बखर वाड्गमयाचा भाष्यकार

By Admin | Updated: September 20, 2014 19:32 IST2014-09-20T19:32:06+5:302014-09-20T19:32:06+5:30

बखर वाड्मय हा मराठी सारस्वताचा एक तेजस्वी अंश आहे. इतिहासकारांनी बखरींना अव्वल दर्जाचा पुरावा मानलेले नाही; पण बखरीतल्या ओजस्वी वर्णनाचे तसेच क्वचित पूरक संबंधांचे मात्र कौतुकच केले आहेa

Commentator | बखर वाड्गमयाचा भाष्यकार

बखर वाड्गमयाचा भाष्यकार

 निनाद बेडेकर 

 
 
बखर वाड्मय हा मराठी सारस्वताचा एक तेजस्वी अंश आहे. इतिहासकारांनी बखरींना अव्वल दर्जाचा पुरावा मानलेले नाही; पण बखरीतल्या ओजस्वी वर्णनाचे तसेच क्वचित पूरक संबंधांचे मात्र कौतुकच केले आहे. ‘काव्येतिहास संग्रहा’तून का. ना. साने आणि कीर्तने यांनी बखरींच्या प्रती जमवून, त्यांचे संपादन करून त्या छापल्या. डॉ. र. वि. हेरवाडकर यांनीही अनेक बखरींचे संपादन केले. ते बखर वाड्मयाने मोहित झाले आणि त्यांनी त्या सारस्वतात स्वत:ला झोकून दिले. ‘पानिपतची बखर’, ‘सप्तप्रकरणात्मक चरित्र’, ‘संभाजीमहाराज आणि थोरले राजाराममहाराज यांची चरित्रे’ इत्यादी बखरींचे संपादन करून त्यांनी त्या पुन:प्रकाशित केल्या.
एवढेच नव्हे, तर त्यांनी याच विषयावर प्रबंध लिहून १९५७मध्ये डॉक्टरेट पदवीही मिळविली. त्यांचा ‘मराठी बखर’ हा विस्तृत ग्रंथ त्यांच्या अविरत कामाची आणि बखरींवरील प्रेमाची साक्षच आहे. त्यांना १४0 बखरी उपलब्ध झाल्या, असे त्यांनी म्हटले आहे! त्यांची यादीही दिली आहे. त्यात ऐतिहासिक, पौराणिक, सांप्रदायिक अशा हस्तलिखित व छापील बखरीही आहेत. ऐतिहासिक बखरींची संख्या ७८ आहे! ऐतिहासिक बखरी या मोडी लिपीत असल्याने त्यांचे वाचन गुंतागुंतीचे आहे. शिवाय, त्यात अरबी, फारसी, उर्दू अशा भाषांतील शब्द वारंवार येतात. एकेका शब्दाचे अनेक अर्थ असू शकतात. अशा वेळी बखरलेखकाला नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे, हे संपादकाच्या अभ्यासावर अवलंबून असते.
हेरवाडकर या बाबतीत कोठे उणे पडले, असे जाणवत नाही. संपादकाने त्याचे हे काम केल्यावर बखर वाड्मयाला वाचकांचा उठाव नसल्याने प्रकाशक असे साहित्य छापायला नाराज असतात. विद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठे यांनी अभ्यासासाठी बखरी लावल्या, तर मात्र ते ग्रंथ जोमाने खपतात. ‘सभासदाची बखर’ ही त्यांतील एक.
श्री. ना. बनहट्टी यांनी र. वि. हेरवाडकर यांच्या एका बखर ग्रंथाला पुरस्कार देताना लिहिले आहे, ‘‘डॉक्टर र. वि. हेरवाडकर आणि त्यांचा व्यासंग यांच्याबद्दल लिहिणे कठीण वाटते. प्रशंसा करावी तर तसले शब्द गुळगुळीत व पांचट बनून गेलेले; इतर अडचणीही कमी नाहीत. त्यांचा व्यासंग झटपट संशोधनात जमा होण्याजोगा नाही. चुटपुटत्या आधारावर तर्कांचे मोठे-मोठे इमले उभारण्याची त्यांना सवय नाही. बळकट आधार असला तरी त्यावरून सावधपणे जपून अनुमान काढावयाचे, अशी त्यांची पद्धत दिसते. जातीय अभिमान किंवा पूर्वग्रह यांचा किंचितसुद्धा वास त्यांच्या संशोधनाला लागलेला दिसत नाही. सत्ताधीशांकडे नजर ठेवून त्यांचे लेखन वा संशोधन होताना दिसत नाही. अशा निर्गंध, निर्लेप संशोधनाची प्रशंसा तरी करावयाची कशी? एखाद्या मुद्दय़ावर किंवा प्रसंगावर सर्व ठिकाणचे, सर्व बाजूंचे आधार ते शोधून काढतात, आणि समतोल मनाने त्यांचा विचार करतात. असेच त्यांच्या इतर बाबतींतही दिसते. प्राध्यापक झालो, डॉक्टरेट मिळवली तेव्हा आता इतिकर्तव्यता झाली, असे त्यांनी मानल्याचे दिसत नाही. अनेक विषयांत शिरून अभ्यासाचा अथवा लेखनाचा फापटपसारा मांडल्याचेही आढळत नाही. संशोधकीय पदवीकरिता जो विषय निवडला, त्याच विषयाचा निष्ठापूर्वक व्यासंग चालू ठेवून अतिशय उपयुक्त निर्मिती त्यांनी केली आहे..
