बायडेन्स.. ते आणि हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 06:01 AM2020-11-15T06:01:00+5:302020-11-15T06:05:02+5:30

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जो बायडेन यांनी जिंकताच त्यांचे नागपूर येथील नातेवाईकही प्रकाशात आले आहेत.

Bidens .. that and this! - History of Jo Biden's family | बायडेन्स.. ते आणि हे!

बायडेन्स.. ते आणि हे!

Next
ठळक मुद्देनवनिर्वाचित राष्ष्ट्रपती जो बायडेन यांचे दूरचे नातेवाईक नागपूरमध्ये राहातात. स्वत: बायडेन यांनी २०१३ साली भारताच्या पहिल्या दाैऱ्यात, आपले नातेवाईक मुंबईमध्ये राहातात, असे सांगितले होते.

संयमी नागपूरकर बायडेन्स

- श्रीमंत माने

मन्नारगुडी हे तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातले तालुक्याचे ठिकाण. नागपूरपासून ते तब्बल १४५५ किलोमीटर अंतरावर आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरून रामेश्वरमकडे जाताना ते लागते. आता तंजावर म्हटले की मराठी माणूस रोमांचित होणारच. व्यंकोजी भोसल्यांचे तिथले राज्य आठवणारच; पण आजच्या कथानकाशी त्या संस्थानाचा अजिबात संबंध नाही. मुन्नारगुडी हे अमेरिकेच्या होऊ घातलेल्या पहिल्या महिला, पहिल्या आशियाई उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे मूळ गाव. केंद्र सरकारच्या सचिव श्रेणीत कार्यरत असताना झांबियात मोठे काम केलेले पी. व्ही. गोपालन हे कमला हॅरिस यांचे आजोबा, म्हणजे आई श्यामला यांचे वडील. त्यांचे हे मूळ गाव. भारतीय कन्या अशा रीतीने अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनल्यामुळे सगळ्यांच्या अंगावर मूठभर मांस चढल्यासारखे वाटले. तेवढ्यात बातमी आली, की नवनिर्वाचित राष्ष्ट्रपती जो बायडेन यांचे दूरचे नातेवाईक नागपूरमध्ये राहातात. स्वत: बायडेन यांनी २०१३ साली भारताच्या पहिल्या दाैऱ्यात, आपले नातेवाईक मुंबईमध्ये राहातात, असे सांगितले होते. त्यानंतर दोन वर्षांनी तेच ते वाॅशिंग्टनमध्येही बोलले. त्याला संदर्भ होता, ते अमेरिकन सिनेटर बनल्यानंतर एप्रिल १९८१ मध्ये नागपूरवरून लेस्ली बायडेन यांनी त्यांना पाठविलेल्या पत्राचा व त्या पत्राला जो बायडेन यांनी दिलेल्या उत्तराचा. लेस्ली बायडेन यांचे त्यानंतर दोनच वर्षांत निधन झाले व त्यांच्या पत्नी जेनेव्हीव यांना तो संवाद पुढे नेता आला नाही, हा भाग अलहिदा. आता मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांच्याकडे सत्ता सोपविण्यात चालवलेली चालढकल संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरला असतानाच चार दशकांपूर्वीच्या पत्रापत्रीचा धागा पकडून माध्यमांनी नागपूर, मुंबईतल्या बायडेनना प्रकाशात आणले. परंतु, हे बायडेन्स मर्यादाशील आहेत. ‘आम्ही जो बायडेन यांचे नातेवाईक आहोतच, असा आमचा अजिबात दावा नाही. निवडणुकीत जो यांची सरशी होताच त्या पत्राची व पाच-सात वर्षांपूर्वीच्या त्यांच्या वक्तव्याची आठवण झाली इतकेच’, अशी अत्यंत संयमी भूमिका नागपूरकर बायडेन्सनी घेतली आहे.

तरीही चर्चा होणारच. कारण, अमेरिकेचे अध्यक्ष हे जगाचे बाॅस असतात. त्यांच्या आयुष्याशी जुळणारा एखादा साधा धागाही लोकांच्या नजरेत काैतुकाचा विषय असतो. ट्रम्प टाॅवर्सच्या निमित्ताने मुंबई, पुण्याच्या मंडळींना गेली चार वर्षे अमेरिका चार बोटे उरलीच होती ना! तेव्हा नागपूरकर बायडेन आहेत तरी काेण?

