सुगंधदान

By Admin | Updated: November 14, 2014 21:47 IST2014-11-14T21:47:48+5:302014-11-14T21:47:48+5:30

ना. धों. महानोरांच्या कवितेच्या या ओळी निसर्गाच्या सुगंधी दानाची महती अगदी सर्मपक शब्दांत व्यक्त करतात

Aroma | सुगंधदान

सुगंधदान

प्र.डॉ. वर्षा गंगणे (लेखिका प्राध्यापक आहेत) - 

निसर्गाने मानवाला मुक्तहस्ते भरभरून सुगंधाचे दान दिले आहे. निसर्गाच्या विविध रंगछटा आणि त्यातील परिमल मनाला सुखावून जाणारा, प्रसंगी भान हरपायला लावणारा असतो. ऋतूंप्रमाणे ऋतुगंधदेखील बदलत जाणारे! माणसाचे जीवनदेखील तसेच प्रत्येक वळणावर बदलणारे. सुगंध आणि आयुष्याचे नाते मुळातच अतुट, सुंदर, तसेच अनाकलनीय असेच म्हणावे लागेल. 

सुगंधाची उधळण होताच तो श्‍वासात किती साठवावा आणि किती नाही, असे वाटते. मनात उत्साहाची कारंजी थुईथुई नाचू लागतात. उदास आणि मरगळलेल्या मनात चैतन्य निर्माण होते. चराचरातून आनंद आणि ताजेपणा प्रसवू लागल्याचे आभास होतात. एखादी अत्तराची डबी सांडावी अन् त्याचा सुगंध सभोवताली पसरावा किंवा एखादे कस्तुरीमृग बेभान होऊन पळत सुटावे अन् सुगंध वार्‍यासवे रानभर व्हावा, तशी काहीशी मनाची अवस्था होते. सुगंधाचे नाते प्रत्येक प्रसंगी, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपली वेगळी ओळख, आभास व अमिट छाप उमटवून जाते. सुगंधाचे अस्तित्व नसले, तरी त्याचा आभास, त्याचा परिमल सभोवती दरवळत राहतो.
विज्ञानाने बरीच प्रगती केली. कृत्रिम पद्धतीने अनेक रासायनिक प्रक्रियांद्वारे सुगंधी अत्तरे तयार करण्यात आलीत, पण.. नैसर्गिक सुगंध कुठे आणि कसे तयार होतात त्याचा शोध मात्र अद्याप लागलेला नाही. त्यासाठी वर्षानुवर्षे बरेच संशोधन करावे लागेल. विशिष्ट ऋतूत, विशिष्ट वातावरणाशी या सुगंधाचे नाते अतूट, जन्म-जन्मांतरीचे असल्यासारखे अजूनही तेवढेच पक्के आणि अतूट असे आहे. या सुगंधाची प्रतीक्षा चराचरातील प्रत्येक सजीवाला असते, हे मात्र त्रिकालाबाधीत सत्य आहे.
‘‘या भुईने या नभाला दान द्यावे
आणि या मातीतूनी चैतन्य गावे’’
ना. धों. महानोरांच्या कवितेच्या या ओळी निसर्गाच्या सुगंधी दानाची महती अगदी सर्मपक शब्दांत व्यक्त करतात. व्योम आणि वसूचे सुंदर, सुगंधी आणि अनुपम नाते रवींद्र साठेंनी आपल्या आवाजातून सुगंधी केले आहे. पहिल्या पावसाचे दान भुईला मिळाले, की मातीतून मृद्गंध पसरतो, या गंधाची तुलना या पृथ्वीवर अतुल्यच! मातीचा सुवास आसमंतात पसरला, की पाऊस येण्याची चाहूल लागते. तन-मन प्रसन्न होऊन उत्साहाने भरून येते. धरणीला मिळालेले सर्वांत मोठे सुगंधाचे दान म्हणजे अत्तराची