व्यवहार, प्रकृती आणि महंत
By Admin | Updated: September 19, 2015 14:59 IST2015-09-19T14:59:31+5:302015-09-19T14:59:31+5:30
कुंभात राजरोस होणा:या आणि साधुसमाजात शिष्टसंमत असलेल्या ‘महंताई’ची प्रक्रिया नक्की असते कशी?

व्यवहार, प्रकृती आणि महंत
>पर्वणी-अकरा बारा वर्षानंतर : अध्यात्म आणि आसक्तीच्या जगातली भ्रमंती
मेघना ढोके
व्यवहार तो मिल गया, लेकीन इतनी प्रतीक्षा.? अब हम क्या सिर्फ व्यवहार के लिए महंताईमें पहुंचे.
हम बहौत व्यस्त है, बहौत प्रकृती लगी रहती है यहॉँ दर्शन के लिए, टेम नहीं है. मै भेज दुंगा किसी को, आप बस ‘व्यवहार’ तुरंत भेज दे.’
-ताडताड बोलत होते ते बाबाजी! संतापलेच होते, पण होता होईतो सौजन्यात समोरच्याचा अपमान करत, आपली मोठायकीही सांगत होते.
विषय काय होता तर आदल्याच दिवशी साधुग्रामात कुणाच्या तरी महंताईचा कार्यक्रम पार पडला. जो ‘महंत’ बनतो तो ‘महंताई’ मिळाल्याच्या पोटी काही रक्कम आखाडय़ांच्या पंचायतीकडे जमा करतो. सध्या जो भाव फुटलाय त्यानुसार कमीत कमी 3क् ते जास्तीत जास्त 7क् लाखार्पयत रक्कम जो महंत बनतो त्याला ‘पंचायती’ला द्यावी लागते. मग ती रक्कम पंचायतीच्या तिन्ही आखाडय़ांमधे (नाशकात वैष्णव पंथीयांचे तीन आखाडे आहेत, निर्मोही, दिगंबर, निर्वाणी) वाटली जाते. मग ते तिन्ही आखाडे आपापल्या खालसांमधे ती रक्कम वाटतात.
आपापला ‘वाटा’ सगळ्यांना मिळतो. काहींना एकसमान मिळतो, काहींना थोडा जास्त मिळतो, असं म्हणतात. तर तो जो काही ‘वाटा’ असतो त्याला साधूंच्या परिभाषेत म्हणतात, ‘व्यवहार’!
या बडय़ा बाबाजींनी आपल्या कुणातरी चेल्याला आखाडय़ात दोनदा ‘व्यवहार’ आणायला पाठवलं. पण तिथले महंत भेटले नाहीत, ‘नंतर या’ म्हणाले असं काहीतरी झालं. म्हणून हे बाबाजी संतापले. ‘व्यवहार’ म्हणजे आपला हक्काचा पैसा. त्यासाठी अशा चकरा मारणं काही बाबाजींना मान्य नव्हतं. (त्या मागे भावनाही अशी की, कधीकाळी महंत होताना आपणही दिलेत की पैसे, मग आता ते पैसे परत येण्याचे दिवस सुरू झाल्यावर असं हात पसरत माणूस पाठवायचा? -घोर अपमान!)
त्यात हे बाबाजी स्वत:ला सा:या महंताई ‘झमेल्यापासून’ स्वत:ला अलिप्तही ठेवू पाहत होते. कुणाच्याच ‘चादर’ सोहळ्याला अर्थात महंताई कार्यक्रमाला ते जात नसत. दिवसभर आपल्या दर्शनाला आपल्या खालसात लोक (तेच ते प्रकृती!) येतात, खूप गर्दी असते असा मोठेपणा सांगतात.
प्रत्यक्षात पाचदहा लोकं डोकं टेकायला येतात, बाकी बाबाजी निवांत बसलेले असतात. पण महंताईला जात नाहीत, कारण काय तर जो महंत झाला त्याच्या कार्यक्रमाला गेलं तर त्याला आपला पाठिंबा आहे असं होतं, म्हणजे मग त्याचे विरोधक साधू नाराज होतात. ते आपल्या विरोधात जातात. त्यापेक्षा नकोच तो वाईटपणा. गेलं नाही तर सांगता येतं, प्रकृती बहौत थी दर्शन को! एका दगडात दोनतीन पक्षी मारले जातात, खालसाबसल्या ‘व्यवहार’ येतो तो वेगळाच!
