‘नो’ कचरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 06:04 AM2019-10-20T06:04:00+5:302019-10-20T06:05:08+5:30

शाळेत आज कोणीतरी  मोठय़ा पाहुण्या येणार होत्या. कदाचित शाळेला त्या भलीमोठी  देणगी देण्याचीही शक्यता होती. त्या शाळेत आल्या, पण त्यांच्याकडून चॉकलेटचं रॅपर चुकून खाली पडलं. शाळेच्या नियमाप्रमाणे मुलांनी  लगेच दंडाची पावती त्यांच्यासमोर धरली! मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रश्न पडला, आता देणगी कशी मिळणार?.

Children's extraordinary efforts to reduce garbage and save environment | ‘नो’ कचरा!

‘नो’ कचरा!

Next
ठळक मुद्देधड ना लहान, धड ना मोठे अशा ‘मधल्या’ मुलांसाठी नवी ‘विण्डो’

- गौरी पटवर्धन

साकूरच्या आर्शमशाळेत आज सकाळपासून जोरदार तयारी चालू होती. आज कोणीतरी मोठे पाहुणे शाळा बघायला येणार होते. त्यामुळे सगळेजण सकाळपासून तयारी करत होते. सगळी शाळा स्वच्छ झाडून काढली होती. शाळेत जेवढं साहित्य होतं ते सगळं नीट आवरून ठेवलं होतं. फळ्यांवर सुविचार लिहिलेले होते. सगळ्या मुलांनी स्वच्छ धुतलेले गणवेश घातले होते. त्यातल्या अनेकांचे गणवेश फाटून पुन: पुन्हा दुरु स्त केलेले होते, काहींना ठिगळं लावलेली होती, पण त्याला काही इलाज नव्हता. शाळेची आर्थिक परिस्थिती फारच वाईट होती. छप्पर अनेक ठिकाणी गळत होतं. रंग द्यायला पुरेसे पैसे नव्हते. शाळेची प्रयोगशाळा अगदीच तोकडी होती. आणि म्हणूनच आज येणारे पाहुणे शाळेसाठी फार महत्त्वाचे होते. कारण त्यांना जर शाळा आवडली तर ते शाळेला मोठ्ठी देणगी देणार होते. आणि अशी देणगी मिळाली तर शाळेचे सगळे प्रश्न एका फटक्यात सुटले असते. त्यामुळेच शिक्षकांनी मुलांना दहा वेळा नीट वागण्याच्या सूचना दिल्या होत्या.
मुले ज्यांची वाट बघत होते ते पाहुणे काहीवेळाने आले. त्यांचा मुंबईला मोठा कारखाना आणि बरीच मोठी दुकानं होती. त्यामुळे ते कुठल्यातरी मोठय़ा गाडीतून येतील आणि एकदम बरेच लोक येतील असं त्यांना वाटत होतं. त्यांना संस्थाचालकांनी सांगितलं होतं की त्या दुकानांचे मालक येणार आहेत. संस्थाचालकांना यायला जमणार नव्हतं आणि त्यामुळेच एका साध्या गाडीतून एक काळीसावळी 35 वर्षांची साधा कॉटनचा ड्रेस घातलेली बाई उतरली. तेव्हा मुलं आणि शिक्षकांच्या चेहर्‍यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह उमटलं, पण आलेल्या पाहुण्यांना असं कसं तोंडावर विचारणार?.
त्यामुळे त्यांनी आपापसात असा अंदाज बांधला की एवढे मोठे कारखानदार आपल्या आडगावच्या शाळेत कशाला येतील? त्यांनी बहुदा ऑफिसमधल्या मॅडमना पाठवलं असेल. आणि मग सगळेजण त्या मॅडमला शाळा दाखवायला निघाले. सगळे वर्ग बघून झाल्यावर परिसर बघायला गेलेले असताना मॅडमनी पर्समधून मोबाइल बाहेर काढला. त्यावेळी त्या मोबाइलबरोबर त्यांच्या पर्समधून एक छोटी चॉकलेटची चांदी खाली पडली. मोबाइल बघून मॅडमनी तो परत आत ठेवला आणि त्या पुढे परिसर बघत मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये गेल्या. मुख्याध्यापकांनी त्यांना स्वत:ची खुर्ची देऊ केली; पण मॅडम त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसल्या. त्या शिक्षकांना म्हणत होत्या,
