कोवळ्या रंगांचे दिवस
By Admin | Updated: January 31, 2016 10:15 IST2016-01-31T10:15:06+5:302016-01-31T10:15:06+5:30
पूर्वाश्रमीच्या शकू अर्थात शकुंतला सामंत. वासुदेव गायतोंडे यांच्या ‘नेक्स्ट डोअर’ शेजारी. गायतोंडे विशी-पंचविशीचे असताना त्या नऊ-दहा वर्षाच्या होत्या. आजही ते दिवस त्यांना लख्खपणो आठवतात. पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वीचं गिरगाव, त्या काळातल्या चाळी, तेव्हाचं सांस्कृतिक जीवन, त्या काळचे रेडिओचे दिवस.. आणि शेजारी राहणारा चित्रं काढणारा एक मुलगा. बाळ!

कोवळ्या रंगांचे दिवस
>- सुनीता पाटील
जिवंतपणी हट्टाने बेदखल राहिलेले आणि मृत्यूनंतर गूढ, रहस्यमय आयुष्याची, कलासाधनेची कोडी जगाला घालत राहिलेले वासुदेव गायतोंडे हे विख्यात भारतीय चित्रकार. त्यांच्या अद्भुत आयुष्याचा वेध घेणारा समग्र गौरवग्रंथ कालच ‘चिन्ह’तर्फे प्रकाशित झाला. या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ग्रंथातील एका नाजूक प्रकरणाचा हा संपादित संक्षेप....
आत्ताची कुडाळदेशकर वाडी जिला निवास म्हणतात ती खरं तर पूर्वीची पेंडसेवाडी. पुढे कुडाळदेशकर मिळत नाहीत म्हणून जागा तशाच रिकाम्या ठेवण्यापेक्षा त्या सारस्वतांना पण द्याव्यात असं ठरलं त्यामुळे सारस्वत कुटुंबं निवासात आली. त्यांपैकी एक गायतोंडेंचं कुटुंब.
1944 साली माझी आई आणि बाळची आई म्हणजे चित्रकार गायतोंडेंची आई दोघी गरोदर होत्या. माझा लहान भाऊ आणि बाळच्या बहिणीचा - किशोरीचा जन्म या सुमाराचा. साधारण यावर्षीपासूनचा बाळ माङया स्मृतीत आहे. गायतोंडेंचं कुटुंब चिखलवाडीतून निवासात राहायला आलं होतं.
आमच्या घरामध्ये त्यावेळी फार कुणाकडे नसणारी एक गोष्ट होती, ती म्हणजे रेडिओ. रात्री गॅलरीत चटई अंथरून रेडिओ लावून आम्ही बसायचो. निवासातले अनेक जण रेडिओवरच्या श्रुतिका, बातम्या ऐकायला यायचे. सैगल, पंकज मलिक आदिंची गाणी लागायची. ती ऐकायला दोन्ही गॅल:या भरून लोक उभे राहायचे. नाच-गाण्याची मला खूप आवड होती. मी नक्कलही बरी करत असे. आणि या सगळ्यांत बाळला रस होता. त्याचे वडील घरी नसले की मधल्या खोलीत आम्ही जमत असू. मग तो फर्माईश करायचा, शकू, त्या अमक्याची नक्कल कर गं - मग मी केली की धो धो हसायचा. तो हसणारा बाळचा चेहरा आजही मला आठवतो. बाळ आईच्या रूपावर गेलेला होता. त्याचे डोळे तर विलक्षण सुंदर होते.
मी नाच, नकला करायचे. त्या काळात ‘यमुना जळी’ वगैरे गाणी घरात म्हणायची सोय नव्हती. बाळच्या घरात त्याच्या समोर वडील नसताना हे सारं चालायचं.
