प्रदूषण थांबविण्याचा ‘हट्ट’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 06:04 AM2019-07-28T06:04:00+5:302019-07-28T06:05:07+5:30

आजोबा सांगत होते,  कुठलीही गोष्ट विकत घेताना  स्वत:ला विचारायचं की,  ही वस्तू मला खरंच गरजेची आहे का? ती विकत घेतली नाही तर माझं काय अडेल?  मुलांच्याही लक्षात यायला लागलं,  आपल्याकडच्या 80 टक्के वस्तू  आपण हट्ट आणि हौसेखातर घेतल्या आहेत. फक्त हौस म्हणून केलेली खरेदी  प्रदूषण करते, हेही त्यांना पटलं.

children's urge to curb pollution! | प्रदूषण थांबविण्याचा ‘हट्ट’!

प्रदूषण थांबविण्याचा ‘हट्ट’!

Next
ठळक मुद्देधड ना लहान, धड ना मोठे अशा ‘मधल्या’ मुलांसाठी नवी ‘विण्डो’

- गौरी पटवर्धन

‘‘पण आपली पृथ्वी तर आपल्यालाच वाचवायला लागेल ना’’ ईशान हताशपणे म्हणाला. ‘‘मग त्यासाठी जे करायला लागेल ते करायलाच लागेल.’’
‘‘हो ना.. पण काय करायचं ते कुठे आपल्याला माहितीये?’’ सेजल म्हणाली.
त्यांच्या सहावीच्या वर्गात वातावरणातील बदल आणि त्यामुळे पृथ्वीवर होणारे परिणाम याबद्दलचा एक माहितीपट दाखवला होता. त्यात पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात वातावरण कसं बदलतं आहे, कुठे भयंकर दुष्काळ पडतोय, कुठे पूर येऊन गावंच्या गावं वाहून जातायत, कुठे चक्रीवादळांनी थैमान घातलंय तर कुठे आजवर कधी पडला नाही इतका बर्फ पडून त्यात घरं गाडली जातायत, कुठे घोटभर पाण्यासाठी प्राणी मैलोनमैल चालतायत तर कुठे सगळा बर्फ वितळून गेल्यामुळे उपाशी मरतायत असं खूप काय काय दाखवलं होतं. अशी परिस्थिती निर्माण होण्यामागची कारणं दाखवलेली होती. त्यात प्लॅस्टिकचा अतिवापर, जैवइंधनाचा अतिवापर, लोकसंख्येचा विस्फोट, अतिपाणी उपसा आणि इतरही अनेक कारणं सांगितलेली होती. तो माहितीपट बघून एरवी मस्तीखोर असणारा त्यांचा सगळा वर्ग एकदम शांत होऊन गेला होता. आपल्या पृथ्वीवर जे चाललंय ते चूक आहे, ते थांबवायला पाहिजे, ही परिस्थिती बदलायला पाहिजे याबद्दल त्या सगळ्यांमध्ये एकमत होतं. पण ही सगळीच कारणं इतकी अक्र ाळविक्र ाळ होती की शाळेत सहावीत शिकणारी छोटी मुलं त्यात काय करू शकणार तेच त्यांना कळेना. पण आपण काहीतरी केलं पाहिजे असं मात्न त्यांना फार मनापासून वाटत होतं. शेवटी सगळ्यांनी आपण काय करू शकतो त्याचा उद्यापर्यंत विचार करूया असं ठरलं.
ईशान आणि सेजल एकाच कॉलनीत राहायचे. त्यामुळे घरी जाताना ते एकत्न जायचे. आजही एकत्न घरी जाताना त्यांच्या शाळेतल्याच विषयावर गप्पा चालल्या होत्या.
ईशान एकदम आठवून म्हणाला, ‘‘मी एक काम करतो. मी ना, माझ्या आजोबांना विचारतो. ते सांगतील की आपण काय करू शकतो.’’
‘‘आजोबांना कसं काय माहिती असेल?’’
‘‘माझ्या आजोबांना सगळं माहिती असतं. आणि त्याहून मोठं कारण म्हणजे, त्यांच्या वेळेला नव्हता ना क्लायमेट चेंज ! मग ते त्या वेळी काय करायचे ते विचारतो. तेच आपणपण करूया.’’
‘‘हां ! ही आयडिया भारी आहे.’’ सेजललापण ते पटलं, ती म्हणाली, ‘‘मग आजोबांना विचारायला मीपण येते.’’
बोलत बोलत ईशान आणि सेजल ईशानच्या घरी पोहचले. ईशानचे आजोबा त्यांची सायकल दुरुस्त करत बसले होते. ते सगळीकडे सायकलवरच जायचे. त्यामुळे तब्येत चांगली राहते असं त्यांचं म्हणणं असायचं. ईशान आणि सेजल गंभीर चेहर्‍याने घरात आलेले बघून त्यांच्या लक्षात आलं, की त्यांना काहीतरी सॉलिड प्रश्न पडलेला आहे. आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे ईशानने घरी गेल्या गेल्या दप्तर टाकून विचारलं,
