बेबी बूर्मस
By Admin | Updated: April 4, 2015 18:32 IST2015-04-04T18:32:16+5:302015-04-04T18:32:16+5:30
१९४६च्या सुमारास अमेरिकेत प्रचंड थंडी पडली. सगळे व्यवहार ठप्प,लोकही घरातच बंदिस्त झाले. काय होणार?- लोकसंख्येत वाढ! या काळात जन्माला आलेल्या लाखो ‘बाळां’ची आता गोरजवेळ सुरू झाली आहे.

बेबी बूर्मस
१९४0च्या मध्यावर; नक्की सांगायचं तर १९४६चा सुमार. न्यूयॉर्कमध्ये पडलेली प्रचंड थंडी, बर्फ. बाहेरचे सगळेच व्यवहार ठप्प झालेले. जनता घरातच बंदिस्त. बाहेर पडता येईना. करणार तरी काय? विजेचे दिवेही बंदच. शेवटी करण्यासारखा राहिलेला एकच उद्योग!
प्रजोत्पादन!!
त्यात सगळेच तरबेज. कुठल्याही अभ्यासाशिवाय, ट्रेनिंगशिवाय जमणारी ही गोष्ट. मग काय सांगू राव!
अमेरिकेच्या लोकसंख्येचा आलेख भराभर वर चढू लागला. त्या काळात जन्माला आलेली बाळं आता सत्तरीच्या जवळ येऊन ठेपली आहेत. त्यांना ‘बेबी बूर्मस’ म्हणतात. अमेरिकेतील आमचे माजी अध्यक्ष ‘बिल क्लिंटन’ हेसुद्धा बेबी बूर्मसपैकी एक. या बेबी बूर्मसची आता गोरजवेळा सुरू झालेली आहे.
तुम्हाला कल्पना नसेल! पण विचार करा, १९४६ ते १९६४ या अठरा वर्षांच्या काळात दरवर्षी सरासरी चाळीस लक्ष (४0,00,000) मुलं जन्माला आली. नक्की सांगायचं तर शहात्तर दशलक्ष मुलं एकंदर संख्या. म्हणजे वर्षाला चाळीस लक्षाहून अधिकच नाही?
पण गंमत पहा. हा सगळा काळ एकदम आनंददायी ठरला. घराघरात आनंदोत्सव सुरू!
तो कसा?
कारण अमेरिकेची अर्थसत्ता बळकट झाली. दुसर्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या प्रचंड महागाईला खीळ बसली. बेकारी आटोक्यात आली. लोकांच्या गरजा वाढल्या. कारखाने अस्तित्वात आले. बेबी फूडपासून ते मुलांचे कपडे, खेळणी, स्ट्रोलर्स, बाबागाड्या, प्ले ग्राऊंड्समधील प्ले इक्विपमेंट्स यांचे उत्पादन वाढले. लहान मुलांसाठी नर्सरीज, किंडर गार्टन्स झपाट्यानं निघू लागली. घरातच राहणार्या स्त्रियांना बाल संगोपनाचे उद्योग मिळाले. बेबी सीटर्सची गरज निर्माण झाली. स्त्रिया घराबाहेर पडून नवीन कामांच्या शोधात फिरू लागल्या. आणि पाहता पाहता केवळ आर्थिक सुबत्ताच नाही, तर अमेरिकेतल्या सांस्कृतिक व सामाजिक जीवनाची जडण घडण बदलू लागली.
या मुलांच्या वाढत्या वयानुसार समाजजीवनातही अनेक बदल झाले. हळूहळू नर्सरीज व किंडर गार्टन्सची संख्या कमी होऊन प्राथमिक, माध्यमिक शाळा निर्माण होऊ लागल्या. दूर राहणार्या मुलांची शाळेत ने-आण करण्यासाठी पिवळ्या रंगाच्या स्कूल बसेस रस्त्यावरून धावू लागल्या. ट्रॅफिक वाढल्यामुळे व मुलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक नियम निर्माण झाले. रस्ते रुंद झाले. वाहनांचे नियम कडक करण्यात आले.
पण लोकसंख्या वाढतच असते. ती वाढणारच. मुलांचे नवीन प्रश्न निर्माण होणार, त्यांना नवी उत्तरं शोधावी लागणार. बेबी बूर्मसच्या काळात जन्मलेल्या पिढीची ऐन तारुण्यात झालेली ससेहोलपट पाहण्याचं दुर्दैव माझ्या वाट्याला आलं.
मी अमेरिकेत पाऊल ठेवलं ते १९६९-७0च्या काळात. त्यावेळी व्हिएतनाम युद्धाचा भडका उडालेला. महागाई आणि बेकारी पुन्हा वाढलेली. बेबी बूर्मसच्या जन्मकाळातला आनंद आणि आवेश संपूर्ण ओसरलेला. १८ ते २६ वयोर्मयादा, किंवा त्याहून थोडी अधिकसुद्धा, असलेल्या तरुणांना सक्तीनं युद्धावर पाठविण्यात येऊ लागलं. सगळं वातावरणच धास्तावलेलं. अमेरिकेचे त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष होते रिचर्ड निक्सन, व्हिएतनामचं युद्ध थांबवण्यासाठी त्यांच्यावर चहूबाजूंनी दबाव. युद्ध थांबवणं हा प्रतिष्ठेचा प्रश्न होऊन बसला.
ऑफिसात माझ्याबरोबर काम करणार्या दोन अमेरिकन तरुणांना व्हिएतनाम युद्धावर जाण्याचं सक्ती-पत्र आलं तेव्हा सगळ्यांचेच डोळे पाणावले.
