‘हट’योगी
By Admin | Updated: August 22, 2015 18:55 IST2015-08-22T18:55:24+5:302015-08-22T18:55:24+5:30
‘हटयोगी’ म्हणजे हे ‘हट’ धरून बसतात ते. हट्टच असतो तो, स्वत:ला यातना देऊन आपलं तेच करण्याचा! आणि हट्ट तरी किती प्रकारचे. कुणी एका पायावरच उभे असतात. काहीजण दोन्ही हात वर करून, एकमेकांना जोडून उभे असतात. - हे साधू का करत असतील असे भलभलते हट्ट?

‘हट’योगी
>
‘मनुष्य को सबसे जादा भाता है दुसरे का कहना की, आप अच्छे हो! आप अलग हो! ये जो भीड लगती है ना आजूबाजू, ये ताकद देती है, अपनी पीडा सहने की.नहीं तो अंधेरे मे कौन रोया, कौन देखा?’
मेघना ढोके
जत्रेला जाणारे सारेच देव भेटावा म्हणून जातात का?
- नाहीच! अनेकांना जत्रेतली चंगळच महत्त्वाची वाटते. काही मुखदर्शन, काही नावाला कळसदर्शन तरी करतात. काही बहाद्दर तर असे जे मंदिरापासून लांब उभे कुठंतरी जागीच चप्पल काढतात, हात जोडतात, जत्रेत देव भेटला अशी स्वत:ची समजूत काढत मस्त जिवाची जत्र करतात!
कुंभमेळा म्हणजे तरी दुसरं काय असतं?
अशी जिवाची जत्र!
आणि जत्रेत एरवी जसे खेळ रंगतात, अनोख्या रंगील्या गोष्टी दिसतात आणि उत्साहाच्या उधाणात धावती भिरभिरी नजर काहीतरी अप्रूपानं पाहते, तसंच सारं याही जत्रेत होतं!
जशी जत्रेला लोटणारी गर्दी कट्टर धार्मिक नी श्रद्धाळू नसते तशीच कुंभात जमणारी सारी माणसं अतिश्रद्धाळू, धार्मिक वा भाविक नसतात! फक्त कुंभातल्या डुबकीचं बोट धरून जत्रेत बुडी मारून घेतात.
त्यातही खरं कुतूहल असतं ते ‘हटयोगी’ साधूंचं! बडय़ाबडय़ा साधूमहंतांना आणि तथाकथित धर्मसंरक्षक चिकित्सकांना असं उगीच वाटतं की कुंभात जमणारी माणसं आपल्याला ‘मानतात’! सामान्य संसारी उत्साही गर्दीला या स्वत:ला महानतम समजणा:या साधूंमधे काही ‘इंटरेस्ट’ नसतो! खरी तुंबळ गर्दी असते ती ‘हट’ म्हणजे खरंतर काहीतरी ‘हटके’ करणा:या, बोलणा:या किंवा वागणा:या साधूंभोवती.
मागच्या सिंहस्थात अशाच एका साधूला पाहायला गर्दी व्हायची. हे हटयोगी साधूबाबा गेली 21 वर्षे आपला एक हात वर करून उभे होते. त्या हाताचं पार लाकूड होऊन गेलं होतं. बाकी हातापायांच्याही काडय़ाच. पण साधूबाबांचा ‘हट’ होता तो, त्यांची तपश्चर्याच, म्हणून मग त्यांनी हात खालीच न करण्याचा पण केला होता म्हणो!
बाबा कुणाशी काही फारसे बोलायचे नाहीत. फार तर नावगाव सांगायचे. लोकही त्यांना फार काही विचारत नसत, फक्त ‘पाहायचे’. नवल करायचे की असा वर्षानुवर्षे हात वर करून माणूस कसा काय राहू शकतो!
ते नवल, ते अप्रूप ही कुंभातली मग आणखी एक कमाई. किती प्रकारचे हटयोगी येतात या कुंभात.
