‘बडा घर’!

By Admin | Updated: August 29, 2015 15:05 IST2015-08-29T15:05:29+5:302015-08-29T15:05:29+5:30

पं. भीमसेन जोशी यांची तंबो:यांची जोडी प्रवासात फुटली. त्यांनी लगोलग ‘बडा घर’ गाठलं. पं. जसराज यांनी आव्हान दिलं, ‘अस्साच’ तानपुरा पाहिजे. अमेरिकन तानपु:याची ती सुधारित आवृत्ती पुढे ‘सफारी तानपुरा’ म्हणून नावाजली! जुन्या-जाणत्या दिग्गजांपासून तर आजच्या नामांकित कलावंतांर्पयत कोणाच्याही संगीत मैफलीचं ‘पान’ आजही या घरातल्या तंतुवाद्यांशिवाय सजत नाही!

'Big house'! | ‘बडा घर’!

‘बडा घर’!

>- श्रीनिवास रागे
अभिजात भारतीय संगीताला नावारूपाला आणणारा मिरजेतला ‘नादी भोपळा’
 
पंडित भीमसेन जोशी सज्जनगडवर मैफलीसाठी निघालेले. पंडितजी गाडीनं, तर साथीदार एसटी बसनं. बसच्या टपावर साहित्य ठेवलेलं. त्यात तंबो:यांची (अर्थात तानपु:यांची) जोडीही होती. ही जोडी पंडितजींनी मिरजेच्या सतारमेकर बंधूंकडून बनवून घेतलेली. साता:याजवळ बस आली आणि जोराच्या वा:यानं तंबो:यांची जोडी खाली रस्त्यावर आदळली.. फुटली. पंडितजी लगोलग तिथं पोहोचले. ती जोडी घेतली आणि तडक मिरज गाठलं. अमीरहमजा सतारमेकर आणि त्यांच्या बंधूंनी लगेच ती दुरुस्त करून दिली.. आणि पंडितजी परत निघाले सज्जनगडावर मैफलीसाठी..
===
पंडित जसराज यांनी अमेरिकेहून तानपुरा आणला.  देखणा, नजाकतीनं नटलेला. त्यांनी सतारमेकर बंधूंना दिल्लीला बोलावून घेतलं आणि आव्हान दिलं, तसाच तानपुरा बनवण्याचं! दोघं बंधू पंधरा दिवस झटले आणि अगदी तसाच कमी उंचीचा तानपुरा बनवून दिला. (पुढं तो ‘सफारी तानपुरा’ म्हणून नावारूपाला आला!) जसराज चकित! त्यांनी बॅगेतलं चेकबुक सतारमेकर बंधूंपुढं ठेवलं आणि आकडा लिहायला सांगितला..
===
आणि आता..
मिरजेच्या सतारमेकर गल्लीत ‘बडा घर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमीरहमजा यांच्या दुमजली घराच्या पडवीत त्यांच्यासह चार-पाच जण तंबोरे बनवत बसलेले. अंगातली रग कमी झाली तरी हात अजूनही सफाईनं हलत असलेले.. ‘काय करणार साहेब? पोरं आता यात यायला नको म्हणताहेत. उणीपुरी सत्तर-ऐंशी माणसं राहिलीत हे बनवणारी. मिळकत पहिल्यापासूनच कमी. मग कशाला येतील पोरं यात? कला जपायची म्हणून आम्ही राबतोय.’ तंबो:याला कमालीचा गोडवा देणा:या या कलावंताचा स्वर कडवट झालेला. आठ वर्षापूर्वी शराफत अब्दुलमजीद सतारमेकर यांना मिळालेला संगीत नाटक अकादमीचा उत्कृष्ट वाद्यनिर्मितीचा पुरस्कार, हीच त्यांची एकमेव मिळकत! शराफत हे अमीरहमजांचे बंधू. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो तिथं टांगलेला दिसतो..
===
भोपळा आणि लाकडापासून बनवलेली मिरजेची तंतुवाद्यं जगभरात प्रसिद्ध. ख्यातकीर्त शास्त्रीय गायक-वादकांना मिरजेत पारंपरिक पद्धतीनं बनवलेल्या तंतुवाद्यांचीच साथ लागते. इथल्या वाद्यांची तार झंकारल्याशिवाय काही गवय्यांच्या मैफलीच सुरू होत नाहीत, हा शिरस्ताच जणू. तंबोरा, सतार, सूरबहार, वीणा, भजनी, दिलरूबा, बीन (रूद्रवीणा) या तंतुवाद्यांच्या शास्रशुद्ध निर्मितीत मिरजेतल्या कारागिरांचा हातखंडा. त्यामुळं देशभरातली गायक-वादक मंडळी इथल्या तंतुवाद्यांनाच पसंती देतात. या वाद्यनिर्मात्या कारागिरांचं मूळ शिकलगार घराण्यातलं. पुढं या घराण्याला सतारमेकर हेच आडनाव चिकटलं. 
