-मुक्ता चैतन्य
ती अवघी बारा वर्षांची होती. सगळेच पालक देतात तसा तिच्याही आईबाबांनी तिला स्मार्ट फोन घेऊन दिला होता. त्यावर तिची सोशल मीडिया खाती होती. व्हॉट्सअँप ग्रुप्स होते. शाळेतल्या, क्लासेसच्या मित्रमैत्रिणींशी गप्पा चालू होत्या. वरवर दिसायला सगळं नॉर्मल चालू होतं आणि अचानक एक दिवस त्या बारा वर्षांच्या मुलीने आत्महत्या केली. - ही अर्जेंटिनामधली घटना !
वयाच्या बाराव्या वर्षी या मुलीच्या मनात आत्महत्येचा विचार का मनात आला असेल असा सगळ्यांनाच प्रश्न पडला. आत्महत्येबद्दल काय कळतं या वयात? आणि इतका कसला त्रास असतो की आयुष्य संपवून टाकावंसं वाटावं?सगळ्यांनाच एक ना हजार प्रश्न पडले होते. पोलीस तपासात तिचा मोबाइल अर्थातच चेक झाला. त्यात काही व्हिडीओज होते. शिवाय व्हॉट्सअँपमध्ये विचित्न चेहर्याच्या बाईचा नंबर आणि काही मेसेजेस. ब्लू व्हेलपाठोपाठच्या अजून एक भयानक गेमचा सुगावा पोलिसांना लागला.
या गेमचं नाव आहे व्हॉट्सअँप मोमो चॅलेंज !
हा गेम लहान मुलं आणि तरुणांना टार्गेट करतो. आधीच्या ब्लू व्हेलप्रमाणे यातही काही चॅलेंजेस दिली जातात. सुरुवातीची चॅलेंजेस आकर्षक असतात. निरूपद्रवीही असतात. पण जसं जसं खेळ पुढे जातो, टार्गेट्स विकृत व्हायला सुरुवात होते. आणि शेवट आत्महत्येचा खेळ खेळून होतो.
व्हॉट्सअँपच्या माध्यमातून पसरणार्या या खेळाने सध्या मेक्सिको, अर्जेंटिना, अमेरिका, फ्रान्स आणि र्जमनी या देशांना टार्गेट केलेलं आहे. पण आभासी जगात गोष्टी पसरायला फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे आपणही सावधान असणं आवश्यक आहे. या मोबाइल नंबर्सचा शोध घेण्याचा प्रयत्न जेव्हा पोलिसांनी केला तेव्हा हे नंबर जपान आणि मेक्सिकोमधले आहेत, इतपतच माहिती त्यांना समजू शकली आहे, त्यापलीकडे या नंबर्सपर्यंत अजून पोलिसांना पोहचता आलेलं नाहीये.
आभासी जग जितकं माहिती पुरवत, नवीन ओळखी, संधी देतं. तितकंच ते धोकादायकही असतं. विशेषत: लहान मुलांसाठी. काल ब्लू व्हेलचा धोका होता, आज मोमोचा आहे, तर उद्या अजून कशाचा तरी असेल. हे संपणारं नाही. अशावेळी माध्यमं आणि गॅजेट्स सजगपणे हाताळण्याची, मुलांना हाताळायला शिकवण्याची, त्याविषयी त्यांच्याशी सातत्याने बोलण्याची नितांत आवश्यकता आहे. माझ्या आजवरच्या अभ्यासातून याबाबत पालक ब-यापैकी उदासीन आणि हलगर्जी असतात असं दिसून आलं आहे. पालकांनी स्वत:साठी घेतलेली गॅजेट्स, किंवा स्वतंत्नपणे मुलांसाठी घेतलेल्या गॅजेट्सबद्दल फारच कमीवेळा मुलांशी तपशिलाने बोललं जातं. यात पालकांचेही काही प्रकार दिसतात.
