शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
5
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
6
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
7
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
8
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
9
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
11
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
12
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
13
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
14
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
15
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
16
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
17
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
18
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
19
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
20
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!

मनोवेधक शुकसारिका

By admin | Updated: October 25, 2014 13:54 IST

स्त्रियांच्या सौंदर्याने बहरलेल्या शुकसारिकांची यथास्थित वर्णने करणार्‍या अनेक लेखकांच्या लेखणीलाही थिटे पाडणार्‍या सिद्धहस्त शिल्पींच्या इवल्याशा छिन्नी-हातोड्याची किमया काही औरच आहे. ही कोरीव शिल्पे खरोखरच दृष्ट लागण्याएवढी श्रेष्ठच आहेत. अशाच शुकसारिका शिल्पांची ही ओळख.

 डॉ. किरण देशमुख

 
भारतात मंदिर स्थापत्याचा उद्गम निश्‍चित केव्हा झाला, याविषयी अभ्यासकांत मतभेद असले; तरीपण सामान्यत: थेट सिंधू संस्कृतीच्या वैभवशाली काखंडापासूनच आपल्या देशात देव, देवपूजा आणि देवालये या अभिनव संकल्पना समाजाने स्वीकारल्या, असे अनुमान काढता येते. 
‘प्रतिष्ठाना’च्या (पैठण, जि. औरंगाबाद) सातवाहनकालीन मंदिरांचे अवशेष जरी अद्यापपर्यंत उपलब्ध होऊ शकलेले नाहीत, तरीपण त्या वेळच्या साहित्यात देवळारावळांचे उल्लेख आढळतात. त्यापुढील काळात तर, मंदिरशास्त्र एवढे प्रगत आणि प्रगल्भ झाले, की मंदिरांची उभारणी केवळ देवदेवतांचे निवासस्थान एवढय़ापुरतीच र्मयादित न राहता, तेथील भव्य देवालये व त्यांच्यातील वरील प्रमाणबद्ध, आशयगर्भ असलेल्या विविध स्वरूपांतील मूर्ती म्हणजे आपल्या संस्कृतीचे महान तत्त्वज्ञान पिढय़ान् पिढय़ा लोकांपर्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने पोहोचविणारे एक प्रभावी ‘माध्यम’ म्हणूनच सर्वमान्य झाले, हे विशेष. प्राचीन देवळांवरील ‘नाना रूपे’ कोरलेल्या शिल्पाकृतींद्वारे आपल्याला सुखी जीवनासाठी ‘शब्दाविणे संवादिजे’ अशा शैलीने योग्य मार्गदर्शन मिळते. 
देवालयांवरील शिल्पावळीत देवदेवतांच्या सुबक मूर्तींबरोबरच सुडौल आणि सुंदरासुंदर अशा स्त्री प्रतिमांचाही समावेश होतोच. विविध चित्तवेधक रूपांतील अशा नारी-शिल्पांना म्हणायचे- सुरसुंदरी.
‘शिल्पप्रकाश’ या प्राचीन ग्रंथात सुरसुंदरींची संख्या १६, तर ‘क्षीरार्णव’ ग्रंथात ३२ एवढी सांगितली आहे. त्याच सुस्वरूपी यौवनिकेत असते- लोभसवाणी-शुकसारिका. 
‘पक्षिणो विविधा: कार्या: करेच शुकसारिका:।
एषा कन्या सुविख्याता विदिता शुकसारिका।। - असे मोठे सर्मपक वर्णन असलेल्या व लालचुटूक चोचीच्या सुंदर पोपटाला स्वत:च्या एका हातावर बसवून, त्याच्याशी मनीतल्या भावनांच्या हळुवारपणे गुजगोष्टी करणार्‍या सुरसुंदरीला म्हणायचे- शुकसारिका. शुक म्हणजे पोपट व सारिका म्हणजे सुंदर स्त्री. 
