विचारस्वातंत्र्यांची हत्या
By Admin | Updated: August 30, 2014 15:05 IST2014-08-30T15:05:28+5:302014-08-30T15:05:28+5:30
एका माणसाचा गळा आपल्या डोळ्यांदेखत चिरला जाणं हा विचारही अंगावर काटा आणतो; पण हे अमानुष क्रौर्य अवघ्या जगानं पाहिलं.. दहशतवाद्यांनी जेम्स फॉयल नामक पत्रकाराला मारून त्याचा व्हिडीओ जगभर दाखवला. विचारस्वातंत्र्यासाठी धडपडणार्यांचा आवाज दाबण्याची ही पहिली घटना नव्हतीच. काय आहे या जगातलं धगधगतं वास्तव?..

विचारस्वातंत्र्यांची हत्या
निळू दामले
जेम्स फॉयल या अमेरिकन छायापत्रकाराचा शिरच्छेद आयसिस या दहशतवादी संघटनेच्या माणसानं इराकमध्ये केला. जेम्स फॉयल २0१२ पासून सीरियात होता. त्याचं अपहरण करण्यात आलं होतं. कोणी म्हणतं, की असदच्या लोकांनी त्याला पकडलं होतं, कोणी म्हणतं, की आयसिसनं पकडलं होतं. अमेरिकेनं जंग जंग पछाडलं पण, त्याचा पत्ताही लागू शकला नाही. अचानक त्याच्या शिरच्छेदाची व्हिडीओ क्लिप दाखवण्यात आली तेव्हा त्याचा पत्ता लागला. ब्रिटिश धाटणीचं बोलणार्यानं शिरच्छेद केला होता. अमेरिकेनं इराकमध्ये आयसिसवर हवाई हल्ले केल्याचा निषेध आणि इशारा म्हणून हा उद्योग आयसिसनं केला.
फॉयल धाडसीच. लिबियाचे हुकूमशहा गद्दाफी यांच्याविरोधात २0११ मध्ये बंड झालं तेव्हा त्याच्या छायाबातम्या करण्यासाठी जेम्स लिबियात गेला होता. गद्दाफीच्या लोकांनी त्याला पकडलं. पण काही दिवसांनी त्याला सोडलं होतं.
फॉयलच्या शिरच्छेदानंतर पीटर थिओ कर्टिस या अमेरिकन पत्रकाराची सुटका झाली. पीटरही २0१२ पासून सीरियात हरावलेला होता. एके दिवशी त्याला युनायटेड नेशनच्या अधिकार्याच्या हाती इस्रायल-सीरियाच्या हद्दीवर सोपवण्यात आलं आणि तो इस्रायलमध्ये तेल अवीवमध्ये अमेरिकन
दूतावासात दाखल झाला. कतार सरकारनं त्याची सुटका केली होती.
अपहरण करणार्या संघटनेनं २.५ कोटी डॉलरची खंडणी मागितली होती. अमेरिकन सरकारचं म्हणणं असं, की खंडणी न देता कतार सरकारनं मानवी कसोटीवर त्याची सुटका साधली होती.
फॉयल, पीटरसारखे किती तरी पश्चिमी पत्रकार इराक, सीरिया, गाझा, लेबनॉन, पाकिस्तान, अफगाणिस्तान इत्यादी धगधगत्या देशात बातमीदारी करत आहेत, गेली कित्येक वर्षे. पाकिस्तानात डॅनियल पर्ल होता, दहशतवाद्यांनी त्याचा खून केला. हे पत्रकार धाडसी असतात, पण वेडे नसतात. खूप विचार करून, पूर्व तयारी करून ते वावरतात. धगधगत्या ठिकाणी जाण्यापूर्वी ते आणि त्यांचं माध्यम याचा आधी सखोल अभ्यास करतात. किती धोका कुठं पत्करता येईल, याचा विचार करतात. गडबड झाली तर कुठं मागं फिरता येईल, याचा विचार केलेला असतो. बहुतेक वेळा अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स इत्यादी देशांचं लष्कर, गुप्तवार्ता खातं यांच्याशीही त्यांचा संबंध असतो.
