जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
By दीपक भातुसे | Updated: November 8, 2025 06:25 IST2025-11-08T06:24:47+5:302025-11-08T06:25:20+5:30
महापालिका निवडणुकाही २० जानेवारीपूर्वी उरकणार

जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा येत्या दोन आठवड्यांत जाहीर होतील, तशी तयारी सुरू असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली आहे. एक निवडणूक संपताच दुसऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला तर आचारसंहितेचा कालावधी वाढू शकतो. त्याचा परिणाम विकासकामांवर होऊ शकतो, हे लक्षात घेऊन आयोगाने तयारी सुरू केलेली आहे.
महापालिका निवडणुकाही २० जानेवारीपूर्वी उरकणार
नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केलेल्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत पार पडत आहेत. तसेच, आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही जाहीर केल्यानंतर साधारणतः ३० दिवसांच्या कालावधीत पार पाडल्या जाण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात या निवडणुका जाहीर होऊन डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात त्या संपवल्या जाण्याची शक्यता आहे. महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात होऊन जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे.