Bollywood and drugs.. | चस्का- बॉलिवूडमधल्या लोकांना गांजाचा ‘कश’ कशाला लागतो?

चस्का- बॉलिवूडमधल्या लोकांना गांजाचा ‘कश’ कशाला लागतो?

ठळक मुद्देफिल्म पडद्यावर जितकी चकचकीत दिसते, तितका कॅमेर्‍यामागे अंधार असतो. तो साहणं सगळ्यांच्याच ‘बस की बात’ नसते. हे कळण्यासाठी मात्र सुशांतसिंहसारखी एखादी ट्रॅजेडीच घडावी लागते. 

 

 

 


- अपर्णा पाडगावकर

एक तरुण मुलगी. कविता करण्याची स्वप्नाळू ओढ तिला मुंबईच्या मायानगरीत घेऊन आली. असिस्टंट डायरेक्टर हा पहिला पडाव असतो सगळ्याच स्ट्रगलर्सचा. ते डझनाने लागतात एकेका सेटवर. अनुभव ढिगाने मिळतो, दोन वेळचं चहा-नास्ता, जेवण सुटतं. गांजाची लत इथेच लागते, या टप्प्यावर. तर या मुलीचा इंटरव्ह्यू उत्तम झाला. शेवटी तिला विचारलं की डू यू स्मोक अप? ती म्हणाली की सिगारेट ओढते. इंटरव्ह्यू घेणारा हसला. तुला स्मोक अपचा अर्थच माहीत नाही.. तू गांजा नक्कीच फुकत नसशील..
दुसरं उदाहरण एका होतकरू दिग्दर्शकाचं. आपल्या मित्राला त्याने पहाटे अडीच वाजता फोन करून भेटायला बोलावलं. सकाळी ये, म्हणाला. मनात धाकधूक घेऊन मित्र सकाळी आठ वाजताच पोहोचला. हा दिग्दर्शक रात्रभर झोपलाच नव्हता. तिथून तो जो बोलू लागला तो सलग दोन वाजेपर्यंत बोलत होता. तू आलास म्हणून, नाहीतर मला स्वत:ला टांगून घ्यावंसं वाटत होतं, म्हणाला. मित्राने मग सायकॅट्रिस्टला बोलावलं आणि पुढे विपश्यनेला वगैरे धाडून त्याची गांजाची सवय मोडवली; पण तेही कधीकधी धड सुटत नाही. त्याच्या नव्या फिल्मचं काम सुरू झालं, तेव्हा या दिग्दर्शकाचे मूड स्विंग्ज इतके होते की ती फिल्म आज चार वर्षांनंतरही डब्यातच पडून आहे. 
गांजाचं सेवन केलेल्या बहुतेकांचा पहिला अनुभव आहे - तुम्हाला शांत, आनंदी वाटतं. आयुष्यात स्ट्रेस नाहीच आणि असला तरी तो आपण हॅन्डल करू शकू, हा आत्मविश्वास वाटू लागतो. पहिला कश मारला तेव्हा सगळ्या गोष्टी स्लो मोशनमध्ये होत असल्याचं वाटलं, असं एकाने सांगितलं. अशा अनुभवांची खूप गंमत वाटते आणि आयुष्यावर आपला कंट्रोल असल्याचं वाटू लागतं. फिल्म इंडस्ट्रीमध्ये जिथे सगळंच अस्थिर, अनिश्चित असतं, तिथे अशा कॉन्फिडन्सची गरज आत्यंतिक असते. 
इंडस्ट्रीमध्ये याचं प्रमाण थोडं अधिक आहे, याचं कारण गांजा फुकणं आणि कल्पना सुचणं याचा जोडलेला बादरायण संबंध. गांजा ही साधी वनस्पती. याचं सेवन दारूपेक्षा स्वस्त पडतं. गांजाची कोरडी पानं तंबाखूसकट किंवा त्याशिवायही रोल करून स्मोक केली जातात. बिया काढलेला साधारण प्रतीचा गांजा साधारणत: 150 ते 350 रुपयांपासून रस्तोरस्ती पानवाल्यांकडे मिळतो. मात्र, तुमच्यापासून धोका नाही, याची खात्री त्याला पटायला हवी. साधारणत: पन्नासेक ग्रॅममध्ये तीन जॉइंटर्स बनतात. दारूची एक क्वॉटर एकूणात पाचशेपर्यंत जाते. शिवाय वेळ, दारूचा वास, ड्रिंक अँण्ड ड्रायव्हिंगचा त्रास.. गांजापासूनच चरस बनतो. त्याची किंमत आठ हजार रुपये तोळा. चरसही तंबाखूसोबत मळून खाल्ला किंवा स्मोक केला जातो. चिलीम किंवा हुक्क्यात वापरला जातो. 
