गोविंदरावांचा फसलेला प्रयोग

By Admin | Updated: October 4, 2014 19:29 IST2014-10-04T19:29:02+5:302014-10-04T19:29:02+5:30

बर्‍याच जणांना आपण जणू डॉक्टरच आहोत, असे वाटत असते. परिणाम देत असलेले चांगले उपचार बंद करून कोणी तरी सांगितलेल्या तथाकथित रामबाण औषधावर असे लोक विश्‍वास ठेवतात. असा अतिआत्मविश्‍वास नेहमीच साथ देतो, असे नाही, कधी तरी तो अंगाशी येतोच. अशा सांगोवांगी उपचारांच्या आहारी गेलेल्या एका गोविंदरावांची कथा.

Crude experiment of Govindrao | गोविंदरावांचा फसलेला प्रयोग

गोविंदरावांचा फसलेला प्रयोग

 डॉ. संप्रसाद विनोद

 
गोविंदराव प्रथम जेव्हा माझ्याकडे आले, तेव्हा ६५ वर्षांचे होते. गोरापान रंग, साडेपाच फूट उंची, अंगापिंडाने सशक्त. शिस्त अंगात भिनलेली. सर्मपित भावनेने एका संघटनेच्या कार्यासाठी तारुण्यातली महत्त्वाची वर्षे दिलेली. व्यक्तिगत आशाआकांक्षा बाजूला ठेवलेल्या. लग्न न करता देशसेवा करायचं लहान वयापासूनच ठरवलेलं. आयुष्याची सगळी आखणी त्यानुसार केलेली. ४0-४५ वर्षांपर्यंत खूप उमेदीनं कार्य केलं. ते करताना बरीच धावपळ झाली. दगदग झाली. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत्या राहिल्या. तब्येतीची खूप हेळसांड झाली. त्यामुळे आनुवंशिक मधुमेहाने ५0व्या वर्षी त्यांना गाठलं. धावपळ तर चालूच राहिली. एकटे असल्यामुळे नात्यातल्या लोकांना अडचणीच्या वेळी गोविंदरावांची आठवण व्हायची. गोविंदरावही फारशी तक्रार न करता वेळेला धावून जायचे आणि प्रसंग निभावून न्यायचे. संघटनेचं कार्य एकीकडे चालूच होतं. या सगळ्याचा तब्येतीवर परिणाम होत गेला.
खरं तर, या संघटनेच्या कार्यासाठी झटणारे, सर्मपित भावनेनं निरपेक्षपणे काम करणारे हजारो कार्यकर्ते वर्षानुवर्षं समाजोपयोगी कामं करीत आले आहेत. अशा जीवनव्रती व्यक्तींना संघटनेच्या परिवारात खूप मानाचं स्थान असतं. ते जिथं कुठं जातील, तिथं त्यांची सर्व व्यवस्था स्थानिक लोकांकडून आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून अतिशय आदरानं आणि अगत्यपूर्वक ठेवली जाते. या कार्यकर्त्यांच्या गरजा अगदी कमी आणि राहणी अतिशय साधी असते. तरीही जगणं खूप दगदगीचंच राहतं. तरुणपणी या दगदगीचं काही वाटत नाही; पण वय वाढलं, की दुखणी डोकं वर काढतात. गोविंदरावांचं असंच झालं.
योग हा मधुमेहावरील कायमचा आणि रामबाण उपाय आहे, अशा समजुतीनं गोविंदराव मोठय़ा आशेनं शांति मंदिरमध्ये आले. सोबत त्यांचा एक मित्रही होता. गोविंदराव त्या वेळी त्यांच्या भावाकडे राहायचे. त्यांनी योगावरील माझे काही लेख आणि पुस्तकं वाचली होती. पहिल्या भेटीच्या वेळी मला त्यांना काही मूलभूत गोष्टी समजावून सांगाव्या लागल्या. मधुमेह हा आनुवंशिक, शारीरिक आणि सततच्या मानसिक ताणांमुळे होतो. अनेक रुग्णांमध्ये ही तिन्ही कारणं कमीअधिक प्रमाणात आढळून येतात. योगाच्या मदतीनं मानसिक ताणाचं नियोजन करायला जमलं, की हा रोग आटोक्यात आणणं खूप सोपं जातं. पँक्रियाज या अंत:स्रावी ग्रंथीतील बिघाडामुळे मधुमेह होतो. काही आसनांच्या साह्यानं या ग्रंथीचं कार्य सुधारता येतं. केवळ आनुवंशिक कारणांमुळे झालेला मधुमेह आटोक्यात आणणं मात्र खूप अवघड असतं; पण योग्य आहार, नियमित व्यायाम आणि मानसिक ताणाचं नियोजन केलं, तर हा रोग सहज नियंत्रणाखाली ठेवता येतो. 
