सौंदर्यवादी चित्रपकलेचा दीपस्तंभ
By Admin | Updated: October 4, 2014 19:21 IST2014-10-04T19:21:49+5:302014-10-04T19:21:49+5:30
आपल्या देशाचा राष्ट्रीय ठेवा असणार्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांमधील एक संपन्न व्यक्तिमत्त्व म्हणजे ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे. येत्या ८ ऑक्टोबरला ते वयाच्या ८0व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. या निमित्ताने त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा व योगदानाचा मागोवा घेण्याचा हा प्रयास.

सौंदर्यवादी चित्रपकलेचा दीपस्तंभ
गोपाळ नांदुरकर
जाणत्याचे जाणावे प्रसंग।। जाणत्याचे घ्यावे रंग।।
जाणत्याचे स्फूर्ति तरंग।। अभ्यासावे।।
(दासबोध १८/२/१२)
श्री सर्मथ रामदासस्वामी दासबोधातील सर्वज्ञसंग निरूपणात थोर प्रतिभावंत, ज्ञानवंत व्यक्तींच्या सहवासाचे फायदे व प्रयोजन सांगताना वरील ओवी लिहितात आणि अशा महनीय व्यक्तिमत्त्वांचे आपल्या आयुष्यातील महत्त्व अधोरेखित करतात. आपण भाग्यवान आहोत, की आजही आपल्या समाजात विविध क्षेत्रातली थोर मंडळी विद्यमान आहेत, त्यांचे योगदान ही आपली सामाजिक व सांस्कृतिक संपत्ती ठरली आहे. याच मांदियाळीतले एक संपन्न व्यक्तिमत्त्व म्हणजे माझे गुरू ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे. येत्या ८ ऑक्टोबरला परांजपे सर वयाच्या ऐंशीव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्ताने त्यांच्या प्रदीर्घ कलाकारकिर्दीचा व योगदानाचा मागोवा घेताना सर्मथांना अभिप्रेत असणारा अभ्यासक दृष्टिकोन बाळगावा असे मला वाटते. एखाद्या पैलूदार हिर्याप्रमाणे अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे विविधांगी दर्शन आपल्याला संपन्न बनवीत असते. ज्या कालखंडात आपल्यासमोर आदर्शतेचा मानदंड खंबीरपणे उभा असावा लागतो तो मानदंड मला परांजपे सरांच्या ठायी गवसला. त्यांच्या सहवासात मला सतत जाणवत आली परांजपे सरांची अजोड रेखांकन क्षमता अर्थात ड्रॉईंगवरचे त्यांचे असामान्य प्रभुत्व, त्यांचे अनोखे चित्ररचना कौशल्य व रंगभान, त्यांना गवसलेली स्वशैली आणि सतत विकसित होत जाणारी प्रगल्भ सौंदर्यदृष्टी, या सर्व गुणांच्या आधारे स्वशैलीला वेळोवेळी पाडलेले कलात्मक पैलू आणि त्यातून निर्माण होणारी त्यांची अप्रतिम चित्रनिर्मिती हे सारेच माझ्यासारख्या अनेक चित्रकारांसाठी कायमच प्रेरणादायी व आदर्श राहिले आहेत. त्याचबरोबरीने जाणवलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे चित्र आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व यातले साम्य. त्यांच्या कारकिर्दीच्या प्रत्येक टप्प्यावरील उच्च कलात्मक दर्जा राखणार्या चित्रकृतीत सरांचे व्यक्तिमत्त्व पूर्णत: मिसळलेले दिसते.
सरांचा जन्म बेळगाव येथील कृ. रा. परांजपे या सुसंस्कृत, कलासक्त, व्यासंगी व ध्येयवादी शिक्षकाच्या घरात झाला व त्या संस्कारातच सरांचा पिंड जोपासला गेला. बेळगावात लाभलेले निसर्गसपंन्न व कलासंपन्न वास्तव्य, त्यात लाभलेले शास्त्रीय संगीताचे व सौंदर्यवादी वास्तवदश्री चित्रकलेचे संस्कार यातून त्यांच्यातला कलावंत बहरला. बेळगावचे ज्येष्ठ चित्रकार के. बी. कुलकर्णी यांच्या चित्रमंदिर या संस्थेतून त्यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतले व मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथे परीक्षा देऊन कलाशिक्षण पूर्ण केले. नवोदित कलावंतांच्या वाट्याला येणारे चढउतार अनुभवतच मुंबईच्या जाहिरात क्षेत्रात इलस्ट्रेटर म्हणून कामास सुरुवात केली. विद्यार्थिदशेत प्राप्त केलेल्या ज्ञानाला व कलाकौशल्याला पैलू पडले ते इलस्ट्रेशन या सतत नवनिर्मितीची मागणी करणार्या आव्हानात्मक क्षेत्रामुळे. याच कालखंडात सरांना स्वशैलीची बीजे गवसली आणि इलस्ट्रेशनच्या क्षेत्रात मुंबई आणि नैरोबी