व्ही. शांताराम यांचा शकुंतला सिनेमा आला होता. माङया वडिलांना कोणी तरी तीन तिकिटं दिली तर ते मला आणि आईला घेऊन गेले. त्या सिनेमातली गाणी मी बाळला आल्यानंतर साभिनय करून दाखवली. तेव्हा त्यानं पुठ्ठय़ाचे दोन गोल कापून त्यावर चंद्रमोहन आणि जयश्री म्हणजे दुष्यंत-शकुंतलेचं चित्र काढून मला बक्षीस दिलं होतं. फार कळत नव्हतं त्यावेळी. चार दिवस मी ते नाचवलं कौतुकानं, नंतर कुठं गेलं कुणास ठाऊक.
एके दिवशी मला बेबी सांगत आली, बाळ बोलावतोय. अर्थातच त्याचे वडील घरात नव्हते. मी गेले तेव्हा बाळनं भिंतीवर पांढरा कागद लावलेला. त्याचा पडदा म्हणून उपयोग करून, टॉर्च वापरून त्यानं मला मधुबालाचं चित्र त्या पडद्यावर दाखवलेलं. हे सगळं का, तर मला सिनेमा आवडतो म्हणून. खूप सहृदय होता तो. पण तसा स्वत:च्या जिवाला जपणाराही. एकदा दिवाळीत खोकला झालेला, तर त्यानं फराळाला हातही लावला नाही, असा निग्रही.
बाळला जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये नोकरी लागली तेव्हा त्यानं पहिल्यांदा फुलपँट, मोजे, शूज असं सगळं विकत घेतलं. ते सगळं घालून तो घरात खुर्चीवर बसला. मला आणि विजाला विचारत होता की, ‘मी कसा दिसतोय?’ - तर विजा त्याला गमतीनं म्हणाली, ‘कोणी तुङया बूट, मोज्यांकडे बघणार नाही. लोक तुझं तोंड बघणार.’
बाळची ही बहीण विजया लवकर नोकरीला लागली. तीच त्याला रंग, ब्रश सामानाचे पैसे द्यायची. माङया आठवणीतलं बाळचं शेवटचं भांडणही विजाशीच झालंय. एक दिवस ती खूप वरच्या आवाजात कोकणीतून बोलत होती. गोव्याची कोकणी असल्यामुळे मला फार कळलं नाही, पण ती म्हणत होती, ‘हांव त्याका इतके पैशे दिले, त्याका मदत केली आणि तो माङयावरच उलाटलों.’
बाळ परदेशी जायला निघाला तेव्हाची पुसटशी आठवण आहे. त्याला स्कॉलरशिप मिळाली होती. परदेशी जाण्याआधी त्यांच्या घरी बरीच मंडळी जमलेली. त्यांतल्या एका मुलीकडे बघून त्याच्या आईनं सांगितलं, ‘बाळचं लग्न ठरलंय, ही ती मुलगी. परदेशातून आल्यावर तो लग्न करेल.’
नाजूक वायलचं पातळ नेसलेली तिची पुसटशी प्रतिमा मला आठवतेय. पण नंतर हे लग्नाचं बारगळल्याचं कळलं. पुढं काय झालं माहीत नाही, पण परदेशातून आल्यावर बाळ घराकडे कधी फिरकलाही नाही. त्याची आई तर बाळ बाळ करतच गेली. त्याला हे कळलं होतं, तरीही तो आला नाही.
त्याआधीची एक आठवण आहे. आमच्या शेजारी डोकीवरच्या पदराच्या एक आजी राहायच्या. त्यांना मोतीबिंदू झालेला. श्रुतिका ऐकायला त्या नेहमी येत. आमच्याकडे टय़ूबलाईट होती. स्वच्छ प्रकाश पडत असे तिचा. त्यामुळे त्या जीवदया नेत्रप्रभा घेऊन येत डोळ्यांत टाकायला. अशाच एकदा त्या येऊन बाहेर चटईवर बसल्या. मी ड्रॉप टाकले. तिथं कठडय़ाला रेलून बाळ उभा होता. आजी त्याला म्हणाल्या, ‘आता पुरे झालं. नोकरी लागली ना? आता लग्न कर. त्या आईला थोडं सुख मिळू दे.’ तर बाळ गमतीनं त्यांना म्हणत होता की, ‘आजी, लग्न काय आईला सुख देण्यासाठी करायचं का? लग्न करून घरकाम करायला एक बाई आणायची? आणि लग्न म्हणजे काय जीवनाची इतिकर्तव्यता का?’.. असं बरंच काही. तेव्हा ते तो गमतीनं आजीला म्हणत असेल कदाचित, पण त्याचे लग्नाविषयीचे विचार तेव्हाच्या आमच्या मध्यमवर्गीय संकल्पनांच्या पलीकडचे होते हे नक्की.