‘हट’ म्हणजे खरंतर हट्टच असतो तो. स्वत:ला यातना देऊन काहीतरी, हट्ट धरून आपलं तेच करण्याचा! आणि हट्ट तरी किती प्रकारचे.
कुणी एका पायावरच उभे असतात. काहीजण दोन्ही हात वर करून, एकमेकांना जोडून उभेच असतात. काही मौनीबाबा असतात. काही फळंच खाऊन राहतात. काही खटियाबाबा असतात, ते खाटल्यावरच राहतात. काही पत्रेबाबा असतात, जे पत्र्यावरच राहतात, कायम बारोमास. आणि काही इच्छाभिक्षाधारी बाबा असतात.
गेल्या सिंहस्थात एक साधूबाबा फक्त इच्छाभिक्षा खायचे. गेली 11 वर्षे त्यांनी तो नेम पाळला होता असं कळलं. म्हणजे काय तर दिवसातून एकदाच ते दिवसभराचं अन्न आणायला जात. सकाळी उठल्यावर जर मनात आलं की आज फक्त सफरचंद खायची तर ते फळवाल्याच्या गाडीजवळ जाणार. मागणार नाहीत. फक्त जाऊन उभे राहणार. त्या फळवाल्यानं जर स्वत:हून सफरचंद दिलं तर ते घेणार, खाणार! पण जर त्यानं केळी, पेरू असं काही दिलं तर ती भिक्षा दुस:या कुणास देऊन साधूबाबा परत जाणार! मग त्यादिवशी दुसरं काही खाणार नाहीत. दुस:या दिवशी पुन्हा तेच. जोवर सफरचंद हवं ही इच्छा पूर्ण होत नाही तोवर दुसरं काहीही खायचं नाही! इच्छाभिक्षेचा हा नियम. ती भिक्षा मिळाली की पुढची इच्छा!
साधूबाबा सांगत होते, एकदा मी सलग 29 दिवस फक्त पाणी पिऊन होतो. मनात आलं होतं दहीचावल खायचे. पण कुणाच्या घरी गेलो तर लोक सारं जेवण देत, पण दहीचावल मिळायचं नाही. आणि मागायचं नाही हा नियम. 29व्या दिवशी एका गरीब बाईनं सांगितलं, ‘कुछ नहीं है घर में, कल का चावल है और सिर्फ दही. वो चाहिए तो लेके जाओ, म्हणून तिनं ते भांडं पुढं केलं!’ रडली ती की, आपण साधूला शिळं खाऊ घातलं म्हणून. पण तिला काय सांगणार की, माता तुङयामुळे मी 29 दिवसानं अन्न खातोय!’
त्या बाबांना विचारलं की, का पण हा हट्ट?
ते म्हणाले, ‘इच्छा तर होणारच, त्या मी रोखू शकत नाही. पण त्यांना संयम तर शिकवू शकतो. मन मांगा चाहिए तो मिलेगा, पर कब मिलेगा? पता नहीं, जब मिलेगा, तब स्वीकार करने की हिंमत बढाओ!’
स्वत:ला असा संयम शिकवत राहतात की असह्य छळून त्या वेदनांचाच आनंद मानतात हे कळण्यापलीकडचं असतं. आणि मग मान्य करावं लागतं की, काहीतरी आनंद मिळत असणारच म्हणून तर हे ‘हटयोगी’ असा अट्टहास करत राहतात.
तो आनंद काय असतो? काय देतो?
जी माणसं इतकी स्वत:ला त्रस करून घेत, त्या वेदनांमधे सुख मानतात. एरवी कुठंतरी कानाकोप:यात जगून अशी ‘पीडा’ स्वत:ला करवून घेतात, ती या जश्नवाल्या, तामझामी, ऐशोआरामी साधू, पराकोटीच्या उपभोगी उत्सवी कुंभात का येत असतील?
