खुबसूरत मोड.

By Admin | Updated: May 2, 2015 17:59 IST2015-05-02T17:59:56+5:302015-05-02T17:59:56+5:30

‘ख्वाईशे आणि ख्वाब’पासून सुरू झालेला प्रेमाचा अंक पुढे पुढे जात ‘इजहार और इंतजार’, मग ‘इकरार, एतबार, ‘जिस्म, शबाब और शराब’, त्यानंतर ‘परेशानाई और कश्मकश’, ‘गम, जुदाई, तनहाई’ करत ‘इश्क सुफियाना’र्पयत येतो,पण हिंदी चित्रपटांतील गाणी तिथून कोलांटउडी मारून पुन्हा प्रेमाच्या तिस:या अंकावर येतात.

Beautiful mode | खुबसूरत मोड.

खुबसूरत मोड.

>- विश्रम ढोले
 
हिंदी गाण्यांमध्ये दिसणारी सर्वात मोठी भावना अर्थातच प्रेमाची. जवळजवळ दोन तृतीयांशांपेक्षा जास्त गाणी या एकटय़ा प्रेमाच्या भावनेला वाहिलेली. प्रेमाच्या अक्षरश: शेकडो प्रसंगांसाठी गाणी आहेत. प्रेमभावनेच्या अनेकानेक छटांना या गाण्यांनी स्पर्श केला आहे. या अनेकानेक छटा आणि शेकडो प्रसंगांना घेऊन हिंदी गाण्यांमधील प्रेमाचे नाटय़ सात अंकांमधून साकारते. पहिला अंक अर्थातच प्रेमात पडण्याच्या इच्छा आणि स्वप्नांचा अर्थात ‘ख्वाईशे आणि ख्वाब’ यांचा. मग दुस:या अंकात होते ती प्रत्यक्ष कोणाच्यातरी प्रेमात पडल्याची जाणीव. तिचा आविष्कार आणि मग प्रेमाच्या स्वीकृतीची प्रतीक्षा. म्हणजेच ‘इजहार और इंतजार’चा टप्पा. एकदा हा इंतजार संपला, प्रेमाला होकार मिळाला की ‘इकरार, एतबार आणि प्यार ही प्यार’चा तिसरा आणि सर्वात मोठा अंक सुरू. शेकडो गाण्यांतून, युगल गीतांमधून हा अंक साकारतो. सहवासातून प्रेम गहिरे होते. अनावर किंवा विलासी होते आणि बरेचदा शारीरही. हा प्रेमनाटय़ाचा चौथा अंक. प्रेमाला ‘जिस्म, शबाब आणि प्रसंगी शराब’चे वळण देणारा अंक. या अंकानंतर प्रेमनाटय़ातील तणावाच्या टप्प्याला सुरुवात होते. वाटेत खाचखळगे लागतात. काटे बोचू लागतात. नाते संपलेले नसते, पण प्रेमाची परीक्षा सुरू होते. हा पाचवा अंक ‘परेशानाई और कश्मकश’चा. या टप्प्यातील तणाव, अपरिहार्यता आणि गैरसमजांपुढे प्रेम टिकू शकले नाही की मग नातं तुटतं. दोघं वेगळे होतात. दु:ख, निराशा आणि एकटेपणा ग्रासून उरतो. हा सहावा अंक असा ‘गम, जुदाई, तनहाईचा’नी भरलेला असतो. खरंतर नाटय़ इथे संपायला हवं. पण हिंदी चित्रपटगीते या पलीकडे जाऊन एकूणच प्रेमभावनेवर काही तात्त्विक सांगू पहातात. प्रेमाच्या श्रेष्ठत्व- कनिष्ठत्वाची, श्रेयस- प्रेयसाची चर्चा करतात. हा सातवा अंक एकूणच ‘इश्काचा अफसाना’ सांगण्याचा, ‘इश्क सुफियाना’ वगैरे करू पाहण्याचा. 
प्रेमभावनेची इतक्या वैविध्यपूर्ण टप्प्यांवर आणि इतक्या तपशीलाने, इतक्या प्रसंगांनिशी चर्चा करणा:या हिंदी चित्रपटगीतांनी काही बाबतीत मात्र कंजुषी दाखविली आहे. प्रेमाचं नातं तुटलं तर किंवा प्रेमाचं नातं टिकवणं अशक्य असेल, अनैतिक ठरू शकत असेल तर काय करायचं, हा त्यातील एक प्रश्न. हिंदी गाणी त्याबाबत ब:यापैकी मुग्धता पाळतात. एकतर ही अवस्थाच हिंदी चित्रपट फार काळ टिकू देत नाहीत. काहीतरी करून, आणि तर्काच्या कोलांटउडय़ा मारून सहाव्या अंकावरून पुन्हा तिस:या अंकाकडेच परत फिरण्याकडे हिंदी चित्रपटांचा कल असतो. प्रेमाच्या परीक्षेत पास वगैरे होऊन ‘अॅण्ड दे लिव्हड हॅपिली एव्हरऑफ्टर’ असेच बहुतेक चित्रपट सांगत राहतात. पण मूळ प्रेमिकांमधील प्रेमभावनाच अनैतिक ठरू शकत असेल तर जे कोणतं नातं नैतिक आहे त्यामध्येच कसे खरे प्रेम दडले आहे असेच बहुतेकवेळा हिंदी चित्रपटांमधून दाखविले जाते. मग या नैतिक नात्याच्या रक्षणासाठी मूळ प्रेमिकांपैकी कोणीतरी त्याग वगैरे करून आपल्या प्रेमाची नैतिक पत उंचावतो. प्रेम आणि नैतिकता यातील तणावावर हिंदी चित्रपट आणि त्यामागील आपली मानसिकता असा पारंपरिक आणि समूहवादी तोडगा शोधते. पण, मूळ नात्याचं काय करायचं, त्या नात्यातील व्यक्तीकडे कसं पहायचं, याची फार समाधानकारक उत्तरं काही चित्रपटांमधून किंवा चित्रपटापेक्षा जास्तीचे आणि सूक्ष्म सांगण्याची क्षमता असलेल्या गाण्यांमधूनही मिळत नाही. 
