शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

चांद्रयान-पर्जन्ययान, फुकटाच्या पावसाला नाही मान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 19:26 IST

खरी गोम अशी आहे की, चांद्रयानातून बराच मोठा महसूल गोळा करता येतो. इथे पाऊस फुकटात पडतो. लोक फुकटात पाणी वापरतात. अशा फुकट्यांच्या दुनियेत पाण्याच्या थेंबाथेंबाला किंमत आल्याशिवाय कृत्रिम पावसाचे महत्त्व कळणार नाही.

- संजीव उन्हाळे

मराठवाडा वर्तमान : २२ जुलैला चांद्रयान-२ चंद्राकडे झेपावणार आहे. त्याच दिवसापासून ढगामध्ये आर्द्रता असेल, तर कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयोगही होणार आहेत. केवळ पाण्यासाठी हा योग जुळून येत आहे. तथापि, चांद्रयानासाठी भरमसाठ पैसा, पुरेशी यंत्रणा, सुसज्ज प्रयोगशाळा याची सोय; पण पर्जन्ययानासाठी मात्र केवळ आंतरराष्ट्रीय टेंडर. कृत्रिम पावसाची व्यवस्था आणि त्यासाठीची पायाभूत सुविधा हवामान बदलाच्या दुखऱ्या बदलाच्या पार्श्वभूमीवर करणे गरजेचे आहे. यामध्ये चीनने मोठा वस्तुपाठ घालून दिला आहे. मराठवाड्यासारख्या कोरडवाहू भागासाठी पर्जन्ययानाची (पर्जन्ययाग यज्ञाची नव्हे) गरज आहे.

चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून राजकीय स्फोटांचा धडाका उडवून देत आहेत. पाऊस पडण्याजोगे ढग निर्माण झाले, तर मराठवाड्यात २२ जुलैनंतर कृत्रिम पाऊस पाडला जाईल, असा बार त्यांनी उडवून दिला. कसा योग आहे पाहा, २२ जुलैलाच तंदुरुस्त चांद्रयान-२ अंतराळात झेपावणार. (२२ जुलैला तुलनेने रोज बदलणाऱ्या स्थितीमध्ये चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो. त्यामुळे इंधन कमी लागते; अन्यथा सप्टेंबरपर्यंत थांबावे लागेल.) ढगाला भेदून जलबिंदू निर्माण करणारा कृत्रिम पाऊस आणि चंद्रावर पाण्याचा शोध घेणारे चांद्रयान-२ या दोन्हींचाही उद्देश जलशक्ती निर्माण करणे हाच आहे. म्हणजे अध्यात्मात जसे ग्यानबा-तुकाराम, चित्रपट संगीतात शंकर-जयकिशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी त्याप्रमाणे अंतराळात आता ‘चांद्रयान-पर्जन्ययान’ ही जोडी शोभून दिसणार आहे. ढगात क्लाऊड सीडिंगचा मारा करून पाऊस पाडणाऱ्या विमानाला आम्ही पर्जन्ययान शब्द वापरला, पर्जन्ययाग नव्हे. चंद्रकांत खैरेंसारखे भाविक यज्ञवीर अगदी थोड्या फरकाने लोकसभेपर्यंत पोहोचू न शकल्याने पर्जन्ययाग यज्ञ बहुतेक झाला नाही. नाही तर महारुद्र्राभिषेक करून यज्ञ मांडला गेला असता. 

अर्थात, चांद्रयान श्रेष्ठ की पर्जन्ययान, असा पोरकट वाद आम्हाला घालायचा नाही. (एकाएकी ‘मी’पणा जाऊन आता ‘आम्ही’पण आले आहे. कारण आम्हाला आता आकाशच ठेंगणे झाले आहे.) जवळपास चार-पाच दशलक्ष वर्षांपासून चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी मुरले आहे. त्याचा शोध घेतला जाणार आहे. (आधीच कळले असते, तर लातूर, उस्मानाबादच्या खननसम्राटांना आम्ही निरोप दिला असता, चंद्रावरही बोअरचे खनन करून पाणी काढले असते. उसाचे फडही लावले असते. ही मंडळी इतकी चतुर आहे की, इस्रोच्या मदतीने लातूर पॅटर्न घेऊन ती केव्हाच चंद्रलोकी गेली असती.) ही मोहीम यशस्वी झाली असती, तर चार वर्षांपासून वॉटर ग्रीडचा ध्यास घेतलेले बबनराव लोणीकर यांनी थेट चंद्रावरून बंद पाईप (हा भाजपचा खास सिंचन पॅटर्न) टाकून परतूरला पाणी आणले असते आणि तमाम मराठवाड्याची तृष्णा भागविली असती. 

तथापि, या दोन यानांत मोठा फरक आहे. मानाचे पान चांद्रयानाला अन् खर्चाचे पान पर्जन्ययानाला मानले जाते. चांद्रयानासाठी सतत ध्यास, अभ्यास आणि संशोधन आणि पर्जन्ययानासाठी तहान लागली की खणा, कृत्रिम पावसाची विहीर, असा प्रकार चालला आहे. इंटरनॅशनल टेंडर काढून ३० कोटी रुपयांना गेल्यावेळी कंत्राट दिले, तर पोटात गोळा येतो. जलयुक्तच्या टेंडरचे वंडर घडले असते. इस्रोसाठी बजेटमध्ये मोठी तरतूद केली जाते. या सरकारचा तर तो मानबिंदू. कृत्रिम पाऊस हा चमत्कार नाही. ते एक शास्त्र आहे. पाऊस पडला की, आपण दुष्काळ विसरून जातो, तसाच विसर कृत्रिम पावसाचाही पडतो; पण मराठवाड्यासारख्या हवामान बदलाच्या प्रदेशाला कृत्रिम पावसावर सातत्याने प्रयोग करण्याची गरज आहे. खरं तर हवामान बदलाचा संबंध सर्वसामान्य लोकांच्या जीवन-मरणाशी, नापिकीशी, पीकरचनेशी अन् पर्जन्यमानाशी आहे. औरंगाबादसकट मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांवर दुष्काळाची छाया आहे; पण शासनाने कायमस्वरूपी रडार नागपूरला आणि तात्पुरती व्यवस्था औरंगाबादला करून ठेवली आहे. औरंगाबाद विभागीय आयुक्तालयाच्या डोक्यावरची रडार यंत्रणा गुपचूप हलविण्यात आली. खरं तर इस्रोप्रमाणे कृत्रिम पावसावर संशोधन करण्यासाठी औरंगाबादला प्रयोगशाळा होणे गरजेचे आहे. किमान या प्रदेशात आलेल्या ढगांमध्ये तरी गोळ्या मारू द्यात. 

