शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

कॉर्बेट ते काश्मीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 6:05 AM

गेला सोमवार आणि उद्याचा सोमवार.  या दोन्ही दिवसांत एक वेगळाच संबंध आहे. गेल्या सोमवारी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली  घटनेचे 370 वे कलम रद्द करतानाची मोदींची ‘रॉ पॉवर’ सगळ्यांनी पाहिली. उद्याच्या सोमवारी ‘मॅन वर्सेस वाइल्ड’  या लोकप्रिय मालिकेत त्यांचे नवे साहस दिसेल. मोदींची ही फक्त एक प्रतिमा नाही.  ते एक खोलवरचे राजकीय स्थित्यंतर आहे.  काश्मीरच्या राजकीय जंगलासंबंधी  त्यांनी दाखविलेले राजकीय धाडस  आणि कॉर्बेटच्या जंगलामधील प्रतिमा धाडस  हे वरकरणी खूप वेगळे असले तरी  त्यांच्यातील मूल्यात्मक दिशा एक आहे.

ठळक मुद्देसांस्कृतिक पुरुषत्वाचा एक राजकीय प्रवास..

- विश्राम ढोले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात मागचा सोमवार आणि उद्याचा (दि. 12) सोमवार यांच्यामध्ये एक वेगळाच संबंध शोधता येऊ शकतो. मागच्या सोमवारी (दि. 5) त्यांच्याच नेतृत्वाखाली घटनेचे 370 वे कलम रद्द करण्याचा प्रस्ताव संसदेत मांडण्यात आला. गेली सत्तर वर्षे एका गुंतागुंतीच्या समस्येच्या केंद्रस्थानी असलेल्या या कलमाला हात लावण्याचे धाडस कोणतेच पंतप्रधान दाखवू शकले नव्हते. ते मोदींनी दाखविले. आणि तेही चर्चा, वाटाघाटी वगैरे गोष्टीत न पडता. थेट निर्णायक कृती. आता या कृतीची पद्धत आणि परिणामांबाबत मतभेद असू शकतात. पण इंग्रजीत ज्याला ‘रॉ पॉवर’ म्हणतात अशी एक ठोस ताकद आणि इतरांना गाफील ठेवून निर्णायक क्षणी ती वापरण्याचे धाडस ही मोदींची दोन वैशिष्ट्ये याही निर्णयातून दिसून आलीत. याआधी नोटबंदी, सर्जिकल स्ट्राइक, बालाकोट हल्ला यांसारख्या निर्णयांमधून या गोष्टी दिसून आल्या होत्या. यातले प्रत्येक निर्णय गुंतागुंतीचे आणि रिस्की होते. दीर्घकालीन परिणाम घडवून आणणारे होते. त्यांच्या उपयुक्ततेबाबत मतभेदही बरेच आहेत हे खरेच. पण असे निर्णय घेण्यामागील ताकद, धाडस आणि कणखरपणा मात्न त्यांनी वेळोवेळी दाखवून दिला आहे. गेला सोमवार त्याचाच एक प्रसंग.उद्याच्या सोमवारीही तेच दिसणार. पण टीव्हीच्या पडद्यावर. डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘मॅन वर्सेस वाइल्ड’ या अत्यंत लोकप्रिय मालिकेच्या उद्याच्या भागात मोदी दिसणार आहेत. त्यांच्या सोबत असेल या मालिकेचा सूत्नधार बेअर ग्रायल्स. गेल्या महिन्यात त्याने ट्विटरवर या भागाबाबत पहिल्यांदा माहिती दिली होती. मग मोदींनीही ट्विट करून त्याला दुजोरा दिला होता. खुल्या निसर्गामध्ये अनेक आव्हाने असतात. जगण्याचा संघर्ष कडवा असतो. विज्ञान तंत्नज्ञानाचा वापर करून आपण ही आव्हाने पेलतो. संघर्ष खूप कमी करतो. पण अशी साधने अगदी कमीत कमी वापरत, स्वत:ची शक्ती, धाडस, कणखरपणा आणि निर्णयक्षमता यांच्या आधारे निसर्गाच्या खडतर आव्हानांपुढे टिकून राहायचे हे या मालिकेचे मध्यवर्ती सूत्न. बेअर ग्रायल्स हा त्याचा मूर्तिमंत आविष्कार. जगभरातल्या अशा खडतर नैसर्गिक जागा शोधून शोधून हा पठ्ठय़ा तिथे जातो आणि तिथे कमीत कमी साधनं आणि जास्तीत जास्त अंगभूत गुण यांच्या आधारे टिकून राहण्याचे प्रात्यक्षिक दाखवितो. बरेचदा तो त्याच्यासोबत नामवंत व्यक्तींनाही सहभागी करून घेतो. