आमिर अश्रू आणि सत्यमेव जयते
By Admin | Updated: January 3, 2015 15:08 IST2015-01-03T15:08:10+5:302015-01-03T15:08:10+5:30
कितीही मोठा स्टार असो, लोकांना एखादी गोष्ट आवडली नाही, तर ते रिमोटनं चटकन चॅनल बदलतात.स्टार्स आहेत म्हणून लोक काय वाट्टेल ते पाहत नाहीत, पण स्टार व्हॅल्यू असलेला आमीरसारखा कुणी जर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न घेऊन आला, तर लोक अधिक गांभीर्यानं पाहातात, हे मात्र खरं आहे.

आमिर अश्रू आणि सत्यमेव जयते
कितीही मोठा स्टार असो, लोकांना एखादी गोष्ट आवडली नाही, तर ते रिमोटनं चटकन चॅनल बदलतात.स्टार्स आहेत म्हणून लोक काय वाट्टेल ते पाहत नाहीत, पण स्टार व्हॅल्यू असलेला आमीरसारखा कुणी जर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न घेऊन आला, तर लोक अधिक गांभीर्यानं पाहातात, हे मात्र खरं आहे.
सत्यजित भटकळ
(‘सत्यमेव जयते ’ या गाजलेल्या चर्चात्मक कार्यक्रमाचे दिग्दर्शक )
क घरबसल्या टीव्ही पाहतात ते चारघटका मनोरंजनासाठी. त्रास करून घेण्यासाठी, विचार करण्यासाठी कोण कशाला आपला विरंगुळ्याचा वेळ देईल?
- ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना हा प्रश्न आम्हालाही पडलाच होता.
आणखी दोन कळीचे प्रश्न होते.
एक म्हणजे कळीचे सामाजिक प्रश्न टीव्हीसारख्या माध्मातून हाताळायचे कसे? आणि रंजक पद्धतीनं माहिती देत ते मांडायचे कसे?
कार्यक्रम रंजक करायच्या नादात भडक-सनसनाटी रस्त्याला जायचं नाही, हे मात्र ठरवलं होतं.
गंभीर विषय आणि रंजक मांडणी हा तोल सांभाळण्यासाठीच आम्ही स्टुडिओ डॉक्युमेण्टरी हा प्रकार निवडला.
सामाजिक प्रश्न मांडताना भारतासारख्या खंडप्राय देशात हा ‘तोल’ राखणं हेच एक आव्हान आहे. इथले सामाजिक प्रश्न सरसकटसारखे नाहीत. वेगवेगळ्या प्रांतांमधे वेगवेगळी परिस्थिती दिसते. स्त्री भ्रूण हत्त्येसारखे प्र गरीब -आदिवासी बहुल समाजापेक्षा देशातल्या तुलनेनं श्रीमंत राज्यात अधिक गंभीर आहेत. सर्वच प्रश्नांच्या बाबतीत कमीअधिक फरकाने हेच चित्रं दिसतं. त्यामुळे प्रश्नागणिक वास्तव वेगळं, त्याबद्दलच्या जनभावना वेगळ्या आणि एकच कार्यक्रम पाहाणार मात्र सगळे. तेही एकाचवेळी. अशा परिस्थितीत प्रश्नाचं सरधोपटीकरण आणि सामान्यीकरण होणार नाही याचीही खबरदारी घेणं हे अवघड काम असतं.
आणि आम्हाला तर ते काम फक्त ६६ मिनिटांत करायचं होतं.
कार्यक्रम ६६ मिनिटांचा असला तरी एकेका समस्येवर संशोधन करताना आम्ही सरासरी १५0 तासांचं व्हिडीओ फुटेज जमा करत गेलो. काही विषयांचं तर आमच्याकडे २५0-३00 तासांचं फुटेज आहे. हे आम्ही ठरवून केलं नाही,विषयाच्या खोलात जाता जाता ते जमा होत गेलं!
काही लोक म्हणतात, आमीर खान नावाचा लोकप्रिय ब्रॅण्ड या कार्यक्रमाशी जोडला गेला म्हणून ‘असा’ माहितीपर कार्यक्रम लोकप्रिय झाला.