कोकेन किंवा कोक हे कोका नामक वनस्पतीपासून बनलं जाते, ज्याचं मूळ मेक्सिको. तिथला गांजाच. त्यावर अनेक रासायनिक प्रक्रिया केल्या जातात. त्याची किंमत एका ग्रॅमसाठी सात-आठ हजार असू शकते. तो नाकानेच ओढावा लागतो. यामुळे प्रचंड एनर्जी येते, तुम्ही सलग तीन शिफ्टमध्ये काम करू शकता, जे इंडस्ट्रीमध्ये खूपच रेग्युलर आहे.  आता कोविडनंतर या किमती किमान तिपटीने वाढल्या आहेत. मात्र, लॉकडाऊनमध्ये वापरही तिपटीने वाढला असल्याचं लोकांचं म्हणणं आहे.
गांजा ओढला की शरीरात टीएचसी प्रकारचं रसायन द्रवू लागतं. आधी प्रचंड भूक लागते, मग झोपही येते; पण हे सातत्याने केलं की हळूहळू भूक मरूही लागते. मग आपोआपच बारीक राहाता येतं. शरीरच माध्यम असण्याच्या व्यवसायात त्याचं महत्त्व वेगळं सांगायला नकोच. त्यामुळे मुलींमध्येही हे प्रमाण मोठं आहेच. गांजा ओढल्यानंतर एकाग्रता वाढते. विशेषत: नटांसाठी-ज्यांना वैयक्तिक आयुष्यापेक्षा वेगळ्या भावनिक स्थितीला जिवंत करायचं आहे, त्यांच्यासाठी ही एकाग्रता खूप महत्त्वाची ठरते. मात्र, हेही तितकंच खरं की जेव्हा तुम्ही एका गोष्टीवर फोकस करता, तेव्हा अन्य गोष्टीही ज्या आपण सामान्यत: करत असतो, उदा - आपण फोनवर बोलताना बाजारात खरेदी करतो, तसं करणं मुश्कील होतं. पण भारी काहीतरी सुचतंय किंवा करतोय, या भावनेने पुन: पुन्हा गांजाचं सेवन होत राहातं. आपली जगावेगळी आयडिया हेच जिथे यशाची किल्ली आहे, तिथे ‘सुचण्याला’ अनन्यसाधारण महत्त्व असतं. 
हे सुचणं किंवा हाय वाटणं हे प्रामुख्याने तत्कालीन मन:स्थितीवरच अवलंबून असतं.  जग गेलं खड्डय़ात, हा अँटिट्यूड मुळात असतोच. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी घरादारावर ठोकर मारलेली असते. जग साथ देत नाही, तेव्हा या अशा भासमान गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. फिल्म पडद्यावर जितकी चकचकीत दिसते, तितका कॅमेर्‍यामागे अंधार असतो. तो साहणं सगळ्यांच्याच ‘बस की बात’ नसते. हे कळण्यासाठी मात्र सुशांतसिंहसारखी एखादी ट्रॅजेडीच घडावी लागते. 

‘इंडिका’ आणि ‘सतिवा’
इंडिका किंवा सतिवा या नावाचे दोन प्रकार गांजामध्ये आढळतात. गांजा वनस्पती कोणत्या वातावरणात वाढते, त्यावर हे प्रकार पडतात. सध्या गांजाची घरगुती किंवा कृत्रिम शेतीसुद्धा करता येते, ज्यात मूळ गांजात अनेक प्रकारचे बदल करता येतात. अनेक देशांमध्ये गांजाचे सेवन वैद्यकीय कारणांसाठी करणं कायदेशीर आहे. पेशंटला खूप लो वाटत असेल तर एनर्जी वाढवणारा इंडिका किंवा खूपच हायपर होत असेल तर शांत करणारा सतिवा प्रकारचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
एलएसडी वगैरे केमिकल ड्रग्ज ही तशी फारच महागडी. एक स्टम्पच्या आकाराचा तुकडा चार हजारांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे प्रचंड भास होतात, ज्यात माणूस काहीही करू शकतो. ते सहसा एकट्याने केले जात नाही.
aparna@dashami.com
(लेखिका दशमी स्टुडिओत क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आहेत.)

Web Title: Bollywood and drugs..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.