क्लोज्ड अँण्ड कॅन्सल्ड- चीनमधल्या ‘क्वॉरण्टाइन’ जगण्याची दुखरी कळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 06:03 AM2020-03-22T06:03:00+5:302020-03-22T11:25:44+5:30

एकटेपणा, एकाकीपणा, दहशत, आर्थिक विवंचना आणि घरातल्या माणसांबरोबर कधी नव्हे ते बंद दाराच्या आत सतत राहण्याची सक्ती ! - या सगळ्याने चिनी माणसांची मोठी परीक्षा घेतली आहे. चिनी सोशल मीडियात सध्या एक विनोद जबरदस्त व्हायरल आहे. ‘रस्त्यावर नागडं पळत सुटा; चालेल. पण मास्क न लावता गेलात, तर लाजच काढतील तुमची !!’

Closed and canceled - other side of corona to live 'quarantine' in China |  क्लोज्ड अँण्ड कॅन्सल्ड- चीनमधल्या ‘क्वॉरण्टाइन’ जगण्याची दुखरी कळ

 क्लोज्ड अँण्ड कॅन्सल्ड- चीनमधल्या ‘क्वॉरण्टाइन’ जगण्याची दुखरी कळ

Next
ठळक मुद्देकोरोना व्हायरसच्या दहशतीने माणसांना घरात डांबलं आणि माणसांपासूनच दूर राहा असं बजावलं तेव्हा घरात कोंडलेल्या माणसांचं नेमकं काय झालं?