आदिलशाहीच्या काळात मिरजेतल्या मीरासाहेब दग्र्याच्या घुमटाच्या कामासाठी विजापूरच्या कलाकारांना आणण्यात आलं. त्यांच्या कलाकुसरीवर खूश होऊन आदिलशहानं त्यांना जमीन देऊन मिरजेतच स्थायिक केलं. या शिकलगार वंशातले फरीदसाहेब आणि मोहिद्दीनसाहेब हे बंधू तंतुवाद्यांचे पहिले निर्माते. कोणत्याही साधनांची उपलब्धता नसताना त्यांनी तंबो:यासाठी भोपळे आणि इतर साहित्य कुठून-कुठून मिळवलं. पानाचा विडा कुटून रंग तयार केला. छत्रीच्या काडय़ा तापवून त्या बारीक छिद्रं असलेल्या लोखंडी पट्टय़ांतून ओढून त्यांच्या लहान तारा बनवल्या.. आणि पहिला तंबोरा तयार झाला. त्यानंतर शिकलगार घराण्यातील शंभरहून अधिक कारागीर या व्यवसायात उतरले. मिरजेच्या पटवर्धन सरकारांनी त्यांच्या स्वत:च्या गणोश कलागृहात काही वाद्यं आणली. ती दाखवून तशीच वाद्यं बनवून घेण्यात आली. फरीदसाहेब आणि मोहिद्दीनसाहेब यांच्यानंतर पीरसाहेब, हुसेनसाहेब, हनीफ चांदसाहेब, अब्दुल करीमसाहेब, उमरसाहेब, आबासाहेब यांनी कौशल्य पणाला लावून वैशिष्टय़पूर्ण तंतुवाद्यं बनवली. फरीदसाहेब हे अमीरहमजांच्या आजोबांचे आजोबा. त्यामुळं त्यांच्या घराला ‘बडा घर’ म्हटलं जातं. 
त्याकाळी गवय्यांना राजाश्रय होता. मिरजेच्या संस्थानात दरवर्षी जलसे होत. देशभरातले गायक जमा होत. त्यांच्याकरवी या तंतुवाद्यांची कीर्ती पसरू लागली. पुढं संगीतरत्न उस्ताद अब्दुल करीम खाँ, बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, पंडित विष्णू दिगंबर पलुसकर, विनायकबुवा पटवर्धन, प्रा. बी. आर. देवधर या संगीत क्षेत्रतल्या दिग्गजांमुळं मिरजेची तंतुवाद्यं देशभर पोहोचली.
तंबोरा आणि सतार ही थोडय़ाफार फरकानं सारखीच वाद्यं. वेगवेगळ्या स्वरांनुसार गायकांसाठी सव्वाचार फुटाचा, तर गायिकांसाठी चार फूट घेराचा तंबोरा तयार केला जातो. बीन म्हणजे रूद्रवीणा. ते दोन भोपळ्यांपासून बनवलं जातं. असतं सतारीसारखंच, पण वाजवण्याच्या पद्धतीत फरक असतो. ते ध्रुपद गायकीच्या अंगानं वाजवलं जातं. दिलरूबा आणि सूरबहार ही वाद्यं सतारीसारखीच, पण आकारानं मोठी असतात.
मिरजेत अशी सारीच तंतुवाद्यं तयार होतात. या दर्जेदार तंतुवाद्यांशिवाय आजही कोणत्याच कलावंताची संगीत मैफल सजत नाही.
दिग्गजांना साथसंगत
पंडित भीमसेन जोशी, गंगूबाई हनगल, मल्लिकाजरुन मन्सूर, सरस्वतीबाई राणो, गानहिरा हिराबाई बडोदेकर, उस्ताद बडे गुलाम अली खाँ, विलायत हुसेन खाँ, मोगूबाई कुर्डीकर, पंडित जसराज, कुमार गंधर्व, पंडित सी. आर. व्यास, निवृत्तिबुवा सरनाईक, इम्रत हुसेन खाँ, मालिनी राजूरकर, परवीन सुलताना, अमीर खाँ, ओंकारनाथ ठाकूर, रामाश्रय झा, जितेंद्र अभिषेकी, किशोरी आमोणकर, उस्ताद उस्मान खाँ, उस्ताद शाहीद परवेज, उस्ताद बालेखाँ या दिग्गजांसह जुन्या-नव्या पिढीतल्या कलाकारांच्या साथीला मिरजेचीच तंतुवाद्यं होती. आताही राजन-साजन मिश्र, मुकुंद उपासनी, नारायणराव व्यास, पंडित हृदयनाथ मंगेशकरांपासून शुभा मुदगल, उमा गर्ग, शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे, राजा काळे, अजित कडकडे, मोहन दरेकर यांच्यार्पयतचे दिग्गज आणि त्यांचे शिष्य मिरजेत तयार झालेल्या सतार-तंबो:यालाच पसंती देतात. नवी दिल्लीतले अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, तसेच पुणो आणि दिल्ली विद्यापीठातला संगीत विभाग, खैरागडचे प्रसिद्ध इंदिरा कला विश्वविद्यालय इथंही मिरजेचीच तंतुवाद्यं लागतात.
 
