युवक काँग्रेसचा मंत्रालयावर मोर्चा
By Admin | Updated: August 20, 2015 00:40 IST2015-08-20T00:40:25+5:302015-08-20T00:40:25+5:30
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे

युवक काँग्रेसचा मंत्रालयावर मोर्चा
मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांना त्यांचे न्याय्य हक्कांसाठी मिळवून देण्यासाठी, त्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठी तसेच दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून वाढीव मदत मिळावी आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष आ. अमरिंदर सिंग राजा ब्रार व महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून मंत्रालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.
प्रारंभी कार्यकर्ते आझाद मैदान येथील मुंबई विभागीय कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयात एकत्र जमले. मुंबई विभागीय कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केले. ब्रार म्हणाले, या सरकारने काळा पैसा बाहेर काढण्याच्या केलेल्या वल्गना फोल ठरत आहेत. परंतु मोदी सरकार या भ्रष्टाचारी मंत्र्यांना संरक्षण देण्याचे काम करीत आहे.
मोर्चाचा उद्देश मंत्रालयाला घेराव घालण्याचा होता. परंतु तेथे धडकण्यापूर्वीच आझाद मैदान येथे पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले. आले. या मोर्चात आ. नसीम खान, आ. वर्षा गायकवाड, आ. आनंदराव पाटील, आ. यशोमती ठाकूर, आ. हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे सरचिटणीस हिम्मत सिंह, गणेशकुमार यादव, रित्वीज जोशी, विदीत चौधरी यांच्यासह युवक कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)