या कुटुंबातील सोनिया बायडेन-फ्रान्सीस व इयान बायडेन या बहीण-भावाने दिलेली माहिती, या कुटुंबाने अत्यंत परिश्रमाने तयार जपलेला जवळपास अडीचशे वर्षांचा वंशवृक्ष रंजक आहे खरा. सोनिया यांच्यासह सख्खी-चुलत-मावस वगैरे मिळून चाैदा भावंडे ही या वंशवेलीची नववी पिढी. जाॅन बायडेन व ॲन ब्यूमाँट हे पती-पत्नी या भारतीय बायडेन परिवाराचा पाया. त्यांचा विवाह १७८१ चा. जाॅन इस्ट इंडिया कंपनीत नोकरीला होते. या दांपत्याला फॅनी, लाॅरा, रिचर्ड, हेन्री, ख्रिस्तोफर, ॲनी अशी सहा अपत्ये. ख्रिस्तोफर यांचा जन्म १७८९ चा. त्याचा मुलगा जाॅन, जाॅन ख्रिस्तोफर यांना कर्नल होराशिओ हे अपत्य. त्यांचा मुलगा सॅम्युअल. या सॅम्युअल बायडेन यांचे सुपुत्र चार्लस् हे लेस्ली बायडेन यांचे वडील, तर एडीथ मारी बायडेन या आई. त्या नागपूरच्या मेयो रुग्णालयात मेट्रन होत्या. जवळच्याच मोहननगरमध्ये आताही हा परिवार राहातो. तिथे अनेक अँग्लो इंडियन कुटुंबे आहेत. इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले आर्थर हे लेस्ली यांचे बंधू. थोडक्यात लेस्ली बायडेन यांच्या खापरपणजोबांच्या आधीच्या तीन पिढ्यांपर्यंत हा इतिहास जातो. लेस्ली बायडेन नागपूरमध्ये भारत लाॅज व पॅलेस कॅफे चालवायचे. जो बायडेन यांना लिहिलेले पत्र त्यांनी मुलीकडे मुंबईला गेल्यानंतर पोस्टात टाकल्याने आपले दूरचे नातेवाईक मुंबईत राहातात, असे जो यांना वाटले असणार. अर्थात, आताही हा विस्तारित परिवार नागपूरबरोबरच मुंबई, चेन्नई, हैदराबाद व पुण्यातही राहात असल्याने मुंबई की नागपूर हे महत्त्वाचे नाहीच. त्याशिवाय इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियातही बायडेन कुटुंबाच्या शाखा विस्तारल्या आहेतच.

अमेरिकन बायडेनना १७० वर्षांचा इतिहास

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांच्या वंशावळीचे संदर्भ मात्र अठराव्या शतकापर्यंत जात नाहीत. भारतातल्या बायडेन्सनंतर जो यांचे पूर्वज जवळपास सत्तर वर्षांनंतर आयर्लंडमधून बाहेर पडले. उपराष्ट्रपती असताना जून २०१६ मध्ये ते एका मुलाखतीत सांगतात, बायडेन हे मूळचे उत्तर आयर्लंडचे. कॅथाॉलिक. आडनावाने ब्लेविट. बायडेन आडनाव आयरिश नाही, इंग्लिश आहे. ते आडनाव त्यांना पणजीमुळे मिळाले. जो यांचे खापरपणजोबा एडवर्ड ब्लेविट आयर्लंडमधील मेयो काउंटीतल्या बलिना येथील रहिवासी. व्यवसायाने सर्व्हेअर. तब्बल दहा लाखांहून अधिक लोकांचा बळी घेणारा आयर्लंडमधील १८४५ ते ४९ दरम्यानचा भीषण दुष्काळ इतिहासात ग्रेट फेमाइन म्हणून ओळखला जातो. त्यावेळी एडवर्ड ब्लेविट यांच्यावर दुष्काळी मदत केंद्रावर देखरेखीची जबाबदारी होती. जो यांचे खापरपणजोबा पॅट्रिक ब्लेविट व्यवसायाने नाविक होते. ते नंतर नातलगांसह अमेरिकेत स्थलांतरित झाले. त्याचदरम्यान आईकडून खापरपणजोबा ओवेन फिनेगन यांचेही आयर्लंडमधून अमेरिकेत स्थलांतर झाले. हे फिनेगन कुटुंब मूळचे लाउथ या आयरिश काउंटीचे. १८४९ मध्ये ते अमेरिकेत स्क्रँन्टाॅन गावात स्थिरावले. कदाचित या भाैगोलिक ऋणानुबंधामुळेच बलिना व स्क्रँन्टाॅन ही शहरे पुढे सिस्टर सिटीज बनली असावीत.

नातवाला आजोबाचे नाव देण्याची परंपरा जगातल्या अनेक देशांमध्येही आहे. त्यामुळेच जो यांच्या आजाेबांचेही नाव एडवर्ड होते. तीन पिढ्यांच्या रहिवासामुळे हा परिवार बऱ्यापैकी स्थिरावला होता. एडवर्ड ब्लेविट हे अमेरिकेतल्या पेनसिल्व्हेनियाचे पहिल्या आयरिश कॅथाॅलिक स्टेट सिनेटर्सपैकी एक. जो यांचे वडील जोसेफ सिनिअर व आई कॅथरिन फिनेगन यांचा विवाह १९४१ चा. त्यानंतर हा परिवार डेलावेअरमध्ये स्थिरावला. जो बायडेन समाजकारण व राजकारणातील एकेक पायरी चढत गेले आणि गेल्या आठवड्यात ते अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

(संदर्भ : ॲन्सेस्ट्री कार्पोरेट - जो बायडेन यांची मुलाखत, २७ जून २०१६)

(लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीत कार्यकारी संपादक आहेत.)

shrimant.mane@lokmat.com

(छायाचित्र सौजन्य : ॲन्सेस्ट्री कार्पोरेट Ancestry Corporate )

Web Title: Bidens .. that and this! - History of Jo Biden's family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.