काही पालकांना आपण मुलांशी बोललं पाहिजे याची जाणीव असते; पण बोलायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे समजत नसल्याने ते बोलणं टाळतात. काही पालकांना मुलांशी बोलण्याआधी टेक्नॉलॉजीच्या वापराबाबत कडक नियमावली करायची असते. ती राबवण्याची घाई असते. यामुळे होतं काय, की मुलांपर्यंत धोके नीट पोहचत नाहीत आणि ‘आईबाबा नाही म्हणतायत ना मग आता मला हवा तसा वापर करणार’ या मोडवर मुलं जातात.
काही पालक सतत मुलांचे मोबाइल चोरून तपासत असतात. खरं तर पालकांनी मुलांचे मोबाइल चोरून तपासायची गरज नसते. जर मुलांना गॅजेट्स देतानाच त्यावर पालकांचं लक्ष असणार आहे याची जाणीव असेल तर पालकांना चोरून बघण्याची गरज उरत नाही. पालक चोरून बघतात हे काही मुलांपासून लपून राहत नाही. मग मुलांच्या मनात पालकांच्या विषयी अविश्वासाची भावना तयार व्हायला लागते.
काही पालकांना अशा कुठल्याच संवादाची गरज वाटत नाही. पैसे खर्च केले की आपली जबाबदारी संपते असा काहीसा त्यांचा पवित्ना असतो. म्हणजे ते तसं म्हणत नाहीत किंवा मान्य करत नाहीत; पण त्यांचे निर्णय आणि वर्तन याच गोष्टी अधोरेखित करत असतात.
- या सगळ्याची बळी होतात मुलं!अशा प्रकारच्या गेम्सना मुलं बळी का पडतात? हा पुढचा प्रश्न !या प्रश्नाला अनेक बाजू आहेत. ज्या पालकांशी असलेला संवाद, स्वओळख, पिअर प्रेशर अशा नानाविध गोष्टींशी संबंधित आहेत. अनेक घरातून जिथे मुलं मोठय़ा प्रमाणावर गेमिंग करत असतात, किंवा दिवसातला बराच वेळ गॅजेट्समध्ये अडकलेली असतात, अशा घरातून पालक मुलांशी फक्त अभ्यास, क्लासेस आणि स्पर्धेविषयी बोलत असतात असं अनेकदा दिसून येतं. मुलांशी अवांतर चर्चा, सहज गप्पा, आजूबाजूला घडणा-या घटनांबद्दल त्यांच्याशी बोलणं, त्यांची मत जाणून घेणं यातली कुठलीही गोष्ट होत नाही.
काही वर्षांपूर्वीपर्यंत मार्कांचं अवडंबर होतं, आता त्या बरोबर निरनिराळ्या स्पर्धा परीक्षांचंही आहे. शाळा आणि विविध क्लासेस, त्यांचा अभ्यास यातून मुलांची सुटकाच होत नाही. पालकांकडे तर वेळ नसतोच; पण मुलांकडेही वेळ नसतो. मग दिवसाचा जो काही वेळ उरलेला असतो तो ज्याला त्याला आपापला हवा असतो. पालकांना स्पेस हवी असते. मग पालकांचं बघून मुलंही स्पेसची मागणी करायला लागतात. आणि एकत्न वेळ घटत जातो.
खोलीच्या बंद दाराआड आपलं मूल आभासी जगात वावरतंय म्हणजे काय करतंय, त्याच्या फोनवर येणारे मेसेजेस कुणाचे आहेत, ते काय पद्धतीचं गेमिंग करतंय, त्यातल्या चॅटरूम्समध्ये काय बोलणं होतं या कशाचाही पालकांना अनेकदा पत्ता नसतो.
इतकं बेजबाबदारपणे वागून कसं चालेल?अनेकदा पालक अशीही तक्रार करतात की मुलं आमचं ऐकत नाहीत, आम्ही गेमिंगला नाही म्हटलं की ती चिडतात, ओरडाआरडा करतात, रडारड करतात. म्हणून मग आम्ही त्यांना खेळू देतो. त्यांना जे करायचं ते करू देतो.
- माझ्या मते ही सगळ्यात सोपी पळवाट असते.
