जूहू बीचवर आंघोळ करणं तरुणीला पडलं महाग
By Admin | Updated: July 9, 2016 21:41 IST2016-07-09T21:41:28+5:302016-07-09T21:41:28+5:30
एक जोडीच कपडे असलेल्या ३० वर्षीय तरुणीला जूहू बीचवर आंघोळ करणे भलतेच महागात पडले

जूहू बीचवर आंघोळ करणं तरुणीला पडलं महाग
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 09 - एक जोडीच कपडे असलेल्या ३० वर्षीय तरुणीला जूहू बीचवर आंघोळ करणे भलतेच महागात पडले. कपड्यांची एकच जोडी असल्याने तिने कपडे धुवून तेथील झुडपांवर वाळत ठेवले. अंघोळ झाल्यावर कपडे वाळण्याची वाट पाहत ती झुडपांच्या आडोशाला बसली. मात्र या दरम्यान अर्धनग्न अवस्थेतील तिच्यावर नागरिकांचे लक्ष गेले. आणि तिच्यावर अत्याचार झाल्याच्या अफवा थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहचल्याची घटना सांताक्रुझमध्ये घडली.
दोन वेळच्या अन्नाची भ्रांत त्यात अंग झाकण्यापूर्ती एक जोडी कपडे. अशात कचरा वेचून ही तरुणी फुटपाथवरच गुजारा करते. बरेच दिवस अंघोळ केली नाही म्हणून शनिवारी ती जुहू बीचवर पोहचली. तेथे एका आडोशाला कोणी नसल्याचे पाहून तिने अंघोळ करण्याचे ठरविले. दरम्यान अंगावर एकच जोडी कपडे असल्याने तिने अंगावरील कपडे धुवून तेथील झुडपांवर वाळत ठेवले. अंघोळ करुन बाहेर आल्यानंतर ही तरुणी कपडे वाळण्याची वाट पाहत तेथील झुडपांत लपून बसली. त्याच दरम्यान जुहू बीचवर पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांची नजर तिच्या हालचालींवर पडली. नागरिक जवळ येत आहेत हे पाहून ती आणखीन घाबरली.
तिची ती अवस्था पाहून तिच्यावर अत्याचार झाल्याच्या संशयाने जमलेल्या गर्दीपैकी एकाने पोलीस नियंत्रण कक्षास याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेतात सांताक्रुझ पोलीस तेथे दाखल झाले. काही कळण्याच्या आतच महिला पोलीसांनी गर्दी हटवित तरुणीला ताब्यात घेतले. मात्र आपल्यासोबत काय झाले हे तिला कळत नव्हते. जुहू बीचवर अंघोळ केल्याने पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतल्याच्या भितीने ती आणखीन घाबरली. तिला पोलीस ठाण्यात आणताच तिच्याकडे पोलिसांनी विचारपूस करण्यास सुरुवात केली. तिच्या चौकशीत वरील बाब उघड होताच पोलिसांनीही डोक्याला हात मारला. दरम्यान तिच्यावर औषधोपचार करुन तिला महिला सुधार गृहात पाठविण्यात आल्याची माहिती सांताक्रुझ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंतनू पवार यांनी दिली.