कोब्राच्या विषाची तस्करी करणारे जेरबंद

By Admin | Updated: March 21, 2017 16:32 IST2017-03-21T16:32:08+5:302017-03-21T16:32:08+5:30

कोब्रासारख्या खतरनाक सापाच्या जहाल विषाची तस्करी करणा-या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी

Zobbins smuggled by Cobra's poison | कोब्राच्या विषाची तस्करी करणारे जेरबंद

कोब्राच्या विषाची तस्करी करणारे जेरबंद

 ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 21 -  कोब्रासारख्या खतरनाक सापाच्या जहाल विषाची तस्करी करणा-या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून लाखोंचे विष आणि इनोव्हा कार जप्त केली. रोशन गिरीधर अमृतवार (वय १९) आणि गोपालसिंग रेनसिंग गौर (वय ३३)अशी या दोघांची नावे आहेत. रोशन तळोधी बाळापूर (नागभिड, जि. नागपूर) आणि गौर हुडकेश्वर (नागपूर) येथील रहिवासी आहे. साप आणि त्याच्या विषाची तस्करी करणा-या आंतरराष्टीय रॅकेटसोबत या दोघांचे संबंध असल्याचा संशय आहे.
हिंगण्याच्या नोगा कंपनीजवळ पांढ-या रंगाची इनोव्हा कार (एमएच ३१/ सीव्ही ७३१९) बराच वेळेपासून उभी असल्यामुळे एमआयडीसी पोलिसांना संशय आला. त्यांनी कारमध्ये बसलेल्या रोशन आणि गौर यांना विचारपूस करताच ते असंबंध उत्तरे देऊ लागले. त्यामुळे त्यांच्यावरील संशय बळावला. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यात छोट्या बॉटल्स (टेस्ट ट्यूब बॉटल) मध्ये विशिष्ट द्रव भरून दिसला. त्याबाबत पोलिसांनी या दोघांना विचारणा केली असता त्यात सापाचे विष असल्याचे त्यांनी सांगितले. हे विष विकायला आणल्याचीही आरोपींनी कबुली दिली. त्यामुळे ठाणेदार सुनील महाडिक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक रमेश तायडे, हवलदार पप्पू यादव, दिनेश जुगनाके, सुशील श्रीवास्तव आणि आशिष दुवे यांनी या दोघांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांची रात्रभर चौकशी केल्यानंतर प्रकरण वनविभागाच्या अधिका-यांच्या अख्त्यारितील असल्याचे लक्षात आल्यामुळे या दोघांना वनाधिका-यांच्या हवाली करण्यात आले.
विष कोब्रा आणि रशल विपरचे
सूत्रांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेले विष कोब्रा आणि रशल विपर या खतरनाक सापाचे असल्याचे समजते. त्याची किंंमत किमान दहा लाख रुपये असावी, असा अंदाज आहे. पकडण्यात आलेल्या या दोघांचे धागेदोरे सावनेरच्या साप तस्करांशी जुळले असल्याचा संशय आहे. आरोपी रोशनने दहावीची परिक्षा देत असल्याचे सांगून कारवाई करू नका, अशी पोलिसांना विनंती केली. त्यांनी हे विष कुठून, कुणाजवळून आणले आणि ते कुणाला विकणार होते, त्याबाबतची माहिती अद्याप उघडड झालेली नाही. मंगळवारी दोन्ही आरोपींना पोलिसांनी वनविभागाच्या अधिका-यांना सोपविले. आता या दोघांची चौकशी वनाधिकारी करीत असून, या प्रकरणात आणखी काहींना अटक होण्याची शक्यता संबंधित सूत्रांनी वर्तविली आहे. 

Web Title: Zobbins smuggled by Cobra's poison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.