भारतीय समाज व पोपट यांच्यातील नाते प्राचीन काळापासूनच खूप घनिष्ठ आहे. देखणा, रंगीबेरंगी शुक पक्षिजनभावनांचा अविभाज्य घटकच बनलाय. त्याचे प्रतिबिंब आपल्या अनेकभाषी साहित्यात तसेच प्रांतोप्रांतीच्या शिल्पकलेतही उमटले आहेच. 
केवळ पाठांतर करण्याच्या वृत्तीला ‘पोपटपंची’ असे आपणच म्हणतो. तर, ग्रामीण भागात भविष्यकथनाच्या क्षेत्रात आजही देखण्या ‘राघू’चेच साह्य घेतात आणि वृक्षावरील कैरी वगैरेंसारखी फळे खाण्यासाठी योग्य झालीत की  नाही, याच्याही उत्तरासाठी पोपटाचीच मदत घ्यावी लागते. आम्रफल पाडाला आले, तरच राघोबा चोचीने त्याची चव चाखतात. सर्कशीतही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी छोट्याशा पोपटाला कसरती आणि करामती कराव्या लागतातच. लवचिक देहाच्या शुकसारिकेच्या डाव्या हातावरील पोपटाने आता तर भुर्रकन उडत जाऊन, भारतीय स्त्रियांच्या ठेवणीतील भरजरी, नक्षीदार, नाजूक ‘पैठणी’वरच ठाण मांडलेय, हे उल्लेखनीय वाटते. 
कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी- 
‘फळे मधुर खावया असति, नित्य मेवे तसे
हिरेजडित सुंदरी कनकपंजरीही वसे, 
अहर्निश तथापि तो शुक मनांत दु:खे झुरे, 
स्वतंत्र वनवृत्तिच्या घडिघडी सुखाते स्मरे- या शून्योक्तिद्वारे राघोबाच्या जीवनाची खरी व्यथा प्रतिपादन केली आहे. दिवाकर कृष्णांची ‘अंगणातील पोपट’ ही लघुकथा सर्वज्ञातच आहे. 
प्रचंड स्मरणशक्ती व लाघवी वाक्चातुर्यामुळे शुकाला ‘पांडित्या’चे भूषणही लाभलेय. पूर्वीच्या काळातील विद्वान कुबेरभट्टाच्या घरी असलेल्या शुकसारिकांनी सारे वेदवाड्मय मुखोद्गत केल्याचे उल्लेख बाणभट्टाच्या ‘हर्षचरित्’ ग्रंथात आढळतात. तर, ज्यांच्या घरीदारी वेद-मंत्रोच्चार उच्चारणे शुक असतील, तेच घर चतुरस्र पंडित मंडन मिश्रांचेच असल्याचे समजावे, असे शंकराचार्यांना सांगण्यात आले होते. अशा विद्वत्ताप्रचुर, वाक्चातुर्य लाभलेल्या ऐटबाज शुकाच्याच मुखातून परम्भागवत ऐकण्यासाठी देश-विदेशांतील भाविक श्रोते आजही शुकताल (उ. भारत) येथे नित्यनेमाने जातात.
मनुष्याच्या जन्म-मृत्यूचा संकेत दर्शविण्याशीही पोपटाचा संबंध आहेच. ‘हिरव्या चोळीवरी। राघू काढून पाहिला। तोचि दिवस राहिला।।’ या लोककाव्यातून अपत्यप्राप्तीचा संकेत मिळतो. तर, प्रणयपरायण पोपटाला ‘प्राणप्रतीक’ही मानले जाते. ‘मनुष्याचा देह पिंजरा असून, त्यातील प्राण म्हणजे राघू होय’- अशी संकल्पना त्यामागे आहे. म्हणून, एखाद्याच्या देहावसनाचा उल्लेख ‘राघू उडून गेला’ अशा सर्मपक रूपकाद्वारे केला जातो. 
प्रख्यात अमरकवींच्या : 
‘दम्पत्योर्निशी जल्पतीगृहशुकेनाकर्णितं यद् वच:
तत्प्रातगरुरुसन्निधौ निगदतस्तस्याति मात्रं वधू:। 
कर्णालम्बितपद्मरागशकलं विन्यस्य चंचूपुटे
व्रीडार्ता प्रकरोति दाडिमफलव्याजेन वाग्बन्धनम्।।’
असे काव्यात्मक वर्णन समूर्त करणारी एक देखणी शुकसारिका विदर्भातील मार्कण्डी (जि. गडचिरोली) येथील मंदिरावर शतकानुशतकांपासून थांबली आहे. येथील सुरेख शिल्पात नवविवाहितांचे नवरात्रीतील गुपचूप ऐकलेले प्रेमकूजन राघू अचानक सकाळीच उच्चारतो, तेव्हा लाजेने चूर झालेली ती नवयौवना स्वत:च्या कानातील माणिकमोती त्या पोपटाला खायला देते. याच प्रकारातील एक मनोहारी शुकसारिका नागार्जुनकोंड (आंध्र प्रदेश) येथेही आढळते. मार्कण्डीला असलेल्या आणखी तीन शुकसारिकाही मोठय़ा चित्तवेधकच वाटतात. 
