राकेश मारिया, हिमांशू रॉय यांना झेड प्लस सुरक्षा
By Admin | Updated: May 22, 2014 05:10 IST2014-05-22T05:10:14+5:302014-05-22T05:10:14+5:30
राज्य पोलिसांचे हेरखाते आणि इंटेलिजन्स ब्युरोने घेतलेल्या ताज्या सुरक्षाविषयक आढाव्यानंतर राज्यातील दोन वरिष्ठ आयपीएस अधिकार्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे

राकेश मारिया, हिमांशू रॉय यांना झेड प्लस सुरक्षा
डिप्पी वांकाणी, मुंबई - राज्य पोलिसांचे हेरखाते आणि इंटेलिजन्स ब्युरोने घेतलेल्या ताज्या सुरक्षाविषयक आढाव्यानंतर राज्यातील दोन वरिष्ठ आयपीएस अधिकार्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना ते यापूर्वी राज्य दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख असताना ही सुरक्षा देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या हिमांशू रॉय यांनाही ही सुरक्षा देण्यात आली आहे. सामान्यपणे राज्यांचे मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, आणि कॅबिनेट मंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा दिली जाते. पंतप्रधानांना मिळणार्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या सुरक्षेच्या खालोखाल ही समजली जात असल्याने अनेक मंत्री आणि उच्चपदस्थ व्यक्ती आपल्या सत्तेचा दिखावा करण्यासाठी ती मिळवण्याच्या मागे असतात. या दर्जाच्या सुरक्षेबद्दल एका वरिष्ठ आयपीएस अधिका-याने सांगितले की यात शक्यतो एनएसजी कमांडो, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कोब्रा कमांडो असतात. ताफ्याच्या पुढे आणि मागे एक-एक पायलट कार असते. बरेचदा एक डॉक्टर आणि रुग्णवाहिकाही असते. सुरक्षा दिलेल्या व्यक्तीची गाडी बुलेटप्रुफ असते. त्याला घरीही चोवीस तास सुरक्षा मिळते. रॉय सध्या अतिरिक्त पोलीस महासंचालक, एटीएस या पदावर आहेत. रॉय यांच्यानंतर येणार्या या पदावरील कोणत्याही व्यक्तीला ही सुरक्षा पदसिद्ध प्रकारे दिली जाणार का, या प्रश्नावर अतिरिक्त आयुक्त (सुरक्षा) किशोर शेलार म्हणाले की या पदावर येणार्या प्रत्येकाला ही सुरक्षा मिळेलच असे नाही. पण रॉय यांना यापूर्वी असलेल्या पदावर आणि सध्या असलेल्या धोक्यावर आधारित ती देण्यात आली आहे. मारिया यांनी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे मोठे जाळे उघडकीस आणले होते. त्यामुळे त्यांना असलेला धोकाही लक्षात घेतला गेला आहे.