नाशिकच्या साधुग्रामात महंताईची धूम सुरू असताना असे ‘अलिप्त’ बाबाजी बरेच भेटतात. त्यांच्याभोवती कोंडाळं करून बसलेले अन्य साधू काय बोलतात हे फक्त आपण कान देऊन ऐकायचं. चेह:यावर मात्र भाव असे ठेवायचे की, चाललंय काय ते आपल्याला अजिबात कळत नाही. असे भाबडे भाव चेह:यावर ठेवून एका बाजूला चुपचाप बसून राहिलं म्हणजे मग ‘महंत’ होण्यासाठी काय ‘लॉबिंग’ करावं लागतं आणि कसं ‘राजकारण’ चालतं याचं उत्तम प्रात्यक्षिक साधुग्रामात पहायला मिळतं. सध्या सगळे आखाडे, खालसे मिळून 8क् महंतांच्या जागा रिक्त आहेत. त्यापैकी 25च्या आसपास जागा आतार्पयत भरल्या गेल्या. त्या भरल्या जात असताना साधुग्रामात
तुफान लॉबिंग, कंपूबाजीचं राजकारण उघड दिसत होतं. तसंही ‘महंत’ व्हायचं म्हणजे काही सोपं काम नसतं. साधूंच्या जगातल्या पंचायती अर्थात त्यांच्या ‘लोकशाही’ पद्धतीप्रमाणंच ते काम चालतं ! आता लोकशाही म्हटलं की, बहुमत पाठीशी हवं, पाठीराखे हवेत, ते टिकवायचे तर हाताशी पैसा हवा आणि सत्ता मिळवायची तरी पुरेसं धनबळ हवंच! म्हणजे महंत व्हायचं तर पहिली आणि मुख्य अट हीच की, तुमच्याकडे पैसा हवा!
आपल्या देशातली लोकशाही ‘जशी’ चालते, तशीच साधू समाजातलीही ‘लोकशाही’ काम करते.
ज्यांना ‘महंत’ व्हायचं, त्यांची निवड एक तर त्या त्या संप्रदायांचे महंत करतात. किंवा मग निवेदन द्यावं लागतं की, मी अमुकतमुक सेवा करतो, अमुकइतकं गोधन, अन्यधन, शिष्यपरिवार आहे तर मला महंताई मिळावी. सोप्यात सोपं काम म्हणजे कुणा महंतानं मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेलं असणं की, माङया पश्चात ‘अमुक’ला महंत करावं. रिक्त झालेल्या जागेवर त्या ‘अमुक’ची भरती मग बरीच विनासायास होते. अर्थात एकाचवेळी दोन तीन शिष्य साधूनं आपल्याच नावे कागद लिहिलेला आहे असा पुरावा घेऊन दावा ठोकतात अशा चर्चाही कानावर येतातच.
त्यामुळे एकूणच हे महंत होणं सोपं काम नसतं. एकतर महंत होणं म्हणजे मोठं खर्चिक काम. त्यातल्या त्यात कुंभात महंताईचा कार्यक्रम थोडा स्वस्तात होतो. कारण सगळे साधू जमलेले असतात. सगळ्यांना ‘पंगत’ दिली की काम होते. नाहीतर मग महंताई कार्यक्रमात आवश्यक सगळ्या साधूंना स्वखर्चानं बोलवावं लागतं. मग त्यांचा आदरसत्कार इत्यादि करावा लागतो.
तुलनेनं कुंभात सोपं. सारे जमलेले असतात. फक्त सगळ्यांना जेवायला घालायचं आणि काही वस्त्रं द्यायची की काम झालं. म्हणजे महंताईसाठीची रक्कम अधिक
हा खर्च, सारं पैशाचं काम.
त्यामुळे ज्याला कुणाला महंत व्हायचं,
त्याच्याकडे दांडगं धनबळ असणं अपेक्षित आहे, ही पहिली गोष्ट!
दुसरी गोष्ट, विरोधक! त्यांना डावलावं तरी लागतं, किंवा गप्पं तरी करावं लागतं!
आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे ‘महंताई’ देणार त्या आखाडय़ाच्या श्रीमहंतांना ‘कन्व्हिन्स’ करावं लागतं की मीच कसा सर्वार्थानं ‘लायक’ आहे!
‘लोकशाही’ व्यवस्थेत या तिन्ही गोष्टी सोप्या कशा असतील? त्या नसतातच.
आणि मग जे सुरू होतं ते सारं गेल्या आठवडय़ात नाशिकच्या साधुग्रामात सुरू होतं!
एका खालशात मी शिरतच होते, तर साधूंनी खच्चून भरलेली एक जीप त्या खालशासमोर थांबली. ताडकन एक बाबाजी उतरले. चालू लागले. वेग एवढा की चेले त्यांच्यामागे जवळजवळ पळतच होते.
शिरले खालशात. ते आले तसे हे खालसावाले बाबाजी ताडकन उभेच राहिले. चहा घ्या म्हणाले. बाकीच्यांना प्लॅस्टिकच्या कपात आणि त्या बडय़ा बाबाजीला स्टीलच्या वाटीत चहा आला. तोवर सारे शांत होते. मग आलेल्या साधूने विषय काढला.
