युवा पिढी ‘शॉर्ट फिल्म्स’कडे वळतेय!
By Admin | Updated: July 4, 2016 02:42 IST2016-07-04T02:42:54+5:302016-07-04T02:42:54+5:30
नाटक, एकांकिका आणि सिनेमासोबतच हल्ली युवा पिढीला शॉर्ट फिल्म अर्थात लघुपटाचे वेड लागले आहे.

युवा पिढी ‘शॉर्ट फिल्म्स’कडे वळतेय!
जयेश पवार,
मुंबई- नाटक, एकांकिका आणि सिनेमासोबतच हल्ली युवा पिढीला शॉर्ट फिल्म अर्थात लघुपटाचे वेड लागले आहे. अगदी काहीच मिनिटांच्या व्हिडीओमधून मोठा सामाजिक संदेश देणारे लघुपट पाहण्यासोबतच ते तयार करायलादेखील तरुणांना आवडते. लघुपटप्रेमींना चालना मिळावी यासाठी मुंबई विद्यापीठात ‘५व्या मस्ट आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.
सम्यक कलांश आणि १०७.८ मस्ट रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठात ‘५वा मस्ट आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. ११ ते १३ जुलै या कालावधीत मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत हा महोत्सव होणार असून, या वेळी वेगवेगळ्या देशांतील सामाजिक विषयांवर प्रकाशझोत टाकणाऱ्या ४८ लघुपटांचे सादरीकरण होणार आहे.
विशेष म्हणजे महोत्सवादरम्यान लघुपट निर्माता व प्रेक्षक यांच्यात परिसंवाद साधला जाणार आहे. या लघुपट महोत्सवासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसून लघुपटात करिअर करू पाहणाऱ्या तरुणाईला लघुपटांविषयीचे मार्गदर्शनही या वेळी उपस्थित दिग्दर्शक, निर्मात्यांकडून मिळू शकेल.
लघुपट महोत्सवाचे हे पाचवे वर्ष आहे. लघुपटप्रेमींसाठी हक्काचे व्यासपीठ असून, याचा अधिकाधिक फायदा तरुणांनी घ्यावा. लघुपटाविषयी असणाऱ्या तुमच्या अनेक शंकांचे निरसन महोत्सवादरम्यान येणाऱ्या मान्यवरांकडून होईलच.
- शशांक बमनोलकर, अध्यक्ष, सम्यक कलांश