एका नव्वदीला टेकलेल्या, पार कंबरेतून वाकलेल्या साधूबाबांनी त्याचं उत्तर दिलं. ते साधूबाबाही इच्छाभिक्षावाले होते. सकाळी उठून कुठल्याही खालशासमोर जाऊन उभे राहायचे. कुणी मूठभर तांदूळ दिले वाडग्यात तर आणायचे. काटय़ाकुटय़ांची तीन दगडांची चूल करून भात शिजवायचे आणि दिवसातून एकदाच खायचे. नाही मिळाले तांदूळ मूठभर तर उपास. बाकी अन्नछत्रत जेवायचे नाहीत, गप्प बसून राहायचे.
त्यांना विचारलं की, जर तुम्ही गेली सत्तर वर्षे असंच जगताय म्हणता तर मग या जत्रेत कसे काय येता?
ते म्हणाले ते फार वेगळं आणि चमकवणारं होतं.
‘मनुष्य को सबसे जादा भाती है लोकेषणा! दुसरे का कहना की, आप अच्छे हो! आप अलग हो! ये जो भीड लगती है ना आजूबाजू, ये ताकद देती है, अपनी पीडा सहने की. नहीं तो अंधेरे मे कौन रोया, कौन देखा?’
साधूबाबांचं म्हणणं होतं की, कितीही पळा, पण इतरांनी आपली केलेली स्तुती, त्यानं वाटणारं सुख यातून सुटका नसते. किंवा ते हवंच असतं. ते मला नको असं म्हणणं हे ढोंग!
आणि त्या ‘लोकेषणो’साठी, त्या माणसांच्या गराडय़ासाठी, कौतुकाच्या नजरांसाठी हे साधू आपापल्या अंधा:या जगातून बाहेर पडून कुंभाच्या जत्रेत येतात.
आपली पीडा दाखवून सुख कमावतात!
त्या सुखातून पीडा सहन करण्याचं बळ मिळतं का.
असावं कदाचित?
कदाचित त्यातून वेगळीही पीडा आतल्या आत छळत असेल?
- असे अनेक प्रश्न आहेत.
जे मागच्या सिंहस्थात फक्त प्रश्न म्हणून कळले, आता त्यांची उत्तरं शोधत साधूंचं बारा वर्षानी पुन्हा गोदाकाठी सजलेलं जग पुन्हा पाहायचं. म्हणून आता पुढचा प्रवास थेट सध्या सजलेल्या गोदाकाठच्या साधुग्रामातून.
डोक्यावर जटांचं ओझं
हटयोगी साधूंइतकंच अप्रूप असतं साधूंच्या जटांचं!
म्हणजे काहींना अप्रूप वाटतं, आणि काहींना त्या जटा पाहून कसंसं वाटतं.
मूळ प्रश्न त्याहून वेगळा आहे की, हे साधूबाबा हा जटांचा डोलारा डोक्यावर सांभाळतात कसे आणि का?
बरेच साधू सांगतात की, जटा हे वेदना सहन करण्याचं आणि त्या बांधून ठेवून ती ठसठस कायम अनुभवण्याचं प्रतीक आहे. ठसठसच असते ती. नाहीतर दोरखंडांनी गच्च आवळून बांधलेले केस घेऊन चोवीस तास वावरणं हे काही सोपं काम नाही. दर सहा-आठ महिन्यांनी या जटा सोडतात. लिंबूरस, मुलतानी माती लावून ठेवतात. मग धुतात. मग पुन्हा बांधतात.
अर्थात बडय़ा साधूंची अशी जटासेवा करायला त्यांचे शिष्य असतात. पण जे बिनाशिष्य असतात, त्यांचे जटा धुताना कमालीचे हाल होतात. मग आळस वाढला तर पाच-पाच र्वष काहीजण जटांना पाणी लावत नाहीत.
त्या जटा डोक्यावर घेऊन जगणं, ही वेदना असते असं जे साधू सांगतात, ते खरंच वाटतं मग!
(लेखिका ‘लोकमत’मध्ये मुख्य
उपसंपादक आहेत)meghana.dhoke@lokmat.com