येथे विपुल काम करून आपल्या स्वतंत्र शैलीची ओळख निर्माण करत त्यांनी अग्रगण्य स्थान प्राप्त केले. १९७३ मध्ये सरांनी मुंबईत स्वत:चा स्टुडिओ सुरू केला. इलेस्ट्रेशनच्या कामाबरोबरच वास्तुप्रकल्पाचे संकल्पचित्र म्हणजे आर्किटेक्चरने तयार केलेल्या वास्तूच्या प्लॅननुसार उभी राहणारी वास्तू प्रत्यक्षात कशी दिसेल ही संकल्पना स्पष्ट करणारे चित्र साकारण्याचे काम सरांकडे आले. त्या चित्रातील नेत्रपातळी, इमारतीची प्रमाणबद्धता, यथार्थदर्शन या तांत्रिक गोष्टी बिनचूक चित्रित करताना त्या चित्राला खास परांजपे शैलीचे कोंदण लाभले आणि त्यांची वास्तुचित्रे उच्च कलात्मक दर्जाला पोहोचली. कामाचा मोठा ओघ येऊ लागला. पुढील १0 वर्षांहून अधिक काळ अविश्रांत मेहनत आदर्श व्यावसायिकता सांभाळत सरांनी या क्षेत्रात भरीव योगदान दिले. या बहरलेल्या कारकिर्दीतच स्वत:तला चित्रकार सजग व नवनिर्मितीक्षम ठेवण्यासाठी सुट्टीच्या दिवशी प्रत्यक्ष निसर्गचित्रणासाठी बाहेर पडणार्या परांजपे सरांनी १९८0 साली स्वत:चे पहिले चित्रप्रदर्शन मुंबईच्या जहांगीर कला दालनात भरवले. ते रसिकमान्य व यशस्वी ठरले; पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय चित्रकलेत शिरलेल्या नवकलेच्या वादळात कलेची अभिजात मूल्ये व कलेचे तंत्रशुद्ध शास्त्र या गोष्टी मोठय़ा प्रमाणात बाधित झाल्या. त्याचा फार वाईट परिणाम चित्रकला क्षेत्रावर झाला आणि आजही होतो आहे. त्या पार्श्वभूमीवर सरांच्या सुबोध सौंदर्यवादी चित्रांवर टिकाटिप्पणी झाली. या टीकेकडे गांभीर्याने पाहत सरांनी चित्रकलेच्या जागतिक परंपरेचा सखोल अभ्यास केला. तिथे निर्माण झालेले मतप्रवाह व त्यांची तात्कालिक परिस्थिती अभ्यासली. त्यात जाणीवपूर्वक घुसवलेला अपप्रचार पाहिल्यावर त्यातला फोलपणा जाणून घेतला; पण त्याबरोबरच पूर्वसूरींच्या अभ्यासाच्या अभ्यासातून चित्रपरंपरा कायम पुढे नेणारा व त्यात काळानुरूप नवसर्जनाचे योगदान देऊन कलाइतिहास समृद्ध करणारा सर्जनशक्तीचा एक ऊर्जास्रोतच त्यांना दिसला. त्यातले थोर चित्रकार मग सरांनी गुरुस्थानी मानले. त्यांची निर्मिती अभ्यासली आणि तेव्हापासून कलेच्या अभिजात मूल्यांशी बांधिलकी सांभाळत चित्रकार म्हणून तरल संवेदनशीलतेने जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बाळगत सगुण-निगरुणाच्या मिलाफातून कलात्मक अभिव्यक्ती करणे हाच सरांच्या निर्मितीचा आदर्श राहिला.
त्याबरोबरच सुबोध सौंदर्यवादी चित्रशिल्प निर्मितीचा उद्देश, अशा कलेचा प्रचार-प्रसार, त्यातून घडणारे रसिकजन, त्यांच्यातून विकसित होणारे समाजमन आणि त्याद्वारे साधले जाणारे वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय हीत असा एक प्रबळ धागा प्रगत राष्ट्रांमध्ये अस्तित्वात असलेला सरांना जाणवला. मग त्यांच्यातला विचारवंत भारतीय कला, संस्कृती, परंपरा, वारसा आणि इतिहास या सार्याकडे निराळ्या दृष्टीने पाहू लागला. आपले गतवैभव विसरलेल्या आजच्या सौंदर्यविरोधी भारतीय समाजरचनेचे चित्र पाहून व्यथित होऊन त्यांनी सौंदर्यवादी कला व समाजरचनेचा आग्रही विचार आपल्या लेखनातून सातत्याने मांडला. त्यांच्या ‘शिखरे रंग-रेषांची’, ‘ब्रश मायलेज’ (आत्मचरित्र), ‘निलधवल ध्वजाखाली’ आणि ‘तांडव हरवताना’ या पुस्तकांद्वारे याच विचारधारेला त्यांनी शब्दबद्ध केले आहे. त्यांच्या चित्रनिर्मितीचे पैलू दाखवणारी पाच पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. अशा या ज्ञानसंपन्न, प्रतिभासंपन्न, विचारसंपन्न कलावंताकडे समाजातील विविध क्षेत्रांतल्या सजग नागरिकांनी जाणीवपूर्वक पाहायला हवे, त्यांचा सर्जनप्रवास अभ्यासायला हवा, त्यातला कलावंत घ्यायला हवा. त्यांचे विचारधन वाचायला हवे. त्यावर मनन-चिंतन व्हायला हवे. त्यामुळे आपल्याला जीवनातल्या ‘सत्यम्-शिवम्-सुंदरम’चा साक्षात्कार निश्चितच होईल!
(लेखक चित्रकार आहेत.)