Ayodhya... the changing face of city | अ-युध्द

अ-युध्द

ठळक मुद्देचिनी यात्रेकरू हुएन त्संग सातव्या शतकात अयोध्येला आला होता. त्यानं लिहून ठेवलं आहे की, त्यावेळी अयोध्येत वीस बौद्ध मंदिरं होती; ज्यांत तीन हजारपेक्षाही जास्त भिक्खु राहात होते. 

- विकास मिश्र

साल 1986. फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा. त्या दिवशी रात्रभर रेल्वेचा प्रवास करून अगदी पहाटेच मी अयोध्येला पोहोचलो होतो. फैजाबाद स्टेशनवर मी रेल्वेतून उतरलो. तिथल्या मिनी बसमध्ये बसून थोड्याच वेळात अयोध्येच्या अगदी मध्यवर्ती भागात पोहोचलो होतो. 
का आलो होतो मी अयोध्येला?
प्रसिद्ध वकिल उमेशचंद्र पांडे यांना भेटण्यासाठी मी तिथे आलो होतो. आज त्यांचं नाव विस्मरणात गेलं असलं तरी त्यावेळी त्यांचं नाव माध्यमांमध्ये सातत्यानं गाजत होतं. 
रामलल्लाच्या दर्शनाची परवानगी मिळायला हवी यासाठी जानेवारी 1986मध्ये अलाहाबाद हायकोर्टात त्यांनी एक याचिका दाखल केली होती. कोर्टानं त्यांचं म्हणणं मान्य केलं होतं. सरकारनं विवादास्पद स्थळ खुलं केलं होतं आणि भारतभरातून लोक अयोध्येत येऊ लागले होते. उमेशचंद्र पांडे यांची मुलाखत मला घ्यायची होती. 
फैजाबाद आणि अयोध्या ही जुळी शहरं. कधीकाळी या दोन्ही शहरांमधलं अंतर दहा किलोमीटर होतं, पण काळाच्या ओघात या दोन्ही शहरांतलं अंतर पुसलं जात कलांतरानं ही दोन्ही शहरं एकरुप झाली. पूर्वी दोन्ही शहरांची प्रशासनिक व्यवस्थाही वेगळी होती, पण तीही आज एकच झाली आहे.  

