दही-मिसळ आणि पैठणी

By Admin | Updated: April 18, 2015 15:55 IST2015-04-18T15:55:27+5:302015-04-18T15:55:27+5:30

‘शो.

Curd-Misl and Paithani | दही-मिसळ आणि पैठणी

दही-मिसळ आणि पैठणी

>- हेमंत कुलकर्णी
 
 
‘शोभा, ए शोभा. उठ बाई आता’
‘....’
‘शो....भा, उठ अगं.’
‘....’
‘बास झालं लोळणं, कित्ती कामं पडलीत घरात..’
‘काय सारखी भुणभुण गं आई, झोपू देना जरा वेळ.’
‘बास झाली झोप. काल मी मटकी भिजवून फडक्यात नीट बांधून ठेवली होती, तिला मोड आलेत का पाहा आणि हो, दही विरजायला ठेवलं होतं, त्याच्या चांगल्या कवडय़ा झाल्यात का तेही बघ. उठ. तुला बाजारातही जायचंय’
‘मटकी, फडकं, मोड, दही, कवडय़ा. किती कटकट करशील? मला नाही ठाऊक त्यातलं काही आणि सकाळी सकाळी तू कशाला कडमडायला किचनमध्ये गेलीस’?
‘बटाटे उकडायला लावलेत ना’
‘आता हे बटाटे कुठून आले? अगं, काय चाललंय हे,  जरा सांगशील का नीट’?
‘शहाणो, काल त्या देवेन्द्र आणि विनोद दोघांचा फोन आला होता. म्हणत होते, शोभाताईंची दही-मिसळ आणि पाववडय़ाची आयडीया त्यांना एकदम पसंत आहे. या दोन्ही गोष्टी घेऊन त्यांनी तुला आज सकाळी मंत्रलयाच्या दारात बोलावलंय. आणि येताना पैठणी नेसायचं विसरू नकोस असंही बजावलंय वरून! फोन आला तेव्हा तू गायब होतीस, त्याला मी काय करू?’
‘ते जाऊ दे. पण हे सगळं घरी का म्हणून करायचं? पास्ता लेनमध्ये मिळतं म्हणावं सगळं. वाटलं तर ते जा घेऊन!’
‘घेऊन जा? त्यांनी मला नाही, तुला बोलावलंय. तुलाच जायचंय. पटपट आवर. चार-पाच डझन पाव, बारीक शेव, भावनगरी, पापडी, गाठी सगळं घेऊन ये. उठ आता.’
‘आता हे कुठून आणू? फोर्टमध्ये नाही मिळत असलं काही. आणि इतके पाव? ते कशाला ?’
‘आता खुसपटं काढू नकोस, सरळ बोरा बाजारात जा. तिथं गुप्ता भांडार आहे. ते खरे आपल्यापैकीच गुप्ते. पण मुंबईत गुप्ते नाव चालत नाही. म्हणून  त्यांनी गुप्ता नाव घेतलंय’
‘आई, आता हा बोराबाजार कुठंय? ’
‘बोरीबंदरचा बेरड बसायचा ती भाटीया बाग माहिती आहे का तुला?’
‘नाही’
‘व्ही.टी.स्टेशन तरी’?
‘ते माहितीय’
‘मग त्याच्या समोरच्या डीएनरोडच्या डाव्या गल्लीत जा’ 
‘आइर्, हे फार होतंय हं आता’ 
‘फार होऊ दे नाही तर कमी. जावं तर लागेलच तुला आता. दहीमिसळ आणि वडापावची आयडीया कोणाची होती’?
‘बरं बाई जाते. पण ते पैठणीचं नाही हं जमणार. सावरणार कोण तो एवढा भला बोंगा?’
‘पैठणीला नो ऑप्शन. त्या आदेश भावोजींनी दिली नव्हती का? असेल कपाटात कधीची’
‘आहे गं. पण नेसवणार कोण’?
‘त्या नानाची मुलगी आहे ना तुझी मैत्रीण? देईल की नेसवून’
