जि.प. नोकर भरतीवर ‘संभ्रम’

By Admin | Updated: November 29, 2014 00:14 IST2014-11-29T00:12:27+5:302014-11-29T00:14:37+5:30

मराठा आरक्षण स्थगिती : परिचर, ग्रामसेवक भरती प्रक्रियेला ब्रेक

Zip 'Confusion' on recruitment | जि.प. नोकर भरतीवर ‘संभ्रम’

जि.प. नोकर भरतीवर ‘संभ्रम’

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर --मराठा समाजाला सरकारी नोकरी व शिक्षणाच्या प्रवेशात दिलेल्या आरक्षणाला न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्याने येथील जिल्हा परिषद नोकरभरती प्रक्रियेसंबंधी प्रशासन संभ्रमावस्थेत सापडले आहे. नियमानुसार परिचर, ग्रामसेवक या दोन संवर्गांमध्ये १६ टक्के मराठा आरक्षणाप्रमाणे प्रक्रिया सुरू आहे. मात्र, स्थगितीमुळे या दोन्ही संवर्गांच्या पुढील भरती प्रक्रियेला सध्या ‘ब्रेक’ लागला आहे.
पुढील कार्यवाही कशी करावी, यासंबंधी मार्गदर्शन व्हावे, अशी विनंती सामान्य प्रशासनाने शासनाकडे केली आहे. लेखी विनंती करूनही पाच-सहा दिवस झाले तरी अजून मार्गदर्शन सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे भरतीसंबंधी काय निर्णय घ्यावे, याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. पर्यायाने न्यायालयाच्या कचाट्यात आरक्षण सापडल्याचा पहिला फटका जिल्हा परिषद नोकर भरतीला बसला आहे.
गेल्या आघाडी सरकारने मराठा समाजाला सरकारी नोकरी व शिक्षणाच्या प्रवेशात १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला. यानुसार अंमलबजावणी सुरू झाली. दरम्यान, येथील जिल्हा परिषदेने रिक्त असलेल्या कनिष्ठ अभियंता, आरोग्यसेवक यासह विविध विभागांतील रिक्त १९४ पदांची जम्बो भरती प्रक्रिया राबविली. या भरती प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षणामध्ये एकापेक्षा अधिक जागा असलेल्यांमध्ये ग्रामसेवक आणि परिचर संवर्गांचा समावेश होतो. त्यामुळे जिल्हा परिषद या दोन संवर्गांसाठीच १६ टक्केप्रमाणे आरक्षणानुसार प्रक्रिया राबवत आहे. या दोन्ही संवर्गांच्या परीक्षा होऊन एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे.
दरम्यान, ग्रामसेवक संवर्गाचा निकाल लागला असून, परिचरचा निकाल लागलेला नाही. मेरीटनुसार निवड झालेल्यांना नियुक्तीपत्र देण्याच्या टप्प्यात ग्रामसेवकची, तर निकालाच्या टप्प्यात परिचरची प्रक्रिया आहे. या दरम्यान १५ नोव्हेंबरला मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणालाच अंतरिम स्थगिती दिल्यामुळे भरती प्रक्रिया ज्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे, तेथेच थांबवण्यात आली आहे. या दोन संवर्गांच्या भरतीसंबंधी प्रशासनामध्येही गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यामुळेच शासनाकडून मार्गदर्शन मागण्यात आले आहे.
मराठा आरक्षण न्यायप्रविष्ठ झाले आहे. अंतरिम आदेशाच्या विरोधातील दाव्याबाबत सुनावणी होऊन न्यायालयाने नव्याने निर्णय दिल्यानंतर शासनालाही भरती प्रक्रियेसंबंधी आदेश द्यावे लागणार आहेत. त्यामुळे न्यायालय आणि शासन या दोन स्तरावर कार्यवाही होणार असल्यामुळे त्वरित भरतीसंबंधीत पुढील आदेश मिळण्याची शक्यता कमी आहे. अनेक उमेदवारजिल्हा परिषदेत येऊन, तसेच फोनवरून संपर्क साधून पुढील कार्यवाही कधी? अशी विचारणा करीत आहेत. परंतु, शासनाकडून पुढील आदेश आल्यानंतर प्रक्रिया सुरू होईल, असे उत्तर प्रशासन देत आहे. यामुळे उमेदवार मराठा आरक्षणाच्या स्थगितीसंबंधी पुढील काय निर्णय होणार? त्यानंतर शासनाकडून काय सूचना मिळणार? याची प्रतीक्षा करीत आहेत.


न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे ग्रामसेवक आणि परिचर संवर्गाची प्र्रक्रिया आता ज्या टप्प्यात आहे, त्या टप्प्यात थांबविण्यात आली आहे. पाच दिवसांपूर्वी शासनाकडून पुढील मार्गदर्शन मागितले आहे. सूचना आल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल.
- सी. एन. वाघमारे, उपमुख्य कार्यकारी
अधिकारी (सामान्य प्रशासन).

Web Title: Zip 'Confusion' on recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.