Bhanu Athaiya- Invention of emotions even in costume! | भानू अथैया- वेशभुषेतही भावनांचा आविष्कार!

भानू अथैया- वेशभुषेतही भावनांचा आविष्कार!

ठळक मुद्देभानूबाई व्यक्तिचित्रण या विषयात अधिक रस घेत असत तसंच फुल फिगर ड्रॉइंग आणि रेखाटनातली शरीराच्या वैशिष्ट्यांसह दर्शन घडविणार्‍या वाक्वळणांचे रेखाटन त्या उत्तम पद्धतीने करीत असत.

- श्रीराम खाडीलकर

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सर्वोत्तम वेशभूषाकार म्हणून काम करत असताना स्वत:च्या मेहनतीवर ऑस्कर पुरस्कार मिळवलेल्या पहिल्या भारतीय तंत्रज्ञ म्हणून भानू अथैया यांना सर्वसामान्य भारतीय ओळखायला लागले ते रिचर्ड अँटनबरो यांच्या गांधी या चित्रपटाच्या निमित्ताने. खरं तर त्याच्याआधी जवळपास पंचवीसेक वर्ष त्या चित्रपटसृष्टीत कार्यरत होत्याच. भानू अथैया या वेशभूषाकार म्हणून ओळखल्या गेल्या असल्या तरी त्या मुळात चित्रकार होत्या हे लक्षात घेतलं पाहिजे. आणखी एक गोष्ट त्यांचं आडनाव अथैया हे लग्नानंतरचं आहे. त्यांचा जन्म कोल्हापूरला मराठमोळ्या राजोपाध्ये कुटुंबात झाला.
भानूबाईंचे वडील शाहू महाराजांचे मुख्य पुरोहित म्हणून जबाबदारी पार पाडत असले तरी ते उत्तम चित्रकार असल्याने गावातलं कलेचं वातावरण घरातही होतं. परिणामी आबालाल, पेंटर, वडनगेकर अशांच्या जोडीला घरातल्या कलाविषयक पुस्तकांमुळे रेम्बा, लिओनादरे, सार्जण्ट आणि कॉन्स्टेबलसारख्या कलावंतांचीही त्यांना शाळेत असतानाच माहिती होती. 
वडिलांकडून असे ज्ञान मिळत असताना आईचे भरतकामही दिसत होते. व्यक्तिचित्र आणि निसर्गचित्र भरतकामातही करता येते हे आईकडून शिकायला मिळाले. आठव्या वर्षी एलिमेंटरी परीक्षा दिलेल्या भानूबाईंनी मुंबई गाठून जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. त्यापूर्वीच पितृछत्र हरपूनही त्यांनी नेटाने शिक्षणावर लक्ष केंद्रित केले.
सर जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला. त्याचबरोबर मानवी शरीर, परिसर, प्रमाणबद्ध रेखाटन आणि चित्रण कसं करतात याचंही पद्धतशीर शास्रशुद्ध ज्ञान मिळत गेले. याचा परिणाम असा झाला की जी डी आर्ट या अखेरच्या वर्षाला त्या सुवर्णपदक मिळवून राज्यात पहिल्या आल्या. विख्यात चित्रकार म्हणून लौकिक मिळवलेले व्ही.एस. गायतोंडे तसंच प्रमिलाताई दंडवते हेसुद्धा त्यांच्याबरोबरच शिकत होते. भानूबाई व्यक्तिचित्रण या विषयात अधिक रस घेत असत तसंच फुल फिगर ड्रॉइंग आणि रेखाटनातली शरीराच्या वैशिष्ट्यांसह दर्शन घडविणार्‍या वाक्वळणांचे रेखाटन त्या उत्तम पद्धतीने करीत असत. रंगांविषयी त्यांचा भरपूर अभ्यास होता. मनातल्या भावना आणि रंगांचं नातं या संदर्भातली त्यांची वैचारिक बैठक आर्ट स्कूलमध्ये लघुचित्रण शैलीचा अभ्यास करताना पक्की झाली होती.
रेखाटनाच्या बळावर त्यांना स्कूलमधून बाहेर पडताना लगेच यूज विकलीमध्ये फॅशन डिझाइनची स्केचेस करण्याचं काम मिळालं. त्यांनी डिझाइन केलेले कॉस्च्युम बुटिकमध्ये दिसले आणि चित्रपटसृष्टीत नाव असलेल्या नर्गिस आणि कामिनी कौशलसारख्या अनेक जणींनी भानूबाईंच्या कॉश्चुम्स डिझायनिंगला आपली पसंती दिली. पाहता-पाहता भानू अथैया हे नाव हिंदी चित्रपट सृष्टीतल्या निर्माते-दिग्दर्शक यांच्यापर्यत जाऊन पोहोचलं. गुरुदत्त, देवानंद, राज कपूरपासून अमोल पालेकर, आशुतोष गोवारीकर अशा अनेक नामवंत दिग्दर्शकांच्या चित्रपटांसाठी कॉश्चुम डिझायनर म्हणून भानूबाईंनी काम केले. 