आठवण कुमार गंधर्वाची
कुमार गंधर्व दरवर्षी मिरजेला येत. त्यांना जोड तानपुरे लागत. या दोन्ही तंबो:यांचे भोपळे एकसारखे आहेत की नाही, त्यांचं जोडकाम एकाचवेळी होतं की नाही याकडं त्यांचं बारीक लक्ष असे. तंबो:यांसाठी वापरले जाणारे भोपळे आणि लाकडाचं ते चक्क वजन तपासत. त्यांना कमीत कमी अडीच ते तीन किलो वजनाचा तानपुरा लागे. पांढरी चार ही त्यांच्या तानपु:याची ठरलेली स्वरपट्टी. 
 
खाँसाहेबांची पाच फूट घेराची जोडी
विलायत हुसेन खाँसाहेबांना पाच फूट घेराचा तानपुरा लागत असे. तानपु:याचा घेर जेवढा जास्त, तेवढा स्वर लागतो! विलायत हुसेन खाँसाहेबांनी मिरजेतून पाच फूट घेराची तानपु:याची जोडी बनवून घेतली होती. तिच्यावरच्या नाजूक नक्षीकामावरून नजर हटत नव्हती. त्यासाठी तब्बल दहा किलो हस्तीदंताचा वापर केला होता! ही भव्य जोडी सध्या सिमला इथं आहे.
 
तंबोरा जुळवण्यासाठी बाळासाहेबच!
चार तारांचा तंबोरा जुळवणं ही एक लोकविलक्षण कला. कुमार गंधर्व आणि भीमसेनजी त्यात माहीर. पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवात आलेल्या गायकांचे तंबोरे स्वत: भीमसेनजी जुळवत. त्यांच्या पश्चात तंबोरे जुळवायचे कुणी, हा प्रश्न होता. मग मिरजेच्या बाळासाहेब मिरजकरांना बोलावणं धाडलं गेलं. तेव्हापासून बाळासाहेब खास तंबोरा जुळवण्यासाठी ‘सवाई गंधर्व’ला जातात! 
 
