मोडलेल्या जीवनाने पुन्हा तजेला धरावा, म्हणून...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 06:03 AM2021-04-25T06:03:00+5:302021-04-25T06:05:10+5:30

‘सगळ्याच जीवमात्राबरोबर मी मैत्र मानतो, माझे कुणाशीही वैर नाही. ज्यांच्या बरोबर हिंसेचा व्यवहार झाला असेल तर मी क्षमा मागतो...’ असे आर्जव करणारे भगवान महावीर आजच्या भयभीत जगाचा खरा आधार आहेत!

Bhagwan Mahavira is the true backing of today's fearful world! | मोडलेल्या जीवनाने पुन्हा तजेला धरावा, म्हणून...

मोडलेल्या जीवनाने पुन्हा तजेला धरावा, म्हणून...

Next
ठळक मुद्देअनेक ठिकाणची माणसांची, व्यवस्थांची निष्क्रीयता, नफेखोरी, अमानवीयता आपल्याला महावीरांच्या शिकवणुकीबद्दल मूलभूत विचार करण्याबद्दल भाग पाडते आहे.

- गिरीश्वर मिश्र

(महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे (वर्धा) माजी कुलगुरू)

‘जीन’चा अनुयायी तो जैन. रागद्वेषापासून मुक्त असणारा. जैन साधू हे निर्ग्रंथ असतात, म्हणजे झोळीत काहीही न बाळगणारे. ते श्रमण ज्ञानपरंपरेचे पाईक असतात. संसाराच्या अव्याहत चालणार्‍या उत्थान नि पतनाच्या चक्रात निवृत्ती आणि मोक्ष या दोहोंवर एकाग्र होत ‘कर्म’ हाच इश्‍वर मानण्याची रीत असते श्रमण ज्ञान परंपरेत. जन्म व मृत्यूच्या चक्रातून मुक्ती देणारा मार्ग म्हणजे ‘तीर्थ’ आणि हा मार्ग जो प्रशस्त करतो तो ‘तीर्थंकर’. वर्तमान जैन परंपरेतले ऋषभ देव हे पहिले तीर्थंकर मानले जातात. या मालिकेतले तेवीसावे तीर्थंकर पार्श्‍वनाथ होते आणि शेवटचे वर्धमान महावीर. इ.स.पूर्व सहाव्या शतकात आजच्या बिहारमधील पटणाजवळ असणार्‍या कुंडलपूर या गावी तत्कालीन राणी त्रिशलादेवी व राजा सिद्धार्थ यांच्या इश्‍वाकू राजकुळात बाल महावीरांचा जन्म झाला. आपल्या आजूबाजूला असणार्‍या आचारविचारांचा नेमस्तपणा पाहून महावीर अस्वस्थ होते. म्हणूनच वयाच्या केवळ तिशीत ज्ञानाच्या शोधार्थ त्यांनी घरादाराचा त्याग केला. अनुश्रुतिने नोंदल्यानुसार सर्वसंगपरित्याग केल्यापासून जवळपास एक दशक महावीर मौन धारण करून शांती, शुचिता आणि आत्मबोधाच्या साधनेत मग्न राहिले. ‘केवल’ज्ञान प्राप्त केल्यावर चाळीस वर्ष त्याच्या प्रचारप्रसारात आणि लोककल्याणाकरिता त्यांनी आयुष्य व्यतीत केले. पावा नगरीत असताना दिवाळीच्या दिवशी, वयाच्या बहात्तराव्या वर्षी त्यांना निर्वाण प्राप्त झाले. तेव्हापासून त्यांना ‘सिद्ध’ मानले जाऊ लागले. त्यांनी पाहिलेले सर्वोदयाचं स्वप्न साकार करण्यासाठी आजही असंख्य साधू, साध्वी, श्रावक, श्राविका स्वत:ला कटिबद्ध मानतात. काळानुसार जैन चिंतन अधिक गहिरे होत गेले. आज जैन परंपरेत श्‍वेतांबर व दिगंबर (वस्त्रहीन जीवन स्वीकारणारे) सारख्या अनुयायांच्या योगदानामुळे ‘जैन दर्शना’तील ज्ञान मिमांसा व तत्त्व मिमांसा यावर गंभीर चर्चा घडते. त्यांच्या व्याख्यांवर विचार होतो.