लगान हा चित्रपट जर आपण नीट पाहिला तर त्यात पांढर्‍या रंगाची कमाल काय असते ते आपल्याला पाहायला मिळेल; पण त्यासाठी तशी दृष्टी असायला हवी. अशीच गोष्ट लेकिन या चित्रपटाबद्दलही सांगता येईल या चित्रपटामधलं जे वातावरण निर्माण केलं गेलं ते रंगसंगतीच्या माध्यमातून. या पद्धतीच्या कामात कल्पकता आणि चित्रपटाची गरज या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. 
गांधी हा चित्रपट करताना खादी हे माध्यम माध्यम महत्त्वाचं होतं पण त्याचबरोबर त्याचा पोत आणि त्या काळातली वस्रांची रचना यालाही महत्त्व होतं या गोष्टीही त्यांनी नेमक्या दिसतील याची काळजी घेतली आणि त्यांच्या मेहनतीचं चीज होऊन ऑस्कर पुरस्काराने त्या सन्मानित केल्या गेल्या. 
आलेल्या संधीचे सोनं करताना आपण आपलं सर्वोत्तम कसं देऊ शकतो हा विचार त्या सतत करत असत. त्यांचा हाच ध्यास त्यांना यशाच्या शिखराकडे घेऊन जाणारा ठरला. 
वस्राचा वेगवेगळा पोत पाहिल्यावर त्या पोताचे आणि चित्रपटातल्या व्यक्तिरेखेचे नाते जोडता येऊ शकते का असा जगावेगळा विचारही भानूबाई करू शकत असत त्यामुळेच साधे दिसूनही परिणामकारक वाटणारे, इतरांहून वेगळेपण असलेले कॉश्च्युम त्यांच्या विशिष्ट रंगांसकट आपल्याला भुरळ घालत आलेत. वस्रांच्या अत्यंत साधेपणातूनही अपेक्षित परिणाम एकीकडे साधताना दुसरीकडे त्या अनेक नामवंत अभिनेत्रींचे ग्लॅमरस डिझाइन करतच होत्या. साठ आणि सत्तरच्या दशकातले अनेक चित्रपट आपल्याला लक्ष वेधून घेणारे वाटतात. त्यातल्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांची सुंदर दिसण्यासाठी जी चढाओढ आहे असं आपल्याला वाटतं ते सगळं र्शेय भानू अथैया यांसारख्या कॉस्च्युम डिझायनरलाच द्यावं लागेल.
भानू अथैया यांचे वडील शाहू महाराजांच्या कडे मुख्य पुरोहित म्हणून जरी कार्यरत असले तरी ते एक चित्रकारसुद्धा होते तसेच एक चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकसुद्धा होते. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात बालकलाकार म्हणून आपली मुलगी भानुमती हिला एक व्यक्तिरेखाही करायला लावली होती. वडिलांकडून चित्रपटाचे आणि चित्रकलेचे नकळत बाळकडू आणि रितसर शिक्षणही काही प्रमाणात त्यांना मिळत गेले. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रय} तर त्यांनी केलाच; पण त्यात अपूर्व यश मिळवलं. या क्षेत्रातल्या सगळ्यांचे डोळे दीपतील असं त्यांचं काम यापुढेही त्यांनी केलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून आपल्याला दिसत राहील.

shriramsaheb@gmail.com
(लेखक दृष्यकलेचे अभ्यासक व ज्येष्ठ कला समीक्षक आहेत.

(भानू अथैया कलाशिक्षण घेत असतानाच्या काळातील जग निवास पॅलेस, उदयपूर येथे 1950 साली केलेले रेखाटन. सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या दुर्मीळ कलाकृतींच्या जतन केलेल्या संग्रहातून.)

Web Title: Bhanu Athaiya- Invention of emotions even in costume!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.