'Add-Dress Now'! - A Unique fashion show for disables.. | आम्ही आहोत! - ‘अँड-ड्रेस नाउ’!
आम्ही आहोत! - ‘अँड-ड्रेस नाउ’!

ठळक मुद्देदरवर्षी बाहेर पडणार्‍या 5000 डिझाइन स्टुडण्ट्सपैकी दोन जणांनी जरी अपंगांच्या कपड्यांच्या डिझाइनविषयी मेहनत घेतली तरी हा प्रवास आश्वासकतेकडे जाणार आहे. पॉवर अशीच तयार होईल..

- गीता कॅस्टलिना

(17 ऑगस्टला ‘एकांश’ संस्थेतर्फे पुणे येथे ‘अँड-ड्रेस नाउ’ हा शो होत आहे. वेगवेगळ्या 21 तर्‍हेच्या अपंगत्वासाठी विशेष विचार करून घडवलेल्या कपड्यांचा फॅशन शो, तोही देशभरातील फॅशन कॉलेजेस/ विद्यापीठांनी स्पर्धापातळीवर सहभाग दिलेला ! - ही गोष्ट कदाचित जगातही प्रथमच घडतेय. या स्पर्धेविषयी, अपंगत्व नि फॅशनेबल आउटफिट याविषयीच्या ‘इन्क्लूजन’ संकल्पनेविषयी सांगताहेत या स्पर्धेच्या सल्लागार व ज्युरी गीता कॅस्टलिनो.)