महावीरांना सन्मती व काश्यप या नावांनीही ओळखले जाई. हजार वर्षांपूर्वी त्यांनी दिलेले उपदेश आज नव्याने जतन करून ठेवता आलेल्या ग्रंथांमध्ये स्पष्टपणे सापडतात. वैदिक यज्ञात पशूबळी देण्याच्या प्रथेने भगवान महावीरांना दु:ख व्हायचे. त्यांनी जैन धर्मातील परंपरांचे पुनरूज्जीवन केले, त्यात सुधारणा केल्या आणि तो सर्वोत्तम व मंगल व्हावा यासाठी आयुष्य वेचले. अहिंसा, तप आणि संयम म्हणजे धर्म हा विचार त्यांनी नव्याने मांडला. सत्य, अस्तेय, अहिंसा, अपरिग्रह व ब्रह्मचर्य या व्रतांचे पालन करणे म्हणजे धर्माचरण करणे असे सांगून त्यांनी धर्माचे आचरण करण्याचे आवाहन केले. ते उपदेश करताना वारंवार सांगायचे, धर्माचे पालन करणे म्हणजेच खर्‍या अर्थाने जगणे, ते करण्यासाठी विशिष्ट मुहूर्ताची वाट बघण्याची गरज नाही. कुठल्याही प्रकारच्या हिंसेला ते धिक्कारणीय मानायचे व तिचा त्याग करण्याविषयी सांगत राहायचे. त्यांच्या मते प्रत्यक्ष हिंसा करणारा, करवून घेणाराच नव्हे तर हिंसेचा दर्शक व समर्थकही समाजातील वैरभाव वाढवण्याचे काम करत असतो. अहिंसा सिद्धांत म्हणजेच जीवनाचं यथार्थ ज्ञान असंही ते सूचित करतात. कुठल्याही जीवाबद्दल हिंसा घडू नये, अहिंसा हाच शाश्‍वत धर्म आहे. ‘सगळ्याच जीवमात्राबरोबर मी मैत्र मानतो, माझे कुणाशीही वैर नाही. ज्यांच्या बरोबर हिंसेचा व्यवहार झाला असेल तर मी क्षमा मागतो...’ असे महावीर आर्जव करतात. मित्ती मे सब्बभूएसु वेरं मज्झं न केणइ...

व्यक्तिगत स्वार्थ, क्रोध, भय अशा कारणांचा हवाला देऊन असत्य बोलणे अगर बोलायला भाग पाडणे याचाही महावीर निषेध करतात. ते म्हणतात, अनावधानाने असत्य बोलले गेले तरी मनुष्य पापाचा धनी होतो. ज्यांना स्वत:चे हित साधायचे असेल त्यांनी क्रोध, अहंकार, माया आणि लोभाचा त्याग करणे गरजेचे आहे. असा त्याग महावीरांनी केला म्हणून तर त्यांना अरिहंत म्हटले जाते. जीवन ही अत्यंत जटिल गोष्ट आहे, महावीर याचा उल्लेख ‘असंस्कृत’ म्हणजेच रानटी या शब्दात करतात. जीवन एकदा नासले की पुन्हा उभारी घेत नाही. मोडले की तजेला धरत नाही. म्हणूनच दुसर्‍याला इजा पोहोचवणे, त्यांचा अपराध करणे, असंयम बाळगणे वगळायला हवे. रूपाबद्दल आवेगहीन झालो, उदासीन झालो तरच शोकमुक्ती साधते. अशानेच सांसारिक व्यापतापात असून सुद्धा माणसे कमळाच्या पानाप्रमाणे स्वत:ला अलिप्त ठेवू शकतात. पुढे महावीर सांगतात, क्रोधामुळे प्रेम, अहंकारामुळे विनय आणि कपटामुळे मैत्री नष्ट होते. हे सद्गुण जपायचे असतील तर काय करावे याचा उपायही ते सांगतात. क्रोधाला शांततेने, अहंकाराला विनयीभावाने आणि लोभाला असीम शांततेने जिंकता येते. मात्र मानवी प्रवृत्ती तितकी सुलभ नाही. लोभाने लोभ वाढत राहातो, कारण तृष्णेला अंत नाही. तृष्णा आकाशासारखी असीम असते आणि तिला जिंकायचे असले तरी मानवी आयुष्याची मर्यादा, या आयुष्यातले अडथळे अनंत.

