लुप्त होणारे जपताना..
By Admin | Updated: December 20, 2014 16:10 IST2014-12-20T16:10:38+5:302014-12-20T16:10:38+5:30
जंगले तोडून तिथे सिमेंटच्या इमारती उभ्या करण्याच्या माणसांच्या हव्यासामुळे अनेक वन्य प्राण्यांना जगण्याची लढाई लढावी लागत आहे.
_ns.jpg)
लुप्त होणारे जपताना..
राजू काळे
जंगले तोडून तिथे सिमेंटच्या इमारती उभ्या करण्याच्या माणसांच्या हव्यासामुळे अनेक वन्य प्राण्यांना जगण्याची लढाई लढावी लागत आहे. आणखी काही वर्षांनी बरेचसे प्राणी मुलांना चित्रातच दाखवावे लागतील, हे लक्षात आल्यानंतर आता वन्य प्राण्यांच्या संवर्धनाबाबत जागृती निर्माण झाली आहे. जिवंत प्राण्यांबरोबरच मृत प्राण्यांनाही त्यांच्याच त्वचेच्या साह्याने जतन करण्याचे शास्त्र विकसित झाले आहे. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुरू असलेल्या या केंद्राविषयी...
मानवाचे मेणाचे पुतळे तयार करण्याचे शास्त्र जगप्रसिद्ध असले तरी त्याच्या मूळ कातडी व सांगाड्यातून त्याचे अस्तित्व हुबेहूब प्रतिकृतीच्या माध्यमातून टिकवून राहिले तर? त्याची कल्पना करणे सहजशक्य मानले तरी हे शास्त्र काही कोस दूरच आहे. हे शास्त्र विकसित झाले तरी त्याला जगभरातून मान्यता मिळेल की नाही, हा तितकाच दूर असलेला विषय आहे. परंतु, वन्य जीवांचे, प्रामुख्याने दुर्मिळ व नामशेष झालेल्या दुर्मिळ वन्यजीवांचे अस्तित्व त्यांच्याच मूळ कातडी व सांगाड्याच्या साह्याने टिकवून ठेवण्याचे शास्त्र जगात प्रसिद्ध आहे. त्याची काही मोजकीच केंद्रे जगात आहेत. भारतातून मात्र हे शास्त्र लुप्त होत चालले आहे. ते टिकवून ठेवण्यासह त्याचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एकमेव वन्य जीव जतन केंद्र (टॅक्सी डर्मी) महाराष्ट्र वन विभागांतर्गत १ ऑक्टोबर २00९ पासून सुरू करण्यात आले आहे. भारतातून लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या या शास्त्रयुक्त कलेचे भारतातील एकमेव केंद्र एका छोटेखानी जागेत सुरू करण्यात आले आहे. हे शास्त्र नष्ट झालेल्या वन्यजीव प्रजातींना त्यांच्या मृत्यूपश्चात कातडीसह हाडे व इतर अवयवांच्या माध्यमातून जीवित ठेवण्याचे शास्त्र म्हणून ओळखले जाते. इंग्रजीत टॅक्सी डर्मी म्हणून संबोधले जाते. या शब्दाचा अर्थ असा की, प्रवाशांना वाहून नेणारी टॅक्सी म्हणजे वहन व डर्मी म्हणजे जीवजंतू, अशा या जीवजंतूंचे वहन म्हणजेच टॅक्सी डर्मी. परंतु, वन्यजीवांच्या बाबतीत वापरण्यात येणार्या टॅक्सीडर्मीला शास्त्रीय भाषेत व सर्वसामान्यांना समजावे म्हणून (मृत) वन्यजीवांचे जतन करण्याचे शास्त्र असे संबोधले जाते. आतापर्यंत अनेक दुर्मिळ व नामशेष होत असलेल्या मृत जीवांच्या हुबेहूब प्रतिकृती या केंद्रात साकारण्यात आल्या आहेत. वन्यजीव शास्त्रांचा अभ्यास करणार्यांसाठी ही एक पर्वणी असून या प्रेरणादायी कलेला आणखी पुढे नेण्याची सुवर्णसंधी मानण्यात येत आहे. या केंद्राला सध्या जीवित ठेवण्यासाठी राज्याच्या वनविभागाने मुंबईतील परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयातील शरीररचनाशास्त्राचे तज्ज्ञ प्रा. डॉ. संतोष गायकवाड यांचे सहकार्य घेतले आहे. पाच वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या केंद्रातून नष्ट झालेल्या व नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या वन्य जीवांच्या हुबेहूब प्रतिकृती भारताच्या कानाकोपर्यात गेल्या आहेत. यात जगातून लुप्त झालेल्या सायबेरियन वाघाचा समावेश असून या वाघाची प्रतिकृती उत्तराखंडच्या नैनिताल येथील भारतरत्न गोविंद वल्लभ पंत उच्चस्थलीय प्राणिसंग्रहालयात ठेवण्यात आली आहे. तसेच जगातील दुर्मिळ झालेल्या १४ पक्ष्यांच्या प्रजातींतील ब्राऊनवूड जातीचे घुबड (हे घुबड बर्फाळ प्रदेशात आढळून येते) व घार (फाल्कन) साकारण्यात आले आहे. शिवाय अलापल्ली येथील सिरोन जंगलातील विमला नामक हत्तीणीचा नदीच्या दलदलीत मृत्यू झाला होता. तिच्या देहाचे जतन करण्यासाठी तिच्या शिराची (डोके) मूळ कातडी व डोक्याच्या कवटीवरून हुबेहूब प्रतिकृती येथे साकारण्यात आली आहे. या शास्त्रात मृत प्राण्यांची कातडी चोवीस तासांच्या आत काढावी लागते. अगदी कुशलतेने काढण्यात आलेल्या कातडीला जिवंत ठेवण्यासाठी त्यावर रासायनिक प्रक्रिया (टॅनिंग) करून ती वाळविली जाते. तद्नंतर त्या मृत प्राण्यांचे मास उपलब्ध तीक्ष्ण हत्यारांद्वारे काढून त्या प्राण्याच्या मृत शरीरापासून हाडांचा सांगाडा वेगळा केला जातो. परंतु, घटनेच्या ठिकाणी हत्यारे उपलब्ध न झाल्यास त्या प्राण्याचे शरीर डीप फ्रीजर (शीतगृह) मध्ये ठेवून सोईनुसार हाडे अथवा सांगाडा काढला जातो. हा सांगाडा तज्ज्ञांच्याच माध्यमातून अथवा उपस्थितीतच त्याला कुठेही डॅमेज (नुकसान) न करता काढला जातो. त्याला किड अथवा मुंग्या लागू नये, यासाठी त्यावरही रासायनिक प्रक्रिया करून त्याला प्लायवूड व लाकडाच्या फ्रेममध्ये टांगून त्याला विशिष्ट पोझिशन दिली जाते. या प्रक्रियेला मृत प्राण्याच्या कालावधीनंतर सुमारे १ महिन्याचा कालावधी लागतो. या प्रक्रियेनंतर त्यावर विशिष्ट आवरणाचे आच्छादन घालून त्याला फायबरने कव्हर केले जाते. पुढे त्यावर त्या प्राण्याची कातडी लावून त्याला अंतिम स्वरूप दिले जाते. या प्रतिकृती काचेच्या बंद पेटीत सुरक्षित ठेवल्यास त्या सुमारे ४0 ते ५0 वर्षांपर्यंत टिकून राहतात. अलीकडेच बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राजा नावाचा बिबट्या व शोभा नावाच्या सिंहिणीचा मृत्यू झाला होता. त्यांची प्रतिकृती याच एकमेव केंद्रात साकारण्यात येत असून, ८ डिसेंबर २0१४ रोजी भायखळ्याच्या जिजाबाई प्राणिसंग्रहालयात मृत पावलेली जिमी सिंहीण येथे साकारण्यात येणार आहे. याखेरीज नाशिक येथील संरक्षण विभागाच्या तोफखाना संग्रहालयातील घोड्याच्या आकाराच्या खेचराचा मृत्यू झाला होता. त्याची प्रतिकृतीही याच संग्रहालयात जतन करून ठेवण्यासाठी त्याचे कातडे व हाडांचा सांगडा येथे आणण्यात येऊन नुकताच रवाना करण्यात आला आहे. या प्रतिकृतींच्या खरेदी-विक्रीवर भारतातील वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये बंदी आहे. हा कायदा केवळ भारतातील वन्य जीवांच्या प्रतिकृतींपुरता र्मयादित असून, परदेशी वन्य जीवांची प्रतिकृती खरेदी-विक्रीसाठी मात्र योग्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते. भारतातील या लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या वन्य जीव जतन शास्त्राचा प्राणिशास्त्र (झूलॉजी) अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर विचार सुरू आहे. या शास्त्राचा वन्यजीवांच्या प्रजाती (आयडेंटिफिकेशन ऑफ अँनिमल्स) ओळखणे, तसेच अन्य अभ्यासात चांगला उपयोग होतो. या शास्त्राचा अभ्यास करणार्यांना जगात चांगली मागणी असली तरी भारतात मात्र हे शास्त्र अद्याप दुर्लक्षित आहे. त्याचा अभ्यासक्रमात समावेश केला तर त्यातून रोजगाराची संधी मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता डॉ. गायकवाड यांच्याकडून वर्तविण्यात येत आहे. वनविभागाच्या कर्मचार्यांनाही या शास्त्राची माहिती मिळावी, या उद्देशाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील १५ कर्मचारी/अधिकार्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे मृत्यूपश्चात वन्य जीवांचे जतन करण्याच्या उद्देशाने त्या मयत वन्यजीवांचे अत्यावश्यक अवशेष वेळेत काढता येणे शक्यप्राय होईल. या शास्त्राचा अभ्यास केल्यास केंद्र शासनाच्या परवानगीने स्वतंत्र व्यवसाय करता येणे शक्य असून, त्यातून स्वयंरोजगार निर्मितीसुद्धा शक्य आहे. यादृष्टीने सरकारने या शास्त्राचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा गांभीर्याने विचार करायला हवा. भावी पिढय़ांना प्राणी कसे होते ते दाखवण्यासाठी म्हणूनही याचा चांगला उपयोग होणार आहे. तसेही प्राणिसंग्रहालयात अशा प्रतिकृती ठेवून जिवंत प्राण्यांना जंगलातच राहू देणे केव्हाही चांगलेच.
(लेखक लोकमत मुंबईचे वरिष्ठ बातमीदार आहेत.)