बोलावा विठ्ठल.

By Admin | Updated: July 18, 2015 13:47 IST2015-07-18T13:47:41+5:302015-07-18T13:47:41+5:30

महाराष्ट्राला जशी लावणी, पोवाडय़ांची परंपरा आहे तशीच अभंगांचीही. हे अभंग सुरांच्या माध्यमातून खुलवण्याच्या अफाट शक्यता भीमसेनजी-किशोरीताई यांच्यासारख्या कलाकारांना जाणवल्या आणि सुरू झाली अभंगवाणीची एक रसाळ परंपरा. आज हीच परंपरा तरूण स्वरांनी बहरली आहे.

Bolava Vitthal | बोलावा विठ्ठल.

बोलावा विठ्ठल.

>वंदना अत्रे
 
सावळ्या विठ्ठलाचे रूप प्रत्येकाच्या मनात असते. आपले-आपले असे खास. विठ्ठल म्हणताच डोळ्यांपुढे लगेच उभे राहणारे, जिवाला लळा लावणारे. कोणाला तो पंढरीच्या वाटेवर असणा:या चिंब निसर्गात दिसतो, तर कोणाला पंढरपूरच्या मंदिराच्या उंच सोनेरी कळसात. कोणाला तो भेटतो गोपीचंदनाच्या गंधात, तुळशीच्या माळात आणि कोणाला त्याची हाक ऐकू येते एखाद्या आर्त अभंगात. जसा ज्याचा ध्यास तसा त्याचा विठ्ठल. आणि म्हणूनच पंढरीच्या वारीसाठी भले दिंडय़ा पताका घेऊन, टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर लाखो वारकरी निघाले तरी त्या पंढरीच्या वाटेवर मात्र जो-तो आपापल्या विठ्ठलासोबत असतो. एकेकटा. आणि गच्च भरलेल्या सभागृहात रंगमंचावर विठ्ठलनामाचा गजर टिपेला पोचला असताना, तिथे धावून येणारा विठ्ठल जेवढा जनात असतो, तेवढाच प्रत्येकाच्या मनातही असतो. गळ्यातून उमटणा:या प्रत्येक स्वराबरोबर त्याचे रूप पालटत असते. दिवसभर अंगावर रिमङिाम बरसत राहणा:या पावसाबरोबर, अनवाणी पावलांचा सारा शीण, सा:या देहभुकांचे भान विसरून पंढरीच्या विठ्ठलाकडे नेणारी वाट तुडवणो ज्या माङयासारख्या दुबळ्या भक्तांना ङोपत नाही त्यांच्यावर या अभंगांनी केवढी कृपा केली आहे. त्या विठ्ठलाची सगळी, अगदी सगळी रूपे त्यात वर्णिली आहेत. आणि ही रूपे जेव्हा संगीताच्या सुरावटीत गुंफून कानावर पडतात तेव्हा मंजि:यांचे पोपटी-जांभळे तुरे असलेल्या तुळशीच्या गच्च हाराचा सुगंध भोवती दरवळू लागतो. रिंगण धरीत, घोडा नाचवीत, मजल दरमजल करीत पंढरीची वारी करण्याची परंपरा जेवढी जुनी तेवढीच अभंगांच्या वाटेने विठ्ठलाचे डोळा भरून दर्शन घेण्याची ही परंपरा जुनी आणि रसाळ. म्हणूनच तर पंडित भीमसेन जोशी किंवा पंडिता किशोरीताई अमोणकर यांच्यासारख्या चोख शास्त्रीय परंपरेतील गायकांनासुद्धा या अभंगांचे बोट धरून या विठ्ठल वाटेवर जावेसे वाटले. त्यामुळे आषाढी म्हटले की आठवते पंढरपूर आणि आठवते अभंगवाणी. काल होऊन गेलेल्या (आणि आजही असलेल्या !) भीमसेनजींची आणि आजच्या राहुल देशपांडेंची, जयतीर्थ मेवुंडीची.. 
महाराष्ट्राला जशी लावणी, पोवाडय़ांची परंपरा आहे तशी अभंगांचीपण एक समृद्ध अशी परंपरा आहे. या अभंगांचे सौंदर्य त्यांच्या शब्दात आहे पण त्या शब्दांनी आपल्या हाताचे बोट पकडले आहे ते कोवळ्या अशा भक्तिभावाचे. हे अभंग सुरांच्या माध्यमातून खुलवण्याच्या अफाट शक्यता जेव्हा भीमसेनजी- किशोरीताई यांच्यासारख्या कलाकारांना जाणवल्या तेव्हा महाराष्ट्रात सुरू झाली अभंगवाणीची एक रसाळ परंपरा. ही परंपरा एखाद्या कलाकाराबरोबर काळाआड जाऊन विस्मृतीत जमा होणार का, अशी भीती महाराष्ट्रातील रसिकांना वाटत असताना एकदम रसिकांसमोर आला तो ‘बोलावा विठ्ठल’सारखा  कार्यक्रम. या कार्यक्रमाने या परंपरेला एक तरु ण ताजा चेहरा दिला. अभंग तेच, त्याला दिलेले सूर तेच आणि त्यामागे असलेला भावही