‘वो अयोध्यासे महाराजजीका फोन आया था, वो नाराज चल रहे है, बोल रहे है की, ऐसे कैसे बिना सबूत उस पाखंडी को महंत बनाऐंगे.’
मग तो अमुक एक कसा ‘लायक’ आहे, हा कसा पैशाच्या जोरावर उडय़ा मारतोय. इत्यादि पुराण सुरू झालं. मग बोलण्यातून हेदेखील कळलं की, ते खालशा खालशात जाऊन विरोध नोंदवून, सा:या विरोधकांची मोट बांधताहेत.
हे खालशावाले बाबा त्यांना समजावत होते, ‘ काय करणार? त्याच्या नावानं त्याच्या गुरुजीनं मरताना लिहिलेला कागद आहे. त्याच्याकडे पुरावा आहे, आता तर चादरपण तयार झाली, आता काय करणार कोण? घ्या गोड मानून, उज्जैनला करू काहीतरी तुमच्या ‘त्या’ महाराजांचं.’
हेवेदावे, रुसवेफुगवे, आपापल्या महंतेच्छेमागे लावलेलं वजन, साधुसमाजातच नाही तर संसारी समाजातही हेवीवेट असलेल्या कुणाकुणाचे अयोध्या, हरिद्वार, अलाहाबाद, दिल्लीवरून येणारे फोन! तासन्तास चर्चा, काथ्याकूट.
ठायीठायी धुसफूस, अत्यंत असुरक्षितता, संशय, आणि अविश्वासाचं वातावरण साधुग्रामात गेले काही दिवस अनुभवायला मिळतंय.
राजकारणाचे डावपेच आणि बारकावे ज्यांना शिकायचे त्यांनी एका कोप:यात उभं राहून हे सारं नुस्तं पाहिलं तरी बरीच ‘ग्यानप्राप्ती’ व्हावी.
सत्ता, पैसा आणि प्रतिष्ठा यापायी काय नी कसं कसं करावं लागतं आणि त्याला साधूचोलाही कसा अपवाद नाही याचं हे एक विदारक उघडवाघडं दर्शनच.!
वाईट फक्त याचंच वाटतं की, हे सारं घडत असताना, साधू ‘अशा’ चर्चेत गुंतलेले असताना काही भाविक, साधूंच्या भाषेत ‘प्रकृती’ येत राहतात. त्यांच्या पायावर डोकं ठेवतात. पुढच्या खालशात जातात.
ज्यांच्या पायांवर आपण डोकं ठेवतोय, ज्यांना मान देतोय, ते ही स्वार्थ आणि षडरिपूंनी बरबटलेलेच आहेत. हे त्या बिचा:या, भाबडय़ा भाविकांना कुणी सांगावं.!
आणि कसं सांगावं?
आयुष्यात पहिल्यांदा त्र्यंबकेश्वरी दाखल झालेल्या एक साध्वी. त्या आधी एका सध्या चर्चेत असलेल्या आणि ‘महिला आखाडय़ांसाठी वेगळी जागा, स्नानाला वेगळी वेळ, वेगळा घाट द्या’ म्हणून मागण्या करत सतत स्टण्ट करणा:या एका मोठय़ा साध्वींबरोबर होत्या.
पण त्या दोघींचं जमलं नाही.
वाटा वेगळ्या झाल्या. जाहीर आरोप प्रत्यारोपही झाले. इकडे नाशिकक्षेत्री या साध्वी प्रचलित ‘पुरुषी’ साधू व्यवस्थेशी पंगा घेत असताना तिकडे त्र्यंबकक्षेत्री जेमतेम पंधरा दिवसांत त्या दुस:या अघोर विद्याधारक साध्वी थेट महंतच झाल्या. त्र्यंबकच्या साधुग्रामात त्यांचा मंडप सजला. तोही इतरांपेक्षा आलिशान. आणि साधूंच्या शाहीस्नानात त्या स्वत:चा खालसा घेऊन रथावर बसून एकटय़ा स्नानाला येऊ लागल्या.
एका कुंभातच डायरेक्ट महंतच झाल्या.
त्यांना विचारलं तर ‘महंताईचा’ रेट काय हे त्या सांगताताही. त्यांना महंत करणा:या आखाडय़ाला त्यांनी किती पैसा दिला हे मात्र आपण विचारू नये, नाही का? कुंभातले पूर्ण नग्न साधू पाहून अनेकांना किळस वाटते, पण त्यापेक्षा उघडंनागडं सत्य जेव्हा कुंभात राजरोस दिसतं तेव्हा किळस कुणाची करायची? उबग आणणा:या गोष्टी करणा:या लोकांची? जे पाहू नये ते पाहणा:या आपल्या नजरेची? की जे दिसू नये ते दाखवणा:या परिस्थितीची?
(लेखिका ‘लोकमत’मध्ये मुख्य उपसंपादक आहेत)
meghana.dhoke@lokmat.com