Children's extraordinary thinking to reduce pollution | पेपर-खोका, सुतळी-बोका!

पेपर-खोका, सुतळी-बोका!

ठळक मुद्देधड ना लहान, धड ना मोठे अशा ‘मधल्या’ मुलांसाठी नवी ‘विण्डो’

- गौरी पटवर्धन
आज समर कॅम्पचा शेवटचा दिवस होता. आयोजकांनी कॅम्पला आलेल्या मुलांचे आठ गट पाडले होते. त्या आठही गटांना पर्यावरण असा विषय देऊन त्यावर १० मिनिटांचं नाटक सादर करायला सांगितलं होतं. विषयांच्या चिठ्ठ्या टाकल्या होत्या. प्रत्येक गटाने आपल्याला आलेल्या विषयावर नाटक लिहायचं होतं, ते बसवायचं होतं, त्याचं नेपथ्य करायचं होतं आणि त्यात अभिनयही करायचा होता. त्या नाटकांचं सादरीकरण आणि मग त्याचा बक्षीस समारंभ असा कार्यक्र म होता.
कार्यक्र माला परीक्षक आणि प्रमुख पाहुणे म्हणून टीव्हीवरच्या मालिकेत काम करणाºया एका अभिनेत्रीला बोलावलेलं होतं. आणि त्यामुळेच सगळ्या मुलांची पहिलं बक्षीस मिळवण्यासाठी जास्त धडपड चालू होती.
पहिली दोन नाटकं सुरळीत पार पडली. म्हणजे काही मुलं काही डायलॉग विसरली, एका नाटकात अर्ध्यातून मागे चिकटवलेला सूर्य पडून गेला असं काही काही झालं; पण एकूणात नाटकं चांगली झाली. त्यानंतर अथर्वच्या नाटकाचं सादरीकरण होतं. अथर्व आणि त्याच्या गु्रपला खात्री होती की पहिला नंबर त्यांचाच येणार. एकतर त्यांना ‘झाडं लावा, झाडं वाचवा’ असा सोपा विषय मिळाला होता. त्यांचं नाटक छान लिहिलेलं होतं. अथर्व मागच्या वर्षी उन्हाळ्याच्या सुटीत नाट्यप्रशिक्षण शिबिराला जाऊन आलेला होता, त्यामुळे त्याला नाटक बसवण्याबद्दल इतर मुलांपेक्षा जास्त माहिती होती. आणि मुख्य म्हणजे त्याच्या गु्रपमधली बहुतेक सगळी मुलं जरा मोठी, म्हणजे आठवीतून नववीत गेलेली होती. त्यांचं नेपथ्यपण छान जमलेलं होतं. आणि त्यामुळेच, त्यांनी एण्ट्री घेतली तीच आत्मविश्वासाने आणि त्यांचं सादरीकरण त्यांच्या आत्मविश्वासाला साजेसंच झालं. इतर मुलांना आणि कॅम्प घेणाºया ताई-दादांनाही त्यांचं नाटक खूप आवडलं. सगळ्यांनी खूप टाळ्या वाजवल्या आणि त्यांचं कौतुकही केलं. इतकं की पहिलं बक्षीस आपल्याला मिळणार याबद्दल त्यांच्या मनात काही शंकाच राहिली नाही.
या सगळ्या कौतुकात त्यांनी त्यांच्या नंतर सादर झालेलं ईशानीचं नाटक नीट बघितलंच नाही. एकतर ती सगळी लिंबूटिंबू गॅँग होती. सगळे जेमतेम सातवीत गेलेले. त्यात त्यांचं नाटक बसवताना सगळ्यांनीच बघितलेलं होतं. त्यांचं नाटक लिहिलेलं चांगलं होतं; पण नेपथ्याची जुळवाजुळव करताना मात्र त्यांची चांगलीच दमछाक झाली होती. एकतर त्यांच्या नाटकात समुद्र, पक्षी, मासे, बोका असं काय वाट्टेल ते होतं. त्यांचंही नाटक चांगलं सादर झालं. पण त्यांच्या नाटकाचं नेपथ्य अथर्वच्या नाटकासारखं चकाचक नव्हतं. कॅम्प घेणाºया ताई-दादांनी सांगूनही त्यांनी काही गोष्टी ऐकलेल्या नव्हत्या. अथर्वच्या गटाने त्यावरून त्यांची बरीच चेष्टाही केली होती. इतकी की त्यांनी शेवटी ईशानीच्या गटाला पेपर-खोका, सुतळी-बोका गट असं नाव दिलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की त्यांनी नाटक कमी आणि हस्तव्यवसाय जास्त केलाय; पण ईशानीच्या गटाने त्यांच्या परीने मेहनत मात्र खूप केली होती.
करता करता सगळ्या आठ नाटकांचं सादरीकरण झालं, मग परीक्षकांनी निकाल लावण्यासाठी घेतलेल्या अर्ध्या तासात अल्पोपाहार करून झाला आणि सगळे आठच्या आठ गट बक्षिसाच्या अपेक्षेने परत येऊन बसले. मुख्य परीक्षक म्हणून आलेली अभिनेत्री बोलायला उभी राहिली आणि म्हणाली,