पहिल्या भेटीच्या वेळी मी हे सगळं वास्तव सांगितलं. योगाविषयी अतिरंजित अपेक्षा ठेवून नंतर अपेक्षाभंग करून घेण्यापेक्षा सुरुवातीपासून वास्तव अपेक्षा ठेवणं अधिक शहाणपणाचं ठरतं. त्यामुळे मी कुठल्याही रुग्णावर योगोपचार सुरू करण्यापूर्वी नेहमी योगाच्या र्मयादांची त्याला जाणीव करून देतो. गोविंदरावांच्या बाबतीतदेखील तेच केलं. रुग्ण उपचारांसाठी परत न येण्याचा धोका पत्करून मी हे करतो. कारण, खोटी आशा दाखवून भ्रमनिरास करणं मला योग्य वाटत नाही. 
गोविंदरावांची भेट झाल्यानंतर मध्ये काही दिवस गेले. नंतर ते पुन्हा एकदा भेटायला आले. सविस्तर चर्चेनंतर त्यांच्यावरील योगोपचारांना सुरुवात केली, त्या वेळी ते सकाळी ४0 आणि संध्याकाळी ४0 युनिट इन्शुलिन घेत होते. योगाभ्यास सुरू केल्यानंतर त्यांचा मानसिक ताण  कमी झाला. परिणामी, इन्शुलिनची मात्राही थोडी कमी झाली. ठराविक अंतरानं रक्त-लघवीच्या तपासण्या चालू राहिल्या. काही आठवड्यांनंतर इन्शुलिनचा डोस आणखी कमी झाला. अण्णांना हुरूप आला. आत्मविश्‍वास वाढला. त्यांचं संघटनेचं कार्य पुन्हा जोरात सुरू झालं. परत धावपळ झाली. आबाळ झाली. खाण्यापिण्याचं तंत्र बिघडलं. काही आठवडे असेच गेले. मधुमेह पुन्हा बळावला. औषधोपचारांनी तो आटोक्यात आणला. पुन्हा योगोपचार सुरू केले. चांगले परिणाम मिळाले; पण हे परिणाम मिळायला पूर्वीपेक्षा जरा जास्त वेळ लागला. 
आता ते शांति मंदिरमध्ये राहायला आले. मी एकदा त्यांना एक आयुर्वेदिक औषध घेताना पाहिलं. त्यांच्या एका मित्रानं ते ‘रामबाण’ औषध त्यांना दिलं होतं. त्यामुळे इन्शुलिन बंद करून ते औषध घ्यायचं त्यांनी ठरवलं होतं. मी प्रयत्नपूर्वक त्यांना हे समजावून सांगितलं, की खरोखरच जर ते औषध एवढं रामबाण असेल, तर असं औषध शोधून काढणार्‍या व्यक्तीला वैद्यकीय क्षेत्रातलं नोबेल पारितोषिक मिळायला हवं. तसं ते मिळालेलं नसल्यामुळे त्यांनी इन्शुलिन बंद करून ते औषध घेऊ नये. इन्शुलिन चालू ठेवून प्रयोग म्हणून घ्यायला हरकत नाही. त्याच सुमारास मला ‘योग फॉर हेल्थ फाउंडेशन’नं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय योग संमेलनाचा प्रमुख पाहुणा म्हणून दोन आठवड्यांसाठी इंग्लंडला जावं लागलं. जाताना मी गोविंदरावांना पुन्हा एकदा सगळं समजावून सांगितलं. 
इंग्लंडमधला कार्यक्रम संपवून परत आलो, तर अण्णांना अतिदक्षता विभागात ठेवल्याचं समजलं. रुग्णालयात गेलो तर ते कोमात होते. रक्तातली साखर ४00-५00 झाली होती. अर्धांगवायूमुळे डावी बाजू लुळी पडली होती. औषधोपचारांनंतर तब्येत थोडी सुधारली. पण, ही सुधारणा फार काळ टिकली नाही. शेवटचा क्षण जवळ आला. मी जवळच होतो. माझा हात हातात घेऊन गोविंदराव सद्गदित स्वरात मला म्हणाले, ‘मी आयुर्वेदाचा अशास्त्रीय प्रयोग करायला नको होता!’ पण, आता फार उशीर झाला होता.
(लेखक हे महर्षी न्यायरत्न विनोद यांचा विशुद्ध अध्यात्माचा आणि अभिजात योगसाधनेचा वारसा चालविणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगगुरू आणि योगोपचारतज्ज्ञ आहेत.)

Web Title: Crude experiment of Govindrao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.