‘कुस्ती’च्या मातीतील ‘जीम’ जोरात
By Admin | Updated: November 2, 2014 23:54 IST2014-11-02T23:45:27+5:302014-11-02T23:54:26+5:30
आरोग्य संपदा : तरुण-तरुणी, गृहिणींबरोबर ज्येष्ठांचीही पसंती

‘कुस्ती’च्या मातीतील ‘जीम’ जोरात
प्रदीप शिंदे- कोल्हापूर -धकाधकीच्या युगात व फास्ट फूड जीवनशैलीमुळे कमी वयातच हाय ब्लडप्रेशर, मधुमेह, पाठदुखी, कंबरदुखी यासारख्या व्याधींचा सामना करावा लागतोय. या सगळ्यांवर औषधोपचारांच्या जोडीला व्यायामाची गरज असल्याने तरुण-तरुणी, गृहिणी आणि ज्येष्ठांचाही ओढा आता ‘जीम’कडे वाढला आहे. त्यामुळेच ‘लाल’ मातीतील कुस्तीत रमणाऱ्या कोल्हापूरकरांमध्ये आता ‘जीम’ संस्कृती रुजू लागली आहेत.
रोजच्या धकाधकीच्या जीवनात फिटनेसचे महत्त्व वाढत आहे. पहाटे लवकर उठून फिरायला जाणे आणि घरच्या घरी योगा करणे या संकल्पनेचे दररोज नियोजन सगळ्यांच्याकडून पाळले जातेच असे नाही. स्पर्धेच्या युगात सगळ्याच वेळेला महत्त्व आले. व्यवसाय, नोकरीमधील टेन्शन अगदी डोक्यावर घेऊन वावरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याचा परिणाम आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. यामुळे जीम संस्कृतीने आता घराघरांत शिरकाव केला आहे. अशातच जीम संस्कृती रुजविण्यात चित्रपटांचाही मोठा वाटा आहे. फिटनेस, फिगरसारखे कानमंत्र तिथूनच समाजात रुजविले जात असल्याने तरुणाईपाठोपाठ आता गृहिणींचाही जीम संस्कृतीकडे ओढा वाढला आहे.
शहरातील जवळपास सगळ्याच जीममध्ये महिलांसाठी विशेष बॅच राखीव ठेवली जात आहे. पूर्वी शहरात केवळ दोन ते तीनच जीम होत्या. त्यामुळे त्यांची फीदेखील हजारोंच्या घरात होती. आता मात्र ही परिस्थिती एकदम बदलली आहे.
सध्या चौकाचौकांत अद्ययावत सोयींनी सुसज्ज अशा जीम सुरू झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहक खेचण्यासाठी कमी फीमध्ये जास्तीत जास्त फायद्याच्या स्कीम्म या जीमकडून दिल्या जात आहेत. या क्षेत्रातही स्पर्धा वाढल्याने वेट लॉस, वेट गेन आणि फिटनेस मॅनेजमेंट अशा विविध प्रोग्रॅमसोबत अॅरोबिक्स, मसाज, स्टीम बाथ, ज्यूस सेंटर, पर्सनल ट्रेनिंग अशा सुविधांचे आमिष दिले जात आहे.
घराघरात्ां जीम
पूर्वी फक्त मुंबई, दिल्लीतच जीमचे साहित्य मिळत होते. मात्र आता ते कुठेही सहज मिळते. त्यामुळे अनेकजणांनी आपल्या गरजेनुसार घरातच जीम सुरु केली आहे. नवीन सोसायटी, अपार्टमेंट बांधणीवेळीच जीमसाठी स्वतंत्र सोय करण्यात येत आहे.
अभिनेत्यांची बॉडी पाहून अनेक युवक जीमकडे वळत आहेत. खुली मैदाने कमी झाल्यामुळे महिलांचाही कल जीमकडे वाढत आहे. स्पर्धात्मक प्रशिक्षण देणे आणि फिटनेस मेन्टेन करणे असे दोन प्रकार जीममध्ये घडत आहेत.
- बिभिषण पाटील,
शिवछत्रपती पुरस्कार विजेते