बडा घर
‘बडा घर’ अशी ओळख असणा:या सतारमेकर घराण्यातील अमीरहमजा हे कलंदर व्यक्तिमत्त्व. काही वर्षापूर्वी त्यांनी सात फुटाची लाकडी सारंगी बनवली होती. ती अमेरिकेला पाठवण्यात आली. भारतातल्या प्रमुख 3क् तंतुवाद्यांपैकी 15 वाद्यांच्या प्रतिकृतीही त्यांनी बनवल्यात. आता वयाच्या पंचाहत्तरीत त्यांनी अॅक्रिलिक आणि फोमचा तानपुरा बनवलाय. त्यात विजेच्या दिव्यासोबत ध्वनिवर्धकाची सोय आहे. अॅम्प्लिफायरला जोडण्याची त्यात खास सुविधा आहे. गिटारप्रमाणं दिसणा:या या तानपु:यातून दहा सतारींचे स्वर काढता येतात. असं असलं तरी पारंपरिक तंबोरा-सतारीचा गोडवा आणि सर त्याला नाही, असं ते आवजरून सांगतात.
 
मिरजकर घराण्याचं योगदान
उमरसाहेब मिरजकर हे हरहुन्नरी कलाकार. त्यांनी पन्नास वर्षापूर्वी संशोधनाअंती सहा तारांचा तंबोरा तयार केला होता. आजकाल मात्र चार तारांचा तंबोरा वापरला जातो. आता त्यांचे चिरंजीव बाळासाहेब हे वैभव जपताहेत. मिरजेतला नवरात्र संगीत महोत्सव आणि अब्दुलकरीम खाँ संगीत उत्सवातून ते शास्त्रीय संगीताचा प्रसार करताहेत. मिरजकरांची सहावी पिढी या व्यवसायात उतरलीय. बाळासाहेबांची दोन्ही मुलं संगीतातील पदविकाधारक आहेत. त्यातल्या मोहसीननं प्रवासात सोयीसाठी म्हणून फोल्डिंगची सतार बनवलीय. ‘कुणीही यावं, ही कला शिकवायला आम्ही तयार आहोत..’ असं बाळासाहेब सांगतात.
 
भाबडा आशावाद की..?
जुन्या तंबो:यांची जागा आज इलेक्ट्रॉनिक्स तंबो:यानं घेतलीय. वजनानं हलका आणि आकारानं आटोपशीर असल्यानं अनेक कलाकार त्याला पसंती देतात. विक्रेत्यांनीही काळानुसार बदल केलाय. एकेकाळी तंतुवाद्यांचं माहेरघर असणा:या मिरजेत आजघडीला केवळ आठ-दहा दुकानांतून तंतुवाद्यांची विक्री होतेय. विक्रेते इलेक्ट्रॉनिक्स वाद्यं ठेवू लागलेत. पण त्याला थोडीच पारंपरिक वाद्यांची सर येणार! पारंपरिक तंबो:यातून निघणा:या श्रुती इलेक्ट्रॉनिक्स वाद्यातून कशा निघणार? भोपळा-लाकडाशिवाय नाद कसा निर्माण होणार? अभिजात भारतीय संगीत पारंपरिक वाद्यांमुळंच टिकेल. जोर्पयत भारतीय शास्रीय संगीत असेल, तोर्पयत तानपुरा लागणारच.. बाळासाहेब मिरजकरांचा हा भाबडा आशावाद म्हणावा, की कालौघावर मात करण्यास आसुसलेली संगीतप्रेमींची तपश्चर्या?
 
कवडीमोल कला
मिरजेत बनणारी तंतुवाद्यं साथीला घेऊन नामांकित गायक, वादकांनी मैफली गाजवल्या, पुरस्कार मिळवले; पण तंतुवाद्यांचा निर्माता उपेक्षितच राहिलाय! एक तंबोरा किंवा सतार बनवायला पंधरा दिवस जातात. पाच हजारांर्पयतचा खर्च येतो आणि मिळतात आठ ते दहा हजार. हे या कलेचं मोल! लाखोंची बिदागी घेणा:या गायक-वादकांनीही कधी याचा विचार केलाय, असं दिसत नाही.
 
उत्पन्न कमी, वाहतूक कठीण
फारूखभाई सतारमेकर सांगतात, ‘एक तानपुरा वर्षानुवर्षे चालतो. वर्षातून दोनदा तार-जव्हेरी करावी लागते. त्यामुळं तंतुवाद्यांना मागणी कमी असते. मुळात यापासून उत्पन्न कमी, त्यात वाहतूक कठीण. रेल्वे-एसटीतून तंतुवाद्यं सहजासहजी नेता येत नाहीत. रेल्वेत चार किलोच्या एका तंबो:यावर साठ किलोचं भाडं आकारलं जातं! दिल्लीला चार तंबोरे पाठवण्यासाठी तीन हजाराचा खर्च येतो.’
 
