Baghdadi is gone, militant movements are still alive!- Senior journalist Nilu Damle explains the journey of Baghadai and isis, al-kayda.. | बगदादी गेला,  खूळ जिवंतच !
बगदादी गेला,  खूळ जिवंतच !

ठळक मुद्देइराक आणि सीरियात तर अल-आयसिस आहेच; पण लिबिया, इजिप्त, येमेन, सौदी अरेबिया, अल्जेरिया, ट्युनिशिया, सोमालिया, फिलिपिन्स इत्यादी ठिकाणीही संघटना सक्रिय आहेत.

- निळू दामले

आजवर तीन-चार वेळा तरी अल बगदादी मारल्या गेल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. अल बगदादी अमर आहे अशी दंतकथा जन्माला यावी अशी स्थिती होती. पण या खेपेला बगदादी खरंच मारला गेलाय. इडलिबमध्ये त्यानं स्वत:च्या अंगावरच्या स्फोटकांनं भरलेल्या बंडीचा स्फोट करून स्वत:ला संपवलंय असं दिसतंय. बगदादीचे डीएनए नमुने घेऊनच अमेरिकन सैनिक इडलिबमध्ये पोहोचले होते, ते नमुने बगदादीच्या शरीराच्या तुकड्यांशी ताडून पहाण्यात आलेत.
सार्‍या जगावर इस्लामी राज्य लादण्याच्या विचार परंपरेतला अल बगदादी हा एक मोठा दुवा. तसं तर आपलाच धर्म सर्वात र्शेष्ठ आणि देवाचा आदेश आपल्याच धर्माला लाभला आहे असं प्रत्येक धर्माला वाटतं आणि आपल्या धर्माच्या नावाखाली सारं जग काबीज करण्याचा प्रयत्न सत्ताभिलाषी माणसं किती तरी शतकं करत आली आहेत. त्या परंपरेतली अगदी अलीकडली व्यक्ती म्हणजे ओसामा बिन लादेन आणि त्याचा अल कायदा. अमेरिकेनं ओसामाला मारलं आणि इस्लामी राज्याचा खातमा केला असं जाहीर केलं. पण तसं झालं नाही. अल कायदाची धुरा अयमान जवाहिरीनं आपल्या खांद्यावर घेतली आणि ती नंतर इराकमध्ये झरकावीकडं गेली. झरकावीकडून ती अल बगदादीकडं गेली. अल बगदादीला आधी इराक, सीरिया, जॉर्डन, लेबेनॉन, इस्रायल या विभागात खिलाफत स्थापन करायची होती आणि नंतर ती जगात पसरवायची होती.
अल बगदादीनं 2004च्या सुमाराला इराकमधे टिक्रीतमध्ये आपली खिलाफत स्थापन केली. अमेरिकेनं इराकवर हल्ला केल्यानंतर इराकी सैन्य आणि तुरु ंग यातून मोकळे झालेले सेनाधिकारी आणि जिहादी अल बगदादीच्या खिलाफतमध्ये सामील झाले. आखाती प्रदेशातून पैसा आणि शस्रं आली. अल बगदादी खिलफा झाला, त्याचं रीतसर राज्य टिक्र ीतमध्ये स्थापन झालं. 
2014 साली अमेरिकेनं टिक्रीतवर हल्ला केला. अमेरिकेच्या बलाढय़ ताकदीसमोर बगदादीचे रणगाडे आणि किरकोळ विमानं टिकाव धरू शकली नाहीत. बगदादीनं पळ काढला आणि तो सीरियात राक्कामध्ये गेला. आता खिलाफत राक्कामध्ये सुरू झाली. सीरियात यादवी चालू असल्यानं बगदादीचं फावलं. अमेरिका, फ्रान्स यांनी सीरियातली आसद विरोधी बंडखोरांची फौज आणि कुर्डांची फौज यांच्या मदतीनं राक्कावर हल्ला केला, राक्काची राखरांगोळी झाली. बगदादीनं तिथून पळ काढला. 
तिथून तर 2019 सालच्या सप्टेंबरपर्यंत बगदादी आपल्या साथीदारांना घेऊन गावं बदलत असे. गावाबाहेरची एखादी जागा, तिथं एक कंपाउण्ड, कंपाउण्डमध्ये एक सुरक्षित इमारत आणि तळघरं आणि भुयारं अशी व्यवस्था असे. 2004पासूनच लष्करातल्या माणसांबरोबरच वावरलेल्या बगदादीला लढाईचे, पळण्याचे, लपण्याचे इत्यादी डावपेच चांगलेच माहीत होते. अमेरिकेचं लक्ष बगदादीवर होतंच. सीरियन बंडखोर आणि कुर्ड ही स्थानिक माणसं असल्यानं त्यांना बगदादीचा ठावठिकाणा कळत असे. त्यांनी दिलेल्या माहितीचा आधार घेऊन, काही महिने माग ठेवून अमेरिकेनं बगदादीच्या ठिकाणावर हल्ला केला, आपण आता सुटत नाही हे कळल्यावर बगदादीनं आत्मघात करून घेतला.
अमेरिका आणि अगदी नाशिक-मुंबई-पुण्यातल्या लोकांनीही नि:श्वास टाकला की, झालं इस्लामिक स्टेट संपलं. आता जगाला असलेला दहशतवादाचा धोका संपला असं माणसं सोशल मीडियात म्हणू लागली. सर्वांच्या वतीनं ट्रम्पही तसंच ट्विट करून मोकळे झाले.
आयसिस, इस्लामिक स्टेट, अल कायदा ही दहशतवादी संघटनांची काही रूपं आणि नावं. ओसामा मारला गेला, त्याचा मुलगा हमझा मारला गेला आता बगदादी मेलाय. तरीही आयसिस, अल कायदा संपलेलं नाही.