कुतूहल वाढवणारं शीर्षक. - ‘अँड-ड्रेस नाउ’ !
मुळात या शीर्षकातच हेतू स्पष्ट होतोय. अन्न, पाणी लागतं तसं माणसाला घालायला कपडेही लागतात. मात्न विविध प्रकारच्या अपंगत्वांच्या विशेष गरजांसाठी अनुरूप ‘ड्रेसेस’ हा विषय आपण गांभीर्यानं ‘अँड्रेस’ केलेला नाहीये हे लक्षात घ्यायला हवं. ‘एकांश’ संस्थेबरोबर म्हणूनच आम्ही फॅशन, टेक्सटाइल व शिक्षण या क्षेत्नातले काही लोक अतिशय विस्तृतपणे व खोलवर विचार करून गेले वर्षभर या स्पर्धेची व फायनल शोची तयारी करतो आहोत.
भारतभरातील फॅशन आणि डिझाइन इन्स्टिट्यूट्सचे कुलगुरु, विभागप्रमुख, तज्ज्ञ आणि विद्यार्थी या सगळ्यांना आम्ही ‘अँड-ड्रेस नाउ’ या स्पर्धेत भाग घ्यायचं आवाहन केलं नि त्यानुसार 52 एण्ट्रीज दाखल झाल्या. यातल्या पंधरा शॉर्ट लिस्ट करून तीन जणांचा सन्मान रोख रक्कम देऊन केला जाणार आहे. स्पर्धेच्या गटांबाबतीतही विचार केलाय. त्यानुसार तीन स्पर्धक, त्यांचा विशेष गरजा असणारा म्हणजे अपंगत्व असणारा एक मेंटॉर आणि एक डिझाइन एक्स्पर्ट अशी मिळून एक टीम असणार आहे. शॉर्टलिस्ट झालेल्या टीमने त्यांनी ज्या विशेष अपंगत्वासाठी कपडे बनवले, त्यासाठी फॅब्रिक, रंग कसे निवडले, डिझाइन काय केलं, ते करताना कुठल्या प्रॅक्टिकल अडचणी आल्या, त्या कशा सोडवल्या, दरम्यान मेंटॉरशी झालेल्या चर्चांमधून काय नवीन मुद्दे समोर आले या सगळ्याचं प्रेझेंटेशन करणं आवश्यक आहे. त्यातून अपंग व्यक्तीच्या कपड्यांबाबतच्या सर्वसमावेशकतेबाबत अतिशय ठोस पावलं उचलता येतील अशी खात्नी वाटते.
अपंग माणसांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांबद्दलच खूप अनास्था दिसते, मग कपडे. कपड्यांनी किती फरक पडतो ! सोयीचे, सुखकारक शिवाय आजच्या फॅशनशी नातं सांगणारे कपडे विशेष गरजांमुळे आपल्यासाठी उपलब्ध नसतील तर आपण पुरेसा आत्मविश्वास राखूच शकत नाही. आणि अपंगांच्या बाबतीत अमुक सोय झाल्यावर तमुक करू असं करून कसं भागेल? सगळं समांतरपणे चालू असायला हवं नाहीतर आपण सगळ्यांच्यात आहोत हा फील जगताना येत नाही. तो नसेल तर अस्तित्वाविषयी फार प्रश्न पडतात व न्यूनगंडाची कारणे वाढतात.
उदाहरण सांगते, माझ्या दोन पायात कॅलिपर्स व दोन्ही काखेत कुबड्या. मी शिक्षण व नंतर व्यवसायाच्या निमित्तानं मुंबईत पब्लिक ट्रान्सपोर्टनेच हिंडायचे; पण पावसाळ्यात प्रश्न भीषण व्हायचा. मी छत्नी वापरू शकणं शक्य नव्हतं. त्यावेळी बाहेरून कापडासारखा दिसणारा डकबॅगचा रेनकोट मी वापरायचे; पण प्रश्न यायचा तो कुबड्यांमुळे काखेतील भाग स्ट्रेच होण्याचा व कम्फर्टचा.
माझ्या आईने तिथला भाग कापून साधारण तशाच रंगाचा पॅच थोडा सैलसर शिवून टाकला व मी त्या ऋतूतही माझं रूटीन व आत्मविश्वास टिकवू शकले. अनेकजण कॅलिपरच्या आत पॅण्ट किंवा सलवार घालायचे त्या काळात मी कॅलिपर्सला अटॅच असलेले बूट स्वतंत्नपणे बनवून घेत वेगळं डिझाइन करून सलवार शिवली. ज्यामुळं कॅलिपर्स झाकले जाऊन वावरता येणं सोपं गेलं. यात कृत्रिम साधनाबद्दल संकोच नाही तर मुद्दाम लक्षवेधी व्हायला नकार आहे. सगळ्यांमध्ये सगळ्यांसारखं असण्याचा हट्ट आहे. ‘इन्क्लूजन’ संकल्पना तेच तर सांगते. तुम्ही व्हीलचेअरवर असाल, कुबड्या घेऊन चालत असाल, कॅलिपर्स अथवा कृत्रिम अवयव वापरणारे असला किंवा अँम्प्युटी. तुमच्या सोयीचे व काळाशी सुसंगत फॅशनचे कपडे तुम्हाला मिळायला हवेत ही मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. ‘एकांश’च्या अनिता अय्यर, फॅशन कन्सल्टंट राजू भाटिया, डिझायनर निवेदिता साबू असे आम्ही सगळेच यासाठी हे व्यासपीठ जाणीवपूर्वक घडवतो नि विस्तारतो आहोत.
स्पर्धेतील सहभागींच्या या स्पर्धेच्या वेगळेपणाबद्दल काही प्रतिक्रि या व एकूण अपेक्षा..
बदल खूप सावकाश होतात; पण ते करण्याची ही वेळ साधायला हवीय. फॅशनने सगळ्यांना पॉवर, डिग्निटी व एम्पॉवरमेंट दिलीय; पण काही लोकांच्या संवेदनशीलतेचा अभाव, कल्पनादारिद्रय़ आणि चिकाटीची कमतरता यामुळे अपंग, वृद्ध लोकांचा एक खूप मोठा गट उगीचच ‘अनअँड्रेस्ड’ राहून गेलाय. - तर काम करणार्‍या सिस्टीममध्ये बदल घडवण्याची, त्यांना शिक्षित करण्याची जबाबदारी आपली आहे. आमच्या दृष्टीनं प्रत्येक डिझाइन स्टुडण्टची ही जबाबदारी आहे की त्यांच्या कामानं कुणाची तरी दैनंदिनी सोपी व्हावी. सुंदर व्हावी. तुम्ही स्वत:मध्ये केवढा आत्मविश्वास निर्माण करता जेव्हा कपडे, फॅशन फॉलो करता..
अंथरुणाला खिळलेल्या एका पॅराप्लेजिक मुलीला मी भेटले होते. तिचे घरचे तिला अंगावर चादर द्यायचे व फक्त कमरेखाली सलवार वगैरे घालायचे. चादर हलेल या टेन्शनपायी ती बसायचीही नाही. प्रत्येकाला वाटतं आपण प्रसन्न दिसावं, लोकांना आपल्याला बघून प्रसन्न वाटावं, आजारपणात होणारे मूडस्विंग योग्य व सोयीच्या कपड्यांनी सुधारावेत. अशी कितीतरी माणसं व त्यांचे केअरगिव्हर नि कुटुंबीय आहेत त्यांनाही अशा विशेष डिझाइन केलेल्या कपड्यांमुळं मदत करणं सुटसुटीत वाटणार आहे.
यासंदर्भात विद्यार्थ्यांशी जेव्हा संवाद घडायचा तेव्हा खूप प्रश्नांवर चर्चा व्हायची. उदा. हत्तीपाय असणार्‍यांना बरेचदा पॅरलल घालावे लागतात नि ते ढगळपण विचित्न वाटतं तर वेगळी युक्ती वापरून कपडे बनवणं शक्य आहे. कुणी मुलीनं सांगितलं की तिच्या अँम्प्युटी मित्नासाठी तिनं वेगळं डिझाइन केलंय व तोच तिचा मॉडेल आहे. निरीक्षण करून या प्रश्नाविषयी आपल्या क्षेत्नात अधिक काम करण्याचा निश्चय काहीजण बोलून दाखवताहेत.
आम्हीही फॅशन कॉलेजेस व विद्यापीठांना ‘अँडेप्टिव्ह क्लोदिंग’ हा भाग अभ्यासक्रमात घ्यावा अशी विनंती करतो आहोत. किमान दरवर्षी होणार्‍या फॅशन शोजमध्ये हा प्रकल्प विद्यार्थ्यांना दिला जावा हा आग्रह आहे. पूर्ण जगात हे कधीही झालेलं नाही. दरवर्षी बाहेर पडणार्‍या 5000 डिझाइन स्टुडण्ट्सपैकी दोन जणांनी जरी यावर मेहनत घेतली तरी हा प्रवास आश्वासकतेकडे जाणार आहे. पॉवर अशीच तयार होईल..

मुलाखत व शब्दांकन : सोनाली नवांगुळ

Web Title: 'Add-Dress Now'! - A Unique fashion show for disables..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.