पालकांना माहीत असतं की आपण मुलांना प्रचंड अडकवून टाकलेलं आहे. आपलं मूल यशस्वी आणि सक्षम व्हावं यासाठीच्या त्यांना माहीत असलेल्या गोष्टी करण्याची त्यांची धडपडही रास्त असते. मग या सगळ्याला उतारा म्हणून पालक गेमिंगकडे, मुलांच्या ऑनलाइन वावराकडे बघत असतात. आणि त्यातूनच काही प्रमाणात दुर्लक्ष करण्याची मानसिकता तयार होते.
पण ही पळवाट अतिशय धोकादायक असते. कारण त्या जगात कोण कुठून कसा कुणाच्या आयुष्यात शिरेल याचा पत्ताही लागू शकत नाही.
एरवी कोप-यावरच्या दुकानात, शाळेत आपण मुलांना एकट्याला जाऊ देत नाही. रस्ता क्रॉस करताना त्यांचा हात घट्ट धरून ठेवतो. मॉलमध्ये गर्दी असली आणि मुलांना पालकांनी हात धरणं नको असलं तरीही त्यांच्या मागे राहत, ते नजरेआड होणार नाहीत याची प्रचंड काळजी घेत असतो आणि ऑनलाइन जगाच्या प्रचंड कोलाहलात मात्न पालक मुलांचा हात सोडून देतात. सोडून द्यायला ते मुळात तो धरतच नाहीत. तिथल्या ब-यावाईट माणसांच्या प्रचंड गर्दीत आपली मुलं एकेकटी भटकत असतात. त्यांना जमेल तसं ते जग समजून घेत असतात. तिथे भेटणार्या ब-यावाईट माणसांच्या अनुभवांतून शिकत असतात.
- आपल्या हे लक्षातच येत नाही की जसं आपण त्यांना बोट धरून चालायला शिकवलं आहे तसंच ऑनलाइन जगातही बोट धरून न्यायला हवं. त्यांना बरंवाईट समजायला लागलं, त्याची जाण आली की मग हळूच बोट सोडून द्यायला हवं. ‘स्वओळखीची’ प्रक्रि या विविधांगी असते आणि त्यात सुरुवातीला तरी पालकांची नितांत आवश्यकता असते.‘फक्त पाच मिनिटं’ म्हणत तासंतास मुलं ऑनलाइन जगात रमायला लागली, तिथे जाण्यावरून, वावरण्यावरून भांडायला लागली, नवीन गेम्ससाठी, गॅजेट्ससाठी घरात चोर्या करायला लागली, स्वत:ला शारीरिक इजा पोहचवायला लागली, कुठल्यातरी अज्ञात माणसाने दिलेलं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आत्महत्येचा मार्ग स्वीकारायला लागली की आपलं धाबं दणाणतं..
- मग आपण मुलांचे हात धरायला जातो.
पण तोवर खूप उशीर झालेला असतो.
ऑनलाइन जगात सगळं वाईट नाही; पण दुष्परिणामांची शक्यता प्रचंड आहे.सध्यातरी ऑनलाइन जगावर कशाचा आणि कुणाचाही अंकुश नाही, अशावेळी सजग वावर आणि माध्यम साक्षरता हेच मार्ग आपल्याकडे हातात आहेत.
व्हॉट्सअँप मोमो चॅलेंजचा मेसेज तुम्हाला आला तर काय कराल?
1 चुकूनही हा मेसेज पाठवणारा नंबर सेव्ह करू नका.
2 नंबर ताबडतोब ब्लॉक करा.
3 समजा तुम्ही मेसेज वाचलेच तरीही दिलेलं टास्क पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका. तसा मोह होण्याची शक्यता असते कारण सुरुवातीचे टास्क सोपे आणि निरूपद्रवी असतात. पण हा मोह टाळा.
4 तुम्हाला खेळण्यासाठी उचकवण्याचा प्रयत्न झाला तरीही त्याकडे दुर्लक्ष करा आणि नंबर ब्लॉक करा.
5 ताबडतोब सायबर पोलिसांशी संपर्क साधा.