- मेघना ढोके

‘यू नो अवर लाइफ, लाइक कार, हायस्पीड, नो ब्रेक! नाऊ नो स्पीड! स्टॉप्ड. शटअप!!’
- बीजिंगमध्ये फ्रीलान्सर म्हणून काम करणारा पत्रकार  यान झू सांगत होता. तो मूळचा बीजिंगपासून दोनशे किलोमीटरवर असलेल्या एका लहानशा गावचा. तो स्वत:ला जॉब मायग्रण्ट म्हणवतो. त्याच्यासारखे जॉब/वर्क मायग्रण्ट चीनमध्ये बरेच. जे कामासाठी मोठय़ा शहरात आलेत, मात्र त्यांचे आईवडील गावीच राहतात. तर या लॉकडाउनच्या काळात चिनी माणसांचं नेमकं काय झालं हे यान सांगत होता, एका वाक्यात. म्हणाला, ‘लाइफ ऑल क्लोज्ड, कॅन्सल्ड. डाउन !’
कोरोना व्हायरसच्या दहशतीने माणसांना घरात डांबलं आणि माणसांपासूनच दूर राहा असं बजावलं तेव्हा घरात कोंडलेल्या माणसांचं नेमकं काय झालं? घरातल्या चार भिंतीत जगणं नेमकं सावरलं, कोमेजलं, सापडलं की तुटायला लागलं हे शोधायचं म्हणून चीनमधल्या पत्रकारांना, चीनचा देश आणि संस्कृती म्हणून अभ्यास असणार्‍या अभ्यासकांना फोन केले. त्यांच्याशी बोलता बोलता फिलिपिन्सचे पत्रकार ऑनलाइन भेटले. तेही सध्या पूर्ण लॉकडाउनमध्ये घरबंद आहेत. शेजारी पाकिस्तानात तर हाहाकार आहे आणि माणसं गुराढोरांसारखी क्वारण्टाइन कॅम्पमध्ये कोंबली जात आहेत, याचे व्हिडीओ तिथले पत्रकार व्हॉट्सअँपवर टाकून  ‘हे थांबवा’ म्हणत झगडत आहेत.
या सार्‍यांशी प्रदीर्घ बोलणं झालं, तेव्हा दिसायला लागलं की एखाद्या आजाराची दहशत माणसांना घरात बसवते तेव्हा नेमकं काय होतं त्यांचं? त्यांच्या मनांचं, घराचं? आणि जगण्याच्या अपरिहार्यतेचंही.
सुदैवानं अजून भारतात आपल्या वाट्याला ते ‘लॉकडाउन’ आलेलं नाही. घराबाहेर पडायला बंदी नाही. घरात कुणी आपल्याला सक्तीनं कोंडूनही घातलेलं नाही. हातातल्या स्मार्टफोनवर अविरत इंटरनेट खळखळतं आहे. त्यामुळे कोरोनावरचे विनोद, मिम्स आणि प्रचारकी उपचार ढकलगाडीत घालून ढकलण्याइतपत हसू आणि स्वास्थ्य आपल्या वाट्याला आलं आहे.
पण ज्यांना मृत्यूच्या भयानं घरात बसावं लागलं त्यांचं काय? त्यांच्या घरात काय घडलं?
यान सांगतो, अनेकांची घरं छोटी. फोकस्ड लाइफस्टाइल. उठायचं कामाला जायचं. घरी यायचं. झोपायचं. फिजिकली घरातल्या माणसांसोबत मी स्वत: जास्त काळ कधी राहिलो नाही. हे फिजिकली सतत एकमेकांना ‘सहन’ करणं सुरुवातीला मला आणि माझ्या मित्रांनाही खूप जड गेलं. काय बोलायचं असं झालं सुरुवातीला. माझ्या गावी मी गेलो होतो, तिथं माझे आईवडील, त्यांचे आईवडील, आणि माझी पणजी, तिची बहीण एवढे घरात होते. आयुष्यात पहिल्यांदा मलाही असंच वाटलं की, माझ्यात त्यांच्यात काही ‘कनेक्ट’ नाही. म्हणजे बोलणं आहे, भांडणं नाही; पण शेअर काही करायचं तर आमचं आयुष्यच एकसारखं उरलेलं नाही.
यानची दोस्त, मेकअप आर्टिस्ट असलेली नोई. तिनं याकाळात बर्‍याच ऑनलाइन मेकअप ट्युटोरिअल्स घेतल्या. ती बीजिंगमध्ये एकटीच राहते. ती सांगते, ‘मेकअप हा आम्हा चिनी तरुणींच्या जगण्याचा अविभाज्य घटक आहे. आता चेहर्‍याला मास्क लावणं इतकं गरजेचं झालंय की फक्त डोळेच दिसतात. तर याकाळात मी फक्त डोळ्यांचा मेकअप कसा करायचा याच्या शिकवण्या घेतल्या. खूपजणी त्याकाळात ऑनलाइन होत्या. बाकी मेकअप, लिपस्टिक यावर खर्च करायचे पैसे आयलॅशेस, आयश्ॉडोवर, आयमेकअपवर खर्च व्हायला लागले. कुणी कुणी तर हाऊ टू मेक अ मास्क, फॅशनेबल मास्क अशा शिकवण्या घेतल्या. त्यातूनही आम्ही बरे पैसे कमवले. कधीतरी आयुष्य नॉर्मल होईल तेव्हा पैसे लागतीलच जगायला, मग घरात बसून जितके कमावता आले तितके मी कमावले; पण घरच्यांना वाटलं की, मला पैशापुढे काही दिसतच नाही !’
हुआंग मीन नावाची प्रसिद्ध चिनी चित्रकार आहे. त्यांचं बीजिंगमध्ये होणारं चित्रप्रदर्शन रद्द झालं. चिनी माणसांचं जगणं आपल्या चित्रातून त्या साकारत असतात. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्या म्हणतात, ‘आयुष्य सुसाट चाललं होतं, एकदम कुणीतरी पॉज बटन दाबलं. सगळंच थांबलं !’