माझ्यामते घरोघरचा टीव्हीचा पडदा बड्या स्टार्सचा फार काही आदर करत नाही. अनेक बड्या स्टार्सचे शो टीव्हीवर लोकप्रिय झाले नाहीत पण, केबीसी सारखा शो मात्र प्रेक्षकांना आवडला आणि त्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत अमिताभ बच्चन स्वीकारले गेले. तसंच सत्यमेव जयतेचं, त्या कार्यक्रमाच्या सूत्रधारच्या भूमिकेत आमीर मनाने आणि बुध्दीनेही गुंतला होता, कार्यक्रमासाठी मेहनत घेत, सगळा विषय समजून घेत होता. तो कार्यक्रम उत्तम सादर करणं हे त्याच्यासमोरचं क्रिएटिव्ह चॅलेंज होतं.
समजा आमीर नसता आणि याच बजेटमध्ये असाच शो कुणी केला असता तरीही तो कदाचित गाजला असता कारण विषयाची मांडणी आणि त्याचं गांभीर्य.
आमीर खान आमचा अँन्कर होता तरी आम्ही संध्याकाळच्या प्राइम टाइम मनोरंजक कार्यक्रमांशी स्पर्धा केली नाही. तिथं आपण टिकणार नाही याची आम्हाला कल्पना होती. ज्याला चॅनलवाले ग्रेव्हयार्ड टाइम म्हणतात, ती वेळ आम्ही घेतली. लोकांनी रविवारच्या सकाळी वेळ काढून कुटुंबासह कार्यक्रम पाहावा असा आमचा आग्रह होता आणि प्रेक्षकांनी तो पाहिला.
सत्यमेव जयते पाहाताना लोकांच्या डोळ्यात पाणी येत असे, हे खरं; पण या कार्यक्रमामुळे लोकांच्या मनोवृत्तीत बदल झाला का, असा प्रश्न विचारला जातो.
मी सांगतो, एका व्यक्तीमुळे, सिनेमामुळे, नाटकामुळे, कवितेमुळे माणूस घडत अगर बदलत नाही. अनेक अनुभवांच्या प्रक्रियेतून तो घडत असतो. सत्यमेव जयते मुळे माणसं एकदम बदलली असतील असा माझा दावा नाही. पण काही ‘न बोलण्याचे’ विषय आणि कायम डोळ्याआड करून नाकारले जाणारे प्रश्न आम्ही चर्चेच्या ऐरणीवर तरी आणून ठेवले. सत्यमेव जयतेचं श्रेय असेल तर ते हे. आणि एवढंच.
आम्हाला सरकारी यंत्रणेकडून फारशी आशा नव्हती. मात्र यंत्रणेनं अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत कायद्यात बदलांपासून ठोस अंमलबजावणीलाही सुरुवात केली हे फार सुखद आणि बोलकं होतं.
स्त्री भ्रूणहत्त्येवर आधारित कार्यक्रमाच्या प्रक्षेपणानंतर आमीर राजस्थानचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक गेहलोतांना भेटला होता. राजस्थानात पत्रकारांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये १५0 डॉक्टर गर्भजलचिकित्सेसाठी पैसा घेताना पकडले गेले होते. याप्रकरणाची चौकशी व्हावी, फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना व्हावी, अशी मागणी होती. आमीर-गेहलोत भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी ती मागणी मान्य केली. दहा दिवसांत अधिसूचना जारी झाली. वर्षभरात दोषी माणसं तुरुंगात गेली. गेल्या दोन वर्षात राजस्थानात दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांच्या जन्मदर ३0 ते ४0 पॉइण्टने सुधारला आहे. असंच एक उदाहरण मध्य प्रदेशातलं, मध्य प्रदेश सरकारनं जेनेरिक औषधांची सुविधा जिल्ह्यापर्यंत पोहोचवली, आज दिवसाला ४ लाख रुग्ण त्या औषधांचा लाभ घेतात.
हे सारं आमच्या कार्यक्रमामुळेच झालं असा आमचा दावा नाही. ते या कार्यक्रमाचं यश आहे, असंही मी मानत नाही. बदल ही एक मोठी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे आमच्यासारख्या लेखक-दिग्दर्शक-कलावंतांचे प्रयत्न.