त्या त्या देशातले पत्रकार या बाहेरून येणार्या पत्रकारांना माहिती देतात, थारा देतात, मदत करतात. त्यांची राहायची, फिरायची सोय करतात. स्थानिक पत्रकारांचे ‘कॉन्टॅक्ट्स’ असतात, त्यांना सारं काही माहीत असतं. दहशतवादी संघटनाही त्यांना माहीत असतात. दहशतवाद्यांचे अड्डे, दहशतवादी त्यांना माहीत असतात. त्यामुळं त्यांच्याच आधारे हे पत्रकार धगधगत्या प्रदेशात हिंडू शकतात. या खटाटोपात हे धाडसी पत्रकार स्थानिक पत्रकारांना धोका पत्करण्याबद्दल व व्यावसायिक मानधन म्हणून पैसेही देतात. कधी कधी स्थानिक पत्रकार व्यावसायिकतेचा भाग म्हणून पैसे न घेताही मदत करतात.
कधी तरी थारा देणारा स्थानिक पत्रकार फुटतो. पैशाच्या बदल्यात तो बाहेरून आलेल्या पत्रकाराची माहिती दहशतवाद्यांना देतो. कधी कधी पत्रकार दबावाखाली येऊन बाहेरच्या पत्रकाराला उघडं पाडतो. त्याचा नाईलाज होतो. दहशतवादी आणि पत्रकार यांच्यात अनेक वेळा एक अलिखित करार असतो. पत्रकाराच्या लिखाणाचा फायदा दहशतवाद्यांच्या विचारांना प्रसिद्धी मिळण्यात होत असल्यानं दहशतवादी पत्रकाराशी सावध संबंध ठेवतात. दहशतवाद्यांमध्येही गट असतात. एक गट पत्रकाराचा सावध वापर करू म्हणणारा असतो, एक गट पत्रकाराला पकडून खंडणी घ्यावी या मताचा असतो. खंडणी हे दहशतवाद्यांचं एक उत्पन्नाचं महत्वाचं साधन असतं. अशी खंडणी हा आयसिसच्या अस्तित्वाचा मोठा भाग आहे.
डॅनियल पर्ल याच रीतीनं अल कायदाच्या दहशतवाद्यांच्या हातात सापडला होता. पीटर किंवा फॉयलही अशाच रीतीनं सापडला असावा. गेल्या महिन्यात सीरियात काम करणारा असाच एक पत्रकार तुर्कस्तान आणि सीरियाच्या हद्दीवर अल कायदाच्या हातात सापडला होता. त्याला आश्रय देणारा पत्रकार उलटला होता. नंतर तो आयसिसच्या तावडीतून मोठय़ा धाडसानं पळून सुटला. त्याची बीबीसीवर मुलाखत झाली. स्टीवन सॅकरनं त्याला विचारलं, की आता तू काय करशील. त्यावर तो पत्रकार शांतपणे म्हणाला, की मी पुन्हा इराक-सीरियामधे जाणार आहे.
सरळ चाललेलं युद्ध, नैसर्गिक संकट इत्यादी ठिकाणी वावरतांना मरणाचा धोका पत्रकारांना पत्करावा लागतो. त्या वेळी त्याची बाजू बळकट असते. माणसं त्याच्या बाजूनं असतात, एखाद्या देशाचं सैन्य त्याच्या बाजूनं असतं. युद्धभूमीवर असताना दोन्ही बाजूच्या सैनिकांचा राग त्या पत्रकारावर नसतो. एका परीनं तशा परिस्थितीत धोके र्मयादित असतात. दहशतवादी वातावरणात काम करणं हा प्रकार अगदीच वेगळा असतो. तिथं कोणतेही कायदे लागू होत नाहीत. मानवताही नसते. सगळा प्रकार चोरीमारीचा, लपवाछपवीचा. दहशतवादी माणसं समाजभर पसरलेली असतात. पाकिस्तान, अफगाणिस्तान, लिबिया, इजिप्त, सीरिया, इराक, लेबनॉन इत्यादी ठिकाणी फिरताना आपल्या शेजारचा माणूस साधा नागरीक आहे, की एखाद्या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे ते कळायला मार्ग नसतो. त्यातही आणखी एक भानगड म्हणजे अनेक दहशतवादी संघटना असतात आणि प्रत्येक दहशतवादी संघटनेत अनेक गट असतात. अनेक संघटना आणि अनेक गट यांच्यात संयोजन नसतं, मेळ नसतो, बहुतेक वेळा त्यांच्यात वैरच असतं. अशा अत्यंत अनिश्चित स्थितीत पत्रकार किंवा कोणाही माणसाला साधं वावरणंही फार कठीण असतं. कराचीत आज कोणाचंही अपहरण होतं. अगदी लष्करी आणि पोलीस अधिकार्यांचंही. सलमान तासीर या पंजाबच्या गव्हर्नरच्या सुरक्षा ताफ्यातच एक दहशतावादी होता. त्यानं सलमानच्या शरीरात वीस- बावीस गोळ्या उतरवून त्याला जागच्या जागी ठार केलं.