‘‘बखरींचे संपादन करताना त्यांनी एक नमुनेदार साचा बनविलेला दिसतो. बखर ज्या विषयावर किंवा व्यक्तीवर असेल, त्याचा वृत्तांत किंवा तिचे चरित्र ते स्वतंत्र रीतीने निरूपण करतात. नंतर त्याच्या अभ्यासाची साधने सांगून संपादनाकरिता घेतलेल्या बखरीचे ऐतिहासिक महत्त्व विशद करतात. पुढे बखरीचे वाड्मयीन स्वरूप आणि भाषिक स्वरूप यांचे विवेचन करून प्रस्तावना संपवितात. खुद्द बखरीची मूळ संहिता येते, तिथे अर्थद्योतक टिपा पानाच्या खालच्या अंगाला देतात. त्यात शब्दाची व्युत्पत्ती देण्यास ते विसरत नाहीत. मुख्य ग्रंथ संपल्यावर ऐतिहासिक माहिती देऊन योग्यायोग्य विवेचन करणार्‍या टिपा, यात डॉ. हेरवाडकरांच्या सखोल अभ्यासाचा प्रत्यय येतो!’’
बनहट्टी यांनी वर डॉ. हेरवाडकरांची संपादनशैली काय होती, याचा उत्तम परार्मश घेतला आहे. तो अचूक आहे. डॉ. हेरवाडकरांनी अध्यापनाचेही काम केले. ते एक विद्यार्थिप्रिय प्राध्यापक होते. 
बखरीतील उतारे त्यांना तोंडपाठ होते; त्यामुळे विद्यार्थी थक्क होत आणि त्यांना अशा प्राध्यापकांबद्दल आपुलकी वाटे. बखरींविषयी, त्यातील ऐतिहासिकतेविषयी अथवा साहित्यिक गुणावगुणांविषयी स्वत: डॉ. हेरवाडकरांना काय वाटते ते आपण जाणून घेऊ.  डॉ. हेरवाडकर लिहितात, ‘‘स्वकीयांच्या पराक्रमाची नोंद करण्याच्या हेतूने मराठी  बखरींचे लेखन झाले म्हणूनच ते इतिहासाचे एक साधन आहे. त्याला इतिहास हे बडे नाव देता आले नाही, तरी इतिहासाशी त्याचे जवळचे नाते आहे. बखरीतील घटनांच्या जुळणीत इतिहासाचे अंग स्पष्ट दिसते. तद्वतच त्याच्या निवेदनात वाड्मयाचे अंग दिसते. बखरकार हा पक्षीय दृष्टिकोनातून ऐतिहासिक घटनांकडे बघतो. त्यांच्याविषयी त्याला आत्मीयता वाटते. या कारणामुळे त्याच्या लेखनाला भावनेचा स्पर्श झाला आहे. बखर सजविण्याचे त्याचे काम असल्याने त्याचे काम वाड्मयीन स्वरूपाचे झाल्यास नवल नाही. वाड्मयलेखनाला आवश्यक असलेली आत्मनिष्ठा त्याच्या ठायी निश्‍चित आहे. तिचे मूर्त स्वरूप म्हणजे त्याची कृती. ऐतिहासिक व्यक्ती व घटना यांबद्दलची त्याची कल्पनात्मक प्रतिक्रिया कित्येक वेळा सखोल किंवा व्यापक आढळत नसली, तरी त्या प्रतिक्रियेशी मात्र त्याने अविचल इमान राखले आहे, याचा प्रत्यय येतो. बखरीत सत्याचा अपलाप जाणूनबुजून कोठेही केलेला नाही..!’’
‘अस्सल कागदाचे एक चिठोरे अवघ्या बखरींचे प्रमाण हाणून पाडण्यास सर्मथ आहे,’ असे म्हणणारे वि. का. राजवाडे यांनीसुद्धा ‘महिकावतीची बखर’ संपादन करून छापलीच! बखर वाड्मयाचा मोह कोणाला टळला नाही? इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, शं. ना. जोशी (वत्स), वि. स. वाकसकर, का. ना. साने, रा. चिं. ढेरे अशा मोठय़ा इतिहासाचार्यांनी वेगवेगळ्या बखरींचे संपादन केले आहे. बखरीतील भाषा ही मराठी सारस्वताला मिळालेली मोठी देणगीच आहे. डॉ. र. वि. हेरवाडकरांना या भाषेची भुरळ पडली, यात नवल काय? त्यांच्या संपादनशैली आणि साच्याबद्दल श्री. ना. बनहट्टींनी लिहिलेच आहे. साचा उलगडून दाखविला आहे. ना. गो. चापेकर यांनी सप्तप्रकरणात्मक चरित्र या बखरीच्या पुरस्कारात लिहिले आहे,
‘‘बखरींसारख्या उपेक्षित वाड्मयप्रकाराचा विशिष्ट पद्धतीचा अभ्यास डॉ. हेरवाडकर हे करीत आहेत, ही गोष्ट स्वागतार्ह होय. अशाच प्रकारचा अभ्यास त्यांच्या हातून उत्तरोत्तर होऊन मराठी साहित्यात भर पडो, ही सदिच्छा व्यक्त करतो.’’ डॉ. हेरवाडकरांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. हेरवाडकर हे मृण्मय होते; पण त्यांचे बखरवाड्मय हे चिन्मय आहे. चिरंतन आहे. हाच त्यांचा लौकिक निरंतर राहो.
(लेखक ज्येष्ठ इतिहाससंशोधक आहेत.)

Web Title: Commentator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.