हे थांबलेपण असं चिनी घरातही एकदम घुसलं. ज्या चिनी माणसांना, घरांना सतत धडधडणंच माहिती होतं, ते एकदम थांबले. त्या थांबलेपणातून नेमकं काय झालं?
दिल्लीच्या ओ. पी. जिंदाल विद्यापाठीत चायनीज स्टडीजच्या प्राध्यापक असलेल्या गुंजन सिंग अलीकडे डिसेंबरमध्येच चीनला जाऊन आल्या. त्या सांगतात, एक मूल धोरणामुळे चीनमध्ये विभक्त, लहान कुटुंबच जास्ती आहेत. तो समाज अत्यंत टार्गेट/वर्क ड्रिव्हन आहे. सकाळी लवकर कामावर जायचं. सायंकाळी घरी. लवकर जेवण की आराम असं रुटीन. तंत्रज्ञान अत्यंत प्रगत आहे, त्यामुळे तरुण सगळे ऑनलाइन असतात. ज्येष्ठांनाच घरातलं कोंडलेपण जास्त अंगावर आलं असेल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे चिनी माणसं कामासाठी रोजचा प्रवास जास्त करतात. अंतर्गत प्रवास आणि स्थलांतर मोठं आहे. ज्यांचं काम रोजंदारीवर आहे, त्यांचे रोजगार याकाळात बुडाले. सगळ्यात मोठा फटका पर्यटनाला बसला. चिनी लोक देशांतर्गत पर्यटनाला मोठय़ा प्रमाणात जातात, ते थांबलं. त्यांच्या अन्नाविषयी, फूड इंडस्ट्रीविषयी बरावाईट प्रचार झाला, त्याचाही फटका स्थानिकांना मोठय़ा प्रमाणात बसला.
आणि घरांमध्ये काय झालं असेल? तर चीनच्या मोठय़ा शहरात अनेक उंचच उंच इमारती आहेत. त्याही सेण्ट्रली एअर कंडिशण्ड. एवढय़ा मोठय़ा इमारतींना क्वॉॅरण्टाइन कसं करणार असे प्रश्न होते. लोकांनी गेटवर कधी जाऊन आपलं ऑनलाइन आलेलं सामान कधी घ्यायचं याच्या वेळाही ठरवून देण्यात आल्या होत्या. कुणी कुणाला भेटायचं नाही. त्यातून अनेकांच्या लाइफस्टाइलचे प्रश्न निर्माण झाले. वृद्धांना तर घराबाहेर, बागेत जाणंही शक्य नव्हतं. माणसांना असं थांबलेपण आलंच!’ 
ओ. पी. जिंदाल महाविद्यालयात चायनीज स्टडीजचे प्राध्यापक असलेले अविनाश गोडबोले सांगतात, ‘बीजिंग-शांघाय यासारख्या मोठय़ा शहरात स्थानिकांपेक्षा स्थलांतरितांची संख्या मोठी आहे. अनेक फॅक्टरी वर्कर्स, कामगार तिथं आपल्या कुटुंबापासून दूर राहतात. शिक्षण आणि नोकरीसाठी स्थलांतर करून आलेल्यांची संख्या मोठी. आणि त्यामानानं सोशल सिक्युरिटी काही नाही. त्यात कम्युनिटी कंट्रोल सिस्टीम. इतकं नियंत्रित जगणं की, या कोरोनाच्या काळात रोज आपल्या शरीराचं तापमान अपडेट करणं सक्तीचं होतं. सलग तीन दिवस ते नाही केलं तर घरी चौकशीला लोक हजर होत. या एक्सट्रिम कण्ट्रोल्ड जगण्याचा अनुभव याकाळात लोकांनी घेतला.’
या कोरोनाच्या निमित्तानं अनेकांनी दहशतीत जगण्याचा अनुभव पहिल्यांदाच घेतला. विशेषत: मिलेनिअल्सनी. बाकी जगाच्या गळ्याला ‘टेररिझम’ हा शब्द तात लावत असला तरी चिनी मिलेनिअल्सनी त्याअर्थानं 9/11 नंतरचं जग अनुभवलं नाही. चिनी भिंतीआड जागतिक दहशतवादाचा अनुभव नव्हता. आपलं जगणं इतकं असुरक्षित होऊ शकतं हे त्यांनी पहिल्यांदाच अनुभवलं. चिनी सोशल मीडियात वाहणारे उदंड रिपोर्ट्स पाहिले तरी हे लक्षात येतं की, त्या दहशतीचा अनुभव या तरुण मुलांनी पहिल्यांदा घेतला. दहशतवाद व्हायरल होतो आणि मरण्याचं भय आपल्याला घेरतं कसं हे सांगणारे अनुभवही अनेकांनी याकाळात लिहिले. 
एकटेपणा, एकाकीपणा, दहशत, आर्थिक विवंचना आणि घरातल्या माणसांसह प्रत्यक्ष जास्त काळ (सक्तीनं) राहण्याचा अनुभव हे सारंच अनेकांसाठी परीक्षा पाहणारं ठरलं.
चिनी सोशल मीडियात सध्या एक विनोद जबरदस्त व्हायरल आहे. त्या वाक्याच्या आधारे मिम्स बनत आहेत.
‘रस्त्यावर नागडं पळत सुटा; चालेल. पण मास्क न लावता जाणं म्हणजे मोठं निलाजरं काम.’
जगणं असं इतकं उघडवाघडं- नागडं होऊन आपल्याच घरात आपल्यालाच कोंडून घालेल असं कुणाला वाटलं असणार?. पण तसं झालंय खरं !

