मालेगाव कॅम्प : मालेगाव महापालिका निवडणुकीत सर्वाधिक ४० जागांवर विजय मिळविणाऱ्या इस्लाम आणि समाजवादी पार्टी यांच्या मालेगाव सेक्युलर फ्रंटने बहुमतासाठी लागणारी ४३ ही मॅजिक फिगर गाठण्यासाठी राजकीय हालचाली गतिमान केल्या असून शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर शिंदेसेनेसह एमआयएम यांच्याकडे बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी प्रस्ताव पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शहराच्या राजकारणात निवडणूक निकालानंतर कोणती नवीन राजकीय समीकरणे उदयास येतात याबाबत आता सर्वांची उत्सुकता ताणली गेली आहे. दरम्यान, महापौरपद पूर्वला आणि उपमहापौरपद पश्चिमला हा गेल्यावेळचा फॉर्म्युला यावेळी पुन्हा राबविला जाण्याचीही दाट शक्यता वर्तविली जात आहे.
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत सर्वाधिक ३५ जागा जिंकून माजी आमदार असिफ शेख यांचा इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र (इस्लाम) हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर इस्लामसोबत युती केलेल्या समाजवादी पक्षाने ५ जागा जिंकल्या आहेत. दोन्ही मिळून ४० जागा जिंकल्या असल्या तरी त्यांच्या मालेगाव सेक्यूलर फ्रंटला बहुमतासाठी लागणाऱ्या ४३ चा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे अन्य पक्षांचा पाठिंबा घेत फ्रंटला सत्तेत यावे लागणार आहे.
निवडणुकीत एमआयएमने २१, शिंदेसेनेने १८, कॉंग्रेसने ३, भाजपने २ जागा जिंकल्या आहेत. इस्लाम पार्टीचे सर्वाधिक ३५ उमेदवार निवडून आल्याने साहजिकच त्याच पार्टीचा महापौर होणार हे निश्चित आहे. आता निवडणूक निकालानंतर सत्तेची गणिते जुळविण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. इस्लाम-समाजवादी यांच्या मालेगाव सेक्युलर फ्रंटने शिंदेसेनेला सत्तेत सहभागासाठी प्रस्ताव पाठविला आहे. तसाच बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी एमआयएमला देखील प्रस्ताव गेल्याची खात्रीलायक माहिती आहे, निवडणूक प्रचार काळात माजी आमदार असिफ शेख यांनी एमआयएम व काँग्रेसशी पदांसाठी कधीही हातमिळवणी केली जाणार नाही, असे सांगितले होते. त्यामुळे इस्लामकडून सत्तेत सहभागासाठी प्रामुख्याने अगोदर शिंदेसेनेला पसंती दिली जाण्याची शक्यता असून काँग्रेसला दूर ठेवले जाण्याचीही चर्चा आहे.
महापौर पूर्वला, उपमहापौरपद पश्चिमला
गेल्यावेळी काँग्रेस-शिवसेना महापालिकेत सत्तेत होती. यावेळी काँग्रेस व नंतर राष्ट्रवादीचे महापौर झाले, तर उपमहापौरपद शिवसेनेने भूषविले. आताही शिंदेसेनेने पाठिंबा दिल्यास उपमहापौरपद पदरात पडण्याची शक्यता आहे. यापूर्वी सखाराम घोडके, रशिद येवलेवाला, अॅड. ज्योती भोसले, नरेंद्र सोनवणे, नीलेश आहेर यांनी ठरावीक कालावधीत उपमहापौरपद भूषविले आहे.
शिंदेसेनेला इस्लाम व एमआयएम या दोन्ही पक्षांकडून सत्तेत सहभागी व्हावे असे प्रस्ताव आले आहेत, तर शिक्षणमंत्री दादा भुसे हे वरिष्ठ पातळीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून मालेगावी कोणासोबत सत्तेत सहभागी व्हायचे हे निश्चित करतील.- अॅड. संजय दुसाने, जिल्हाप्रमुख, शिंदेसेना, मालेगाव ग्रामीण.
शहरात सर्वांत मोठा पक्ष म्हणून इस्लाम उदयास आला आहे. दोन नंबरवर एमआयएम असला तरी आम्ही शहर विकासासाठी इस्लाम पार्टीसोबत सत्तेत जाण्याचा विचार करत आहोत. वेळेवर योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आमचे नेते आमदार मुफ्ती मौलाना यांनीच सांगितले आहे.- अब्दुल मलिक युनूस ईसा, माजी महापौर, शहर अध्यक्ष एमआयएम
इस्लाम व सहयोगी समाजवादी पक्षाची अगोदरपासून युती आहे. यात महापौर, उपमहापौर अथवा सत्ता स्थापनेसाठी आम्ही शहराचा विकास करण्याचा हेतू पुढे ठेवून बिनशर्त पाठिंब्यासाठी एमआयएम, शिंदेसेना व इतरांना प्रस्ताव मांडले आहेत. पुढे काय होते ते बघू.- नाविद खातिब अहमद, शहराध्यक्ष, इस्लाम पार्टी.
एमआयएम सांप्रदायिक पक्षांसोबत जाणार नाही
मालेगाव एमआयएम कोणत्याही परिस्थितीत 'फिरकापरस्त (सांप्रदायिक)' पक्षांसोबत सत्ता स्थापन करणार नाही. मात्र, शहराच्या विकासासाठी इस्लाम पक्षाशी चर्चा करण्यास एमआयएम तयार असल्याचे एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद यांनी स्पष्ट केले आहे.
आमदार मुफ्ती म्हणाले की, निकालापूर्वी जितक्या जागांची अपेक्षा होती, तितक्या जागा प्रत्यक्षात मिळाल्या नाहीत. तथापि, मांच्या संख्येच्या दृष्टीने एमआयएमच्या उमेदवारांना सर्वाधिक मते मिळाली असून खरा जनतेचा कौल एमआयएमलाच मिळालेला आहे, असा दावाही त्यांनी केला. इस्लाम पक्षाच्या उमेदवारांना १ लाख ७ हजार मते मिळाली असून एमआयएमच्या उमेदवारांना १ लाख १७ हजार मते मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
इस्लाम पक्षासोबत सत्ता स्थापनेसंदर्भात बोलताना आमदार मुफ्ती यांनी मात्र अट घालत सांगितले की, चर्चेसाठी इस्लाम पक्षाने पुढाकार घ्यावा. शहराचा विकास आणि नागरिकांना सांप्रदायिक शक्तींपासून दूर ठेवण्याच्या भूमिकेवर चर्चा करायची असल्यास आम्ही तयार आहोत, असेही त्यांनी नमूद केले. मात्र, तसेच, इस्लाम पक्षासोबत बिनशर्त चर्चा होणे कठीण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जर इस्लाम पक्षाशी चर्चा झाली नाही, तर पक्षश्रेष्ठींशी सल्लामसलत करून पुढील निर्णय घेतला जाईल. एमआयएम कोणत्याही परिस्थितीत या पक्षांसोबत जाणार नाही, मग सत्ता येतो अथवा न येवो, असेही मौलाना मुफ्ती यांनी ठामपणे सांगितले.
Web Summary : Islam Party, winning most seats in Malegaon, proposes unconditional support from Shinde Sena, MIM to reach majority. Political activity intensifies post-election.
Web Summary : मालेगाँव में सबसे अधिक सीटें जीतने वाली इस्लाम पार्टी ने बहुमत तक पहुँचने के लिए शिंदे सेना, एमआईएम से बिना शर्त समर्थन का प्रस्ताव रखा। चुनाव के बाद राजनीतिक गतिविधियाँ तेज।