शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
3
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
4
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
5
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
6
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
7
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
8
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
9
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
10
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
11
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
12
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
13
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
14
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
15
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
16
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
17
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
18
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
19
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
20
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला

सिनेमातला सिनेमा

By admin | Updated: November 8, 2014 18:18 IST

काय करायचे आहे, कसे करायचे आहे याची पक्की समज हे नव्या पिढीचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच त्यांच्या जगण्याला एक प्रकारची घाई आहे. जगभरातील नव्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांमधून ही घाई दिसून येते. मात्र, कशावर फोकस करायचा, हे माहिती असल्याने ही घाई वृथा वाटत नाही.

- अशोक राणे

 
हल्लीची पिढी खूपच स्मार्ट आहे, असं अलीकडे सर्रास कानांवर येतं. म्हणजे नेमकं काय, असं विचारलं तर सरसकट सर्वांनाच सांगता येईल असं नाही. ‘आपल्या आधीच्या पिढीपेक्षा अधिक हुशार’ एवढंच मोघम उत्तर मिळण्याचीच दाट शक्यता. ही पिढी वेगळी आहे हे खरंच आहे. याआधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे, ती इमोशनल आहे; परंतु सेंटिमेंटल नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा निर्णय ते फार वेळ न दवडता घेतात. कारण ते उगाचच भावुक होत नाहीत. कुणाला काय वाटेल याचा तर जवळपास विचारच करीत नाहीत. कारण त्या त्या निर्णयाचा थेट त्यांच्याशी आणि केवळ त्यांच्याशीच मुख्यत: संबंध असतो, याची त्यांना स्पष्ट आणि नेमकी जाणीव आहे. पुढच्या वळणाकडे सरकण्याची त्यांना एक प्रकारची अपरिहार्य घाई असते. आधीच्या पिढीसारखं एकाच जागी खोळंबून राहणं त्यांना त्यांच्या काळाच्या- काम, काळ, वेगाच्या संदर्भात परवडणारं नसतं. पूर्वीची पिढी एकदा नोकरीत चिकटली की ग्रॅच्युइटी, फंड घेऊनच बाहेर पडणार. आताची पिढी सटासट नोकर्‍या बदलते आणि इतकंच नाही, तर त्याचं म्हणजेच करियरचं नीट प्लॅनिंगही करते. त्यांच्या सभोवताली आकर्षित करून घेणार्‍या गोष्टी इतक्या असतात, की या पिढीतील मुले जेव्हा फोकस्ड राहतात, तेव्हा त्यांचं मनापासून कौतुक करावंसं वाटतं. काळ कुठलाही असो, प्रत्येक तरुण पिढीत दोन प्रकार असतातच. एक वर्ग सर्वच बाबतींत बेपर्वा असतो, तर दुसरा फोकस्ड! सभोवताली नीट बारकाईने पाहिलं, तर एक गोष्ट सहज लक्षात येईल आणि ती म्हणजे आधीच्या पिढय़ांतील फोकस्ड लोकांपेक्षा या आताच्या पिढीसाठी काळ मोठा कसोटीचा आहे.. कारण भरकटण्याच्या शक्यता आता अधिक आहेत आणि इथेच ही पिढी खर्‍या अर्थाने आधीच्या पिढीपेक्षा अधिक स्मार्ट वाटते. अशी एक स्मार्ट मुलगी मला भेटली ‘डोन्ट से दॅट वर्ड’ या जपानी चित्रपटात!