योगायोग असा की, हेच दोन तरुण पुढे अनेक वर्षांनी माझ्याच ऑफिसात नोकरीवर रुजू झाले तेव्हा आनंदातिशयानं आम्ही एकमेकांना मिठय़ा मारल्या. पुढे अनेक वर्षं आम्ही एकत्रच काम करीत होतो. तरुणपणातल्या आठवणींचे धागे घट्ट धरून ठेवले होते.
काळ सरकत गेला. डोक्यावर पडलेल्या टकलावरचं गोरजवेळेचं उनही सोसनासं झालं; पण भल्या-बुर्या आठवणींचं ओझं मात्र शाबूत राहिलं. वाढत्या वयानुसार मन मात्र कातर होत राहिलं..
बेबी बूर्मसचा काळ संपला.
ती संपूर्ण पिढीच आता गोरजवेळेच्या शांत प्रकाशात न्हाऊन निघत आहे. संध्याकाळची उन्हे झाडांवर चमकताना पाहून कवी अनिलांची कविता आठवली.
‘‘संध्येच्या रंगछटा वृक्षांवर अडलेल्या,
लांब लांब पडछाया पुसट फिकट पडलेल्या..’’
संध्येच्या रम्य रंगछटा पाहताना त्या पलीकडच्या पुसट फिकट पडछाया भेसूर वाटायला लागतात. त्या पडछायांच्या वाटांवरून करावा लागणारा पुढचा खडतर प्रवास डोळ्यापुढे फेर धरू लागतो.
एकत्र कुटुंब पद्धती नाही. आई-बाप म्हातारे झाले तरी स्वतंत्र! मुलं-सुना-नातवंडं स्वतंत्र!
मला आठवतंय, मी लहान असताना माझ्याकडे पाहून वडील अभिमानानं म्हणायचे, ‘‘ही आमची म्हातारपणाची काठी आहे. आधार आहे.’’
कसचं काय नि कसचं काय!
आई-वडिलांच्या, दोघांच्याही अंतिम क्षणी मी सातासमुद्रापलीकडेच होतो. झटकन जाताही आलं नाही. आता हे व्रण काही कुठल्याही औषधानं मिटणारे आहेत का?
इच्छा असो नसो, आयुष्यात काही तडजोडी स्वीकाराव्याच लागतात. मुख्य म्हणजे त्या स्वीकारण्याचा प्रश्नच नसतो. त्या लादल्याच जातात.
अन् या कोणी कोणावर लादलेल्या तडजोडी?
मला वाटतं, माझ्या पिढीनं स्वत:च्या आणि कौटुंबिक उन्नतीच्या नावाखाली आधीच्या पिढीवर लादलेल्या तडजोडी असाव्यात.
होती कुठे समाजव्यवस्था ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीची? तिथेही नव्हती अन् इथेही.
वैद्यकीय शास्त्रानं केलेल्या प्रगतीमुळे माणसाला दीर्घायुष्य मिळू लागलं. विविध रोगांच्या अभ्यासातून नवीन औषधं मिळू लागली. रोग बरे होऊ लागले आणि माणसाचा वृद्धापकाळही दीर्घ होऊ लागला. आता या शोधांमुळे माणसाला मिळालेलं हे वरदान म्हणायचं की शाप हे मला माहीत नाही.
‘या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ - किंवा ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ हे म्हणणे ठीक आहे. पण शेवटी कुठल्या जगण्यावर आणि जीवनातली कुठही घडी हे प्रश्न उरतातच. नुसते उरतात असं नाही तर ते भेडसावतात सुद्धा. शेवटी गोविंदाग्रज म्हणतात- ‘मरणात खरोखर जग जगते’ हेच खरं. वृद्धापकाळानं विकलांग झालेला देह घेऊन जगत राहण्याचा मिळालेला शाप श्रेष्ठ की यथाकाल मरणाचं मिळालेलं वरदान?
पण या प्रश्नांची चाहूल लागताच इथे झर्रकन काटे फिरू लागले. अमेरिकन सरकारच्या डोळ्यापुढे ‘बेबी बूर्मस’चा वृद्धापकाळ नाचू लागला. दररोज १0 ते ११ हजार या संख्येनं नवृत्त होणार्या ‘बाळां’चं करायचं तरी काय? विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांचा या विषयावर अभ्यास होऊ लागला. डह ळड ऊएअछ हकळ डछऊ अ¬ए, एठखड डछऊ अ¬ए - अ ढफअउळकउअछ ¬वकऊए, ळए अफळ डऋ अ¬कठ¬ अशा तर्हेची पुस्तकं बाजारात येऊ लागली. उतारवयातली आर्थिक परिस्थिती, शारीरिक दुर्बलता, वाढत जाणारा एकटेपणा, दृष्टिक्षीणता व कर्णबधिरतेमुळे वाटणारं भय व त्यातून समाजात न मिसळण्याची वाढत जाणारी वृत्ती - या सगळ्या गोष्टींचा सातत्यानं व बारकाईनं विचार होऊन त्यावर उपाय शोधण्यात आले. ते नुसतेच शोधण्यात आले असं नाही, तर ते जनमानसात कसे रुजवायचे, ज्यामुळे क्षितिजावरल्या गोरजवेळेच्या रंगपंचमीचा आस्वाद घेण्याची लोकांची क्षमता वाढीला लागेल याबद्दल अधिक जागरूकता निर्माण झाली.
(दीर्घकाळ अमेरिकेत वास्तव्याला असणारे ज्येष्ठ मराठी लेखक. ‘कुंपणापलीकडले शेत’ हा कथासंग्रह, ‘अलिबाबाची हीच गुहा’ या संगितिकेसह विदेशातील अनेक मराठी उपक्रम / संस्थांचे संपादक,
संयोजक, संघटक)