‘सर ती तुमची खुर्ची आहे. त्यात मी बसू शकत नाही. माझी तेवढी पात्नता नाही.’ मुख्याध्यापक संकोचून त्यांच्या शेजारी उभे होते, तेवढय़ात पाचवीची दोन मुलं परवानगी मागून त्यांच्या ऑफिसमध्ये आली.
‘काय रे?’ मुख्याध्यापकांनी विचारलं.
‘सर, आम्ही या पाहुण्यांना दंड करायला आलो आहे.’ त्यातल्या एकीने वर बांधलेली वेणी झटक्याने मागे टाकत सांगितलं.
‘काय?’ - सर पुढे काही बोलणार एवढय़ात त्यातला मुलगा म्हणाला,
‘हो सर, त्यांनी आवारात प्लॅस्टिकचा कचरा टाकला.’ त्याने हाफ चड्डीच्या खिशातून ती छोटी चॉकलेटची चांदी बाहेर काढली आणि टेबलवर ठेवली.
‘अरे, असा कुठे पाहुण्यांना दंड करतात का? चुकून पडली असेल ती चांदी.’ सरांनी घाम पुसत शाळेची बाजू सावरायचा प्रयत्न केला. पण छे! असा प्रसंग हातचा जाऊ देतील तर ती मुलं कसली?
‘सर चुकून पडली असेल तरी त्यांनी ती उचलायला पाहिजे होती.’
‘बरं जाऊदे. किती दंड आहे सांग, मी भरतो. ते आपले पाहुणे आहेत. त्यांनी दंड करणं योग्य नाही.’
‘सर पहिल्या चुकीला दहा रु पये दंड आहे; पण तो तुम्ही भरलेला चालणार नाही.’ दोन वेण्यांच्या मधले तिचे काळेभोर डोळे लुकलुकत होते. ‘कारण दंडाचा उद्देश हा पैसे गोळा करण नसून चुकीच्या वागण्याची जाणीव होणं हा असतो.’
‘बरोबर आहे..’ 
- सरांना आता वाटायला लागलं होतं की आपण आपल्या टेबलखाली जाऊन लपावं. मुलं त्यांचं म्हणणं फारच स्पष्टपणे मांडत होती आणि पाहुण्या मॅडम काहीच बोलायला तयार नव्हत्या. बरं, मुलं जे बोलत होती ते योग्य होतं. त्यांनीच शाळेत नियम केला होता की प्लॅस्टिकचा कचरा इकडे-तिकडे टाकला तर दंड होईल. अशावेळी पाहुण्यांचा अपवाद करणंही त्यांच्यातल्या शिक्षकाला पटेना. शेवटी पाहुण्या मॅडमनीच त्यांची त्या परिस्थितीतून सुटका केली. त्या गंभीरपणे म्हणाल्या,
‘सगळ्या मुलांना एका ठिकाणी बसवता का? मला काहीतरी बोलायचं आहे.’
सरांनी ती संधी साधून तिथून सुटका करून घेतली आणि पाहुण्यांना चहा द्यायला सांगून ते मुलांना शिस्तीत बसवायला निघून गेले. जाताना त्यांनी शिस्त समितीच्या त्या दोन सभासदांनाही बरोबर घेतलं. इतका वेळ मॅडम खुश दिसत होत्या; पण आता त्यांचा मूड बदलल्यासारखा वाटत होता. या दोन मुलांमुळे शाळेचं मोठं नुकसान होणार आहे याबद्दल त्यांच्या मनात काही शंका नव्हती. पण त्या दोघांना त्याचा थांगपत्ताही नव्हता. त्यांची आपापसातली चर्चा ही पाहुण्यांनी दंड द्यायला पाहिजे होता अशीच होती.
सगळ्या मुलांना रांगेत बसवल्यावर मॅडम आल्या. त्या बोलायला उभ्या राहिल्या. सगळीकडे शांतता पसरली. त्या म्हणाल्या, 
