‘झेड प्लस’, ‘वाय’, सुरक्षा आता मुख्य सचिव ठरविणार
By Admin | Updated: November 18, 2014 02:48 IST2014-11-18T02:48:25+5:302014-11-18T02:48:25+5:30
महत्त्वाच्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या ‘झेड प्लस’, ‘झेड’, ‘एक्स’ किंवा ‘वाय’ सुरक्षा देण्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडील अधिकार आता मुख्य सचिवांना असतील

‘झेड प्लस’, ‘वाय’, सुरक्षा आता मुख्य सचिव ठरविणार
मुंबई : महत्त्वाच्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या ‘झेड प्लस’, ‘झेड’, ‘एक्स’ किंवा ‘वाय’ सुरक्षा देण्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडील अधिकार आता मुख्य सचिवांना असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी त्यासंदर्भात निर्णय घेतला.
विविध राजकीय व इतर महत्त्वाच्या व्यक्तींना ‘झेड प्लस’, ‘झेड’, ‘एक्स’ आणि ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरविली जाते. मोठा फौजफाटा असलेल्या या श्रेणीतील सुरक्षेच्या वर्गवारीचा अधिकार आतापर्यंत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडेच होता. सुरक्षेच्या तुलनेत ‘स्टेटस सिंबॉल’ या अर्थाने महत्त्व असलेली ‘झेड प्लस’ किंवा ‘झेड’ दर्जाची सुरक्षा मिळविण्यासाठी अनेक राजकारणी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांशी असलेल्या संबंधांचा वापर करायचे. संंबधित परंपरागत पद्धतीला फाटा देताना कुणाच्या जिविताला किती धोका आहे हे निश्चित करणे ही बाब पूर्णत: तांत्रिक आहे. धोक्याची पातळी निश्चित करणे व त्यानुसार आवश्यक श्रेणीची सुरक्षा पुरविणे हा मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांनी वापरावयाचा अधिकार नाही. त्याचा निर्णय सक्षम प्रशासनानेच घ्यायला हवा, असे मत फडणवीस यांनी हा निर्णय घेताना नोंदविले. पोलीस महासंचालक व इंटेलिजन्सचे आयुक्त हे समितीचे सदस्य असतील, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. (विशेष प्रतिनिधी)