व्हॉट्सअँप मोमो चॅलेंज नेमके काय आहे?
1 हा गेम जगभर व्हॉट्सअँपच्या माध्यमातून पसरला आहे. यात व्हॉट्सअँपवर एका विचित्र दिसणा-या मुलीचा फोटो असलेला नंबर आणि मेसेजेस येतात.
2 या मेसेजेसमध्ये काही चॅलेंजेस दिलेली असतात. एक चॅलेंज पूर्ण केलं आणि त्याचा व्हिडीओ पाठवला की पुढचं चॅलेंज सांगितलं जातं. म्हणजे गेमची एक लेव्हल पूर्ण करून पुढच्या टप्प्यात जाणं.
3 सुरुवातीची चॅलेंजेस नॉर्मल असतात; पण एकदा का व्यक्ती खेळ खेळायला लागला की हे चॅलेंजेस विकृत आणि हिंसक होत जातात.
4 अमुक एक टास्क पूर्ण करा, असा मेसेज आला की हा खेळ खेळणारी व्यक्ती टास्क पूर्ण करण्याच्या मागे लागते. टास्क किंवा चॅलेंज पूर्ण केलं नाही तर जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. लहान मुलं आणि टीनेर्जस अनेकदा या धमक्यांना घाबरून टास्क पूर्ण करतात.
या गेमचा मेसेज पाठवणा-या नंबरवर जो डीपी आहे तो जपानी चित्रकार ‘मिदोरी हायाशी’ यांनी काढलेल्या स्त्रीचा आहे. पण त्यांचा या खेळाशी काहीही संबंध नसल्याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. त्या विचित्र चेह-याच्या बाईचा फोटो हीच या गेमच्या नंबर आणि मेसेजची खूण आहे.
मुलांकडे स्वतंत्र मोबाइल आणि व्हॉट्सअँप नंबर असल्यास.
1 मुलांना फोन देताना काही नियम लावा. उदा. त्यांच्या फोनला पासवर्ड असता कामा नये. तुम्ही त्यांचा फोन कधीही चेक करू करता. रात्नी 10 नंतर फोन बंद झाला पाहिजे.
2 या आणि अशा टास्क चॅलेंज गेम्स बद्दल मुलांशी तपशिलाने बोला. त्यांना विश्वासात घेऊन त्यातले धोके सांगा. नुसता मुलांच्या मोबाइल वापरावर वॉच ठेऊन प्रश्न सुटणार नाहीत.
3 तुमचं मूल जर सतत गॅजेट्सना चिकटून असेल तर गॅजेट्सच्या ऐवजी तितकंच इंटरेस्टिंग अजून काहीतरी त्यांना द्या. त्यांचं मन दुसरीकडे वळवा. शाळा, क्लास, अभ्यास आणि उरलेला वेळ गॅजेट्स आणि ऑनलाइन. हे रुटीन अजिबातच चांगलं नाही.
4 अनेकदा असं दिसून आलं आहे, ज्या मुलांना घरात पुरेसं अटेन्शन मिळत नाही, ज्यांचा पालकांशी संवाद नसतो, मुलांच्या आयुष्यात काय चालू आहे हे पालकांना आणि पालकांच्या आयुष्यात काय चालू आहे हे मुलांना माहित नसतं, अशी मुलं या विकृत गेम्सचे अनेकदा बळी ठरतात. त्यामुळे पैसा कमावणं, करिअर करणं याइतकंच मुलांसाठी वेळ देणं आवश्यक आहे.
5 मुलांच्या व्हॉट्सअँप बरोबरच सोशल मीडिया अकाउण्ट्सवरही नजर ठेवा. कारण या गेम्सचे मेसेजेस जरी व्हॉट्सअँपवरून सुरु झाले असले तरी ते इतरही समाज माध्यमांमधून मुलांपर्यंत पोचू शकतात. आज व्हॉट्स अँपचा वापर गेमकर्ते करत आहेत, उद्या फेसबुक मेसेंजरचाही होऊ शकतो. सो जागते राहा
(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत)
muktaachaitanya@gmail.com