शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
5
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
8
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
9
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
10
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
11
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
12
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
13
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
14
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
15
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
16
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
17
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
18
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
19
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
20
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

बधिर सामाजिकतेने घेतलेला बळी

By admin | Updated: April 29, 2014 15:30 IST

समाजच मद्यधुंद झाला आहे आणि आत्मकेंद्रितही. म्हणूनच तरुणांची अवस्था दोरा तुटलेल्या पतंगासारखी झालेली आहे. आम्ही शिक्षकसुद्धा त्या विकृतीचा एक घटक बनून जगतो आहोत. दिशाहीन झालेलं हे वादळ अचानक एके दिवशी आमच्या महाविद्यालयाच्या उंबरठय़ावर येऊन आदळलं. तेव्हा वाटलं, की केवळ समाजाच्या निष्क्रियतेमुळे हे घडलं..

समाजच मद्यधुंद झाला आहे आणि आत्मकेंद्रितही. म्हणूनच तरुणांची अवस्था दोरा तुटलेल्या पतंगासारखी झालेली आहे. आम्ही शिक्षकसुद्धा त्या विकृतीचा एक घटक बनून जगतो आहोत. दिशाहीन झालेलं हे वादळ अचानक एके दिवशी आमच्या महाविद्यालयाच्या उंबरठय़ावर येऊन आदळलं. तेव्हा वाटलं, कीकेवळ समाजाच्या निष्क्रियतेमुळे हे घडलं..निमशहरी रूप असलेलं एक तालुक्याचं ठिकाण. व्यापार-उदीम, खरेदी-विक्री यांची उलाढाल मोठी. त्यामुळे झपाट्याने शहरी चेहरा प्राप्त होत चाललेलं. तंबाखू-गांजापासून तमाशापर्यंत आणि तमाशापासून वेश्यांपर्यंत सार्‍या भोगविलासांचे तीर्थस्थान झालेलं. अशा या विलासभूमीत तीन-चार महाविद्यालयांची रेलचेल होती. एक डी.एड.चे, एक कला-वाणिज्यचे आणि तिसरे तंत्रज्ञानविषयक महाविद्यालय होते. चारी दिशांनी येणार्‍या विद्यार्थ्यांचा लोंढा शहरात खळाळत असे. शहरापासून थोड्याशा अंतरावर ही सारी महाविद्यालये विसावलेली. या महाविद्यालयांच्या परिसरातच थोडीफार वस्ती पसरलेली. काही दुकानेही थाटलेली. आमच्या कला-वाणिज्य महाविद्यालयाला लागून असलेल्या छोट्या रस्त्यावर हॉटेल्स, शीतगृहे, बेकरी आणि पान-तंबाखूच्या टपर्‍या यांची एक लांबलचक रांगच उभी होती. एकदा आम्हा प्राध्यापकांची बैठक संपल्यानंतर काही मोजकेच प्राध्यापक थांबलो असताना दोन शिपाई जवळ येऊन म्हणाले, ‘‘सर, विद्यार्थ्यांचे वर्ग झाडताना अलीकडे वर्गात भरपूर तंबाखू-गुटख्याच्या पुड्या सापडतात. अर्धवट