अयोध्याची ती सकाळ आजही मला स्पष्टपणे आठवते. न्यायालयाच्या ज्या आदेशानं संपूर्ण देशात खळबळ माजली होती, त्या आदेशाचा जराही परिणाम अयोध्येवर झालेला दिसत नव्हता. 
सर्व धर्मपंथाचे लोक एकमेकांशी अशा तर्‍हेनं एकरुप झाले होते, जसं एखाद्या हारात फुलं गुंफली जावीत!
1986नंतरही वेळोवेळी मी अयोध्येला जात राहिलो. काळानं अनेकदा कूस बदलली, अनेक बदल झाले, पण तिथल्या ‘गंगा-जमुना’ संस्कृतीत बदल होताना मात्र मला कधीच दिसला नाही. 
वाद न्यायालयापर्यंत पोहोचला होता, पण हृदयातली स्पंदनं मात्र एकच होती. हा ‘भाईचारा’ इतका, दोन्ही पक्षकारांमधला याराना इतका अफलातून की, न्यायालयात जातानाही ते एकाच रिक्षातून जात-येत आणि रोजची संध्याकाळही एकमेकांच्या सोबतीनंच व्यतीत करीत.
सरयू नदीच्या उजव्या किनार्‍यावर वसलेल्या या शहराचा इतिहासही बराच पुरातन आहे. 
असं म्हणतात, की या शहराचं मूळ नाव ‘अ-युद्ध’- म्हणजे जिथे कधीच युद्ध होत नाही- असं होतं! या संपूर्ण कालौघात अयोध्या शहरानं आपल्या नावाची भावना कायम जपली. याच शहराला पूर्वी कौशल देशाच्या नावानंही ओळखलं जात होतं. 
चिनी यात्रेकरू हुएन त्संग सातव्या शतकात अयोध्येला आला होता. त्यानं लिहून ठेवलं आहे की, त्यावेळी अयोध्येत वीस बौद्ध मंदिरं होती; ज्यांत तीन हजारपेक्षाही जास्त भिक्खु राहात होते. 
आजच्या घडीलाही येथे केवळ हिंदू मंदिरंच नाही, तर जैन मंदिरांची संख्याही खूप मोठय़ा प्रमाणात आहे. अयोध्या नगरपालिकेचे ताजे आकडे सांगतात, येथे तब्बल 6228 मंदिरं आणि मठ आहेत!
 धर्मावर आधारित अर्थव्यवस्था
खुद्द भगवान रामाच्या पावन नगरीचे आपण रहिवासी असल्याचा इथल्या लोकंना खूप अभिमान आहे, पण काळाच्या ओघात या शहराचा चेहरामोहरा बदलावा अशी त्यांचीही मनोमन इच्छा आहे. 
या शहराची अर्थव्यवस्था मुळात धर्माच्या आधारावरच बेतली गेलेली आहे. इथे वर्षभरात तीन मेळे भरतात. पूर्वी या मेळ्यांना लोखोंच्या संस्थेने लोक गर्दी करायचे, गेल्या काही वर्षांत मात्र ही गर्दी बरीच ओसरली आहे. पण  अयोध्येत भव्य राम मंदिर उभारलं गेल्यानंतर लोकांची तीच लाखोंची गर्दी इथे पुन्हा पाहायला मिळेल आणि अयोध्येची अर्थव्यवस्था सुधारेल अशीही अपेक्षा लोकांमध्ये व्यक्त केली जात आहे. 
कोणीही कोणत्याही धर्माचा असो, पण एकाच व्यवस्थेवर इथली अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. इथल्या मंदिरांच्या जवळ फुलं, हार घेण्यासाठी थोडा वेळ जरी थांबलात, तरी तुम्हाला याची प्रचिती येईल की ही व्यवस्था मुख्यत्वे इथल्या मुस्लीम समाजाच्या हातात आहे. इतकं की, अनेक मठांतले कर्मचारीसुद्धा मुस्लीम आहेत.
जितके जास्त भाविक इथे येतील तितकं सगळ्याचं भलं होईल, इतकं साधं हे गणित आहे. 
अयोध्येत पायाभूत सुविधा व्हाव्यात, चांगली हॉटेल्स उभी राहावीत, रस्ते भव्य, चकचकीत असावेत, पर्यटकांच्या सर्व सोयी-सुविधांचा विचार व्हावा, एकदा का पर्यटकानं या नगरीत पाऊल टाकलं की, त्याला परत परत इथे यावंसं वाटावं, प्राचीन मंदिरं आणि महालांची देखभाल-दुरुस्ती व्हावी आणि हे शहर पुन्हा नावारुपाला यावं अशी लोकांची आस आहे. 
मात्र गेल्या तीस-चाळीस वर्षांत इथल्या पुरातन वास्तू, मठ आणि मंदिरांची साधी रंगरंगोटीही झालेली नाही, हे वास्तव आहे. काही लोकांनी तर या शहराचं ‘कोसळणार्‍या इमारतींचे शहर’ असंही नामकरण करून टाकलं आहे. 
जे लोक वृंदावनला जाऊन आले आहेत, ते कायम तिथलं उदाहरण देत असतात. तिथल्या धार्मिक आणि ऐतिहासिक वारशांचं कसं जतन-संवर्धन करण्यात आलं आहे, याचे दाखले देत असतात. 
स्थानिक लोक सांगतात, इथे आजवर घोषणा तर भरपूर झाल्या, पण कारखाने आणि उद्योगांचा मात्र अजूनही अभावच आहे.
लंकेवरील विजयाचं प्रतीक!
पूर्वीच्या काळी प्रसिद्ध असलेली अनेक शहरं काळाच्या ओघात नंतर नष्ट झाल्याचा इतिहास आहे. अयोध्याही किती वेळा वसली आणि उद्ध्वस्त झाली याची गिणती नाही. अपवाद एकच, तिथला ‘हनुमान टिला’! हाच परिसर आज ‘हनुमान गढी’ म्हणून प्रसिद्ध आहे. 
लंकेवर विजय मिळवून र्शीराम जेव्हा परत आले, तेव्हा विजयाचं प्रतीक म्हणून काही वस्तू सोबत आणल्या. त्या वस्तू याच मंदिरात ठेवल्या आहेत, असं मानलं जातं. खास प्रसंगी या वस्तू बाहेर काढल्या जातात आणि त्यांची पूजाअर्चा केली जाते. 
हनुमानगढीवर कोणाचाच अधिकार नाही!
महाबली हनुमान जिवंत आहेत, अशी अनेक हिदूं भाविकांची र्शद्धा आहे.  राजद्वाराच्या समोर असलेल्या हनुमान गढीत आजही हनुमानाचं वास्तव्य असल्याचं अयोध्येत मानलं जातं. 
अयोध्येत अशी मान्यता आहे की, भगवान रामानं हनुमानाला सांगितलं होतं, जो कोणी भक्त माझ्या दर्शनासाठी अयोध्येला येईल, त्याला आधी तुझं दर्शन-पूजन करावं लागेल. त्यामुळेच या मंदिरात आल्यावर आपल्या मनोकामना पूर्ण होतात, यावर भाविकांची गाढ र्शद्धा आहे. 
तत्कालिन नवाबानं हनुमान गढी मंदिराचा केवळ जिणोद्धारच केला नाही, तर ताम्रपत्रावर लिहून दिलं की, या मंदिरावर कोणताही राजा किंवा राज्यकर्त्याचा अधिकार असणार नाही  किंवा देवळातून कर वसूल केला जाणार नाही. नवाबानं 52 बिघे जमीनही दान केली होती, अशीही भाविकांची र्शद्धा आहे. 

स्वर्गाशी तुलना 
अयोध्या मथुरा माया काशी 
काञ्ची अवन्तिका ।
पुरी द्वारावती चैव 
सप्तैता मोक्षदायिका:॥
गरुड पुराणात वर्णन केलेल्या या ोकाचा अर्थ आहे, अयोध्या, मथुरा, हरिद्वार, काशी, कांचीपुरम, उज्जैन आणि द्वारका ही स्थळं मोक्षदायी आहेत. अनेक धर्मग्रंथांमध्ये ईश्वराला नगर म्हटलं गेलं आहे आणि त्याची तुलना स्वर्गाशीही करण्यात आली आहे. 

vikas.mishra@lokmat.com
(लेखक लोकमत समाचारचे संपादक आहेत.)

Web Title: Ayodhya... the changing face of city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.