साटो ताकुमा या चोवीस वय असलेल्या लेखक-दिग्दर्शकाचा हा चित्रपट! हायस्कूलच्या फुटबॉल टीमची मॅनेजर नात्सु हिला टीममधल्या खेळाडूंपेक्षा पराभव वर्मी लागला आहे. चालू सिझनमध्ये तिची टीम सपाटून मार खाते आहे. एकामागून एक पराभवाची मालिकाच सुरू आहे.. आणि शिक्षा सुनावली जाते नात्सुला! तिने राजीनामा द्यावं असं सुचविलं जातं. ती केवळ नकारच देत नाही, तर पदावर राहण्यासाठी निकराने लढा देते. कारण सततच्या या पराभवाची नामुष्की टीमवर का येते, याची तिला नेमकी जाणीव आहे. टीममधला कुणीच गांभीर्याने खेळाकडे पाहत नाही. केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी प्रत्येक जण खेळतो आहे. एका विशिष्ट र्मयादेपर्यंत आपापलं कसब, कौशल्य वापरायचं आणि त्याच्या जोरावर एक खेळाडू म्हणून पुढच्या वर्षीच्या कॉलेज प्रवेशाची व्यवस्था करायची, एवढाच र्मयादित स्वार्थ प्रत्येक जण पाहतो आहे. टीम म्हणून एक सांघिक जाणिवेचा त्यांच्यात लवलेशही नाही आणि हेच त्यांच्या सततच्या पराभवाचं मुख्य कारण आहे. नात्सु ते संबंधितांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करते आहे; परंतु मुळाशी न जाता वरवरची मलमपट्टी करायची सवय असलेल्या व्यवस्थेला तिच्या तडफडीची दखल घ्यावीशी वाटत नाही.. आणि मग एका क्षणी तिला मॅनेजरच्या पदावरून पायउतार व्हावं लागतं. शिस्तीचा आग्रह धरणारी नात्सु गेल्याचा पोरांना आनंद होतो. आधीच तिची टर उडविणारे, तिला छळणारे उच्छाद मांडतात. टीमचा कॅप्टन गो याला नात्सुची तडफड कळते; परंतु बेपर्वा वृत्तीच्या आपल्या टीममेट्सना तो समजावू शकत नाही. नात्सुला टीम सोडावी लागते; परंतु ती एकाकी पडत नाही. अगतिक होत नाही. कारण तिला खेळाचं र्मम कळलेलं असतं.. आव्हानं अंगावर घ्यायची, ती पेलायची आणि परतवायची! जयपराजयाच्या पलीकडे जाऊन निकराने, जिद्दीने ‘खेळत’ राहणे म्हणजे खेळ! ती तेच आपल्या टीममध्ये पेरायचा प्रयत्न करते.. कारण ते खेळाचंच नव्हे, तर अवघ्या जगण्याचंच र्मम आहे, याचे तिला भान आहे. ती आणि एकूणच ‘डोन्ट से दॅट वर्ड’ तेच अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतो. हा चित्रपट पाहताना मला ‘हीप हीप हुर्ये’, ‘उडान’ आणि ‘चक दे इंडिया’ या आपल्या चित्रपटांची तीव्रतेने आठवण झाली. कारण हे तीनही चित्रपट केवळ खेळाचंच नव्हे, तर अवघ्या जगण्याचं भान देणारे विलक्षण सुंदर चित्रपट होते.
साटो ताकुमा इकॉनॉमिक्स घेऊन बी.ए. करीत असताना अँड फिल्म्सचं आकर्षण वाटून तिकडे वळला. परंतु, ‘अँड फिल्म्स करायच्या त्या क्लायंटसला खूष करण्यासाठी, त्यापेक्षा आपण आपल्याला आवडतील अशा फिल्म्स का करू नयेत’ असा विचार करीत थोडीफार उमेदवारी करून त्याने त्याकडे पाठ फिरविली. चित्रपट निर्मितीच्या एका साध्या कार्यशाळेत जाऊन चार धडे गिरविले आणि थेट चित्रपटच केला. ‘डोन्ट से दॅट वर्ड’ हा त्याचा पहिला चित्रपट! चित्रपट पाहून अजिबात तसं वाटत नाही. इतकी त्याची माध्यमाची आणि मुख्यत: भोवतालच्या जगाची समज प्रगल्भ आहे. गेल्या काही वर्षांत जगभर असे काही साटो ताकुमा भेटत आलेत. अतिशय फोकस्ड आणि म्हणूनच प्रभावी!
वर मी म्हटलंय, की या नव्या पिढीला, पुढच्या वळणाकडे सरकण्याची एक प्रकारची अपरिहार्य घाई असते. ‘वुई विल बी ओके’ या कोरियन चित्रपटात या तरुणाईच्या कायम तोंडी असलेला एक संवाद आहे - ‘यू डोन्ट हॅव मच टाइम लेफ्ट, हाऊ कॅन यू बी सो रिलॅक्स्ड.’ आपण म्हणावं, अरे आता आता कुठे तुझं आयुष्य सुरू झालंय. अख्खं आयुष्य पडलंय. कसली एवढी घाई? पण त्यांना ती आहे. कारण त्यांच्या काळाचा वेग भन्नाट आहे. 