बी. आर. चोप्रांच्या ‘गुमराह’ मधील (1963) ‘चलो इक बार फिरसे अजनबी बन जाए हम दोनो’ हे गाणो या पाश्र्वभूमीवर खूप वेगळे ठरते. केवळ वेगळेपणाच्याच नव्हे तर सौंदर्य आणि चित्रपटातील औचित्य या निकषांवरही श्रेष्ठ ठरते. खरंतर ‘चलो इक बार फिर से’ ही साहिर लुधियानवीची कविता. साहिरच्या अनेक मूळ कविता आणि गझलांना चित्रपटगीतांमध्ये जसंच्या तसं किंवा थोडय़ाफार फरकाने दुसरा जन्म मिळण्याचं भाग्य लाभलं. चलो एकबार फिर से त्यातीलच एक. त्यातील काव्यगुणांना आणि शब्दांना न्याय देण्यासाठी संगीतकार रवीला बरेच श्रम घ्यावे लागले, हे गाण्यातील अवघड सांगीतिक वाटावळणातून जाणवत राहते. पण, रवीचे संगीत आणि उंच पट्टी राखूनही भावूक राहिलेला महेंद्र कपूरचा आवाज यांनी साहिरच्या शब्दांना उत्तम साथ दिली आणि एक अतिशय वेगळे, भावस्पर्शी आणि श्रेष्ठ गाणो आकाराला आले. पडद्यावर ते साकारते हिंदी चित्रपटांना आवडणा:या पियानो गीताच्या संदर्भात. घरगुती प्रसंगात किंवा पार्टीत ती किंवा तो पियानोवर बोटं नाचवित मनातील भावना गाण्यातून व्यक्त करतो किंवा करते. हा सत्तरीपर्यंतच्या हिंदी चित्रपटांमधील एक टिपिकल प्रसंग. गुमराहमध्येही तो तसाच घडतो. कलाकार असलेला राजेंद्र (सुनील दत्त) त्याची पूर्वीची प्रेयसी मीना (माला सिन्हा) हिच्या घरी तिच्या नव:याच्या म्हणजे अशोकच्या (अशोककुमार) समक्ष हे गाणो गातो. राजेंद्र आणि मीना खरंतर एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालेले असतात. पण, काही घटनांमुळे मीनाला अशोकशी लग्न करण्याचा अपरिहार्य वाटावा असा निर्णय घ्यावा लागतो. परिस्थितीशी तडजोड करून ती अशोकच्या संसारात सुखी आणि स्थिर होण्याच्या प्रयत्नात असते. तोच राजेंद्र पुन्हा तिच्या आयुष्यात येतो. विवाहित मीना आणि राजेंद्रचे जुने प्रेम पुन्हा वर येऊ पहाते. दोघांचीही घालमेल सुरू होते. अशोकला सुरुवातीला अर्थातच याची काही कल्पना नसते. या सा:या पाश्र्वभूमीवर एका नाजूकप्रसंगी हे गाणो येते. आपल्या नात्यावर काळाने लादलेली अनैतिकता, ते सुरू ठेवण्यातील धोके, नुकसान आणि वैयर्थता याची त्यांना जाणीव व्हायला लागते. एकीकडे परिस्थितीवश खुडल्या गेलेल्या जुन्या प्रेमाचे अनिवार आकर्षण आणि दुसरीकडे त्याला रोखू पाहणारी नैतिकतेची अपरिहार्य भिंत. ‘चलो इक बार’ चे खरे आवाहन आहे ते अपरिहार्यता आतून स्वीकारण्याचे. या तणावातून संयत, व्यावहारिक पण मानवी तोडगा काढण्याचे.  
नैतिकतेच्या, सामूहिकतेच्या आणि कर्तव्याच्या मूल्यांनी करकचून बांधलेल्या आपल्यासारख्या समाजात बहुतेकांच्या प्रेमाचा प्रवास सार्थकतेच्या मुक्कामापर्यंत पोहचतच नाही. बहुतेकांना तो मध्येच कुठल्याशा वळणावर अपरिहार्यपणो सोडून द्यावा लागतो. हे सोडणो अर्थातच सोपे नसते. अनेक जण हा प्रवास आत्मनिंदा किंवा परिनंदेच्या वळणावर सोडतात. तर अनेक जण निराशा आणि निर्थकतेच्या. हिंदी गाण्यांमध्ये बहुतेकवेळा ऐकू येतो तो प्रेमाच्या विजयाचा जयघोष. पण प्रेम पराभूत झाले तर बहुतेकवेळा ऐकू येतो वैफल्याचा, निराशेचा किंवा निर्थकतेचा सूर. क्वचित प्रसंगी निंदेचाही. या पार्श्वभूमीवर या गाण्यातलं ‘वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमिकन. उसे इक खुबसूरत मोड देके छोडना अच्छा.’ ही शांत, संयमी स्विकृती फार वेगळी वाटते. ‘हे सोडणं समंजस आणि सुंदर करावे’ हे आवाहन फार महत्त्वाचे वाटते. नात्याचे ओङो होत असेल, त्याची इतरांना बाधा होत असेल तर पुन्हा एकदा ‘अजनबी बन जाए हम दोनो.’ ही गाण्यातील भूमिका श्रेयस्कर वाटू लागते.
हिंदी चित्नपटातील गाणी म्हणजे समाजमनाची एक सुप्त भाषा. ही भाषा मानवी आशाआकांक्षा, ताणतणाव, स्वप्न, संघर्ष, नैतिक पेच एका वेगळ्या प्रमाणात आणि निराळ्या पातळीवर परिभाषित करीत असते. प्रेमाच्याच नव्हे तर टिकविता येणार नाही अशा कोणत्याही नात्यांच काय करायचं या खोलवर पेचाच्या प्रश्नाला ही सुप्त भाषा ‘खुबसुरत मोड देके छोडना अच्छा’ असे सोपे आणि श्रेयस्कर उत्तर देते. अशा मन:स्थितीतून जाणा:यांना हे गाणो एक दिशा दाखिवते. आणि सुंदर वळणावर प्रवास सोडण्याचा अनुभव असलेल्यांच्या भावनांना एक सुंदर अभिव्यक्ती मिळवून देते.
 
