ऑनलाइन लोकमत
माजलगाव, दि. ३० - तालुक्यातील लऊळ येथे शुक्रवारी रात्री दहा वाजता जुन्या भांडणाची केस मागे घेत नाही म्हणून तरुणाचा धारदार चाकूने वार करुन निर्घृण खून केल्याची घटना घडली. या घटनेने खळबळ उडाली असून मारेकरी फरार आहे.
संतोष पुनाजी घडसिंग (३५, रा. लऊळ) असे मयताचे नाव आहे. तो ऊसतोड मजुरी करुन आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत असे. गावातीलच बाळू बाबू घडसिंग याच्याशी त्यांचा जुना वाद आहे. दोन वर्षांपूर्वी संतोषची आई विमल यांना बाळूने मारहाण केली होती. ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद होता. हे प्रकरण सध्या न्यायालयात सुरु आहे. दरम्यान, आठवड्यापूर्वी संतोष यास बाळूने दमदाटी केली होती. याप्रकरणी संतोषने ग्रामीण पोलिसांत तक्रार अर्जही केला होता. शुक्रवारी रात्री दहा वाजता बाळूने संतोषच्या घराजवळ जाऊन शिवीगाळ सुरु केली. संतोष बाहेर येताच त्याच्या पोटात चाकूने वार करुन आरोपी बाळूने पोबारा केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संतोषला नातेवाईकांनी माजलगाव येथील ग्रामीण ठाण्यात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिका-यांनी त्यास मयत घोषित केले. त्याच्या पश्चात वयोवृद्ध आई- वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. नातेवाईकांनी शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत मृतदेह ताब्यात घेतल नव्हता.
आरोपीच्या शोधार्थ पथके गेली असून त्याला लवरकच जेरबंद करु, असे ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक सुरेश चाटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
ग्रामीण ठाण्यात ठिय्या
शनिवारी सकाळी १ वाजता संतोषच्या नातेवाईकांनी ग्रामीण ठाण्यात धडक दिली. यावेळी संतोषच्या मारेकºयांना अटक झालीच पाहिजे, अशी मागणी लावून धरत ठिय्या दिला. पोलिसांच्या हलगर्जीपणाचाच हा बळी असल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला. संतोषच्या तक्रार अर्जावर कारवाई केली असती तर संतोष गेला नसता, अशी कैफियत मांडत त्याची आई विमल यांनी टाहो फोडला.
आरोपींवर अनेक गुन्हे
आरोपी बाळू घडसिंग याच्यावर यापूर्वी मारामारीचे विविध गुन्हे दाखल आहेत. महिन्यापूर्वीच तो एका गुन्ह्यातून जामिनावर सुटला होता. त्याला दारुचे व्यसन होते. नशेतच त्याने संतोष घडसिंग याचा काटा काढला, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.