आधीच्या कुठल्याही पिढीत नव्हती एवढी स्पर्धा आहे. त्यात नुसतं टिकून राहण्यासाठीच नव्हे, तर यशस्वीपणे वाटचाल करायची असेल, तर ही घाई अपरिहार्य आहे. त्यातून एक विजिगीषू जिद्द जशी पुढे येते तद्वतच नैराश्यही वाट काढणारच. आत्महत्येचा विचारही बळावणार. ‘वुई विल बी ओके’चा नायक सांग-सेक तरुणाईच्या या मनोवस्थेकडे आपलं लक्ष वेधतो.
तो एक नट आहे. अजून त्याला मोठी संधीही मिळायची आहे; परंतु अनावर महत्त्वाकांक्षेने जोर धरलाय. त्याची भूमिका असलेल्या चित्रपटाचा बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभाग व्हावा आणि नट म्हणून त्याला जगभरच्या चित्रपट व्यावसायिकांमध्ये वावरायला मिळावं; परंतु महत्त्वाकांक्षाच ती! ती काय इतकी सहजपणे पूर्ण होणार?
नट म्हणून नुकती कुठे सुरुवात झालेल्या सांग-सेकला त्याच्या मित्राच्या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका मिळते; परंतु  नायिका पहिल्याच दिवशी शूटिंग सोडून निघून जाते. कारण यांची फिल्म मोबाईलच्या कॅमेर्‍याने शूट होणार असते. मुळातच सर्व प्रकारच्या अडचणींशी सामना करीत सुरू झालेल्या या फिल्मला सतत अडचणींना सामोरे जावे लागते. परिणामी किंचितही कसली प्रगती होत नाही आणि सांग-सेकला कमालीचं नैराश्य येतं. आणि मग तो आत्महत्येचा निर्णय घेतो. एरवी चिठ्ठी लिहून ठेवली जाते. तो मोबाईलवर तशी चिठ्ठी ‘लिहून’ ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तो आत्महत्या करता करता, आपण आत्महत्या का करतो ते सांगताना स्वत:ला मोबाईलच्या कॅमेर्‍याने शूट करतो. म्हणजे तसा प्रयत्न करीत राहतो. कारण ते नेमकं जुळून येत नाही. गच्चीच्या कठड्यावर उभं राहतानाच तारांबळ उडते, त्यातून खाली वाकून पाहताना भ्यायला होतं आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही ते जुळून येत नाही. त्यातच हे सारं चालू असताना स्वत:च शूट करायचा. इमेज आणि साऊंड सिंक्रोनाईज होत नाही.. आणि तिथून त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो. तो पुन्हा नव्या उमेदीने आयुष्याकडे येतो. जगणं अवघड आहे; परंतु मृत्यूही सोपा नाही, याचं त्याला भान येतं.
जेमतेम विशी गाठलेल्या बेक जेहोने चित्रपट लेखन-दिग्दर्शनाच्या आपल्या पहिल्याच प्रयत्नात ती समज दाखवली आहे, ती कौतुकास्पद आहे. आपल्या नायकाच्या कलाजीवनात त्याच्या अति महत्त्वाकांक्षेमुळे निर्माण झालेले प्रश्न आणि 
अगदी आत्महत्येच्या निर्णयाशी त्याचं येणं हा प्रवास लेखक-दिग्दर्शक म्हणून तो स्वत:ही सेंटी होऊन पाहत नाही. जे वाटतं त्या वाटेने नायकाला जाऊ देत तो त्याचं त्याला भान येण्यास मदत करतो आणि यादरम्यान  तो नायक जे कॅमेर्‍यात निरोपाचं बोलतो, त्यातून या पिढीची मानसिकता नेमकी व्यक्त करतो. आजवर मी ‘फिल्म विदिन फिल्म’ म्हणजेच सिनेमातला सिनेमा या जॉनरमधील अनेक उत्तमोत्तम चित्रपट पाहिले. 
‘वुई विल बी ओके’ हा त्यामधला एक, असं मी निश्‍चितपणे म्हणू शकतो. चित्रपटातल्या लोकांची गोष्ट आणि म्हणून मग एकाच वेळी ते बनवत असलेला चित्रपट आणि त्यांच्या ‘या’ गोष्टीवरचा चित्रपट असं हे जॉनर आहे. गुरुदत्त यांचा ‘कागज के फूल’ आणि अगदी अलीकडचा ‘ओम शांती ओम’ हे या प्रकारातील चित्रपट! ‘वुई विल बी ओके’चा नायक चित्रपटात काम करणारा नट आहे, त्याची महत्त्वाकांक्षाही चित्रपटविषयक आहे, त्याच्या चित्रपटाचं रडत रखडत कामही सुरू आहे आणि आपल्या आत्महत्येचं तो शूटिंगही करण्याचा प्रयत्न करतो आहे. असा आहे हा उत्तम जमून आलेला सिनेमातला सिनेमा..!
(लेखक भारतीय व जागतिक चित्रपटांचे 
व्यासंगी अभ्यासक, दिग्दर्शक व परीक्षक आहेत.)