२० जुलै १९६९ रोजी ईगल चांद्रयानातून नील आॅर्मस्ट्राँग आणि एडवीन आॅल्ड्रीन चंद्रावर उतरले. आज या चांद्रविजयाची पन्नाशी होत आहे. त्याचवेळी आपले चांद्रयानही जात आहे. आता २०२२ मध्ये अखिल भारत वर्ष म्हणणार की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले. किमान प्रधानमंत्री तरी ठसकेबाज भाषण करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले, असे ठासून सांगतील. तेव्हा खरेच उत्पन्न दुप्पट झाल्यासारखे वाटेल; पण या २०२२ लाच महाराष्ट्र दुष्काळाची पन्नाशी साजरी करील. १९७२ च्या दुष्काळापेक्षा यावर्षीचा दुष्काळ अधिक भयानक होता. त्याचे गांभीर्य नव्हते एवढेच! लोकांनी मुकाट स्थलांतर केले. पुणे-मुंबईच्या जपानी मेट्रोच्या कामाला निघून गेले. 

आमच्या उलट चीनचे आहे. या महाकाय देशाने सातत्याने कृत्रिम पावसावर संशोधन केले. प्रदेशानुरूप, हवामानानुसार बदल आणि सुधारणा केल्या; पण आपल्याकडे तसे काहीच घडले नाही. जगामध्ये कृत्रिम पावसावर जेवढे प्रयोग होतात त्यापैकी निम्म्याहून अधिक प्रयोग चीनमध्ये होतात. (आमच्या विद्यापीठात केवळ पदवीपुरते संशोधन होते.) २००८ मध्ये चीनमधील बीजिंग शहरात आॅलिम्पिक स्पर्धा चालू असताना मोठे प्रदूषण आढळून आले. शास्त्रज्ञांनी तात्काळ त्याठिकाणी कृत्रिम पाऊस टाकून ते जिरवले. ‘अगा ऐसे घडलेचि नाही’ अशा आविभार्वात स्पर्धा पार पाडल्या. आमच्याकडेही त्यांचे जरा अधिकचेच लक्ष आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचे एक शिष्टमंडळ मराठवाड्यात आले. इथल्या हवामानाचा अदमास घेतला. त्यानंतर त्यांनी कृत्रिम पाऊस तंत्रज्ञानाद्वारे क्लाऊड सीडिंग करण्याची आॅफर थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. 

चीनच्या या अधिकाऱ्यांचा महाराष्ट्र दौरा हा आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. कृत्रिम पाऊस हे मृगजळ नाही, तर तो हमखास उपाय आहे; पण त्याचे शास्त्र पाळले पाहिजे, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. ख्यातनाम गीतकार शमशूल हुडा बिहारी यांनी जाहीरपणे विज्ञान आणि तंत्रज्ञानाने आमच्या चंद्राचे सौंदर्य घालविले आहे, अशी तक्रार केली आहे. ‘ये चाँद सा रोशन चेहरा’, असे ‘कश्मीर की कली’ चित्रपटातील गाणे खरे तर आपल्या प्रेयसीच्या सुंदर मुखड्याची आठवण करून देणारे आहे; परंतु चंद्रावरील खड्डे पाहून कोण त्यावर विश्वास ठेवील! तरीसुद्धा कवी आणि साहित्यिक काही केल्या चंद्राचा पिच्छा सोडणार नाहीत. अखिल विश्व साहित्य संमेलनाचे कायम संयोजक कौतिकराव ठाले-पाटील सातत्याने पुढचे साहित्य संमेलन कोठे घ्यावे म्हणून चिंतित असतात. चांद्रयानाचे हे मिशन जर यशस्वी झाले, तर चंद्रावर साहित्य संमेलन घेण्याचे स्वप्न ते निश्चितच साकार करतील आणि कवीही आपली कवितेची पासोडी चंद्रावर सोडल्याशिवाय राहणार नाहीत. अर्थात, ही सारी कवी कल्पना नाही, तर या मिशनचा एक उद्देश चंद्रावर ‘लुनार कॉलनी’ निर्माण करण्याचा आहे. गुरू आणि मंगळ या मोठ्या ग्रहावर जाण्यासाठीचे चंद्र हेलिपॅड म्हणून वापरले जाणार आहे. खरी गोम अशी आहे की, चांद्रयानातून बराच मोठा महसूल गोळा करता येतो. इथे पाऊस फुकटात पडतो. लोक फुकटात पाणी वापरतात. अशा फुकट्यांच्या दुनियेत पाण्याच्या थेंबाथेंबाला किंमत आल्याशिवाय कृत्रिम पावसाचे महत्त्व कळणार नाही.

टॅग्स :RainपाऊसState Governmentराज्य सरकारdroughtदुष्काळ