उद्या काय होईल.? - बंद दाराआडच्या फिलिपिनो माणसांची घुसमट

मार्लर अलेक्झांडर लुसरो. फिलिपिन्समधला तरुण पत्रकार. लिपा नावाच्या शहरात राहतो. ऑनलाइन भेटला, म्हणाला, सध्या हाताला काही कामच नाही. किती उकरणार स्टोरी कोरोनाच्या, सगळं तर ठप्प आहे. कम्प्लिट लॉकडाउन.
कोरोना विषाणूने फिलिपिन्सलाही  घेरायला सुरुवात केली आणि गेल्या 17 मार्चपासून येत्या 15 एप्रिलपर्यंत तिथं पूर्ण लॉकडाउन आहे. लोकांना सक्तीनं घरात बसवण्यात आलं आहे. लोकांच्या हातात आधीच पैसा नाही, काहींना तर धड रहायला घरंही नाहीत. अलीकडेच म्हणजे फेब्रुवारीत ज्वालामुखीचा उद्रेक झाला. पाच लाखांहून अधिक लोक बेघर झाले. जीव वाचवून पळाले.
असंच आपलं घरदार सोडून पळावं लागणार्‍यांत मार्लरचंही कुटुंब आहेच.
मार्लन सांगतो, ‘ज्वालामुखीच्या उद्रेकात आमचं घर गेलं. आम्ही कसेबसे तगून आहोत. वयस्क, आजारी आईवडील. माझी दोन भावंडं आणि मी. अजूनही उद्रेकाची भीती आहेच. आता त्यात कोरोना. आमच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावरच पोलीस चेकपॉइण्ट आहे. एका घरातल्या एकाच व्यक्तीला कामासाठी बाहेर जाता येतं. माझ्या घरातून मी जातो. त्याचं कारण असं की, मी फ्रीलान्स रिपोर्टर आहे. माझी स्टोरी एअर झाली तर पैसे मिळतात. नो वर्क, नो पे असं मीडियातलं धोरण आहे. आमच्याकडे माध्यमांची अवस्था भीषण आहे. मला जगायचं तर काम करण्यावाचून पर्याय नाही. आणि उद्या कोरोनाची लागण झाली तरी माझी जबाबदारी घेणारी कोणी  व्यावसायिक संस्था माझ्या पाठीशी नाही. माझ्यासारखे अनेक आहेत. हातावर पोट. महागाई खूप. खाणारी तोंडं फार. त्यात आता आमच्याकडे सगळ्यांच्याच नोकर्‍या मोठय़ा प्रमाणात जातील असं भय आहे. अर्थव्यवस्था, ज्वालामुखी आणि कोरोना सगळी संकटं एकत्रच आली आहेत. आणि त्यात आता सरकारनं आम्हाला ‘इनहान्स्ड कम्युनिटी क्वारण्टाइन’ म्हणून घरात डांबलं आहे. जगायचं कसं, खायचं काय याचं मात्र काही उत्तर नाही. दुसराही देशात एक वर्ग आहे. ज्यांना खायची ददात नाही. ते सुखवस्तू आहेत. त्यांना सुटी मिळाली. ते पाटर्य़ा करताहेत. त्यांचा इतर समाजाशी काही संबंध नाही. त्यांनी पॅनिक बाइंग केलं. साठवून ठेवलं सगळं. आता ते मजेत आहेत. ज्यांना उद्याची चिंता, नोकरी गमावण्याचं भय आणि आज हातात आर्थिक स्थैर्य नाही, त्यांना आज घरात बसून एकच गोष्ट खातेय, उद्या काय होईल.’
- मार्लन सांगत असतो, त्याची, त्याच्या समयवस्क फिलिपिनो जगण्याची कहाणी.
प्रश्न विचारावं असं आपल्याकडेही काही उरत नाही, ऐकता ऐकता.