शिंपण करीत येणारा मृगाचा पहिला पाऊस! मृद्गंधासवे पुलकीत होणारी सृष्टी तिच्या अनुपम लावण्याने खुलून येते. पाना-फुलांना नवी लकाकी येते. या मृद्गंधासवे वारा बेभान होऊन पळत सुटतो. मदमस्त, मधुमालती, आपल्या हिरव्याकंच देहावर टपोर्‍या मधाळ पिवळसर कलिकांचे घोस खोवतात अन् पहाट सुगंधाचा शेला लपेटून येतो. मोगरीच्या वेलीवर सुगंधी चांदणे उमलते. अंगणाच्या अंगांगाला मादक, स्वप्नील सुवास येतो. मन मोगर्‍यासवे फुलत जाऊन स्वप्नांच्या हिंदोळय़ावर झोके घेऊ लागते. मातीचा सुवास जमिनीशी एकरूप होतो न होतो तोच जुईची वेल इवल्याशा कळय़ांच्या घोसांसवे लगडून जाते. पावसाचे टपोरे थेंब तिचा सुगंध प्राशण्यास आतूर झालेले असतात. इतके, की जुईची शुभ्र पांढरी फुले आरसपानी होतात. रातराणी फुलारून यौवनात येते अन् वसुधा सुगंधाने वेडी होते. रानातली वाळकी ओसाड वाट हिरवाईचे दान घेऊन भरात येते. एक मोहक, उग्र सुवास पाला-पाचोळय़ातून आसमंतात पसरतो. त्या उग्र दर्पाशी खूप जुने नाते असल्याची खूण पटते, कारण हा दर्प आणि सृष्टीचे वैभव यांचे अगदी घट्ट नाते आहे, असे वाटते.
ऋतू बदलले, की ऋतुगंध बदलतात. प्रत्येक ऋतूचे वैभव वेगळे, तसेच गंधाचे लावण्यदेखील वेगळे असते. मृगाच्या पहिल्या थेंबानंतर मातीतून येणारा सुगंध आणि वैशाखात पोळलेल्या मनाला एखाद्या जांभळय़ा ढगातून मिळालेल्या सरींचे दान दोन्ही तेवढेच महत्त्वाचे! अप्रतिम, वर्णनातीत असेच! चाफ्याचा साज लेवून उभी असणारी बाग, निशिगंधी तुर्‍याचे वार्‍यासवे डोलणे, पारिजातकाची हसरी फुले किंवा गंधाळलेले मोहबन, सगळेच मोहक, हवेहवेसे वाटणारे. वसंताच्या वैभवाचा थाट जेवढा देखणा तेवढेच शरदाचे टिपूर चांदणेही सुंदर. फुलांमधून येणार्‍या सुगंधासवे पाखरांची गाणीदेखील सुगंधी होतात. पश्‍चिमा या सुगंधावर आरक्त होऊन क्षितिजाशी एकरूप होते अन् गुलाली मुग्ध पहाट एका अनामिक सुगंधासवे दारात येते. निसर्गाने आपल्यासाठी उधळलेल्या या सुगंधी अत्तराचे वर्णन करावे तेवढे अपुरे आहे. 
माणसाचे व सुगंधाचे एक अतूट नाते असावे, असे मला नेहमीच वाटते. एखाद्या मधुर प्रसंगाची आठवण करून द्यायला शब्द नसले, तरी सुगंध पुरेसा असतो. नात्यांची घट्ट वीण भावनांच्या सुगंधी धाग्यांनीच विणली जाते. मनाच्या तारा सुगंधी सुरांनीच जोडल्या जातात. मधुर शब्दांची फुले होतात अन् जीवनाला सुगंधी धुमारे फुटतात. जगातील सर्वांत सुखी असणारी व्यक्ती याक्षणी मी आहे, याची प्रचिती या सुगंधामुळेच येते.