तरुणाने भागवली गावाची तहान
By Admin | Updated: September 19, 2015 23:05 IST2015-09-19T23:05:16+5:302015-09-19T23:05:16+5:30
मराठवाड्यातील दुष्काळाच्या बातम्यांमुळे एक तरुण अस्वस्थ होतो... पावसाने दगा दिला, पण आपण तर या लोकांची साथ करू शकतो, असा विचार त्याच्या डोक्यात येतो...

तरुणाने भागवली गावाची तहान
- लक्ष्मण मोरे, पुणे
मराठवाड्यातील दुष्काळाच्या बातम्यांमुळे एक तरुण अस्वस्थ होतो... पावसाने दगा दिला, पण आपण तर या लोकांची साथ करू शकतो, असा विचार त्याच्या डोक्यात येतो... एका गावाला पिण्यासाठी पाणीच नाही, अशी माहिती त्याला कळते. अन् स्वत:च्या पगारातून पैसे देत हा तरुण गावासाठी महिनाभर पाण्याचा टँकर सुरू करण्याची जबाबदारी घेतो.
नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मोहीम उघडली आहे. त्याच धर्तीवर अनेक जण आपापल्या परीने मदतीसाठी पुढे येत आहेत. विशाल अशोक नेरकर यांनीही असाच एक छोटासा प्रयत्न केला आहे.
४०वर्षीय नेरकर पुण्यातील नऱ्हे येथील एका कंपनीत वित्त विभागात व्यवस्थापक आहेत. दुष्काळाच्या बातम्यांनी ते व्यथित झाले. काहीतरी केले पाहिजे, असे त्यांना वाटू लागले. दुष्काळग्रस्तांसाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी कार्यालयातील सहकाऱ्यांकडेही विचारणा केली. तेव्हा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पारनेर गावाला पिण्यासाठी पाणीच नसल्याची माहिती त्यांना समजली.
त्यांनी तातडीने पारनेरमधील विजयकुमार लाहोटी यांचा दूरध्वनी क्रमांक मिळवून संपर्क साधला. सुरुवातीला गावात धान्य, चारा पाठविण्याची त्यांनी तयारी दर्शविली. परंतु धान्यापेक्षा पाणी फार महत्त्वाचे आहे, असे लाहोटी यांनी सांगितले. त्यावर नेरकरांनी एक महिनाभर गावाला पाणी देण्याचे वचन दिले.
गावात लगेच टँकर सुरू करा, असे सांगत त्यांनी लाहोटी यांच्या बँक खात्यावर पहिल्याच दिवशी साडेसात हजार रुपये जमादेखील केले.
त्यानंतर लगेच गावात टँकर आला. १५ दिवसांपासून टँकरद्वारे पारनेरकरांची तहान भागविली जात आहे. आपल्यापर्यंत पोहोचणारे पाणी कोणाकडून येते, याची अनेक गावकऱ्यांना माहितीही नाही.
- नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मोहीम उघडली आहे. त्याच धर्तीवर विशाल अशोक नेरकर यांनीही असाच एक छोटासा प्रयत्न केला आहे.
पारनेरमध्ये पाण्याचा प्रश्न बिकट आहे. लोकांना आणि जनावरांना प्यायला पाणी नाही. विशाल नेरकरांनी दिलेली भेट अनमोल आहे. दररोज सात हजार लीटर पाणी गावामध्ये टँकरद्वारे दिले जाते. प्रत्येक गल्लीमध्ये एक दिवसाआड पाण्याचा टँकर पाठवून लोकांना समप्रमाणात पाण्याचे वाटप केले जात आहे.
- विजयकुमार लाहोटी, पारनेर, जि. जालना
मदत करण्यासाठी फार काही भव्यदिव्य करण्याची आवश्यकता नाही. कोणतीही यंत्रणा सोबतीला नसली, तरी आपल्या परीने छोटी मदत करता येते. दुष्काळग्रस्तही आपलेच बांधव आहेत. त्यांचे दु:ख सर्वांनी थोडेथोडे वाटून घेतले तर ते कमी होईल. - विशाल नेरकर