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, अभिनेत्नी केट विन्स्लेट, टेनिसपटू रॉजर फेडरर यांनाही त्याने यांसारख्या कार्यक्रमांमध्ये आणले होते. त्यांच्या सोबतीने निसर्गाच्या खडतर आव्हानांचा सामना करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले होते. उत्तराखंडमधील जिम कॉर्बेटच्या जंगलात ग्रायल्सच्या सोबतीने मोदींनी हे जंगलाचे आव्हान कसे पेलले हे उद्याच्या भागात दाखविले जाणार आहे.अर्थात हा फक्त एक टीव्ही शो आहे. तो बर्‍यापैकी सुरक्षित आणि नियंत्रित वातावरणात चित्नित करण्यात आला आहे. जंगलातील खडतरता, धोके याचे वास्तव जसेच्या तसे त्यात नाही, हे खरेच. एका देशाचा पंतप्रधान त्यात सहभागी होत असताना ते तसे राहूही शकणार नाही हेही खरेच. पण या कार्यक्रमामधील मोदींच्या सहभागातून मिळणारा सुप्त संदेश या खेळाच्या वास्तवापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. हा संदेश आहे त्यांच्या गेल्या सोमवारी दिसलेल्या प्रतिमेबद्दलचा. ताकदवान, कणखर, प्रसंगी रॉ अथवा राकट आणि परिणामांचा फार विचार न करता निर्णायक घाव घालण्याची वृत्ती ही त्यांच्यासंबंधीच्या प्रतिमेची काही वैशिष्ट्ये. अगदी मोदींच्याच शब्दात सांगायचे तर छप्पन इंच छातीवाली प्रतिमा. मोदींनाही स्वत:ची ही प्रतिमा आवडत असावी. कारण ते त्याचा बरेचदा जाहीर उच्चार करत असतात. आणि ती दाखविण्याची किंवा अधोरेखित करण्याची संधी ते सोडीत नाहीत. विशेषत: दृश्य माध्यम असले तर अधिकच. मग ते त्यांच्या योगासनांचे आणि व्यायामांचे व्हिडीओ असो, अमरनाथच्या गुहेमधील ‘ध्यानधारणेचा’ फोटो असो किंवा प्रचार सभांमधील मोदींचा व्यासपीठावरील वावर असो. एक कणखर, ताकदवान पुरुषी प्रतिमा ठसविण्याकडे मोदींचा कल असतो. या प्रतिमा पाहणारी व्यक्ती आणि प्रसंगानुसार त्याचे आविष्कार आणि अर्थच्छटा बदलू शकतात. त्याविषयी निर्माण होणार्‍या मतांमध्येही खूप भिन्नता असू शकते. पण या अर्थावरण किंवा मतावरणाच्या केंद्रस्थानी मोदींची ताकदवान, राकट, कणखर पुरुष ही प्रतिमा आहे हे नाकारता येत नाही. उद्याचा मॅन व्हर्सेस वाइल्ड हा त्याचा नवा आविष्कार. मोदींची ही फक्त एक प्रतिमा नाही. ते एक खोलवरचे राजकीय स्थित्यंतर आहे. फक्त आधुनिक भारतीय राजकारणातच नव्हे तर जागतिक राजकीय पटलावरही ते दिसते. शीर्षस्थ राजकीय नेत्याचा वावर हा विवेकी, संयत, चिवट, अनाक्र मक, संवादी, वत्सल, सौंदर्यासक्त, क्षमाशील असावा हा आधुनिकता नावाच्या विचारप्रणालीने गेल्या तीन-चारशे वर्षांमध्ये निर्माण केलेला व बिंबवलेला एक संस्कार. विशेषत: लोकशाहीमध्ये तर ती एक सुप्त अपेक्षाच बनून जाते. अनेकविध कारणांमुळे आपल्या उत्क्रांतीमध्ये आणि जगभरातील बहुतेक संस्कृतीमध्ये हे गुण स्रित्वाशी जास्त जोडले गेले. म्हणजे हे गुण पुरु षांमध्ये असतच नाही वा असूच नये असे नसते. पण त्यांच्यात ते अत्यवश्य आहे असे मानले जात नाही. देहभूत शक्ती, बाह्य जगाप्रति धाडस, कणखरपणा- प्रसंगी क्रूरपणा, प्रदर्शन, आक्र मकता, पराक्र म, निग्रह आणि स्वकेंद्रितता हे गुण पौरुषाशी जास्त जोडले गेले. आता ही मूल्यात्मक विभागणी काही फार चांगलीच आणि नियमवजा आहे असे नाही. दोन्ही बाजूने अपवाद दिसतात. काही जणांमध्ये दोन्हींचा उत्तम संगमही दिसतो. या धारणांविषयीचे मत आणि मूल्यमापन बदलूही शकते. पण स्रीत्व आणि पुरुषत्व यांच्या अशा ढोबळ धारणा वा अपेक्षा समाजमनामध्ये, व्यक्तिमनामध्ये खोलवर आढळतात हे नाकारता येत नाही. आधुनिकतेने- विशेषत: लोकशाहीवादाने- शीर्षस्थ राजकीय नेत्याच्या वावरामध्ये या सांस्कृतिक- मूल्यात्मक स्रीत्वाला प्राधान्य व प्रतिष्ठा दिली.