1 प्रेमाच्या नात्यातून निवृत्त होण्याचा दुस:याचा अधिकार अशाच शांतपणो स्वीकारणारे साहिरचेच आणखी एक गाणो म्हणजे- ‘तुम मुङो भूल भी जाओ तो ये हक है तुमको’. 1959च्या ‘दीदी’ या चित्रपटातील हे अतिशय सुंदर गाणो गायले होते सुधा मल्होत्र आणि मुकेश यांनी आणि या गाण्याचे संगीत होते सुधा मल्होत्रंचे. 
 
2 गुमराहमधील ‘आप आए तो खयाल ए दिल ए नाशाद आया’, ‘इन हवाओं मे इन फिजाओ में’, 
‘ये हवा ये हवा’ ही गाणीदेखील लोकप्रिय झाली. 
 
3 कवितेचे गाणो करताना अनेकदा चालीसाठी मूळ शब्दात वा ओळींमध्येही बरेचदा बदल करावे लागतात. ‘चलो इक बार’च्या बाबतीत तसे करावे लागले नाही. अपवाद फक्त एका शब्दाचा. मूळ कवितेमध्ये ‘वो अफसाना जिसे तकमील तक लाना न हो मुमिकन’ अशी ओळ आहे. पण ‘तकमील’ हा शब्द कठीण वाटल्याने किंवा मीटरमध्ये अचडणीचा झाल्याने त्याऐवजी ‘अंजाम’ हा सोपा सुटसुटीत शब्द टाकण्यात आला.
 
4 गुमराहसाठी महेंद्र कपूरला सर्वोत्कृष्ट गायकासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार (1963) मिळाला होता.
 
(लेखक माध्यम, तंत्रज्ञान आणि संस्कृती या विषयाचे अभ्यासक आहेत.)

Web Title: Beautiful mode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.