दहशतवादी संघटनेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या संघटनेला बलशाली माणसं, संघटना, देश यांचा पाठिंबा असतो. त्यामुळं ते कोणाचंही अपहरण करू शकतात. वरिष्ठ पदावरचे लष्करी अधिकारीही ते पळवून नेतात. खैबर पख्तुनख्वामधे पाक लष्कराचे अधिकारी चक्क रणगाड्यांतून आणि सैनिकांच्या गराड्यात फिरत असतात. केव्हाही आपल्याला तालिबान, अल कायदावाले पळवू शकतात, याची भीती त्यांना असते. पीटरला सीरियातल्या अल कायदाच्या हातून कतार सरकार सोडवू शकलं, कारण कतार सरकार आणि दहशतवादी संघटना यांच्यात गॅटमॅट आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तानातल्या दहशतवादी संघटनांना सौदी अरेबिया, कतार, इराणी इत्यादी देशांतून पैसे आणि शस्त्रं पुरवली जात असतात. इजिप्तमधे मुस्लिम ब्रदरहूड ही दहशतवादी संघटना सक्रिय आहे आणि कतार सरकार त्या संघटनेला मदत करत असतं.
पश्चिमी पत्रकार या अशा अत्यंत गुंत्याच्या स्थितीत विचारपूर्वक, तयारीपूर्वक धोका पत्करून काम करतात. आपल्या दैनिकाच्या एअरकंडिशन्ड खोलीत बसून ‘लढा, आगे बढो, शत्रूचा खातमा करा’ असे सल्ले देण्याची पद्धत तिथं नाही. दहशतवादी, बॉम्ब, गोळ्या, राजकीय पुढारी, धनदांडगे, भ्रष्ट नोकरशहा, भ्रष्ट मंत्री, भ्रष्ट राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्याशी पंगा घेण्याची परंपरा त्या देशांत आहे. हे कामही एक व्यावसायिक काम आहे, असं मानलं जातं. धोका पत्करलेल्या किंवा मृत झालेल्या पत्रकारांना रत्न पुरस्कार द्यावा, सरकारनं त्याच्या कुटुंबीयांना मदत करावी इत्यादी कोलाहल त्या देशांत होत नाहीत. सत्कार-बित्कार तर अजिबात होत नाहीत. पत्रकार आपापली कामं शांतपणे करत राहतात.
दहशतवादी संघटना अनेक असतात. प्रत्येक दहशतवादी संघटनेत अनेक गट पडलेले असतात. या संघटना आणि गट यांच्यात मेळ नसतो. अनेकदा त्यांच्यात वैरच जास्त असतं. अशा अनिश्चित स्थितीत पत्रकार किंवा कोणाही व्यक्तीला नुसतं वावरणंही कठीण असतं. कधीही कोणाचंही अपहरण होईल, अगदी लष्करी आणि पोलीस अधिकार्यांचंही. सलमान तासीर या पंजाबच्या गव्हर्नरच्या सुरक्षा ताफ्यातच एक दहशतवादी होता. त्यानं सलमानच्या शरीरात वीस बावीस गोळ्या उतरवून त्याला जागच्या जागी ठार केलं.
(लेखक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान, पॅलेस्टाईन, तुर्कस्तान आदी देशांतील दहशतवादाचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे.)