आपल्याकडे गांधी-नेहरूंपासून ते वाजपेयी मनमोहनसिंगांपर्यंतच्या अनेक नेत्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात हे ‘मूल्यात्मक सांस्कृतिक स्रीपण’ दिसते. या उलट, इंदिरा गांधीमध्ये हे ‘मूल्यात्मक सांस्कृतिक पुरुषत्व’ अनेकदा दिसून आले. त्यांच्यासंदर्भात ‘दुर्गा’ किंवा ‘मंत्निमंडळातील एकमेव पुरु ष’ वगैरे जी संबोधने वापरली गेली त्यामागे हीच स्री-पुरुष मूल्यात्मक विभागणीची समज होती. इंदिरा गांधींनंतर दीर्घकाळाने मोदींच्या रूपात देशाच्या शीर्षस्थस्थानी असा मूल्यात्मक पातळीवरील पुरुषी नेता आला आहे. सामाजिक वर्तन दाखविणार्‍या प्राण्यांच्या अभ्यासामध्ये अशा आक्रमक, ताकदवान पुरुषाला ‘अल्फा मेल’ म्हटले जाते. मोदींचे वर्णन काहीजण ‘अल्फा मेल’ असेही करतात त्यामागे हीच धारणा आहे. मोदी प्रत्यक्षातही तसेच आहेत किंवा नाही हे इथे दुरून सांगणे अवघड आहे. पण त्यांचा सार्वजनिक वावर ही मूल्यात्मक पुरुषी प्रतिमा प्राधान्याने निर्माण करतो. मोदीच कशाला, जगभरात अनेक ठिकाणी शीर्षस्थस्थानी असे मूल्यात्मक पुरुषी नेते दिसत आहेत. रशियाचे अध्यक्ष पुतिन, फिलिपाइन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो ड्यूट्रेट, उरुग्वेचे माजी अध्यक्ष जोस मुजिका, काही प्रमाणात जपानचे पंतप्रधान शिंझो आबे अशी काही उदाहरणे त्यासाठी देता येतील. (काही जण त्यामध्ये ट्रम्प यांचेही नाव जोडतात. पण ट्रम्प हे निराळेच आणि गुंतागुंतीचे प्रकरण आहे.) या नेत्यांचा सार्वजनिक वावर, टीव्ही वा तत्सम दृश्य माध्यमे आजूबाजूला असताना होणारे त्यांचे वर्तन त्यांच्यातील हा मूल्यात्मक पुरुषीपणा अधोरेखित करतो. लोकशाहीतील सुप्त धारणांसाठी असे नेते नवीन आहेत. आदिवासी समूहाच्या नेत्यासारखी भासणार्‍या त्यांच्या बलवान, प्रदर्शनी, कणखर, धाडसी, गूढ, स्वकुलदक्ष प्रतिमेची लोकशाहीला सवय नाही. म्हणूनच अशा नेत्यांविषयी लोकशाहीमध्ये एकाच वेळी अपार आकर्षण आणि अफाट विरोध या दोन्ही प्रतिक्रि या आढळतात. तसेही भारतीय मनाला अशा ‘संभवामि युगे युगे’ टाइपच्या त्नात्या पुरु षाचे आकर्षण वाटत असते. दृश्य माध्यमांमध्ये तर अशा कृतिप्रधान, शक्तिप्रधान, गूढ, धाडसी, प्रदर्शनी प्रतिमेला एक वेगळी झळाळी देण्याची मुलत:च एक शक्ती असते. त्यात जंगल, शिकार, भटकंती, वगैरे गोष्टी तर  सांस्कृतिक संस्कारांमधून पुरुषत्वाशी जोडलेल्या. म्हणूनच मोदींची छप्पन इंची छातीवाली प्रतिमा आणि त्यांचे मॅन वर्सेस वाइल्ड कार्यक्र मामध्ये सहभागी होणे यात एक मूल्यात्मक संगती आहे. ही प्रतिमा आणि त्यातील मूल्ये कोणाला आवडणार नाहीत, त्याबाबत मतभेदही असतील, पण काश्मीरच्या राजकीय जंगलासंबंधी दाखविलेले राजकीय धाडस आणि कॉर्बेटच्या जंगलामधील प्रतिमा धाडस हे वरकरणी खूप वेगळे असले तरी त्यांच्यातील मूल्यात्मक दिशा एक आहे. कोणाला ते आवडो न आवडो कॉर्बेट ते काश्मीर हा सांस्कृतिक पुरुषत्वाचा राजकीय प्रवास आहे. vishramdhole@gmail.com(लेखक माध्यम, तंत्नज्ञान आणि संस्कृती या विषयाचे अभ्यासक आहेत.)