तरुणांनी चोरली एके-४७ रायफल !
By Admin | Updated: November 3, 2014 00:39 IST2014-11-03T00:39:40+5:302014-11-03T00:39:40+5:30
शहरात फिरायला आलेल्या तरूणांच्या वाहनांतील पेट्रोल संपल्यानंतर त्यांनी एका दुचाकीतून प्रेट्रोल तर चोरलेच मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगरक्षकाच्या बंद घरातून एके-४७ रायफलसह सोन्याचा

तरुणांनी चोरली एके-४७ रायफल !
२३ राऊंड झाडले : पोलिसाच्या बंद घरातच चोरी; दोघांना अटक
नरेश रहिले - गोंदिया
शहरात फिरायला आलेल्या तरूणांच्या वाहनांतील पेट्रोल संपल्यानंतर त्यांनी एका दुचाकीतून प्रेट्रोल तर चोरलेच मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगरक्षकाच्या बंद घरातून एके-४७ रायफलसह सोन्याचा हारही त्यांनी लांबविला. ११ दिवसांनंतर पोलिसांना या दोन तरुणांना जेरबंद केले.
आमगाव तालुक्यातील भोसा येथील मनोहर उर्फ गोलू योगेश्वर फरकुंडे (२२) हा २१ आॅक्टोबरला अभिषेक बहेकार (२२) या आपल्या मित्रासह गोंदियाला मोटारसायकलवर फिरण्यासाठी आला होता. दोघेही दुपारपासून सायंकाळपर्यंत शहरात फिरले. त्यामुळे त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपले. गावाला परतण्यासाठी कारंजा येथील हिमगिरी ले आऊट परिसरातील एका घरासमोरील दुचाकीमधील पेट्रोल चोरल्यावर त्यांना एक घर बंद दिसले. त्यांनी घराचे दार फोडून एक सोन्याचा हार, सहा ग्रॅम वजनाचे कानातील दोन टॉप्स व एके-४७ रायफल, दोन मॅग्जीन असा ऐवज पळविला. भोषाला जाण्यापूर्वी त्यांनी चोरीचे दागिणे व इतर ऐवज एका छोट्या पुलाच्या पाईपजवळील कचऱ्यात झाकून ठेवले होते. दिवाळीत फटाक्यांच्या आवाजातच त्यांनी गावातील एका मैदानावर एके-४७ मधून गोळ्या झाडून पाहिल्याचे पोलिसांना सांगितले. चोरी गेलेल्या ६० राऊंड पैकी २३ राऊंड नसल्याची सूत्रांची माहिती आहे.
पोलीसही होते काळजीत
जिल्हाधिकाऱ्यांचा अंगरक्षक ज्ञानेश्वर बकीराम औरासे यांच्या घरातून तरुणांनी ही चोरी केली. दोन मॅग्जीन म्हणजेच ६० राऊंड चोरीला गेल्याने पोलीसही काळजीत पडले होते. ११ दिवसांच्या तपासानंतर रविवारी पहाटे पोलिसांनी मनोहर फरकुंडेचे घर गाठले. त्याच्याकडून रायफल व इतर ऐवज जप्त करण्यात आल्ृाा. पोलिसांनी आधी त्याला न नंतर त्याच्या साथीदाराला अटक केली.
हवेतील गोळीबाराबाबत शंका
पोलिसांना आरोपींनी हवेत गोळीबार केल्याबाबत साशंकता आहे. कारण गोळीबार केल्याच्या परिसरात पोलिसांना बुलेट कॅप मिळालेल्या नाहीत.