अंधार, उजेड, रंग आणि स्पर्श
By Admin | Updated: March 23, 2015 19:15 IST2015-03-23T19:15:38+5:302015-03-23T19:15:38+5:30
ऑइल -टरपेंटाइनचा वास नाही. रंग सांडत नाही, ब्रश पुसावा लागत नाही. फडकी-बिडकी लागत नाहीत. ईझलवर कॅनव्हास लावला की जे वाटतं ना ओलं ओलं, ते खरं..

अंधार, उजेड, रंग आणि स्पर्श
चंद्रमोहन कुलकर्णी
डिजिटल तंत्रनं हजारो चित्रं काढता येतात, पण कॅनव्हासची मजा त्यात नाही. ऑइल -टरपेंटाइनचा वास नाही. रंग सांडत नाही, ब्रश पुसावा लागत नाही. फडकी-बिडकी लागत नाहीत. ईझलवर कॅनव्हास लावला की जे वाटतं ना ओलं ओलं, ते खरं..
आर्ट स्कूलचा फाउंडेशन कोर्स डिझाइन करण्यात ज्यांचा महत्त्वाचा वाटा होता ते गजानन भागवत नुकतेच गेले.
फाउंडेशनमधे जे शिकलो, ते माणसानं विसरू नये.
खटावकर सर होते फाउंडेशनला.
एक दिवस म्हणाले,
‘उद्या येताना मुठीत मावेल, एवढा लाकडी कोळसा घेऊन या.’
आमच्या घरी तेव्हा पाणी तापवायला सुंदरपैकी तांब्याचा बंबच रेग्युलर वापरला जायचा.
आई म्हणाली, ‘कोळसा? कॉलेजमधे?’
मी म्हटलं, ‘कशाला ते माहीत नाही, पण सांगितलाय आणायला.’
मग टोळक्याला पुरेल एवढा पिशवीभर नेला.
वर्गात दुस:या दिवशी, एका हातात जेवणाचा डबा, एका हातात कोळशाची पिशवी!
सर म्हणाले होते, ‘मोठा काळा कागद पण आणा. नाहीतर काळं कापड आणा एखादं.’
नेलं.
काळ्या कागदावर ठेवलेला काळा कोळसा. त्यावर पडलेला उजेड.
काळा कोळसा तो उजेड पिऊन घेतो. उजेडाचं शोषणच होतं.
असा उजेड आणि असा अंधार समजून घ्यायचा. उजेड न्याहाळायचा. खड्डे. उंचवटे. आकार. घनता. त्याचं चित्र काढायचं.
असंच मग नंतर पांढ:या कागदावर गुळगळीत अंडं ठेवायचं, लसणाचं चित्र काढायचं, मग कांद्याचं.
पुढं मग लय मज्जा. वांगी, मिरच्या, लिंबं, मुळा. जांभळा, हिरवा, लाल, पिवळा, पांढरा.
फाउंडेशनला खरोखरच पायाभरणी पक्की होते.
***
शब्दश: काही हजार चित्रं काढली पुस्तकांच्या मुखपृष्ठांसाठी आत्तापर्यंत.
त्यातली अमुक हजार डिजिटली काढली. अजूनही हजारो काढीन.
कारण- आवडतं प्रचंड. कंटाळा नाही येत कधीच. चित्र काढायचा का कंटाळा येईल?
पण
काही म्हटलं तरी डिजिटल ते डिजिटलच. सिंथेटिक.
रंग सांडत नाही की ब्रश पुसावा लागत नाही.
ऑइलचा - टरपेंटाइनचा वास नाही. नाइफ पुसायला फडकी बिडकी लागत नाहीत.
सगळं स्वच्छ,
पसारा नाही.
मजा नाही.
ईझलवर कॅनव्हास लावला की जे वाटतं ना ओलं ओलं, ते खरं.
चित्र कसं का येईना, ते आपल्या हातात नसतं.
पण
प्रत्येक कॅनव्हासच्या वेळी हा फरक जाणवतो.
वाटतं-
खरी मजा, खरं काहीतरी करण्यात आहे. रिअलमधे आहे, व्हच्यरुअलमधे नाही.
जी गोष्ट रिअलमधे आहे ती व्हच्यरुअलमधे नाही.
: स्पर्श.
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)