चघळून टाकलेला तंबाखूचा चोथाही जागोजागी असतो. यासाठी काहीतरी नियम करावा असं वाटतं. तास संपल्यावर सायंकाळी मी आणि भीमा एकदा वर्ग झाडण्यासाठी निघालो असताना जिन्यामध्येच तोंडाला घाण वास असणारा मुलगा भेटला. कदाचित तो पिऊन आला असावा सर. त्यानं हे सांगताच आम्ही सारेजण चक्रावून गेलो. आजकालच्या मुलांमध्ये ही व्यसने झपाट्याने फोफावत आहेत, याची आम्हाला तशी कल्पना होती; पण कॉलेजमध्ये तासाला हा घाण ‘कचरा’ तोंडात घालून येतात, याची आम्हाला काळजी वाटली. निदान अशा विद्या संकुलाच्या परिसरात तरी अशी दुकाने नसावीत असे वाटायचे. पण समाजाला याचे जराही गांभीर्य वाटत नाही. आपल्याच मुलांना, आपल्याच हातांनी अशा व्यसनाच्या जबड्यात ढकलतो, हे कुणालाही पापमय वाटत नव्हते. सारा समाजच व्यसनावर उभा आहे, व्यसनावर जगतो आहे आणि उद्याच्या पिढीला नरकात ढकलतो आहे, याचे सोयरसुतक कुणालाच नाही, याची खंत आम्हाला अस्वस्थ करून गेली. या शिपायांनी सांगितलेली घटना कितपत खरी आहे, हे जाणून घेण्यासाठी प्राचार्यांनी चार-चार प्राध्यापकांचे गट तयार करून वर्गातील मुलांची झाडाझडती घेतली आणि आम्हाला निखार्‍यावरून जावे तसा चटका बसला. चार-सहा मुलांपैकी निदान एकाच्या तरी खिशात तंबाखूची पुडी किंवा गुटखापुडी सापडली. सार्‍या वर्गातला हा जहरी ‘ऐवज’ जेव्हा आम्ही गोळा केला; तेव्हा तो दोन टोपल्या भरतील एवढा निघाला. मधल्या सुट्टीत सारे विद्यार्थी मैदानात असतानाच तो जाळून टाकला. ‘यापुढे ज्यांच्याकडे पुडी सापडेल त्याला कडक शिक्षा केली जाईल,’ असा इशाराही प्राचार्यांनी दिला. व्यसनांमुळे होणारी हानी समजावून सांगितली. नंतर दोनच दिवसांनी आम्ही चार-पाच प्राध्यापक प्रवेशद्वाराजवळच असलेल्या सार्‍या दुकानदारांना भेटलो. पान, बिडी, सिगारेट विकणार्‍या दुकानदारांना कळकळीनं सांगितलं, की ‘‘शाळा-कॉलेजपासून काही ठराविक अंतरात ही विक्री केंद्रे असता कामा नये, असा सरकारी आदेश आहे. तरीही तुम्ही पोरांना मोह व्हावा अशा ठिकाणी दुकाने थाटली आहेत. ही मुले मोहापोटी, कुतुहलापोटी, आग्रहापोटी हातात पुस्तक घेण्याऐवजी तंबाखू घेतात. सिगारेट घेतात. आपल्याच नात्या-गोत्यातील या मुलांना व्यसनाची चटक लावता, हा फार मोठा गुन्हा आहे. आपण आपल्या हाताने या पिढीला बरबाद करीत आहोत. कृपा करून या गोष्टी विकायच्या बंद करा. त्यांना नीट समजावून सांगा.’’ त्यावर एक टपरीवाला ताडकन म्हणाला, ‘‘सर, आम्ही नाही विकले तरी ते थांबणार आहे का? आपल्या गावात बिडी-काडीची पन्नास दुकाने आहेत. ही पोरं इथं नाही मिळालं तर बाहेर कुठूनही घेतील. बाकीचे लोक विकायचं थोडेच थांबतील? शिवाय आमचं पोटपाणी या दुकानावर आहे. तेच बंद केलं तर आम्ही उपासमारीनं मरून जाऊ. खरं तर पालकांनी-शिक्षकांनीच जरब ठेवली पाहिजे. हे बंद केलं पाहिजे.’’ याच प्रकारचं उत्तर आणखी दोघा-तिघांनी दिल्यामुळे आम्ही निरुत्तर झालो. नंतर एका शीतगृहाच्या मालकाला भेटलो. त्याला समजावून सांगितले- ‘‘अरे, तुझ्या या दुकानात मुले फक्त कोकाकोला पित नाहीत असं समजतंय. ही पोरं त्यात दारू मिसळून पितात. कधी-कधी गावठी दारू आणून पितात, अशा तक्रारी आहेत. आपल्याच तरुण पिढीचं आपण नुकसान करतोय, ते तू लक्षात ठेव आणि असले उद्योग बंद कर.’’ त्यावर तो शांतपणे म्हणाला, ‘‘सर, मी चुकूनही दारू विकली नाही. या ओढय़ाच्या पलीकडं गावठी दारूच्या भट्टय़ा आहेत. तिथून ते दारू आणतात. मी विरोध केला तर तुमच्याच बागेतल्या झुडपात बसून ते दारू ढोसतात. तेव्हा तुम्ही त्यांना सांगा. मला सांगून काय उपयोग?’’ या संभाषणातून या रोगाची मुळे किती विस्तारली आहेत आणि किती खोल गेलेली आहेत, हे आमच्या लक्षात आले. तरीही त्यांना कळकळीची विनंती केली. त्यांनीही सहकार्य करण्याचे कबूल केले. या निर्बंधामुळे थोडाफार फरक पडेल, अशी आम्हाला अशा वाटली. खरं तर फुटलेल्या धरणाला आम्ही मंडळी चिंध्याचा बोळा बसवत होतो. हाती खुळखुळणारा पैसा, पालकांचं दुर्लक्ष, व्यसनी मुलांशी मैत्री, व्यसनाला मिळणारी प्रतिष्ठा, बदललेली जीवनमूल्ये आणि चंगळवादाचा शिकार झालेला समाज या सार्‍यांचा परिपाक या वाढत्या व्यसनात होतो आहे. ओठ पिळला तर दूध निघेल अशा वयातील मुले एखाद्या पार्टीच्या निमित्ताने रात्रभर दारू पिऊन गोंधळ घालतात, यासाठी कोणीच पुढे येत नाही. समाजानेच आपल्या पोटातील ही घाण स्वत:हून काढून टाकायला हवी. पण, समाजच बधिर झाला आहे, मद्यधुंद झाला आहे आणि आत्मकेंद्रितही झाला आहे. त्यामुळे तरुणांची अवस्था दोरा तुटलेल्या पतंगासारखी झालेली आहे. आम्ही शिक्षकसुद्धा त्या विकृतीचा एक घटक बनून जगतो आहोत. आणि दिशाहीन झालेले हे झंझावात अचानक एके दिवशी आमच्या महाविद्यालयाच्या उंबरठय़ावर येऊन आदळले. घडले असे की, परगावाहून रोज एसटीने कॉलेजला येणार्‍या चार-पाच मुलींची काही टारगट मुले आणि काही रिक्षावाले जाताना छेडछाड करायचे. घाणेरडे हावभाव करून टोमणे मारायचे. घाबरलेल्या या मुलींनी आधी दुर्लक्ष केले. मग तक्रार केली. नेहमीप्रमाणे पोलिसांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे अधिकच धीट आणि उन्मत्त झालेल्या एका तरुणाने एका मुलीचा रस्त्यावरच हात धरला. तिच्या अंगाशी झोंबू लागला. दारूच्या नशेत तो वाटेल ते बरळत होता. ती कन्या आपली सुटका करून घेण्यासाठी मोठय़ाने ओरडली. त्याच्या दंडाला चावली. तेवढय़ात तिच्या मागे असलेल्या मैत्रिणी धावत आल्या. दोन तगडे विद्यार्थीही धावले. सर्वांनी तिची सुटका केली आणि त्या नराधमाला उभा-आडवा पार बेशुद्ध होईपर्यंत धुतला. अगतिक आणि भेदरलेल्या त्या मुलीचे अश्रू खूप वेळ वाहत होते. तिचे हे अश्रू म्हणजे बधिर आणि बेजबाबदार झालेल्या समाजाचा निषेध म्हणावा लागेल. या घटनेची शोकांतिका अशी, की त्या मुलीचे शिक्षण त्या दिवसापासून पालकांनी बंद केले. तिच्या सार्‍या आयुष्याचे दरवाजेच जणू बंद झाले! (लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व निवृत्त प्राचार्य आहेत.)