Courage .. | हिंमत..

हिंमत..

ठळक मुद्दे..हो! हे असं होईल!! पुन्हा एकदा सारं पहिल्यासारखं होईल. हा उदास, हताश काळ सरेल, आणि तुंबलेलं पाणी पुन्हा वाहतं होईल!

- राजेंद्र दर्डा


धावत्या शहरांच्या पायात
बेडी पडली आहे,
फिरत्या चाकांच्या पट्टय़ांवर
धूळ चढली आहे.

.पण हे टिकणार नाही.
आजचा दिवस उद्या असणार नाही. 
काहीही झालं, तरी 
माणूस हिंमत हरणार नाही!

रस्ते आहेत सुनसान.
माणसं बावरलेली,
मनातून घाबरलेली,
घरातघरांत कोंडून पडलेली!

दिवसांचं चैतन्य हरवलं आहे,
रात्रींची चमक ओसरली आहे.
.पण हे टिकणार नाही.
आजचा दिवस उद्या असणार नाही.
काहीही झालं, तरी
माणूस हिंमत हरणार नाही!

मंदिराचे गाभारे एकेकटे..
रमझानची सहेरी उदास,
इफ्तारची रौनक विझलेली!
..पण हे संपेल,
आज आहे तसं उद्या नसेल!

शेकडो मैल दूरच्या घराकडे 
चालत निघाले आहेत अनवाणी पाय!
असहाय्य बापाकडे दुसरा पर्याय नाही,
थकल्या आईचा जीव थार्‍यावर नाही,
भुकेल्या पोराच्या ओठी दुधाचा थेंब नाही!

- हा असा आहे का माझा देश?
इतका क्रूर?
इतका निर्दय?

- पण ही तडफड थांबेल.
वर्तमान बदलेल!
आजचा दिवस उद्या असणार नाही!
काहीही झालं तरी,
माणूस हिंमत हरणार नाही.

पुढे काय होणार?
कसं होणार?
जगल्या वाचल्या लोकांच्या वाट्याला
कसलं जग येणार?

हाताला काम असेल का?
भुकेला घास मिळेल का?

कधीतरी, पुन्हा स्वप्नं बघता येतील का?
सुखाने श्वास घेता येईल का?
शेजारच्या प्रत्येकाकडे संशयाने पाहणं,
कधीतरी थांबेल का?

कधीतरी पुन्हा एकदा
जीवलग मित्रांना 
घट्ट मिठी घालता येईल का?

..हो!
हे असं होईल!!
पुन्हा एकदा
सारं पहिल्यासारखं होईल.
हा उदास, हताश काळ सरेल,
आणि
तुंबलेलं पाणी पुन्हा वाहतं होईल!

कारण,
जे आज आहे,
ते उद्या नसेल!!
आजचा दिवस उद्या असणार नाही!
काहीही झालं, तरी
माणूस हिंमत हरणार नाही!!!

rjd@lokmat.com
(लोकमत वृत्त-समूहाचे एडिटर इन चिफ)

Web Title: Courage ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.