जीवनाचे जटिल कोडे सोडवायचे तर भूतकाळातील कर्मांवरील धूळ झाडून, त्याचे परिक्षण करून वर्तमान व भविष्यात एकही चूक घडू नये यासाठी दक्ष राहावे लागेल. कर्म आपला पाठलाग सोडत नाही, मग ते चांगले असो की वाईट. आपल्या पदरी आलेल्या सुखदु:खाचे कारण ठरणारा आणि ते भोगणारा आत्माच असतो अखेर. सरळमार्गी चालत राहिलो तर मित्र नि वाट वाकडी केली तर शत्रू! संयमयुक्त आचरण मनुष्याला श्रेष्ठ बनवते. सद्गुरू व वृद्धजनांची सेवा, मूर्खांपासून अंतर राखणे, एकाग्रपणे अभ्यास करणे, धैर्याने शांततेचा मार्ग अनुसरणे यातून जगण्याचा अनुभव उन्नत होतो. स्वत:वर विजय हाच अंतिमत: सर्वोच्च विजय असतो. संयमी पुरूष हिंसा, खोटेपणा, चोरी, लोभ, व्यभिचार यापासून स्वत:चा बचाव करतो. हाच श्रमण मार्ग. समतेचा विचार मनी रूजवण्याने, ब्राह्मणाने ब्रह्मचर्य व्रत धारण केल्याने, मुनींना ज्ञान मिळत राहाण्याने व तपस्वींनी तप करण्याने श्रमण मार्ग टिकतो. स्वत:वर विजय मिळवण्याबाबतीत महावीर असाही सूक्ष्म विचार सांगतात, स्वत:च्या दृष्टीकोनाची प्रशंसा व दुसर्‍याची निंदा करणारे असत्याच्या नागपाशात जखडले जातात. एकान्तग्राही तत्त्वांची पाठराखण करणारे धर्म आणि अधर्माबद्दल अनभिज्ञ असतात. त्यातून विविध शक्यतांना गृहित धरणारे ‘स्याद्वादा’चे तत्त्व मांडण्यात आले. याचाच एक अभिन्न भाग म्हणजे भंगी न्याय. या न्यायाचा खूप बोलबाला झाला. ‘आहे, नाही’ आणि त्याच्या विविध संगती लावून विचारांकडे बघण्याची दिशा देणारा हा न्याय.

ज्ञानाने संपन्न, संयमाने ओतप्रोत आणि तपस्वीवृत्ती असणार्‍यालाच साधू बनता येते. शरीर कष्टवण्यातून नव्हे तर बुद्धीला कष्टवण्यातून, तिचे जागरण करण्यातून मनाला खरा उल्हास मिळतो. त्यामुळेच सतत उचित वागण्याचा आग्रह हवा. भगवान महावीरांनी ‘त्रयोदशांग धर्म’ जगाला सांगितला. अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, सम्यक गती, सम्यक भाषा, सम्यक आहार, सम्यक प्रयोग, सम्यक उत्सर्ग, मन गुप्ती, वचन गुप्ती, काय गुप्ती याबद्दलची व्यवस्था या धर्मातून त्यांनी सांगितली.

सतत परिवर्तनशील असणार्‍या संसाराकरिता, जगाकरिता कुठलीही अतिंद्रिय अथवा इंद्रियापलीकडची सत्ता नाकारून स्वत: स्वत:ची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन करत भगवान महावीरांनी धर्माबद्दल एक व्यापक दृष्टी मानवाला देऊ केली. आजच्या हिंसा, संघर्ष, कलह, अविश्‍वास, असत्य यांनी व्यापून असलेल्या खळबळत्या वर्तमानाला पाहता ही दृष्टी स्वीकारणे अधिकच महत्त्वाचे झाले आहे. कोविडसारख्या महामारीच्या काळात माणसांच्या जगण्याचा प्रश्‍न आव्हान बनून धडका देतो आहे. या पार्श्‍वभूमीवर अनेक ठिकाणची माणसांची, व्यवस्थांची निष्क्रीयता, नफेखोरी, अमानवीयता आपल्याला महावीरांच्या शिकवणुकीबद्दल मूलभूत विचार करण्याबद्दल भाग पाडते आहे. सम्यक आचरणाचे आवाहन करते आहे. आपण मात्र लोभाच्या नि स्वार्थाच्या साखळदंडात आणखी आणखी चुकत चाललो आहोत. जीवनाच्या बाजूने उभे राहायचे असेल तर भगवान महावीरांच्या उपदेशाला नि नैतिक आचरणाच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याशिवाय भागणार नाही. 

Web Title: Bhagwan Mahavira is the true backing of today's fearful world!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.