कलाकारांचा दर्जा कधी मिळणार?
दिल्ली, कोलकाता, लखनौमध्येही तंतुवाद्यं बनतात, पण कुशल कारागिरीमुळं देशभरात मिरजेतच हा व्यवसाय जादा तग धरून राहिलाय. या कारागिरांना कलाकारांचा दर्जा अद्याप मिळालेला नाही. मग पेन्शन, सवलती तर लांबच! तंतुवाद्य निर्मितीतले बहसंख्य कारागीर झोपडपट्टीत राहतात.
 
असा बनतो तंबोरा आणि सतार..
सतार आणि तंबो:याचा प्राण भोपळ्यात असतो. हे भोपळे सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातून भीमाकाठावरून आणले जातात. या कडूझार भोपळ्यांना जनावरंही तोंड लावत नाहीत! ते जागेवरच वाळवले जातात. वाळल्यावर आतून पोकळ होतात. कीड लागू नये म्हणून काहीवेळा आतून मोरचूद किंवा डीडीटी पावडर लावतात. तंबो:यासाठी चार-साडेचार फूट घेराचे, तर सतारीसाठी अडीच ते साडेतीन फूट घेराचे भोपळे निवडले जातात. छोटे भोपळे एकतारीसाठी असतात. भोपळे एक-दोन दिवस पाण्यात भिजवल्यानंतर रबरासारखे पातळ होतात. ते कापून त्याला लाकडाचा गळा बसवला जातो. दांडय़ासाठी लाल देवदाराचं लाकूड वापरलं जातं. ते कर्नाटकात शिमोगा आणि कारवार जिल्ह्यातल्या जंगलात मिळतं. त्यानंतर पत्ती काढली (नक्षीकाम) जाते. आधी त्यासाठी हस्तीदंत किंवा सांबराचं शिंग वापरलं जायचं. आता प्लॅस्टिकचा वापर होतो. मग सोनाराच्या लाखेनं तबली-दांडी जोडतात. तिला फ्रेंच पॉलिश लावून, चंद्रस मारून चकाकी आणली जाते. त्यानंतर तारा लावतात. तंबो:याला चार, पाच किंवा सहा तारा असतात. अमीर खाँसाहेब सहा तारांचा तंबोरा वापरत. सतारीला प्रामुख्यानं सहा ते सात तारा असतात. सतारीचे शैलीनुसार चार-पाच प्रकार पडतात. मात्र उस्ताद विलायत खाँ (सहा तारा) आणि पंडित रविशंकर (सात तारा) या दोन शैली अधिक प्रचलित आहेत. तरफाच्या खुंटय़ा आणि तारा मागणीनुसार लावल्या जातात. त्यानंतर आड आणि ब्रीज (ज्यावरून तारा ओढल्या जातात) बसवतात. आड आणि ब्रीज जनावरांच्या हाडापासून बनवले जातात. तंबो:याच्या तारा पूर्वी जर्मनीतून येत. आता त्या मुंबईतही मिळतात. त्या स्टीलच्या, पितळाच्या किंवा पंचधातूंच्या असतात. स्वरानुसार त्यांचे गेज असतात. मग जव्हारी काढल्यानंतर पडदे लावले जातात. जव्हारी काढणं म्हणजे तारांची कंपनं तपासणं. हे काम अत्यंत कौशल्याचं. अस्सल कानसेनांनाच ते जमतं. सरतेशेवटी स्वर लावून त्या वाद्याचं प्रमाणिकरण होतं! आजकाल लहान भोपळ्याच्या आणि हलक्या लाकडाच्या सतारी वापरल्या जातात. प्रवासात हाताळण्यास त्या सोयीस्कर असतात म्हणून! 
 
(लेखक लोकमतच्या सांगली आवृत्तीचे प्रमुख आहेत.)
 
shrinivas.nage@lokmat.com
 

Web Title: 'Big house'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.