‘नानाला मुलगाय गं, मुलगी नाही’
‘मुलगीच आहे. मला माहित्येय. साडय़ांचा प्रपोगंडा करीत फिरत नसते का ती?’
‘अगं ती शायना एनसी. तिचा नानाशी काय संबंध??’
‘शोभा, अगं तू मुंबईकर म्हणवते ना, शायनाचा बाप नाना चुडासामा नाही का ठाऊक तुला’?
‘शायना कशाला हवी? ती मला साडी नेसवते, फोटो काढते आणि माङो फोटो इतरांना विकून पैसे तिच्याच पर्समध्ये टाकते. ती नको. तूच नेसवशील का’?
‘नेसवीन बाई. मग तर झालं’?
‘अगं, पण  पैठणी नेसून जायचं तर मग मंत्रलयाच्या दारातच कशाला जायचं गं? आत जायला पास देतील की ते देवेन्द्र आणि विनोद.’
‘नाही. आत जायचं नाही. मंत्रलयाच्या दारातच उभं राहायचं. कळलं? तू मराठी आहेस ना? आहेस की नाही बोल’
‘यस्स, आय अॅम मराठी मानूस’
‘मग आत नाही जाता यायचं. तात्यासाहेबांनी फार पूर्वीच ठरवून टाकलंय. मराठीने मंत्रलयाच्या दारातच थांबायचं’
‘आता हे तात्यासाहेब कोण’?
‘नाही माहीत? जाऊ दे बाई. उशीर होतोय. सांगितलेलं काम कर म्हंजे मिळवलं’
‘आई, एक आयडीया सांगू? खरंच आपण कैलाशमधली दहीमिसळ घेऊ आणि शिववडापाव घेऊन जाऊ’
‘हाणतील तुला धरुन. आधीच त्यांना डिवचून ठेवलंयस तू. आता नको आणखी घोळ घालूस ’
‘आई, तू फार भोळी आहेस गं. व्यवहार वेगळा, तत्त्वं वेगळी, हे का तुला ठाऊक नाही? मला बघताच सगळे  सैनिक गोळा होतील, वाट्टेल तितके शिववडे पावासकट देतील आणि तरीही माङया पर्सला मला बोटदेखील लावावं लागणार नाही’ 
‘कर बाई, तुला काय करायचं ते कर. तसंही तू कधी कुणाचं काही ऐकलंयस का? तरी सांगते, तुझा तो टिवटिवाट की चिवचिवाट त्याला जरा आवर घाल, बाई. तू जातेस सुटून आणि घाम गाळावा लागतो मला’
मंत्रलयाच्या दारात देवेन्द्र, विनोद आणि बाकीचे सारेच घुटमळत होते. छावा आणि छावा (ज्यु) हेदेखील होते. 
उशीर होत चालला होता. पोहे किंवा थालपीठं पो़टात ढकलली असती तर बरं झालं असतं, असा विचार अधूनमधून सा:यांच्याच पोटातून येत होता. 
इतक्यात गाडी पोर्चमध्ये शिरली. दोन्ही छावे सामोरे गेले. पटापटा फोटो निघाले. देवेन्द्र आणि विनोद गाडीच्या डिक्कीतून दहीमिसळ आणि वडापावाची पार्सलं केव्हां बाहेर पडतात याची वाट पाहू लागले. 
- पण डिक्की उघडलीच नाही. 
‘पडले तरी नाक वर’ याची जन्मजात सवाय असल्याने मग देवेन्द्र-विनोद मनातल्या मनात म्हणू लागले, 
‘नाही मिसळ, नाही वडा, नाही पाव पण मराठीला पैठणी नेसून मंत्रलयाच्या दारात उभी केलीच की नाही?’ 

Web Title: Curd-Misl and Paithani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.