याचं कारण इस्लामिक स्टेट वा अल कायदा या सामान्यत: ज्याला संघटना म्हणतात अशा तर्‍हेच्या संघटना नाहीत. सरकार, कंपनी, कॉर्पोरेशन इत्यादी संस्थांसारखं आयसिस नाही. नियम, बंधनं, आदेश, पदाधिकार्‍यांची उतरंड, बजेट, नियम न पाळणार्‍यांवर कारवाई अशा पद्धतीनं आयसिस किंवा अल कायदा बनलेलं नाही. आयसिस म्हणजे शेतकर्‍यानं कष्टपूर्वक केलेली पेरणी नाही. आयसिस म्हणजे वार्‍यानं पसरणार्‍या बीजांनी निर्माण होणारं पीक आहे.
इस्लाम आणि इस्लामचं राज्य अशी एक दंतकथा शेकडो वर्षांत तयार झाली आहे. ती दंतकथा म्हणजे वास्तव आहे असं मानून ती अमलात आणण्याचा प्रयत्न काही माणसं करतात. धर्माचं राज्य नावाची गोष्ट कधीही खरी नव्हती. धर्माचा वापर करणार्‍यांचं राज्य हे वास्तव होतं. ओसामालाही इस्लामच्या नावाखाली त्याचं राज्य आणायचं होतं. दंतकथा इतकी शक्तिशाली होती आणि आहे की, ज्यांनी ओसामाला कधी पाहिलं नाही, ज्यांचा ओसामाशी कधीही कोणत्याही स्वरूपात संपर्क नाही अशी माणसं ओसामाकडून प्रेरणा घेऊन आपापल्या जागी स्वतंत्नपणे इस्लामी राज्य आणायचा खटाटोप करत. इस्लामी राज्य म्हणजे इस्लामी नसलेल्या लोकांचा खातमा करायचा आणि समाजावर ताबा बसवायचा. बस. त्यासाठी शस्रं गोळा करायची, विरोधकांना मारून टाकायचं. बारा-पंधराशे वर्षांपूर्वी ते खपून जात होतं कारण तेव्हां माणसाचे अधिकार, माणसाचं स्वातंत्र्य, लोकशाही इत्यादी गोष्टी माणसाला माहीत नव्हत्या. पण विसाव्या-एकविसाव्या शतकात त्या कल्पना म्हणजे खुळेपणा आणि अगोचरपणा ठरत होता. अर्थात दंतकथा हाच कार्यक्र म मानणार्‍यांना ते कसं पटायचं.
झरकावी आणि बगदादी यांचा शपथविधी वगैरे झालेला नव्हता. त्यांनी आपापले प्रयत्न चालवले,  त्यांना ओसामाची प्रेरणा होती आणि दंतकथेचा फायदा घेऊन राजकारण साधणार्‍या सरकारांचा पाठिंबा मिळाला.
बगदादी मेला खरा; पण अगदी याच क्षणी अफगाणिस्तानात आणि पाकिस्तानात आयसिस-अल कायदा जोरात आहे. अल-आयसिस दररोज स्फोट करून पाचपन्नास माणसं मारतंय. अफगाणिस्तानात तालिबान खतम करायचं आणि पाकिस्तानातले इस्लामी गट नष्ट करायचे असा अल-आयसिसचा डाव आहे.
इराक आणि सीरियात तर अल-आयसिस आहेच; पण लिबिया, इजिप्त, येमेन, सौदी अरेबिया, अल्जेरिया, ट्युनिशिया, सोमालिया, फिलिपिन्स इत्यादी ठिकाणीही संघटना सक्रि य आहेत. 
अल बगदादी जरी इडलिबमध्ये होता तरीही इराक आणि सीरियात 2019च्या जानेवारी-फेब्रुवारीत 502 हल्ले आयसिसनं केले. जगभरात  2017-2018 या काळात 3670 हल्ले आयसिसनं तरी घडवले किंवा आयसिसच्या प्रेरणेनं तरी घडले. खुद्द अमेरिकेत पाच हल्ले झाले. हे हल्ले करणारे लोक स्थानिक होते, त्यांनी त्यांचं वैचारिक वा शस्राचं प्रशिक्षण बगदादीकडं जाऊन घेतलं नव्हतं. नेटवर आयसिसचा वैचारिक प्रचारही असतो आणि स्फोट व स्फोटकांचं मॅन्युअलही असतं. कोणीही कुठंही त्यांचा वापर करून आपल्या शत्नूंवर हल्ले करू शकतो, करत असतो. एका माणसानं तर ब्रेक्झिटला विरोध करणार्‍या खासदार बाईलाच गोळी घालून मारून टाकलं, इंग्लंडमध्ये.
नाशिक, पुण्यातल्या लोकांना नि:श्वास टाकायला हरकत नाही कारण भारतातले मुस्लीम बांधव आयसिसच्या दंतकथांना बळी पडत नाहीत. भारतात लोकशाही मार्गानं सत्ता मिळवता येते असं अजून तरी बर्‍याच लोकांना वाटतंय. जिथं लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडालाय किंवा लोकशाहीची सवय नाही अशा ठिकाणी आयसिस फोफावू शकतं, फोफावतंय. अफगाणिस्तान, पाकिस्तान, येमेन, सोमालिया, सौदी अरेबिया इत्यादी.
बगदादी मेला खरा; पण आससिस आणि धर्मावर आधारलेला देश हे खूळ अजून मेलेलं नाहीये. 
damlenilkanth@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Web Title: Baghdadi is gone, militant movements are still alive!- Senior journalist Nilu Damle explains the journey of Baghadai and isis, al-kayda..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.