आता या सगळ्यात चित्रकार गायतोंडे कुठं होते? खरं सांगायचं तर ही व्यक्ती चित्रकार आहे हे आम्हाला खूप उशिरा कळलं. आम्ही एकमेकांचे शेजारी होतो. किशोरीलाही चित्रकलेची आवड होती. आम्ही एकत्र रांगोळ्या काढायचो. दिवाळीत रांगोळ्यांची स्पर्धा असायची. किशोरी ठिपक्यांच्या रांगोळीऐवजी वेगळी चित्रं काढायची. कधी तरी बाळ तिला रंग सांगायचा. त्याला किशोरीबद्दल वेगळा आपलेपणा होता. नंतर जेव्हा किशोरीनं हे घर विकलं तेव्हा बाळची चित्रं, रंग, ब्रश, जे काही माळ्यावर होतं ते टाकून दिलं. आमचं एकवेळ सोडा, चित्रकलेतलं आम्हाला काही कळत नव्हतं; पण किशोरी स्वत: जे. जे. स्कूलची विद्यार्थिनी, मग तिनं असं का करावं? त्यांच्यातले संबंध ताणले गेले होते हेच यामागचं कारण असावं. बाळ घर सोडून गेला याचा सगळ्यात जास्त त्रस तिलाच झाला.
मी लहान असताना बाळला त्याच्या घरात चित्रं काढताना बघितलंय. पण त्याची चित्रं कधी कळली नाहीत. तो जमाना दलाल, मूळगावकर यांच्या शैलीतल्या चित्रंचा होता. इथं बाळच्या चित्रत एक डोळा इकडे तर दुसरा तिकडे असं काही तरी वेगळंच असायचं. हळूहळू मी मोठी व्हायला लागले. वाचनाची आवड वाढायला लागली. बारा-चौदा वर्षांची झाले आणि साडी नेसायला लागले. बालपण संपलंच जणू. त्या काळी वयात आलेल्या मुली मुलांशी फार बोलत नसत. तसा बाळही त्याच्या विश्वात जास्त गुंतत गेला. नंतर तर आणखीनच दूर झाला. घरात चित्रं काढणं मात्र चालू असायचं.
मी दारासमोरच्या आरामखुर्चीत पुस्तक वाचत बसलेली असताना कधी तरी त्याचे मित्र यायचे. हे मित्र आणि तो जिन्याखालच्या कोळशाच्या पिंपाला चित्र टेकवून तासन्तास बघत उभे राहायचे. कधी कधी युरोपियन लोक यायचे तेव्हा निवासातले लोक आश्चर्यानं बघत राहायचे. पण चित्रतलं म्हणून आम्हाला काही कळायचं नाही.
उतारवयाला आले. बालमोहनसारख्या शाळेत शिक्षिका म्हणून काम केलं. जीवनाकडे बघण्याचा माझा साराच दृष्टिकोन हळूहळू बदलत गेला. थोडा समजूतदारपणा आला. आता वाटतं, पुन्हा एकदा बाळची चित्रं बघावीत. तो त्यात काय शोधत असेल त्याचाही आपण शोध घ्यावा. पण आता तो भारतातला प्रख्यात चित्रकार वासुदेव गायतोंडे आहे आणि त्याची चित्रं बघायला मिळणं हे आता फार दुर्मीळ झालंय!