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावरील सुगंधाच्या सुवासिक आठवणी आपल्या सभोवताल नेहमीच पिंगा घालीत असतात. एकांतातदेखील तो परिमल आपल्या आसपास दरवळत असतो. अगदी तान्हुल्या बाळाच्या जावळांचा सुवास आईला जन्मभर लक्षात राहतो. त्या सुवासाने ती नेहमीच हुरळून जाते. जिवलगाने केसात माळलेला गजरा त्याच्या प्रेमळ स्पर्शासवे तिचे आयुष्य व त्यातील प्रत्येक क्षण सुगंधी करीत असतो, तर उतारवयात नातवाने वेचून आणलेली चाफा व प्राजक्ताची फुले आजीला सगळी दुखणी विसरायला लावतात. घराचे पावित्र्य राखण्यासाठी लावलेल्या धुपाचा सुवास, उत्सव समारंभाप्रसंगी कुपीतून बाहेर आलेल्या केशर-कस्तुरीचा सुवास किंवा दाराशी असलेल्या सायलीचा सुवास सगळे आनंद व प्रसन्नता पसरविणारे, आवडणारे.. ऋतुगंधा प्रमाणे..!
मनालादेखील एक सुगंध असतो अन् तो जपला जाणेही तेवढेच महत्त्वाचे असते. निसर्ग जसा आपले सुगंध जपून ठेवतो, त्याचप्रमाणे मानवी मनानेही आपले सुगंध व सौंदर्य जपून ठेवणे आवश्यक आहे. आजच्या धावपळीच्या युगात, सिमेंटच्या जंगलात, बंदिस्त बंगल्यात, नैसर्गिक सुगंधाला थारा राहिलेला नाही. मोकळा श्‍वास घ्यायला स्वच्छ व शुद्ध हवा नाही. त्यामुळे मनातील सुगंधदेखील हरवत चालला आहे आणि त्यामुळेच की काय नाती दुभंगत चालली आहेत. 
आपुलकी, माया, प्रेम आटत चालली आहेत. डोळय़ांमधील भाव वाचायला वेळ उरला नाही. पाखरांची किलबिल ऐकायला मोकळे आकाश राहिले नाही. सुगंधाची उधळण बंद बाटल्यांमधून करावी लागते, ती क्षणिक टिकणारी असते, अगदी आजच्या भंगलेल्या नात्यांसारखी.
ध्यान लावून बसले असताना बंद डोळय़ासमोर येणार्‍या आराध्याची प्रतिमा, नकळत मिळणारा गुरूउपदेश, ती मंगल अनुभूती होतानाही एक वेगळा सुगंध मनाच्या गाभार्‍यात दरवळतो आणि आत्मशक्ती मिळून मन:शांतीची जाणीव होते. या सुगंधाचे वर्णन करणे अशक्य आहे; पण अनुभवातून त्याची प्रचिती येणे म्हणजे अनुपम आनंदाची सुगंधयात्राच! 
असे ध्यानमग्न होण्यास, एखाद्या निवांतक्षणी निसर्गाचे देखणे रूप बघण्यास, त्यातील आनंद वेचण्यास, सुगंध प्राशण्यास वेळ राहिला नाही म्हणूनच आजचा माणूस कालच्या माणसासारख्या आनंदाने बेहोश होत नाही. सौंदर्याने मुग्ध होऊन नाचत नाही. पावसाच्या सरी अंगावर घेण्यास उत्सुक राहत नाही. कदाचित म्हणूनच महानोरांसारखे शब्द फुलून येत नाहीत. पापणीला पूर येत नाही.
‘गुंतलेले प्राण ह्या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
शब्दगंधे तू मला बाहुत घ्यावे
या नभाने या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतूनी चैतन्य गावे’
महानोरांप्रमाणे आपणही सुगंधाचे दान या नभाला मागू या..!
 

Web Title: Aroma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.