- वंदना आर. थोरात
आम्ही रोज सकाळी मंदिरात स्वयंपाक करण्यास मदत करण्यासाठी जातो. गेल्या महिनाभरापासून सगळीकडेच कामधंदे, दुकाने, हॉटेल सगळं बंद आहे. आम्ही घरीच आहोत; परंतु जे लोक घरापासून दूर बाहेर राहतात, या बंदमुळे गावात, रस्त्यावर अडकून पडले, त्यांना भूक लागली तर खायचं काय, असा प्रश्न आहेच. आता इतक्या सगळ्या लोकांना आपण तर काय जेवण देऊ शकत नाही. कारण आपलंच पोट हातावर आहे. आपल्या भाजी-भाकरी इतकं आपण कसंतरी भागवतोय पण नुसतंच तेवढं करून घरी बसून राहण्यापेक्षा लोकांना जेऊ घालण्यासाठी जे स्वयंपाक बनवतात त्यांना तर आपण मदत करू शकतो ना, या विचाराने आमच्या गटातील सात आठ जणी मिळून मंदिराच्या येथे सकाळी स्वयंपाक बनविण्यासाठी आणि तयार केलेले जेवण पॅक करण्यास मदतीसाठी जात आहेत. मंदिरवाले मग ज्या लोकांना गरज आहे त्यांना जेवणाच्या पॅकेटचे वाटप करून येतात. या चांगल्या कामात आपला काही तरी लहानसा हातभार लावावा असं वाटतं, अशा शब्दात वेरूळ येथील रेखा आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. वेरूळ येथील मंदिर ट्रस्टच्या वतीने रोज शंभर लोकांचा स्वयंपाक केल्या जातो. या बंदच्या काळात गावतल्या, आसपासच्या गरजू लोकांना जेवण देण्यासाठी हा उपक्रम राबविल्या जात असून, तेथे अण्णाभाऊ साठे स्वयंसहायता समूहाच्या गटातील या महिला स्वयंस्फूर्तीने आपल्या सेवाभावी वृत्तीतून विनामोबदला काम करीत आहेत.आमच्या येथे वाटसरू, घराकडे जायच्या आशेने निघालेले लोक, बाया-माणसं, विद्यार्थी, आजूबाजूचे मजूर, असे अनेक लोक जेवण करून जातात. ते सगळेच वेळेवर दोन घास खायला मिळाल्याचे समाधान व्यक्त करतात. त्यांच्यासारखंच आम्हालाही भुकेल्यांना दोन घास वेळेवर देता येताय, याचं खूप समाधान वाटतं. २ एप्रिलपासून आम्ही शिवभोजन केंद्र चालवायला घेतलं आहे. रोज सकाळी आठ वाजता आम्ही सात आठ जणी आमच्या गटाच्या महिला चपाती, भाजी, वरण, भात असा स्वयंपाक करतो. दुपारी दोनपर्यंत आमच्या येथे ७०-८० लोक जेवण करून जातात. आता तर शासनाने पाच रुपयांतच जेवण द्यायला सांगितले आहे. पण काही लोकांकडे ते पाच रु.पण नसतात, अशा लोकांना आम्हीच पैसे नका देऊ जेऊन घ्या म्हणतो. आमच्या येथे एक खूप गरीब बाई तिच्या पाच वर्षांच्या मुलीसोबत एकेदिवशी जेवण करायला आली होती. ती बिचारी बाहेरगावची असून बस बंद असल्याने पायी चालत आपल्या गावाकडे जाण्याच्या विचाराने निघालेली होती. आम्ही तिला जेवण करा म्हणलो, तेव्हा ती सांगू लागली की, हातावर पोट आहे. रोज काम करून कसंतरी राहत होतो, पण या बंदमध्ये काही कामधंदा करता येणार नाही. रोज खायला कसं मिळणार म्हणून गावाकडे निघालो आम्ही मायलेकी. बघू आता कधी पोहोचतो. पण लहान लेकराला घेऊन त्या बाईने असं चालत जाण आम्हाला काही योग्य वाटलं नाही म्हणून आम्हाला कामात थोडी मदत करत सगळं सुरू होईपर्यंत इथेच थांबण्याचे त्यांना समजून सांगितले. आता त्या दोघी आमच्या परिसरातच थांबल्या असून, रोज शिवभोजन केंद्रावर येतात. त्यांच्यासारख्या अनेकांना आम्हाला वेळेवर दोन घास देता येत आहे, याचं समाधान वाटत असल्याचे शिवभोजन केंद्रचालक सरला शेळके यांनी सांगितले.