तोच, विठ्ठल भेटीसाठी आतूर असा. पण साद मात्र तरुण मुखातून आलेली! प्रयत्न वेगळे होते आणि त्यात धोकेही नक्की होतेच. भीमसेनजींच्या दमदार घोटीव आवाजाचे गारुड असलेल्या मराठी रसिकांना अभंगवाणी गाणारा हा तरुण स्वर किती भावेल अशी शंका कदाचित हा प्रयोग सुरू करणारे पंचम निषादचे शशीभाई व्यास यांना वाटली असेलही; पण पहिल्याच प्रयत्नावर रसिकांनी पसंतीची मोहर उमटवली आणि ‘बोलावा विठ्ठल’ गावोगावच्या रसिकांना पंढरीची वारी घडवू लागला. बघता बघता या प्रयोगाने दहा वर्षांची वाटचाल पूर्ण केली आहे. 
अभंगवाणीविषयी बोलताना या प्रयोगाची दखल नक्कीच घ्यावी लागते याचे कारण काय? एक तर या स्वरांना एक तरुण तडफदार ऊर्जा मिळाली जी आपल्या वाटेने या अभंगांचा आणि त्यातील भावाचा शोध घेऊ बघते आहे. भौतिक समृद्धी नावाच्या भ्रमाचा फुगा एकीकडे आपले पाय जमिनीवरून उचलत असताना आणि सारे भोवताल धूसर होत असताना या अभंगातील आर्त भाव आणि स्वर आपल्याला पुन्हा या मातीवर आणतात. आणि मातीवर आणणारे ते स्वर आजचे, तरु ण आहेत हे दिसते तेव्हा ही परंपरा पुढे चालू राहण्याचे आश्वासन मिळते. जे अभंग भीमसेनजींच्या स्वरात, अभिषेकीच्या ढंगात ऐकले ते जेव्हा राहुल देशपांडे, जयतीर्थ मेवुंडी, सावनी शेंडे किंवा आनंद भाटे यांच्या तोंडून ऐकताना आपल्या मनात एकीकडे असते ते भीमसेनजी किंवा अभिषेकी यांच्या स्वरांचे स्मरण; पण त्या कलाकृतीतून दिसणा:या स्वरांच्या नव्या आकृती बघताना वाटते, अरे स्वराची ही नवी, वेगळी आकृती पण छान आहे की! ही यापूर्वी कधी बघितली नव्हती.. स्वरांचा हा नवा आविष्कार हे या अभंगवाणीचे सामथ्र्य आहे. मराठी ही रूढार्थाने मातृभाषा नसलेल्या 
रंजनी गायत्री जेव्हा आपल्या दाक्षिण्यात ढंगात ‘बोलावा विठ्ठल’ म्हणतात तेव्हा विठ्ठलाचे एक वेगळे स्वरूप दिसत असते. 
या अभंगवाणीला लाभलेल्या या तरु ण स्वरांनी एक फार महत्त्वाची गोष्ट साधली आहे आणि ती म्हणजे तरु ण श्रोत्यांना या विठ्ठलनामाची ओढ निर्माण करण्याचे ! देवाचे नाव तरुण पिढीने घेणो जणू निषिद्ध आहे अशा समजुतीत (की भ्रमात?) बहुसंख्य तरुण जगत असताना ते अभंगवाणीकडे वळले ते त्यात सहभागी होत असलेल्या तरुण दमाच्या कलाकारांमुळे. या कलाकारांची नव्या दमाची गायकी भले या तरुण श्रोत्यांना या मंचापर्यंत आणत असेल; पण हा श्रोता तिथे रमतो तो मात्र त्या अभंगातील भावामुळे. गोडव्यामुळे. आणि हा गोडवा फक्त त्या शब्दातून व्यक्त नसावा, त्या पलीकडे त्या रचनांमध्ये काहीतरी अशी जादू आहे ज्यामुळे हा ‘विठ्ठल’ आता मराठी मातीच्या सीमा ओलांडून देशभरात गेला आहे. कानडा विठ्ठलु पंजाबी, तामिळी. गुजराती अशा कितीतरी भाषेतील रसिकांपर्यंत आज तो निव्वळ पोचला नाही तर त्याने ‘वेड मज लावियले’ अशी या रसिकांची अवस्था केली आहे.  स्वरांना कुठे त्यांची भाषा असते आणि भक्तीला? भाषा आणि जात, वर्ण आणि देश हे सगळे सोडून ते स्वर आणि तो भक्तिभाव फक्त तुमच्या थेट हृदयापर्यंत जात असतो. 
पावसाची झड आता कधीही सुरू होईल. त्यात भिजत वारकरी कधीच चंद्रभागेच्या वाळवंटी निघाले आहेत. आणि स्वरांची दिंडीही वाजत गाजत चहू दिशांनी विठ्ठलाला कवेत घेण्यासाठी निघाली आहे..
           
 
 
(लेखिका शास्त्रीय संगिताच्या आस्वादक 
व ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Web Title: Bolava Vitthal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.