कोरोनाचा अंधार दाटला खरा, पण त्यातही जगण्यात 
उमेदीचे दिवे उजळणारे हे काही ‘ग्लोबल’ क्षण..

..गाणारी गोष्ट


1    ज्या वुहानमधून कोरोना जगभर गेला त्या वुहानच्या कोरोना रुग्णांच्या वॉर्डात जाऊन अनेकांनी गाणी गायली. काराओके करत रुग्णांना गाणी म्हणायला लावली. होम काराओके रेडिओ स्टेशनवर सुरू करत ‘वुहान जियापू’. म्हणजे जगू आपण म्हणत जगण्याची आस जागी ठेवली.
2 इराणमध्ये 514 लोक कोरोनानं गेले. उपग्रहानं पाठवलेल्या छायाचित्रांत कबरी खोदकाम दिसलं. इतकं भयंकर चित्र. त्यात सैन्याची सत्ता. माणसांचं दमन. सायबर पोलिसांचं प्रत्येकावर लक्ष. त्यात डॉक्टर्स पुढं आले. देशभर लॉकडाउन असताना, उपचार करणार्‍या काही तरुण डॉक्टरांनी आपलं काम आटोपल्यावर नृत्य करत, वाद्यं आणून संगीत वाजवत रुग्णांना अधिक दिलासा दिला.
3    इटलीतल्या लोकांनी बाल्कनीत उभं राहून गायलेली गाणी. राष्ट्रगीत म्हणत वातावरणात भरलेली ऊर्जा तर व्हिडीओच्या माध्यमातून सार्‍या जगानं पाहिली. लोक बाल्कनीत उभं राहून गात होते. एकटेपणात सारे एकत्र होते.
4त्या उमेदीच्या सुरांचा परिणाम म्हणून की काय व्हेनीसच्या जगप्रसिद्ध कॅनलमध्ये अचानक मासे दिसू लागले. डॉल्फिन पोहायला लागले. आणि अनेकांनी त्याचे फोटो नेटवर टाकले.
5फ्रान्समध्येही पूर्ण लॉकडाउनच्या काळात. एक ऑपरा सिंगर आपल्या खिडकीत उभं राहून उत्तम ऑपरा गात होती, त्या गाण्याचे व्हिडीओ व्हायरल झाले.
6भारतात गुरुंगावमध्ये सेक्टर 28 मध्ये राहणार्‍या सोसायटीतल्या लोकांनी गायत्री मंत्र आणि हम होंगे कामयाब म्हणत युरोपातल्या फ्लॅश मॉबचं अनुकरण केलं.
7    ब्रिटनी स्पिअर्सही यात मागे राहिली नाही. जगभर लोकांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभावं म्हणून आपण ऑनलाइन काही योग मुद्रा दाखवू असं म्हणत तिनं पुढाकार घ्यायचं ठरवलं.
meghana.dhoke@lokmat.com
(लेखिका लोकमत वृत्तसमूहात मुख्य उपसंपादक आहेत.)

Web Title: Closed and canceled - other side of corona to live 'quarantine' in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.