनपत्र काढावे. त्यामुळे धन आणि श्रम यांची बचत होऊन वातावरणही खेळीमेळीचे राहील.
७) निवडणुकीत ज्या उमेदवारास दुसर्या क्रमांकाची मते मिळतील त्यालाही संमेलनात सन्मानित करावे व त्याचे लेखनक्षेत्र लक्षात घेऊन शाखासंमेलन भरवावे व त्या शाखा संमेलनाचे अध्यक्षपद त्यास द्यावे.
८) संमेलनात ज्येष्ठ विचारवंत/ ज्येष्ठ साहित्यिक/ उत्तम वक्ता यांचेही दीर्घ व्याख्यान ठेवावे.
९) महाविद्यालयीन व विद्यालयीन छात्रांना उत्तेजन मिळेल, असे त्यांचे कथाकथन, काव्यवाचन असे कार्यक्रम असावे.
१0) विनोदी वक्तृत्व स्पर्धा, काव्यगायन मैफल, काव्याधारित नृत्य, असे नव-नवे कार्यक्रम आयोजित करावेत.
११) प्रकाशक, संपादक, संशोधक, चित्रकार, मुद्रक, गं्रथविक्रेते इत्यादी ग्रंथसंबंधी व्यक्तींचे प्रातिनिधिक सत्कार व्हावेत.
१२) संमेलन सर्व समाजाचे असल्यामुळे सर्व समाजास निधीसाठी आवाहन करावे, धनिक व शासन यांचेही आर्थिक साह्य घ्यावे व त्यांचाही गौरव करावा.
१३) संगणक व तत्सम आधुनिक उपकरणे वापरून जे साहित्य व्यवहार करीत आहेत. त्यांचेही साह्य परोपरीने संमेलनाने घ्यावे.
१४) संमेलनाचा सर्व आर्थिक व्यवहार समाजासमोर स्पष्टपणे सादर व्हावा.
१५) संमेलनात महाराष्ट्राबाहेरील व भारताबाहेरील मराठी समाजास विशेष प्रतिनिधित्व मिळावे, ते मराठीच्या सरहद्दीचे शिपाई आहेत.
१६) महामंडळ आणि अध्यक्षीय निवडणूक यांच्या संबंधीची सर्व माहिती व सर्व तपशील सातत्याने प्रसारमाध्यमांद्वारे समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत.
१७) महामंडळ घटक संस्था, संलग्न संस्था, इत्यादींचे आर्थिक व्यवहार समाजाला कळलेच पाहिजे.
१८) याशिवाय इतर अनेक परीने संमेलनात शुद्धता आणि नवीनता आणता येईल.
१९) साहित्य संमेलन दर तीन वर्षांनी व्हावे.
(लेखक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आहेत.)