‘तुम्हा सगळ्यांच्या चेहर्‍यावर दिसणार्‍या पहिल्या प्रश्नाचं मी आधी उत्तर देते. तुम्हाला जे पाहुणे येतील म्हणून फोन केला होता ती पाहुणी मीच आहे. मुंबईला माझीच मोठी फॅक्टरी आहे. आणि त्याबरोबर काही मोठी दुकानंसुद्धा आहेत. माझ्या कामात मला जो नफा होतो त्यातून काही संस्थांना देणगी द्यायची माझी इच्छा होती. तुमच्या शाळेबद्दल मला माझ्या एका परिचितांनी सांगितलं होतं. ते म्हणाले होते की तुमच्या शाळेत खूप गोष्टींची कमतरता आहे. पण इथे आल्यावर तर मला वेगळंच चित्न दिसलं. इथे मला सगळ्यात आधी दिसला तो स्वच्छ परिसर आणि भरपूर झाडं. मग मला समजलं की ती झाडं मुलांनीच लावलेली आहेत आणि मुलंच त्यांची काळजी घेतात. दुसरी गोष्ट मला दिसली ती म्हणजे चांगलं वाचनालय. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे पुस्तकं खूप हाताळलेली दिसत होती. याचा अर्थ तुम्ही मुलं खूप वाचत असणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा स्वच्छ परिसर. हा परिसर इतका स्वच्छ कसा, असा प्रश्न मला पडला होता; पण त्याचं उत्तर माझ्याच एका चुकीमुळे मला मिळालं. मी नजरचुकीने तुमच्या शाळेत ही चॉकलेटची चांदी टाकली आणि त्यासाठी तुमच्या शिस्त समितीने मला दहा रुपये दंड केला.’
पाहुण्या मॅडम बोलताना क्षणभर थांबल्या. मग सगळीकडे नजर फिरवत म्हणाल्या,
‘हा दंड माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण यातून मला ही गोष्ट समजली, की तुम्ही मुलं तत्त्वाची पक्की आहात. मी तुम्हाला कदाचित देणगी देईन म्हणून तुम्ही मला माफ केलं नाहीत, तर उलट माझ्या चुकीची मला जाणीव करून दिलीत. तुमच्या शिक्षकांचंही मला कौतुक करावंसं वाटतं, कारण ते तुम्हाला त्यावरून रागावले नाहीत. तुमची शाळा, तुमचे शिक्षक आणि त्याहीपेक्षा तुम्ही मुलं मला फार आवडलात. कारण मीही तुमच्यासारख्याच लहान गावातली आहे. पण मलाही तुमच्यासारखेच शिक्षक मिळाले म्हणूनच मी आज आयुष्यात चांगलं काहीतरी करू शकले आहे. त्या चांगलं करण्याचा एक भाग म्हणून मी तुमच्या शाळेत उत्तम शिक्षण देण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या करून देईन. मग त्यासाठी कितीही पैसे लागले तरी चालेल.’
मुलांनी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवायला सुरु वात केली; पण मॅडमनी हात वर करून त्यांना थांबवलं. मग त्या पाचवीतल्या शिस्त समितीतल्या मुलांना पुढे बोलावलं. ते लाजत लाजत पुढे आले. मग मॅडमनी पर्समधून एक दहा रु पयांची नोट काढून त्यांना दिली आणि म्हणाल्या,
‘प्लॅस्टिकचा कचरा करणार्‍या कोणालाही सोडू नका.’

lpf.internal@gmail.com
(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)

Web Title: Children's extraordinary efforts to reduce garbage and save environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.