‘‘खरं सांगायचं, तर आज इथे सादर झालेली सगळीच नाटकं छान होती. कोणाचं स्क्रि प्ट चांगलं होतं, तर कोणाचा अभिनय उत्तम होता. कोणाचं नेपथ्य चांगलं होतं, तर दिग्दर्शन छान केलं होतं. आणि मुख्य म्हणजे सगळ्यांनी जीव ओतून आपापल्या नाटकावर मेहनत घेतलेली जाणवत होती. पण आपण सगळ्यांना बक्षीस काही देऊ शकत नाही. त्यामुळेच, यातल्या जास्तीत जास्त गोष्टी ज्यांच्या नाटकात होत्या त्यांना मिळणार आहे पहिलं बक्षीस. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज इथे सादर झालेल्या नाटकांपैकी एक नाटक अतिशय छान झालं. त्याला सर्व प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याचं दिग्दर्शन छान होतं. अभिनय उत्तम होता.’’
ती इतकं बोलल्यावरच अथर्वच्या ग्रुपने आपापसात टाळ्या द्यायला सुरु वात केली. ती अभिनेत्री आपल्याच गटाबद्दल बोलते आहे याबद्दल त्यांना कसलीही शंका उरलेली नव्हती. इतर मुलंही त्यांच्याकडे बघायला लागली, कारण ती अभिनेत्री त्याच ग्रुपबद्दल बोलते आहे हे सगळ्यांच्याच लक्षात आलं होतं. पण तेवढ्यात ती म्हणाली, ‘‘सगळ्याच बाजूंनी हे नाटक सर्वोत्तम होतं, पण.. त्या नाटकाला पहिला नंबर मात्र मी देऊ शकत नाही.’’
इतका वेळ प्रेक्षकांमध्ये सुरू असलेला गोंधळ थांबून अचानक शांतता पसरली.
ती म्हणाली, ‘‘झाडे लावा, झाडे वाचवा’’ या विषयावर पर्यावरणाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी नाटक सादर केलं, पण त्यात जंगल दाखवायला त्यांनी खºया झाडांच्या हिरव्या फांद्या तोडून आणल्या. थर्माकोलचे प्राणी बनवले, प्लॅस्टिकच्या शीटने पाणी दाखवलं. या सगळ्या गोष्टी पर्यावरणाचं नुकसान करतात हा संदेश त्यांनीच आपल्या नाटकातून दिला. आता आपण जे बोलतो आणि जी कृती करतो यात काहीतरी ताळमेळ असायला नको का? तो या गटाचा अजिबात नव्हता. आणि म्हणूनच, उत्तम सादरीकरण करूनही या गटाला मी तिसरं बक्षीस जाहीर करते आणि अशी आशा करते की या तिसºया बक्षिसातून ते योग्य तो बोध घेतील.’’
यावर अथर्वच्या गटातल्या मुलांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. बरं, तिचं म्हणणं योग्य असल्यामुळे त्यांना त्याविरु द्ध काही बोलताही येईना. त्यावर ती पुढे म्हणाली,
‘‘यानंतर पहिल्या क्र मांकासाठी दोन गटांचे गुण जवळजवळ सारखेच होते. मग प्रश्न असा होता, की यापैकी कोणाला पहिलं बक्षीस द्यायचं आणि कोणाला दुसरं? मग ज्या गटाचं नेपथ्य सगळ्यात पर्यावरणपूरक होतं त्या गटाला आम्ही सर्वानुमते पहिलं बक्षीस जाहीर करतोय. या गटाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी नेपथ्यातली प्रत्येक वस्तू स्वत: बनवली होती, एवढंच नाही, तर त्यासाठी काहीही नवीन सामान विकत न आणता सगळं काही घरातल्या जुन्या वस्तू वापरून बनवलेलं होतं. त्यासाठी त्यांनी जुनी खोकी, जुने कपडे, सुतळी अशा वस्तूंचा फार कल्पक वापर केलेला होता. त्या गटाचं नाव आहे..
यावर ईशानी ओरडली, ‘‘पेपर-खोका, सुतळी-बोका!’’ आणि मग तिचा सगळाच गट टाळ्या देऊन हसायला लागला..
(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)

lpf.internal@gmail.com

Web Title: Children's extraordinary thinking to reduce pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.