निलंगा (जि. लातूर) येथे गावातच निळकंठेश्‍वराचे सुरेख मंदिर असून, त्याच्या मंडोवरावरील शिल्पथरात एका लक्षवेधी शुकसारिकीने नाजूक अलंकार घालून उजव्या हाताने आम्रफळाची डहाळी पकडली असून, तिच्या डाव्या हातावरील चावट पोपटाने फळच समजून, तिच्या ‘पक्वबिंबाधरोष्टा’वरच स्वत:चीच चोच चटकन मारलीय, हे विशेष. 
याच देवळावरील अन्य शिल्पातील शुक मात्र सभ्य आहे. तो सारिकेने स्वत:च्या डोक्यावर आडव्या धरलेल्या डहाळीतील आम्रफळाचा रसास्वाद चोचीने घेतोय.  धर्मापुरी (जि. बीड) येथील केदारेश्‍वर देवालयाच्या बाह्यांगावरील एका चित्ताकर्षक शिल्पात मादक देहयष्टीची, द्विभुजी सारिका देहुडा शैलीत उभी असून, ‘डमरूमध्या’ रूपातील सारिकेच्या हातात राघू आहे.  शुकाच्या मनी संभ्रम निर्माण झाल्याचे पाहून ती सारिका गालातल्या गालातच हसते आहे. दोघांच्याही चेहर्‍यावरील भाव प्रसंगानुरूपच शिल्पीने येथे सजीव केले आहेतच. 
निलंग्याच्या पोपटापेक्षा धर्मापुरीचा राघू सुंदरींच्या सौंदर्य व यौवनठेव्याचा अधिकच रसिक दिसतो. दोन्ही ठिकाणच्या शुकसारिकांच्या अप्रतिम शिल्पांना सार्‍या देशात ‘जोड’ नाही, हेच खरे.  व्होट्टल (जि. नांदेड) येथील मंदिरांवरही सुंदर शुकसारिका आहेतच. तेथील एका मनोवेधक शिल्पातील सारिका देहुडा शैलीत, त्रिभंगावस्थेत, स्थानक असून ती द्विभुजी आहे. येथील सालंकृत मदनिकेने उजव्या हाती फळांची डहाळी वरील भागावर पकडली असून, तिच्या डाव्या हातावरील पोपटाने गळाहारातील मोत्यावरच फळ समजून टचकन चोच मारलीय. येथीलच अन्य शिल्पातील शुकाची मान कोणा तरी दुष्टाने तोडलीय, हे दुर्दैव होय. 
कोरवली (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील शिवालयाचे बाह्यांग केवळ सुरसुंदरींच्याच शिल्पाने सजलेले आहे. त्यातील एक शुकसारिका खूपच लक्षवेधी आहे. तारुण्याने काठोकाठ भरलेली येथील शुकसारिका त्रिभंगी असून, तिने उजव्या हाती फळाची डहाळी घेतली असून, डाव्या हातीचा दिमाखदार राघू तिच्याशी प्रेमाचे गुंजारव करतोय. 
मथुरेच्या संग्रहालयातील शुकसारिकेचे एक शिल्प तर खूपच वैशिष्ट्यपूर्ण असून, तेथे एक युवती उजव्या हाती पिंजरा पकडून उभी असून, त्यातून मुक्त झालेला शुक तिच्या डाव्या खांद्यावर बसून स्वत:चीच चोच तिच्या कानाजवळ नेऊन सुंदरीशी अगदी हळुवारपणे गप्पागोष्टी करीत आहे. सुंदरीचे प्रियकरासोबत झालेले संवाद रात्री ऐकून, तेच तो शुक तिला पुन्हा ऐकवतोय. म्हणून, तिच्या नाजूक नेत्री आनंदाचे भाव, तर ओठी किंचित हास्य तरळलेले दिसते, हे ‘शब्दाविणे संवादिजे’ पद्धतीने कलास्वाद घेणार्‍या सुज्ञ रसिकाला सांगण्याची काय आवश्यकता? 
शुकसारिकांची अशीच काही ‘दिलखेचक’ शिल्पे खिद्रापूर (जि. कोल्हापूर), पानगाव (जि. लातूर) तसेच भुवनेश्‍वर (ओडिशा), सांची (म. प्रदेश), बेलूर (कर्नाटक) इत्यादी ठिकाणीही आहेतच. 
स्त्रियांचे उसळते तारुण्य आणि सळसळते सौंदर्य यांनी बहरलेल्या शुकसारिकांची यथास्थित वर्णने करणार्‍या अनेक लेखकांच्या लेखणीलाही थिटे पाडणार्‍या सिद्धहस्त शिल्पींच्या इवल्याशा छिन्नी-हातोड्याची किमया श्रेष्ठ ठरविणारी ठिकठिकाणची उपरोल्लेखित शुकसारिकांची कोरीव शिल्पे खरोखरच दृष्ट लागण्याएवढी श्रेष्ठच असून, त्यांच्या सौंदर्याबरोबरच त्यांच्याचमुळे देवळांचे देखणेपणही अधिकच वाढते.
(लेखक शिल्पशास्त्राचे अभ्यासक आहेत.)