‘‘आजोबा, हा क्लायमेट चेंज कसा काय थांबवायचा हो?’’
‘‘का रे? तुमच्यावर यूनोने जबाबदारी टाकली की काय?’’
‘‘ओ आजोबा, गंमत नका करू. सांगा ना, क्लायमेट चेंज कसा थांबवायचा? तुमच्या वेळेला क्लायमेट चेंज थांबवायला तुम्ही काय करायचात?’’
‘‘आम्ही? आमच्या वेळेला क्लायमेट चेंज नव्हताच.’’
‘‘म्हणजे??? असं कसं असेल?’’ सेजलला काही ते पटलं नाही.
‘‘अगं म्हणजे आत्ता जसं खूप उकडतं, कधीही पाऊस पडतो असलं काही आमच्या वेळी फारसं व्हायचं नाही. ठरल्या वेळी पाऊस पडायचा.’’
‘‘हो, पण त्यासाठी तुम्ही काय करायचाय ते तर सांगा!’’
‘‘आम्ही काय करायचो त्यापेक्षा काय करायचो नाही ते सांगतो.’’ आजोबा म्हणाले, ‘‘आम्ही मोटारसायकल वापरायचो नाही, आम्ही गाड्या वापरायचो नाही, आम्ही पेनातली रिफील संपली तर रिफील बदलायचो, पेन टाकून द्यायचो नाही, आणि शक्यतो शाईचं पेन वापरायचो, आम्ही सारखे सारखे कुठेतरी फिरायला जायचो नाही, सारखे कपडे आणायचो नाही.’’
‘‘आजोबा,’’ ईशान त्यांना थांबवत म्हणाला, ‘‘तुम्ही आता चान्स मारून आम्हाला उगीच लेक्चर देऊ नका.’’
‘‘अरे ! मी खरं तेच सांगतोय. आम्ही हे सगळं करायचो, त्यामुळे आमच्या वेळी क्लायमेट चेंज असं काही नव्हतं.’’
‘‘हॅट ! या सगळ्याचा आणि क्लायमेट चेंजचा काय संबंध?’’
‘‘नाही कसा? हे बघ हां, तू पेनातली शाई संपली की पेन टाकून देतोस. त्यामुळे काय होतं? तुला नवीन पेन आणायला लागतं. मग आधीच्या पेनचं तू काय करतोस? ते कचर्‍यात टाकतोस. ते पेन असतं प्लॅस्टिकचं. त्याचं विघटन व्हायला किती वर्षं लागतात? पाचशे का हजार? तेवढी वर्षं ते पेन पृथ्वीवर इथेच पडून राहणार. अशी तू महिन्याला दोन पेन्स टाकून देतोस. अशी तुझ्या वर्गात चाळीस मुलं आहेत. तुझ्या शाळेत पाचशे मुलं आहेत. म्हणजे फक्त तुझ्या शाळेतून दर महिन्याला एक हजार पेनं कचर्‍यात जातात. त्यापेक्षा शाईचं पेन वापरलं तर ते दोन-चार वर्षं टिकतं. म्हणजे तू दोन-चार वर्षात एखादंच पेन टाकून देशील. तेच पॉलिएस्टर आणि इतर सिन्थेटिक कपड्यांचं, तेच प्लॅस्टिकच्या डबे-बाटल्यांचं. तेच उगीच जाळलेल्या पेट्रोलचं.. तुम्ही वापरलेली प्रत्येक वस्तू पर्यावरणावर काहीतरी परिणाम करतेच.’’
‘‘पण मग वस्तूच वापरायच्या नाहीत असं कसं करणार?’’
‘‘असं नाहीच करायचं. पण आपण घेत असलेली वस्तू आपल्या खरंच गरजेची आहे का याचा विचार करायचा. आपली गरज पेन्सची असेल तर त्यानंतर आणलेलं प्रत्येक पेन हे आपण केलेलं प्रदूषण असतं.’’
‘‘हम्म्म्म’’ ईशान आणि सेजलला त्यांचं म्हणणं पटत होतं.
‘‘हे बघ, मी अजून सोपं करून सांगतो. कुठलीही गोष्ट विकत घेताना स्वत:ला विचारायचं की ही वस्तू मी विकत घेतली नाही तर माझं काम अडणार आहे का? तुमच्या असं लक्षात येईल की, आपण 80 टक्के वस्तू हौस म्हणून खरेदी करतो. आणि फक्त हौस म्हणून केलेली खरेदी प्रदूषण करते.’’
ईशान आणि सेजलच्या मनात आपल्याकडे किती डबे, वॉटर बॅग्ज, दप्तरं, कपडे, बूट असल्या वस्तू आहेत त्याची यादी तयार होत होती. त्यातल्या कुठल्या वस्तू आईबाबा नाही म्हणत असताना आपण हट्टाने घेतल्या ते आठवत होतं. आणि आपण प्रदूषण करायला कसा नकळत हातभार लावला ते त्यांच्या लक्षात येत होतं.
त्यांचे चेहरे बघून त्यांना आपलं म्हणणं समजलंय हे आजोबांच्या लक्षात आलं आणि ते हसले. उद्यापासून पृथीवर प्रदूषण करणारी दोन माणसं नक्की कमी होणार होती. 
lpf.internal@gmail.com
(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)

Web Title: children's urge to curb pollution!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.